चालू घडामोडी : १३ ऑगस्ट
निधन : माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी
- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचे १३ ऑगस्ट रोजी वयाच्या ८९व्या वर्षी निधन झाले.
- हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. मूत्रपिंडाच्या विकारामुळे त्यांच्यावर डायलिसिसच्या माध्यमातून उपचार सुरु होते.
- सोमनाथ चॅटर्जी यांचा जन्म २५ जुलै १९२९ रोजी आसाममधील तेजपूर येथे झाला. ते १९५७साली एमए झाले व इंग्लंडच्या मिडल टेम्पल शिक्षणसंस्थेतून बॅरिस्टरही झाले. ते प्रख्यात वकीलही होते.
- वीणापाणी देवी या त्यांच्या मातोश्री होत्या. त्यांचे वडील निर्मलचंद्र चॅटर्जी हे ख्यातनाम वकील आणि हिंदुत्ववादी होते. हिंदू महासभेचे संस्थापक अध्यक्षही होते.
- त्यांनी १९६८मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. २००८पर्यंत ते माकपमध्येच होते. ते माकपच्या केंद्रीय समितीचेदेखील सदस्य होते.
- १९७१मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले. त्यानंतर आतापर्यंत १० वेळा ते लोकसभेत खासदार म्हणून निवडून आले. २००४ ते २००९ या काळात ते लोकसभेचे अध्यक्ष होते.
- चॅटर्जी यांच्या निमित्ताने लोकसभेच्या सभापतीपदी पहिल्यांदाच डाव्या पक्षाच्या सदस्यांना संधी मिळाली होती.
- २००८मध्ये अणु कराराच्या मुद्द्यावरून माजी पंतप्रधान मनमोहनसिंह सरकारचा पाठिंबा डाव्या पक्षांनी काढून घेतल्यानंतर चॅटर्जी यांनाही लोकसभा अध्यक्षपद सोडण्यास सांगण्यात आले होते. मात्र, त्यांनी पद न सोडल्याने पक्षातून त्यांना निलंबित करण्यात आले होते.
- किपिंग द फेथ: मेमॉयर्स ऑफ अ पार्लमेंटरियन या त्यांच्या पुस्तकात त्यांनी लोकसभेतील आपल्या कार्यकाळातील अनेक अनुभव दिले आहेत.
- ते लोकसभा अध्यक्षपदी असताना जुलै २००६मध्ये लोकसभेसाठी विशेष वाहिनी सुरु झाली. या वाहिनीचे प्रक्षेपण २४ तास सुरु झाले.
- पश्चिम बंगालचे अनेक वर्षे मुख्यमंत्रीपद भूषविलेले नेते ज्योती बसू यांच्या निकटवर्तीयांमध्ये सोमनाथ चॅटर्जी यांचा समावेश होता.
- पश्चिम बंगालमध्ये नवीन उद्योग सुरू व्हावेत व गुंतवणूक व्हावी यासाठी ज्योती बसूंनी सोमनाथ चॅटर्जी यांना औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष बनविले होते.
- राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रश्नांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. काही संसदीय समित्यांचे अध्यक्ष किंवा सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.
- त्यांचा सर्वच राजकीय पक्षांत आदरयुक्त दबदबा होता. लोकसभा अध्यक्षपदाची मुदत २००९मध्ये संपल्यानंतर ते सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले होते.
- संपूर्ण राजकीय कारकिर्दीत चॅटर्जी यांना एकच पराभव पत्करावा लागला होता. १९८४मध्ये जादवपूर मतदारसंघातून त्यांना ममता बॅनर्जी यांनी मात दिली होती.
- सोमनाथ चॅटर्जी यांना १९९६ साली उत्कृष्ट संसदपटूच्या पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
देशातील ४०७ स्वच्छ रेल्वे स्थानकांची यादी जाहीर
- रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी १३ ऑगस्ट रोजी रेल्वे स्थानकांचे सर्वेक्षण करून तयार केलेला ‘स्वच्छ रेल्वे स्वच्छ भारत’ नावाचा अहवाल जाहीर केला.
- या अहवालात देशातील ४०७ रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ३६ स्थानकांचा समावेश आहे.
- अ-१ श्रेणीमध्ये पश्चिम रेल्वेचे वांद्रे स्थानक सातव्या क्रमांकावर असून देशातील प्रथम दहा स्थानकांत त्याला स्थान मिळाले आहे.
- याच श्रेणीत मुंबई-सीएसएमटी आणि दादर स्थानकांनी सुधारणा केली असून, या स्थानकांनी अनुक्रमे १३व्या आणि ४९व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. मागील वर्षी ही स्थानके अनुक्रमे ४९ व ७०व्या स्थानी होती.
- ५० कोटींपेक्षा जास्त प्रवासी ज्या रेल्वे स्थानकांतून प्रवास करतात अशी रेल्वे स्थानके अ-१ श्रेणीत आहेत. या श्रेणीत पहिल्या ३ क्रमांकांवर जोधपूर, जयपूर आणि तिरुपती रेल्वे स्टेशन आहेत.
- अ-१ या श्रेणीत पुणे (२५), नागपूर (३२), लोकमान्य टिळक टर्मिनस (३५), मुंबई सेंट्रल (४०), सोलापूर (४८), ठाणे (५७) आणि कल्याण (७४) या रेल्वे स्थानकांनाही स्थान मिळाले आहे.
- अ श्रेणी स्थानकांमध्ये देशातील ३३२ रेल्वे स्थानकांचा समावेश असून, त्यात पहिल्या ३ स्थानांवर अनुक्रमे राजस्थानचे मारवाड व फुलेरा आणि दक्षिणेतील वारांगल ही रेल्वे स्थानके आहेत.
- ए श्रेणीच्या रेल्वे स्थानकांमध्ये अव्वल १० मध्ये महाराष्ट्रातील एकाही स्थानकाचा समावेश नाही. यामध्ये बडनेरा, अकोला, नाशिक रोड ही स्थानके अनुक्रमे २६, २७ आणि ४१व्या स्थानी आहेत.
- ए १ श्रेणी आणि ए या दोन्ही श्रेणींमधील स्वच्छ स्थानकांमध्ये राजस्थानच्या सर्वाधिक स्थानकांचा समावेश आहे.
भारतातील हवेचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्नांची गरज
- शिकागो विद्यापीठ व हार्वर्ड केनेडी स्कूलच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार भारतातील हवेचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे.
- जागतिक आरोग्य संघटनेची स्वच्छ हवा मानके पाळल्यास भारतीयांचे आयुष्य ४ वर्षांनी वाढू शकते, असे त्यांच्या अभ्यासात म्हटले आहे.
- या संशोधकांनी त्यांच्या अभ्यासातून ‘अ रोडमॅप टुवर्ड्स क्लीनिंग इंडियाज एअर’ नावाचा अहवाल सादर केला आहे.
- या अहवालानुसार हवा प्रदूषणामुळे भारताला दरवर्षी ५०० अब्ज डॉलर्सचा फटका बसत असून त्यामुळे लाखो लोकांचे आयुष्यमान कमी झाले आहे, आजारी पडून लोकांचे मृत्यू होत आहेत.
- या संशोधकांनी याबाबत काही उपायही सुचवले असून त्यात धोरणात्मक बदलांचा समावेश आहे.
- जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार, पीएम २.५ कणांचे प्रतिघनमीटर प्रमाण वार्षिक सरासरीत १० मायक्रोग्रॅम तर २४ तासातील २५ मायक्रोग्रॅम असावे.
- तर पीएम १० कणांचे प्रमाण वार्षिक २० मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर तर २४ तासाला ५० मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर असावे.
- या निकषांनुसार हवेचा दर्जा साध्य करण्यात भारताला यश आले, तर भारतीयांचे आयुर्मान सरासरी ४ वर्षांनी वाढेल.
- शिवाय भारताचा पैसाही वाचेल. कारण प्रदूषणामुळे होणाऱ्या रोगांमुळे आर्थिक खर्च वाढत असतो. लोकांची उत्पादनक्षमता कमी होत असते.
- या अहवालानुसारभारतातील ६६० दशलक्ष लोक हे पीएम २.५ या कणांची धोकादायक पातळी असलेल्या भागात राहतात.
- हवेचा दर्जा सुधारण्यासाठी या अहवालात केलेल्या शिफारशी:-
- निरीक्षकांना प्रोत्साहन देऊन प्रदूषणावर देखरेखीच्या पद्धतीत सुधारणा करणे.
- प्रदूषणकारक घटकांमधून होणाऱ्या उत्सर्जनाबद्दल सातत्याने नियंत्रकांना माहिती पुरवणे.
- प्रदूषणाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्यास आर्थिक दंड लावणे.
- प्रदूषण करणाऱ्या घटकांची माहिती जाहीर करणे.
टोरंटो मास्टर्स टेनिस स्पर्धा : नदाल व हॅलेपला विजेतेपद
- स्पेनच्या राफेल नदालने ग्रीसच्या स्टीफानो त्सित्सिपासवर मात करीत टोरंटो मास्टर्स टेनिस स्पर्धेत अजिंक्यपदावर मोहोर उमटवली.
- नदालने त्सित्सिपासला ६-२, ७-६ (७-४) असे पराभूत केले. मास्टर्स दर्जाच्या स्पर्धामधील नदालचे हे ३३वे विजेतेपद आहे. तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्याचे हे ८०वे विजेतेपद आहे.
- महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात सिमोना हॅलेपने स्लोअन स्टीफन्सचा ७-६, ३-६, ६-४ असा पराभव करत विजेतेपद मिळवले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा