इक्वेस्ट्रीयन (घोडेस्वारी): भारताला ३६ वर्षांनंतर वैयक्तिक रौप्यपदक
भारताने ‘इक्वेस्ट्रीयन’ या घोडेस्वारीच्या प्रकारात २ रौप्यपदके पटकावली. यापैकी एक पदक हे वैयक्तिक स्वरूपाचे तर एक सांघिक प्रकारातील ठरले.
भारताला ३६ वर्षांनंतर या क्रीडाप्रकारात वैयक्तिक पदक मिळाले. यापूर्वी रघुवीर सिंग यांनी १९८२ साली नवी दिल्ली येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत वैयक्तिक गटातील दोन सुवर्णपदके जिंकली होती.
वैयक्तिक प्रकारात घोडेस्वार फौवाद मिर्झा याने हे यश संपादन केले. त्याने आणि त्याचा घोडा सिगनूर मेडिकोट याने २२.७० या वेळेत शर्यत पूर्ण केली.
या स्पर्धेत जपानच्या ओइवा योशीआकी याला पहिला क्रमांक मिळाला. तो आणि त्याचा घोडा बार्ट एल ज्रा यांनी ही शर्यत २२.६० एवढ्या वेळेत पूर्ण केली.
याशिवाय, भारताने सांघिक प्रकारातही इक्वेस्ट्रीयन जम्पिंगमध्येही रौप्यपदक मिळवले. जपान व थायलंड यांनी अनुक्रमे सुवर्ण व कांस्यपदक जिंकले.
भारतीय संघात राकेश कुमार, आशिष मलिक, जितेंदर सिंग व फौवाद मिर्झायांचा समावेश होता.
ॲथलेटिक्स: हिमा, द्युति आणि अनासला रौप्यपदक
४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत महिलांच्या गटात भारताच्या हिमा दासने रौप्यपदकाची कमाई केली. तिने ५०.७९ सेकंदात शर्यत पार करत राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली.
४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत पुरुष गटात भारताच्या मोहम्मद अनासनेही रौप्यपदकाची कमाई केली. अनासने ४५.४९ सेकंदात शर्यत पार करत राष्ट्रीय विक्रम रचला.
धावपटू द्युति चंदनेही १०० मीटर शर्यतीमध्ये रौप्यपदकावर नाव कोरले. १०० मी. अंतर तिने ११.३२ सेकंदात पार केले. तिचे सुवर्णपदक अवघ्या २ सेकंदाच्या फरकाने हुकले.
महिलांच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत २० वर्षांनंतर भारताने प्रथमच पदक मिळवले. भारताच्या रचिता मिस्रीने या प्रकारात शेवटचे १९९८मध्ये मिळवले होते.
भारताच्या लक्ष्मणन गोविंदनने १० हजार मीटर शर्यतीमध्ये कांस्यपदकाची कमाई केली होती. पण पाऊल बाहेर पडल्यामुळे त्याला हे कांस्यपदक गमवावे लागले.
ब्रिज: पुरुष आणि मिश्र सांघिकमध्ये भारताला कांस्यपदक
ब्रिज या खेळाचा आशियाई स्पर्धांमध्ये प्रथमच समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पुरुष आणि मिश्र सांघिकमध्ये भारताला कांस्यपदक मिळाले.
उपांत्य फेरीत भारताच्या पुरुष संघाला सिंगापूरने पराभूत केले. तर मिश्रमध्ये भारताला थायलंडकडून पराभव पत्करावा लागला.
पुरुष संघात जे. शिवदासानी, राजेश्वर तिवारी, अजय खरे, राजू तोलानी, डी. मजूमदार आणि सुमीत मुखर्जीचा समावेश आहे.
मिश्र संघात किरण नादार, हेमा देओरा, हिमानी खंडेलवाल, बी. सत्यनारायणा, गोपीनाथ मन्ना आणि राजीव खंडेलवालचा समावेश आहे.
केरळमधील पूरग्रस्तांना अॅपलकडून सहाय्य
अॅपल या अमेरिकन कंपनीने केरळमधील पूरग्रस्तांना ७ कोटी रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे.
घरे, शाळा यांच्या पुर्नबांधणीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला अॅपलकडून हा निधी देण्यात आला.
याशिवाय अॅपलने आपले होम पेज, अॅपस्टोअर आणि आयट्यून स्टोअर याठिकाणी ग्राहकांना केरळवासीयांना मदत करण्याचे आवाहनही केले आहे.
याबरोबरच मायक्रोसॉफ्टचे संस्थापक असलेल्या बिल गेट्स यांच्या बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनतर्फे केरळमधील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी ४ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
मुसळधार पावसाने केरळमधील जनजीवन विस्कळीत झाले असून, केरळमधील पूरप्रकोपात आतापर्यंत ३५०हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच २ लाख नागरिक बेघर झाले आहेत.
केरळमध्ये १०० वर्षातील सर्वात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. केरळच्या पूरग्रस्तांना जगभरातील लोकांनी मदतीचा हात दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा