डॉलरसमोर भारतीय रुपयाने ऐतिहासिक निचांकी पातळी गाठली असून १४ ऑगस्ट रोजी डॉलरच्या तुलनेत रुपया ७०.०७ रुपयांवर घसरला आहे.
याच आठवड्यात डॉलर ७२ रुपयांवर व त्यानंतर वर्षअखेरीस ८०च्यावर जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
या वर्षात रुपया आशियातील सर्वाधिक कमकुवत चलन ठरले आहे. पहिल्या ८ महिन्यांत रुपयाच्या मूल्यात ७ टक्के कपात झाली.
याचा परिणाम इंधनदरांवर होतो. गेल्या आठवड्यात डॉलर ६८ दरम्यान असताना खनिज तेल ७२.४० डॉलर प्रति बॅरल (१५९ लिटर) होते. त्यावेळी भारतीय तेल कंपन्यांना ३०.९६ रुपये प्रति लीटरने खनिज तेल खरेदी करावे लागत होते.
आता डॉलर ७०च्यावर गेल्यानंतर खनिज तेलसुद्धा ७२.९५ डॉलर प्रति बॅरल झाले. तेल खरेदी करण्यासाठी आता ३२.४२ रुपये प्रति लीटर मोजावे लागत आहेत.
भांडवली बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचे दुर्लक्ष आणि खनिज तेलाच्या दरांचा विपरित परिणाम स्थानिक चलनावर झाल्याचे निरिक्षण तज्ञांनी नोंदविले आहे.
उषा अनंतसुब्रमण्यन यांचे अखेर निलंबन
पंजाब नॅशनल बँकेच्या हिरे व्यापारी नीरव मोदी १४ हजार कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी चर्चेत आलेल्या या बँकेच्या तत्कालिन अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक उषा अनंतसुब्रमण्यन यांना सरकारने अखेर निलंबित केले आहे.
याचबरोबर याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यास सरकारने केंद्रीय अन्वेषण विभागाला परवानगी दिली आहे. त्यामुळे अनंतसुब्रमण्यम या आणखी अडचणीत आल्या आहेत.
उषा अनंतसुब्रमण्यन या सध्या अलाहाबाद बँकेच्या अध्यक्षा होत्या. मात्र पंजाब नॅशनल बँकेतील फसवणूक प्रकरण उघडकीस आल्यानंतर गेल्या तीन महिन्यांपूर्वी त्यांचे या बँकेवरील अधिकार गोठविण्यात आले होते.
यानुसार बँकेच्या अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक पदावर कायम राहूनही त्यांना निर्णय मर्यादा होत्या. आता त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
पीएनबीच्या काही अधिकाऱ्यांनी नियम मोडून मोदी व चोक्सीला कर्जासाठीची १४,००० कोटी रुपयांची हमीपत्र दिली होती. बँक अधिकारी व मोदीच्या संगनमताने हा प्रकार २०११पासून सुरू होता.
या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने उषा यांचे नाव आरोपपत्रात नोंदविले आहे. याच प्रकरणात पीएनबीचे कार्यकारी संचालक संजीव शरण यांच्याविरुद्धही कारवाई सध्या सुरू आहे.
उषा या पंजाब नॅशनल बँकेत जुलै २०११ ते नोव्हेंबर २०१३ या कालावधीमध्ये कार्यकारी संचालक होत्या. तर, ऑगस्ट २०१५ ते मे २०१७ दरम्यान त्या बँकेच्या सीईओ होत्या. त्यानंतर त्यांची नियुक्ती अलाहाबाद बँकेत करण्यात आली.
शहीद रायफलमन औरंगजेब यांना शौर्य चक्र
केंद्रीय गृह मंत्रालयाने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला सीआरपीएफच्या ५ आणि सैन्य दलातील १४ जवानांना १५ ऑगस्ट रोजी शौर्य चक्र देऊन गौरविणार असल्याचे जाहीर केले.
याबरोबरच शिपाई ब्रह्मपाल सिंह यांना मरणोत्तर कीर्ती चक्र आणि दोन पोलिसांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित केले जाणार आहे.
शौर्य चक्राने गौरविण्यात येणाऱ्या जवानांमध्ये अतिरेक्यांनी अपहरण करून हत्या करण्यात आलेले शहीद रायफलमन औरंगजेब आणि मेजर आदित्य कुमार यांचा समावेश आहे.
१५ जून रोजी ईद साजरी करण्यासाठी घरी जात असताना अतिरेक्यांनी औरंगजेब यांचे अपहरण करून, त्यांची गोळ्या घालून हत्या केली होती.
याशिवाय देशातील एकूण ९४२ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी विविध पदके जाहीर करण्यात आली आहेत.
देशभरातून शौर्यासाठी २ राष्ट्रपती पोलिस पदके व १७७ पोलिस पदके, तर उत्कृष्ट सेवेसाठी ८८ राष्ट्रपती पोलिस पदके आणि ६७५ पोलिस पदके जाहीर झाली आहेत.
पदक विजेत्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील ५१ जणांचा समावेश आहे.
या जवानांना मिळणार शौर्यचक्र: रायफलमन औरंगजेब (मरणोत्तर), मेजर आदित्य कुमार, लेफ्टनंट कर्नल अर्जुन शर्मा, मेजर पवन गौतम, कॅप्टन जयेश राजेश वर्मा, कॅप्टन कनिंदर पालसिंह, नायब सुभेदार अनिल कुमार दहिया, नायब सुभेदार विजय कुमार यादव, हवालदार कुल बहादूर थापा, हवालदार जावेद अहमद भट्ट, गनर रंजितसिंह, रायफलमन निलेशभाई, रायफलमन जयप्रकाश ओरांव
राहण्यासाठी सर्वात उत्तम शहरांमध्ये पुणे प्रथम स्थानी
केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाने देशात राहण्यासाठी सर्वात उत्तम अशा शहरांची यादी(इज ऑफ लिव्हिंग इन्डेक्स) जाहीर केली असून, त्यात पुणे शहराने प्रथम स्थान पटकावले आहे.
पुण्यापाठोपाठ या यादीत नवी मुंबई, मुंबई या शहरांनीही क्रमश: दुसरे आणि तिसरे स्थान मिळवले आहे. तर ठाणे शहर सहाव्या स्थानी आहे.
यासाठी देशातील १११ शहरांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात असून, शहरांची निवड करताना संस्था आणि प्रशासन, सामाजिक पायाभूत सुविधा, शिक्षण आणि आरोग्य, त्याचबरोबर आर्थिक घटक याचा विचार करण्यात आला.
शहरांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन व शाश्वत विकास यांच्या माध्यमातून लोकांच्या उंचावलेल्या जीवनमानाचे मूल्यमापन या सर्वेक्षणात करण्यात आले.
सुरूवातीला या सर्वेक्षणात ११६ शहरांचा समावेश करण्याची योजना होती. यामध्ये सर्व १०० स्मार्ट शहर आणि ज्या शहरांची लोकसंख्या १० लाखांहून अधिक होती अशांचा समावेश करण्यात आला होता.
परंतु हावडा, न्यू टाऊन कोलकाता आणि दुर्गापूरने या सर्व्हेत भाग घेण्यास नकार दिला. तर नवीन रायपूर आणि अमरावती (आंध्रप्रदेश) हे सर्वेक्षणाच्या निकषात बसू शकले नाहीत.
या यादीत चेन्नईला १४वा क्रमांक मिळाला आहे. देशाची राजधानी दिल्ली थेट ६५व्या क्रमांकावर घसरली आहे.
क्रमवारीचे निकष:
जून २०१७मध्ये सुलभ जीवन निर्देशांकाचे निकष निश्चित. त्यानुसार १९ जानेवारी २०१८ पर्यंत शहरांचे संस्थात्मक, सामाजिक, आर्थिक आणि भौतिक अशा चार मुख्य निकषांवर मूल्यांकन.
संस्थात्मक आणि सामाजिक आधारासाठी प्रत्येकी २५ गुण. आर्थिक आधारासाठी ५ गुण तर भौगोलिक आधारासाठी ४५ गुण.
कुणाची, कशात बाजी?:
संस्थात्मक आधारावर निवडण्यात आलेल्या दहा अव्वल शहरांमध्ये राज्यातील नवी मुंबई प्रथम, तर पुणे आठव्या स्थानावर.
सामाजिक आधारावर निवड झालेल्या शहरांमध्ये नवी मुंबई तिसऱ्या, पुणे पाचव्या, बृहन्मुंबई सहाव्या आणि वसई-विरार दहाव्या क्रमांकावर.
आर्थिक आधारावर निवड झालेल्या शहरांमध्ये पुणे सातव्या, तर ठाणे नवव्या स्थानावर.
भौतिक आधारावर बृहन्मुंबई पहिल्या, पुणे दुसऱ्या, ठाणे तिसऱ्या आणि नवी मुंबई सातव्या क्रमांकावर.
यादीतील पहिली १० शहरे: पुणे, नवी मुंबई, बृहन्मुंबई, तिरुपती, चंदिगढ, ठाणे, रायपूर, इंदूर, विजयवाडा, भोपाळ
केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री: हरदीपसिंग पुरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा