गरिबांचे मसिहा म्हणून ओळखले जाणारे संयुक्त राष्ट्रसंघाचे माजी सरचिटणीस आणि नोबेल पुरस्कार विजेते कोफी अन्नान यांचे १८ ऑगस्ट रोजी वयाच्या ८०व्या वर्षी निधन झाले.
८ एप्रिल १९३८ रोजी गोल्ड कोस्ट म्हणजेच आत्ताचा घाना या देशात त्यांचा जन्म झाला. त्यांना २००१मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.
१९६२ ते २०१३ इतका प्रदीर्घ काळ ते संयुक्त राष्ट्र आणि त्याच्याशी संबधित इतर संस्थांमध्ये कार्यरत होते.
१९६२मध्ये कोफी अन्नान यांनी जागतिक आरोग्य सघटनेमध्ये बजेट अधिकारी म्हणून काम सुरु केले. तिथे ते ३ वर्षे कार्यरत होते.
१९६५ ते १९७२ या कालावधीत त्यांनी इथियोपियाची राजधानी असलेल्या अद्दीस अबाबा येथे संयुक्त राष्ट्रांच्या इकॉनॉमिक कमिशन फॉर अफ्रिकेसाठी काम केले.
संयुक्त राष्ट्र संघाच्या सरचिटणीसपदाची धुरा सांभाळणारे ते आफ्रिकन वंशाचे पहिले नागरिक होते. १९९७ ते २००६ या कालावधीत त्यांनी संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीसपद भूषवले होते.
१९९७मध्ये कोफी अन्नान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या विविध संघटनांमध्ये ताळमेळ रहावा म्हणून संयुक्त राष्ट्र विकास समुहाची स्थापना केली होती.
कोफी अन्नान यांनी जागतिक स्तरावर शांतता कशी प्रस्थापित होईल यावर लक्ष केंद्रीत केले आणि त्यासाठी आपले आयुष्य वेचले.
तसेच गरीबीचे उच्चाटन कसे करता येईल, गरीब जनतेला समाजाच्या मुख्य प्रवाहात कसे आणता येईल यादृष्टीनेही समाजकार्य केले.
युद्धात होरपळलेल्या जनतेचे पुनर्वसन करण्याचे कामही त्यांनी केले होते. या योगदानासाठीच त्यांना शांततेचे नोबेल पुरस्कार करण्यात आला होता.
‘कोफी अन्नान फाऊंडेशन’ संस्थापक अध्यक्ष आणि नेल्सन मंडेला यांनी स्थापन केलेल्या ‘द एल्डर’ या आंतरराष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले होते.
दिल्लीतील मोहल्ला क्लिनिक्सची संकल्पना त्यांना फार आवडली होती आणि ६ सप्टेंबरला ते हे क्लिनिक पाहण्यासाठी भारतात येणार होते.
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी इम्रान खान यांची निवड
तेहरीक-ए-इन्साफ या पक्षाचे प्रमुख असलेले इम्रान खान यांनी पाकिस्तानचे २२वे पंतप्रधान म्हणून १८ ऑगस्ट रोजी शपथ घेतली.
पंतप्रधानपदाच्या निवडीसाठी पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत मतदान झाले. यामध्ये इम्रान खान यांना १७६ मते मिळाली.
त्यांनी पाकिस्तान मुस्लिम लीगचे प्रतिस्पर्धी उमेदवार शहाबाज शरीफ यांचा पराभव केला. शहाबाज शरीफ यांना ९६ मते मिळाली.
इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी पंजाब सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले माजी क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धू इस्लामाबादमध्ये हजर होते.
इम्रान खान यांनी प्रचारावेळी नवाज शरीफ यांच्या सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा लावून धरला होता.
निवडून आल्यानंतरच्या भाषणात त्यांनी देशामध्ये वेगाने विकास होईल असे आश्वासन दिले होते. तसेच देशाबाहेर गेलेल्या संपत्तीला परत आणण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते.
पाकिस्तानच्या राष्ट्रीय असेंबलीमध्ये एकूण ३४२ जागा आहेत. त्यापैकी २७२ उमेदवार थेट जनतेमधून निवडले जातात. तर बाकीच्या ६० जागा महिलांसाठी आणि १० जागा धार्मिक अल्पसंख्याकांसाठी राखीव आहेत.
पाकिस्तानात जुलै २०१८मध्ये २७२ पैकी २७० जागांसाठी मतदान झाले होते. या निवडणुकीत कोणालाच स्पष्ट बहुमत मिळाले नाही.
मात्र ११६ जागा जिंकत इम्रान खान यांचा तहरीक-ए-इन्साफ हा सर्वात मोठा पक्ष ठरला. त्याप्रमाणात त्यांना आणखी ३३ राखीव (२८ महिला व ५ अल्पसंख्यांक) जागा मिळाल्याने पक्षाची सदस्यसंख्या १४९वर पोहोचली होती.
या निवडणुकीत शहाबाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीगने ६४ जागा तर बिलावल भुट्टो यांच्या पाकिस्तानी पीपल्स पार्टीने ४३ जागा जिंकल्या. त्यांना अनुक्रमे १८ व ११ राखीव जागा मिळाल्या होत्या.
पंतप्रधानपदी निवडून येण्यासाठी इम्रान खान यांना १७२ मतांची आवश्यकता होती आंनी १७६ मते मिळवत ये आय पाकिस्तानचे २२वे पंतप्रधान बनले आहेत.
डॉ. अमित समर्थ : ट्रान्स-सायबेरियन एक्स्ट्रीम रेस पूर्ण करणारे पहिले भारतीय
नागपूरमधील आघाडीचे सायकलपटू डॉ. अमित समर्थ यांनी जगातील सर्वात आव्हानात्मक रेसपैकी एक असलेली रशियातील रेड बुल्स ट्रान्स-सायबेरियन एक्स्ट्रीम (९१०० किमी) रेस पूर्ण करत इतिहास रचला.
मॉस्को येथे २४ जुलै रोजी फ्लॅग ऑफ झालेल्या या रेसचे २५ दिवसात १५ टप्पे पूर्ण करायचे आव्हान होते.
ही शर्यत पूर्ण करणारे डॉ. समर्थ हे भारतातील पहिले सायकलपटू ठरले. डॉ. अमित समर्थ यांच्यासह इतर तीनच सायकलपटूंनी हे आव्हान पूर्ण करू शकले.
अमित समर्थ यांनी ३४७ तास १६ मिनिटे १७ सेकंद वेळेसह शर्यत पूर्ण करीत चौथे स्थान पटकावले.
पीटर बिश्चॉप (३१५.४५.२८), मायकल कनूडसेन (३३३.१३.०४) आणि मार्सिलो फ्लोनटिनो सोरेस (३४६.१९.००) यांनी अनुक्रमे पहिली तीन स्थाने मिळविली.
गेल्यावर्षी पाच हजार किलोमीटर अंतराची रेस अक्रॉस अमेरिका ११ दिवस २१ तास आणि ११ मिनिट वेळेत पूर्ण केल्यापासून डॉ. अमित समर्थ चर्चेत आले होते. ही शर्यत पूर्ण करणारेही ते पहिले भारतीय आहेत.
यापूर्वी त्यांनी इन्स्पायर इंडियातर्फे आयोजित डेक्कन क्लिफहँगर २०१७ (पुणे ते गोवा ६४३ किलोमीटर अंतर) रेस २५ तास २८ मिनिट वेळेत पूर्ण करीत जेतेपद मिळविले होते.
तसेच ऑस्ट्रेलियामध्ये डिसेंबर २०१६मध्ये (३.८ किलोमीटर जलतरण, १८० किलोमीटर सायकलिंग आणि ४२.२ किलोमीटर धावणे) रेस पूर्ण करीत पूर्ण आयर्नमॅनचा किताबही त्यांनी पटकावला होता.
इन्फोसिसचे सीएफओ एम डी रंगनाथ यांचा राजीनामा
माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतातील दुसरी मोठी कंपनी असलेल्या इन्फोसिसचे मुख्य वित्तीय अधिकारी एम डी रंगनाथ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
राजीव बन्सल यांनी कंपनी सोडल्यानंतर २०१५साली त्यांनी मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून जबाबदारी संभाळली होती.
रंगनाथ हे मागील १८ वर्षांपासून इन्फोसिसमध्ये कार्यरत आहेत. या कालावधीत त्यांनी सल्ला, वित्त, रणनीती, जोखीम व्यवस्थापन इत्यादी अनेक विभागात महत्वाची भूमिका बजावली आहे.
१६ नोव्हेंबर २०१८पर्यंत रंगनाथ मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून काम सांभाळतील. तोपर्यंत इन्फोसिस आपल्या नव्या सीएफओचा शोध घेणार आहे.
मागील वर्षी विशाल सिक्का यांनी इन्फोसिसच्या सीईओपदाचा अचानक राजीनामा दिल्यानंतर इन्फोसिसचे संस्थापक नारायणमूर्ती व व्यवस्थापन यांच्यामधील वाद समोर आला होता.
त्यानंतर कंपनीला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी कंपनीचे सहसंस्थापक नंदन नीलेकणी यांना अकार्यकारी अध्यक्ष बनवले होते, तर सलील पारेख यांनी याचवर्षी जानेवारीमध्ये सीईओ पद सांभाळले आहे.
केरळमधील प्रसिध्द कवी चेम्मनम चाको यांचे निधन
आपल्या कवितांतून समाजातील अनिष्ट रूढी, परंपरांवर टीका करणारे केरळमधील प्रसिध्द कवी चेम्मनम चाको यांचे १४ ऑगस्ट रोजी निधन झाले.
७ मार्च १९२६ रोजी कोट्टायम जिल्ह्य़ात मुलाकुलम या वैकोमजवळच्या गावात शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला.
तिरुअनंतपूरम युनिव्हर्सिटी कॉलेज येथे त्यांचे शिक्षण झाले. लहानपणापासून त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती.
स्वातंत्र्याच्या प्रेरणेतूनच त्यांनी ‘प्रवचनम’ ही पहिली कविता लिहिली. त्यानंतर त्यांचा ‘विलाम्बरम’ हा काव्यसंग्रह १९४७मध्ये प्रसिद्ध झाला.
विशेष म्हणजे त्यांनी मुलांसाठीही कथा-कविता लिहिल्या होत्या. १९६७मध्ये त्यांनी लिहिलेल्या ‘नेल्लू’ या काव्याने त्यांचे नाव झाले.
शाळा व कॉलेजात त्यांनी मल्याळम भाषा शिकवण्याचे काम केले. केरळ साहित्य अकादमी व केरळ चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे ते सदस्य होते.
केरळ विद्यापीठाचा शब्दकोश विभाग व प्रकाशन विभागात त्यांनी नोकरी केली. १९८६मध्ये ते निवृत्त झाले.
त्यांच्या कवितांची भाषांतरे इंग्रजीत करण्यात आली. ती भारतीय कवितांच्या ऑक्सफर्ड संग्रहात समाविष्ट आहेत.
१९७७मध्ये त्यांच्या राजपथ काव्यसंग्रहास केरळ साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला, तर २००६मध्ये त्यांना केरळ साहित्य परिषदेने जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले होते.
याशिवाय कुंजन नंबियार पुरस्कार, महाकवी उल्लूर पुरस्कार, कुरुप्पन पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले.
लेखनातून केरळच्या समाज जीवनावर परखड भाष्य त्यांनी केले, जीवनाच्या जवळपास प्रत्येक क्षेत्रास स्पर्श करणारे असेच त्यांचे लेखन होते.
nice
उत्तर द्याहटवा