या आधी भारताला २००६मध्ये १ कांस्य, २०१०मध्ये १ कांस्य व १ रौप्यपदक व २०१४च्या इंचिऑन स्पर्धेमध्ये दोन कांस्यपदक मिळाले होते.
वुशू चिनी मार्शल आर्ट्सचा एक प्रकार आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन
राज्य सरकार पुरस्कृत ‘सेंद्रीय शेती विषमुक्त शेती’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन स्थापन्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
राज्यातील शेती क्षेत्रात रासायनिक खतांचा असंतुलित वापर तसेच किटकनाशकांचा अति आणि अनावश्यक वापर रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला मोठ्या प्रमाणावर चालना देण्यात येत आहे.
या मिशनच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीच्या प्रसाराबरोबरच त्यातील शेती मालाच्या वितरणासाठी व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. यामुळे विषमुक्त फळे, भाजीपाला आणि अन्नधान्य उपलब्ध होणार आहे.
पहिल्या टप्प्यात बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांपासून योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर जिल्ह्यांतही ही योजना राबविण्यात येईल.
यंदाच्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी सेंद्रिय शेती - विषमुक्त शेती या योजनेसाठी १०० कोटींची तरतूद केली होती.
त्यानुसार केंद्र शासनाच्या याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात सेंद्रिय शेतीसाठी राज्य पुरस्कृत स्वतंत्र योजना प्रस्तावित करण्यात येत आहे.
परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना
परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी खुल्या प्रवर्गाबरोबरच विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासवर्गातील (ओबीसी) विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.
राज्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे परदेशातील नामांकित विद्यापीठातील उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये म्हणून त्यांना राज्य सरकार शिष्यवृत्ती देणार आहे.
राज्य सरकारने यापूर्वी अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याची योजना सुरू केली आहे.
त्याच धर्तीवर आता खुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी चालू शैक्षणिक वर्षांपासून ही योजना सुरू करण्यात येत आहे. या योजनेसाठी अंदाजे २० कोटी रुपये खर्च येणार आहे.
या योजनेअंतर्गत दरवर्षी २० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. त्यापैकी १० विद्यार्थी खुल्या प्रवर्गातील असतील, तर उर्वरित १० विद्यार्थी इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गाचे असतील. मुलींसाठी ३० टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत.
विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये पदवी, पदव्युत्तर पदवी व पीएचडी या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
शिष्यवृत्तीचा कमाल कालावधी पीएचडीसाठी चार वर्षे, पदव्युत्तर पदवीसाठी दोन वर्षे आणि पदव्युत्तर पदविकेसाठी एक वर्ष इतका आहे.
खुल्या प्रवर्गातून लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचे आणि त्यांच्या पालकांचे सर्व प्रकारचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २० लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे, अशी अट घालण्यात आली आहे.
इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उन्नत गटात मोडत नसल्याचे (नॉन क्रिमीलेअर) प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे.
या योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी परदेशातील अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांच्या शिक्षणाचा फायदा राज्य सरकारला व्हावा या उद्देशाने शासन निर्णयामध्ये तशी तरतूद करण्यात येणार आहे.
निधन: काँग्रेस नेते गुरुदास कामत
काँग्रेसमधील अभ्यासू नेते गुरुदास कामत यांचे २२ ऑगस्ट रोजी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते.
काँग्रेसमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पडत संघटनकौशल्य सिद्ध केले होते. राज्यातील तळागाळातील कार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्क असायचा.
गुरुदास कामत यांचा जन्म ५ ऑक्टोबर १९५४ रोजी कर्नाटकातील अंकोला येथे झाला. त्यांनी मुंबईच्या आर. ए. पोदार महाविद्यालयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी मिळवली.
त्यांनी काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून काम केले असून, ते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे.
२००३-२००८ या काळात ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते. २०१३मध्ये अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या महासचिव पदावर त्यांची नियुक्ती झाली.
गुजरात, राजस्थान, दादरा नगर हवेली आणि दीव व दमण या राज्यांचे प्रभारी म्हणूनही त्यांनी काम केले.
कामत यांनी १९७२मध्ये विद्यार्थी चळवळीतून राजकारणात प्रवेश केला. १९७६मध्ये त्यांनी एनएसयूआयचे (कॉंग्रेसची विद्यार्थी शाखा) अध्यक्षपद भूषवले.
२००९ ते २०११ या कालखंडातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये त्यांनी गृहमंत्रालयाचे राज्यमंत्रीपद सांभाळले. त्यांच्याकडे माहिती-तंत्रज्ञान खात्याची अतिरिक्त जबाबदारीही होती.
मुंबईच्या पश्चिम उपनगरात गुरुदास त्यांचे वर्चस्व होते. ईशान्य मुंबई मतदारसंघातून १९८४मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेले.
त्यानंतर १९९१, १९९८, २००४ व २००९मध्येही निवडून ते गेले होते. २०१४मधील निवडणुकीत शिवसेनेचे गजानन किर्तीकर यांनी कामत यांचा पराभव केला होता.
२०१७मध्ये मुंबई काँग्रेसमधील वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला.
फोर्ब्सच्या यादीत पी व्ही सिंधूला सातवे स्थान
२०१८सालात सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंच्या फोर्ब्सने जाहीर केलेल्या यादीत भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूला सातवे स्थान मिळाले आहे.
पहिल्या १० जणांमध्ये सिंधू ही एकमेव बॅडमिंटन खेळाडू आहे. जाहीराती व इतर माध्यमातून सिंधूने २०१८मध्ये अंदाजे ६० कोटी रुपये कमावले आहेत.
अमेरिकेची टेनिसपटू सेरेना विल्यम्सने या यादीमध्ये पहिले स्थान पटकावले आहे. सेरेनाने यंदाच्या वर्षात जाहीरातींच्या माध्यमातून १०२ कोटी रुपये कमाई केली आहे.
बुंदेलखंड एक्स्प्रेस मार्गाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव
उत्तर प्रदेश सरकारने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ बुंदेलखंड एक्स्प्रेस मार्गाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची घोषणा केली आहे. या मार्गाचे नाव आत अटल पथ असे करण्यात येईल.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील काही योजनाही अटलजींच्या नावाने राबविण्याचे जाहीर केले आहे.
याशिवाय छत्तीसगडने नव्याने बांधलेली राजधानी नया रायपूरला अटलजींचे नाव देण्याची घोषणा केली आहे. या राजधानीचे नाव आता ‘अटलनगर’ असे करण्यात येणार आहे.
१९९८साली पोखरण येथे अणूचाचणी यशस्वी करण्यामध्ये वाजपेयी यांनी दिलेल्या योगदानाबद्दल ‘छत्तीसगड आर्म्ड फोर्सेस’ (सीएएफ) बटालियनला पोखरण बटालियन असे नाव देण्यात येणार आहे.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.
याशिवाय बिलासपूर विद्यापीठ, राजनांदगाव येथे बांधण्यात येत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालय, जांगिर चम्पा जिल्ह्यातील मारवा औष्णिक प्रकल्प व रायपूरमध्ये बांधकाम सुरु असलेल्या एक्स्प्रेस मार्गालाही अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात येणार आहे.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने राष्ट्रीय पातळीवरचा काव्यपुरसकार देण्यात येणार आहे.
याशिवाय मध्यप्रदेश शिक्षण मंडळाकडून येथील शाळांच्या पाठ्यपुस्तकात वाजपेयी यांच्या जीवनचरित्राचा समावेश करण्यात आला आहे.
चंद्रावर पाणी असल्याच्या माहितीला नासाकडून दुजोरा
भारताकडून १० वर्षांपुर्वी प्रक्षेपित करण्यात आलेल्या अंतराळ यान चांद्रयान-१ कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे नासाच्या शास्त्रज्ञांनी चंद्रावर गोठलेले पाणी आढळल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे.
‘पीएनएएस’ जर्नलमध्ये प्रकाशित लेखात नासाने चंद्राच्या सर्वात थंड आणि अंधाऱ्या ध्रुवीय क्षेत्रात गोठलेल्या अवस्थेत पाणी आढळल्याची माहिती दिली आहे.
शास्त्रज्ञांनी मून मिनरेलॉजी मॅपरकडून (एम३) प्राप्त झालेल्या आकड्यांचा वापर करत चंद्रावर गोठलेले पाणी उपलब्ध असल्याचे सांगितले आहे.
हे संशोधन ‘रिमोट डिटेक्शन ऑफ वाईडस्पेस इंडिजिनस वॉटर इन लुनार पायरोक्लास्टिक डिपोझिट’ या शीर्षकाखाली प्रकाशित करण्यात आले आहे.
Nice information sir
उत्तर द्याहटवा