भारताच्या पहिल्या जैव इंधनावर (बायो फ्युएल) चालणाऱ्या विमानाचे २७ ऑगस्ट रोजी चाचणी उड्डाण यशस्वी झाले.
स्पाईस जेट या भारताच्या विमान सेवा देणाऱ्या कंपनीने बम्बार्डियर क्यू ४०० या विमानाची जैविक इंधनावर यशस्वी चाचणी घेतली.
डेहराडून येथून उड्डाण केल्यानंतर हे विमान दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितरित्या उतरले.
या विमानात ७५ टक्के एव्हिएशन टर्बाइन फ्युएल तर २५ टक्के बायो फ्युएल (जैव इंधन) वापरण्यात आले होते.
डेहराडूनस्थित इंडियन इंस्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम या संस्थेने जेट्रोफा वनस्पतींच्या बियांपासून या विमानात वापरण्यात आलेल्या जैवइंधनाची निर्मिती केली होती.
नागरी हवाई वाहतूक संचलनालय (डीजीसीए) व स्पाइसजेटच्या अधिकाऱ्यांसह एकूण २० जणांनी या विमानातून प्रवास केला. सुमारे २५ मिनिटे हे विमान आकाशात होते.
या यशस्वी चाचणीबरोबरच जैविक इंधनावर विमानाचे यशस्वी उड्डाण करणाऱ्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे.
चालू वर्षाच्या सुरुवातीला जगातील पहिल्या जैविक इंधनावर चालणाऱ्या विमानाने लॉस एंजेलिसपासून मेलबर्नपर्यंत उड्डाण केले होते.
आतापर्यंत कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या विकसित देशांनीच जैविक इंधनावर विमान उड्डाण करण्याचे तंत्र विकसित केले होते. त्यानंतर आता भारतानेही हे आव्हान यशस्वीरित्या पेलले आहे.
जैविक इंधनावर विमान चालवून विमान संशोधनामध्ये भारताने मोठी झेप घेतली आहे. तसेच जैव इंधनावर विमान उड्डाण करणारा भारत हा पहिला विकसनशील देश ठरला आहे.
या इंधन प्रकाराची विमानोड्डाण चाचणी यशस्वी झाल्यानंतर याचा देशांतर्गत वापर वाढवण्यावर भर देण्यात येऊ शकतो.
आशियाई क्रीडा स्पर्धा: नववा दिवस
भालाफेक: भारतीय चमूचा ध्वजधारक नीरज चोप्राला सुवर्णपदक
भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने ८८.०६ मीटरची सर्वोकृष्ट फेक करत भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवून दिले.
याबरोबरच आशियाई स्पर्धांमध्ये भालाफेक या क्रीडाप्रकरात भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा नीरज पहिलाच खेळाडू ठरला आहे. याआधी भारताला या स्पर्धेत भालाफेक कधीही कमावता आले नव्हते.
याशिवाय या फेकीमुळे त्याने राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. त्याची वैयक्तिक सर्वोकृष्ट कामगिरी ठरली. नीरजचे हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक आहे.
२०१६मध्ये नीरजने २० वर्षांखालील विश्व कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत जागतिक विक्रमासह सुवर्णपदक मिळवले होते.
त्यानंतर त्याने २०१७मध्ये भुवनेश्वर येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत व गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावले होते.
हरयाणातील पानिपत येथे जन्मलेल्या नीरजला यंदा आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी गेलेल्या भारतीय चमूचा ध्वजवाहक होण्याचा मान मिळाला होता.
अॅथलेटीक्स: नीना, सुधा आणि अय्यास्वामी यांना रौप्यपदक
महिला लांबउडीपटू नीना वरकिलने ६.५२ मी. एवढी लांब उडी मारत भारताला रौप्यपदक जिंकवून दिले.
नीनाचे आशियाई क्रीडा स्पर्धेतील हे पहिले पदक आहे. यापूर्वी नीनाने २०१७साली भुवनेश्वर येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते.
भारताची युवा धावपटू सुधा सिंगने स्टीपलचेस ३००० मी. या प्रकारात सुधाने दमदार कामगिरी करत देशाला आज रौप्यपदक पटकावून दिले.
हे अंतर ९ मिनिटे ४० सेकंद एवढ्या वेळेत पूर्ण केले. तिचे सुवर्णपदक फक्त चार सेकंदांनी हुकले.
सुधाने यापूर्वी २०१०साली झालेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. तसेच तिने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत २०१७साली रौप्यपदक पटकावले होते.
पुरुषांच्या ४०० मीटर अडथळा शर्यतीत धरुण अय्यास्वामीने राष्ट्रीय विक्रमासह रौप्यपदकाची कमाई केली. धरुणने ४८.९६ सेकंद वेळ नोंदवून दुसरे स्थान मिळवले.
धरुणने मार्च २०१८मध्ये फेडरेशन कपमध्ये ४९.४५ सेकंद वेळ नोंदवून राष्ट्रीय विक्रम रचला होता.
बॅडमिंटन: सायना नेहवालला कांस्यपदक
बॅडमिंटनच्या महिला एकेरीत सायना नेहवालने कांस्यपदक पटकावले. उपांत्य फेरीत जागतिक क्रमावारीत अव्वल असलेल्या चीनी ताइपेच्या ताइ जू यिंगने तिचा पराभव केला.
१९८२नंतर आशियाई स्पर्धांमध्ये भारताला बॅडमिंटनमध्ये पदक मिळवून देणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. यापूर्वी १९८२मध्ये सय्यद मोदीला एकेरीत कांस्यपदक मिळाले होते.
याशिवाय आशियाई स्पर्धांमध्ये बॅडमिंटनच्या अंतिम स्पर्धेपर्यंत पोहोचणारी सिंधू ही पहिली भारतीय ठरली आहे. तिने जपानच्या यामागुचीचा पराभव करत अंतिम फेरी गाठली.
रिलायन्स जिओचा महसुली उत्पन्नाच्या बाबतीत देशात दुसरा क्रमांक
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ इन्फोकॉमने दूरसंचार क्षेत्रात महसुली उत्पन्नाच्या बाबतीत व्होडाफोनला मागे टाकत देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे.
ग्रामीण भागात केलेली दमदार कामगिरी आणि कमी किमतीत दिल्या जाणाऱ्या सेवांमुळे जिओच्या महसुलात मोठी वाढ झाली आहे.
जिओने २ वर्षांपूर्वी ४जी सेवा देण्यास सुरुवात केली. दोनच वर्षांच्या कालावधीत रिलायन्स जिओने महसुली उत्पन्नाच्या बाबतीत मोठी झेप घेतली आहे.
देशातील दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपन्यांचा महसूल लक्षात घेता, त्यातील रिलायन्स जिओचा वाटा २२.४ टक्के इतका आहे.
महसुलाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या भारती एअरटेलचा महसुली उत्पन्नातील वाटा घसरला असून, तो सध्या ३१.७ टक्के इतका आहे.
व्होडाफोनचा महसुली उत्पन्नातील वाटा १९.३ टक्के, तर कुमार मंगलम बिर्ला यांच्या आयडियाचा वाटा १५.४ टक्के आहे.
टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरटी ऑफ इंडियाने (ट्राय) ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
लवकरच आयडिया आणि व्होडाफोनच्या एकत्रीकरणाची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. या कंपन्या एकत्र आल्याने नव्याने तयार होणारी कंपनी देशातील सर्वांत मोठी कंपनी ठरणार आहे.
या नव्या कंपनीचे एकूण महसुली उत्पन्न ३५ टक्के असेल. त्यानंतर एअरटेल दुसऱ्या आणि जिओ तिसऱ्या क्रमांकावर जाईल.
निधन: अमेरिकेचे युद्धनायक जॉन मॅक्केन
व्हिएतनाम युद्धामध्ये अमेरिकेचे हिरो मानले गेलेले आणि अमेरिकेचे विद्यमान सिनेटर जॉन मॅक्केन यांचे दीर्घ आजारानंतर २७ ऑगस्ट रोजी वयाच्या ८१व्या वर्षी निधन झाले.
मॅक्केन यांना युद्धनायक (वॉर हीरो) म्हणून ओळखले जाते. ५ वर्षे ते व्हिएतनाममध्ये तुरुंगात होते. तेथे त्यांच्यावर अन्ववित अत्याचार करण्यात आले होते.
व्हिएतनाम युद्धात त्यांनी अमेरिकेसाठी बाजूने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांच्या युद्धतंत्रामुळेच त्यांना अमेरिकेत हिरो मानले गेले होते.
मॅक्केन दोनवेळा अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे दावेदार राहिले होते. २००८च्या निवडणुकीत मॅक्केन हे बराक ओबामा यांच्याकडून पराभूत झाले होते.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कडवे ते टीकाकार मानले जायचे. अमेरिकेच्या प्रभावशाली सिनेटर्सपैकी एक असलेले मॅक्केन हे भारतमित्र होते.
त्यांची कारकीर्द नौदलातून सुरू झाली. ॲरिझोनातून पहिल्यांदा १९८६मध्ये त्यांची सिनेटर म्हणून निवड झाली. शेवटपर्यंत ते सिनेटर होते इतका लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास होता.
लोकशाही मूल्यांचा खंदा पुरस्कर्ता, लढवय्या राजकारणी अशी त्यांची ओळख होती. त्यांनी युद्ध, शांतता, देशाची स्थिती या मुद्यांवर उघडपणे मत मांडले.
डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांना ‘आयर्नमॅन’ हा किताब
फ्रान्समधील विची येथे पार पडलेल्या ‘आयर्नमॅन २०१८’ या स्पर्धेचा किताब ५२ वर्षीय नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी पटकावला.
सायकलिंग, स्विमिंग आणि रनिंग अशा तीनस्तरावर होणारी अत्यंत खडतर व अवघड अशी ही स्पर्धा जागतिक स्तरावर मानाची समजली जाते.
यामध्ये स्पर्धकाला निर्धारित १६ तासांच्या कालावधीमध्ये १८० किमी अंतराची सायकलिंग, त्यानंतर ४ किमी अंतराचे पोहणे (स्विमिंग) आणि त्यानंतर ४२ किमी अंतर धावावे (रनिंग) लागते.
यामध्ये नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. सिंगल यांनी १५ तास १३ मिनिटांमध्ये अंतर पार करीत ‘आयर्नमॅन’ हा किताब पटकावला.
या स्पर्धेसाठी जगभरातून सुमारे १३०० स्पर्धक सहभागी झाले होते. यात महाराष्ट्र पोलीस दलातून डॉ. रवींद्रकुमार सिंगल हे एकमेव आयपीएस अधिकारी सहभागी झाले होते.
मेजर गोगोई यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई
श्रीनगरमधील एका हॉटेलबाहेर तरुणीसोबत असताना अटक करण्यात आलेल्या मेजर लितुल गोगोई यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.
कर्तव्यावर असताना गोगोई त्यांना नेमून देण्यात आलेल्या हद्दीच्या बाहेर होते. त्यामुळे न्यायालयाने त्यांना दोषी ठरविले आहे.
याशिवाय मेजर गोगोई यांनी त्यांना देण्यात आलेल्या सूचनांविरोधात जाऊन स्थानिकांनी संपर्क वाढवण्याचा प्रयत्न केल्यानेही न्यायालयाने त्यांना दोषी ठरविले आहे.
२३ मे रोजी त्यांना श्रीनगरमधील हॉटेलमध्ये एका तरुणीसोबत जाण्याचा प्रयत्न करत असताना ताब्यात घेण्यात आले होते.
या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी ब्रिगेडिअर दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली न्यायालयीन चौकशी समिती नेमण्यात आली होती.
या समितीने त्यांना दोषी मानत लष्कराला शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश दिले आहेत. चौकशीदरम्यान, संबंधित दस्ताऐवजांची तपासणी केल्यानंतर इतर लष्करी अधिकाऱ्यांचे जबाबही नोंदवण्यात आले होते.
मेजर गोगोई दोषी ठरल्याने त्यांच्यावर आर्मी अॅक्टनुसार दंडात्मक कारवाई होऊ शकते किंवा कोर्ट मार्शल होण्याची शक्यताही आहे.
यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्या एका स्थानिक तरुणाला लष्कराच्या जीपला बांधल्याने मेजर गोगोई वादाच्या भोवऱ्यात अडकले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा