चालू घडामोडी : २९ ऑगस्ट

आशियाई क्रीडा स्पर्धा: अकरावा दिवस

  • अॅथलेटीक्स: तिहेरी उडीमध्ये अरपिंदर सिंगला सुवर्णपदक
  • तिहेरी उडीमध्ये अरपिंदर सिंगने भारताला सुवर्णपदक जिंकवून दिले. त्याने १६.७७ मी. लांब उडी मारत सुवर्णपदकावर नाव कोरले. या स्पर्धेतील हे भारताचे दहावे सुवर्णपदक आहे.
  • भारताने आशियाई स्पर्धेतील तिहेरी उडीत ४८ वर्षांनंतर सुवर्णपदक पटकावले. यापूर्वी महिंदर सिंग याने १९७०मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.
  • अॅथलेटीक्स: हेप्टॉथ्लॉनमध्ये स्वप्ना बर्मनला सुवर्णपदक
  • अॅथलेटीक्समधील हेप्टॉथ्लॉन प्रकारामध्ये भारताच्या स्वप्ना बर्मनने ६०२६ गुण मिळवत सुवर्णपदक जिंकले. आशियाई क्रीडा स्पर्धेतील हे ११वे सुवर्णपदक आहे.
  • पात्रता फेरीमधील पहिल्या दोन (भालाफेक आणि उडी) निकषांमध्ये मोठी आघाडी घेत पहिले स्थान कायम राखल्यानंतर स्वप्नाने ८०० मीटरची शर्यत पूर्ण करून सुवर्णपदकावर नाव कोरले.
  • पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वप्नाला १० लाख रुपयांचे इनाम जाहीर केले असून सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली आहे.
  • हेप्टॉथ्लॉन या खेळात अॅथलेटीक्सच्या ७ प्रकारांचा समावेश असतो. यामध्ये २०० मी. आणि ८०० मी. धावण्याची शर्यत होते. तसेच १०० मी. अडथळ्याची शर्यत खेळवली जाते. त्यानंतर उंच उडी. लांब उडी, गोळाफेक आणि भालाफेक या प्रकारांचा समावेश असतो.
  • अॅथलेटीक्स: द्युती चंदला २०० मी. धावण्याच्या शर्यतीमध्ये रौप्य
  • भारताची धावपटू द्युती चंदने महिलांच्या २०० मी. धावण्याच्या शर्यतीमध्ये रौप्यपदक जिंकले. तिने २०० मी. अंतर २३.२० सेकंदांमध्ये पूर्ण केले.
  • आशियाई क्रीडा स्पर्धेतील तिचे हे दुसरे पदक ठरले. याआधी द्युतीने १०० मी. शर्यतीमध्येही रौप्यपदक जिंकले आहे.
  • एकाच आशियाई स्पर्धेत १०० मी. व २०० मी. शर्यतीत पदक जिंकणारी ती चौथी भारतीय खेळाडू ठरली. याआधी लेव्ही पिंटो, आर. ज्ञानसेखरण, पी.टी.उषा यांनी हा विक्रम केला होता.
  • आयएएएफने २०१४मध्ये आपल्या हायपरअँड्रोगेनिझम नियमांअंतर्गत दुतीला निलंबित केले होते. यामुळे तिला राष्ट्रकुल स्पर्धेला मुकावे लागले होते. या निर्णयाविरुद्ध न्याय मागितल्यानंतर तिचे पुनरागमन झाले.
  • टेबल टेनिस: भारताला मिश्र दुहेरीमध्ये कांस्यपदक
  • भारताची मिश्र दुहेरी जोडी मनिका बत्रा व अचंथा शरथ कमल यांना उपांत्य फेरीत ऐतिहासिक कांस्यपदक जिंकले.
  • गेल्या ६० वर्षांतील भारताचे टेबल टेनिसमधील हे पहिलेच पदक आहे. यापूर्वी भारताच्या पुरुष संघाने याच स्पर्धेत कांस्यपदक मिळवले आहे.
  • उपांत्य सामन्यात भारतीय जोडीला चीनकडून ४-१ ने पराभव स्विकारावा लागला, यामुळे भारताला कांस्यपदकावर समाधान मानावं लागले.
  • हॉकी: भारतीय महिला हॉकी संघ अंतिम फेरीत
  • आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला हॉकी संघाने २० वर्षानंतर अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. याआधी १९९८साली भारतीय महिला हॉकी संघाने ही कामगिरी केली होती.
  • भारतीय संघाने चीनचा १-० ने पराभव करत अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केलं. अंतिम फेरीत भारताचा सामना जपानसोबत होणार आहे.

नोटाबंदीमुळे बाद झालेल्या ९९.३० टक्के नोटा आरबीआयकडे जमा

  • नोटाबंदीच्या निर्णयानंतर चलनातून बाद झालेल्या ९९.३० टक्के नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे जमा झाल्याची माहिती आरबीआयच्या २०१७-१८च्या वार्षिक अहवालातून समोर आली आहे.
  • याचा अर्थ नोटाबंदीमुळे चलनातून बाद झालेल्या १५.४४ लाख कोटी रुपयांच्या नोटांपैकी १५.३१ लाख कोटी रुपये आरबीआयमध्ये परत आले आहेत. केवळ १३ हजार कोटी रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे आल्या नाहीत.
  • नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेला ५०० व २००० रुपयांच्या नवीन नोटांच्या छपाईसाठी ७,९६५ कोटी रुपये खर्च करावे लागले होते.
  • काळा पैसा संपुष्टात यावा, दहशतवाद्यांची आर्थिक रसद बंद व्हावी, डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ व्हावी व रोखीचे प्रमाम कमी व्हावे अशा बहुउद्देशीय कारणासाठी नोव्हेंबर २०१६मध्ये मोदी सरकारने नोटाबंदीचे पाऊल उचलले होते.
  • नोटाबंदीमुळे मोठ्या प्रणाणात काळा पैसा बँकेत परत येणार नाही, असा दावा करण्यात येत होता. मात्र ९९ टक्क्यांहून अधिक नोटा परत आल्याने नोटाबंदीच्या निर्णयाचा नेमका फायदा काय झाला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
  • आरबीआयच्या वार्षिक अहवालातील ठळक मुद्दे:
  • गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा.
  • देशात गुंतवणूक व उत्पादनाचे प्रमाण वाढले असून महागाई काही प्रमाणात कमी झाली आहे.
  • अप्रत्यक्ष कर प्रणालीत जीएसटी मैलाचा दगड ठरला.
  • मार्च २०१८ अखेरीस भारतीय बाजारपेठेमध्ये १८ लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात.
  • आधीच्या वर्षाच्या तुलनेत चलनात असलेल्या नोटांचे मूल्य ३७.७ टक्क्यांनी वाढून १८.०४ लाख कोटी रुपये झाले.
  • जास्त किमतीच्या म्हणजे २००० रुपयांच्या नोटा चलनात आणल्यामुळे प्रत्यक्ष नोटांच्या संख्येतील वाढ फक्त २ टक्क्यांची आहे.
  • १८ लाख कोटी रुपयांमध्ये ५०० व २००० रुपयांच्या नोटांचा वाटा ७२.७ टक्के. तर २०० रुपयांच्या नोटांचे प्रमाण २.१ टक्के.
  • २०१८-१९मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ ७.४ टक्क्यांनी होईल असा अंदाज.

निधन: ज्येष्ठ दाक्षिणात्य अभिनेते नंदमुरी हरिकृष्णा

  • ज्येष्ठ अभिनेते आणि तेलगू देसम पार्टीचे नेते नंदमुरी हरिकृष्णा यांचे अपघाती २९ ऑगस्ट रोजी निधन झाले.
  • हरिकृष्णा हे आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे मेहुणे आणि माजी मुख्यमंत्री आणि अभिनेते एन. टी. रामाराव यांचे पुत्र होते.
  • हरिकृष्णा यांचे दोन मुलगे ज्युनिअर एनटीआर आणि नंदमुरी कल्याणराम हे तेलुगू चित्रपट सृष्टीमधील आघाडीचे नट आहेत.
  • नलगोंडा जिल्ह्यातील नरकटपल्ली-अदांकी महामार्गावरून जात असताना हरिकृष्णा यांच्या वाहनाला अपघात झाला होता.
  • या अपघातात गंभीर जखमी झालेल्या हरिकृष्णा यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली.

निधन: अमेरिकेचे लोकप्रिय नाटककार नील सायमन

  • अमेरिकेचे सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय नाटककार तसेच पटकथा लेखक नील सायमन यांचे २६ ऑगस्ट रोजी निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते.
  • त्यांचा जन्म ४ जुलै १९२७ रोजी न्यूयॉर्क येथे झाला. ‘कम ब्लो युअर हॉर्न’ (१९६१) हे त्यांचे पहिले नाटक. याचे ६८० हून अधिक प्रयोग झाले आहेत. त्यानंतर त्यांनी एकूण ३० नाटके लिहिली.
  • त्यांना अमेरिकी नाटकांना दिले जाणारे ‘टोनी पुरस्कार’ तीनदा आणि १९७५साली ‘टोनी कारकीर्द गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
  • अमेरिकन रायटर्स गिल्डतर्फेही त्यांचा गौरव करण्यात आला होता. १९९१सालच्या ‘लॉस्ट इन याँकर्स’ या नाटकासाठी ‘पुलित्झर पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्यांना चारवेळा ऑस्करसाठी नामांकनही मिळाले होते.

वाजपेयींचे राजघाटाजवळ समाधीस्थळ उभारणार

  • दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे भव्य स्मारक महात्मा गांधी यांचे समाधीस्थळ असलेल्या राजघाटाजवळ उभारण्याचा निर्णय भाजपा सरकारने घेतला आहे.
  • याच ठिकाणी १७ ऑगस्ट रोजी वाजपेयी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. या समाधी स्थळाचे काम १५ सप्टेंबरपासून सुरू होईल.
  • या समाधी स्थळाची उभारणी २५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. २५ डिसेंबरला वाजपेयी यांची ९४वी जयंती आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा