चालू घडामोडी : १५ ऑगस्ट

७२व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांचे भाषण

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या १५ ऑगस्ट रोजी ७२व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून सलग पाचव्यांदा देशाला संबोधित केले.
  • आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील साडेचार वर्षात झालेला विकास, जगामध्ये भारताची प्रतिमा कशी बदलली यावर आपल्या खास शैलीत भाष्य केले.
  • आपल्या साधारण ८५ मिनिटांच्या भाषणात त्यांनी विविध मुद्दे मांडले. त्यांनी प्रामुख्याने स्वच्छ भारत अभियान, गरीबी, शेतकरी प्रश्नांवर भाष्य केले. तसेच काश्मीर प्रश्नावरही त्यांनी भाष्य केले.
  • तसेच त्यांनी पंतप्रधान जनआरोग्य योजना (आयुष्मान भारत) समवेत अनेक मोठ्या घोषणा करत देशाला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचे वचन दिले
  • मोदींनी आपल्या ४ वर्षातील कामकाजावर होत असलेल्या टीकेला कवितेच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले.
पंतप्रधानांच्या भाषणातील ठळक मुद्दे
  • पंतप्रधान जनआरोग्य योजना (आयुष्मान भारत)
  • २५ सप्टेंबर रोजी पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीला देशभरात पंतप्रधान जनआरोग्य योजना योजनेचा शुभारंभ होईल, असे त्यांनी जाहीर केले.
  • देशातील गरीब आणि सर्वसामान्यांना चांगले उपचार मिळावे. मोठ्या आजारांसाठी चांगल्या रुग्णालयात मोफत उपचार मिळावे, हा योजनेचा मुख्य हेतू आहे.
  • या योजनेंतर्गत नवीन रुग्णालये उभारले जातील आणि यातून रोजगाराच्या संधीही निर्माण होतील, असा दावा त्यांनी केला.
  • योजनेत पारदर्शकता राहावी आणि सर्वसामान्यांना या योजनेचा सहज लाभ घेता यावा यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.
  • योजनेची वैशिष्ट्ये:
    • १०.७ कोटी गरीब कुटुंबियांना जोडण्याचे लक्ष्य.
    • प्रत्येक कुटुंबाला ५ लाखांचे आरोग्य विमा कवच.
    • आर्थिक निकषांवर कुटुंबाची निवड होणार.
    • पुर्णपणे कॅशलेस सुविधा.
    • १.५ लाख आरोग्य केंद्र सुरु करणार.
    • खासगी कंपन्यांनाही सहभागी होता येईल.
    • केंद्र सरकार ६० तर राज्य सरकार ४० टक्के खर्च उचलणार.
  • लष्करातील महिलांसाठी स्थायी कमिशनची घोषणा
  • मोदी यांनी लष्करात काम करत असणाऱ्या महिलांसाठी स्थायी कमिशनची घोषणा केली आहे.
  • शॉर्ट सर्व्हिस कमिशनद्वारे निवडलेल्या महिलांसाठी ही घोषणा केली आहे. त्यामुळे या महिलांना अधिक काळ सैन्य दलात काम करता येईल आणि त्यांना इतर सुविधाही मिळतील.
  • शॉर्ट सर्व्हिस कमिशनद्वारे नियुक्त होणाऱ्या उमेदवार १४ वर्ष (१० वर्षे अनिवार्य आणि ४ वर्षे अतिरिक्त) सेवा करू शकतात. तर स्थायी कमिशनमुळे महिलांना २० वर्षांपर्यंत काम करता येईल आणि त्यात वाढही करता येईल.
  • प्रामाणिक करदात्यांना अभिवादन
  • प्रामाणिक करदात्यांमुळे गरिबांच्या ताटामध्ये अल्प दरात अन्न मिळत असल्याचे मोदी म्हणाले.
  • प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करदात्यांच्या संख्येत होत असलेल्या वाढीचे आकड्यांचा उल्लेख आपल्या भाषणामध्ये केला. तसेच त्यांची प्रशंसाही केली.
  • २०२२साली भारताचा अवकाशवीर अंतराळात जाणार
  • अंतराळ क्षेत्रात वैज्ञानिकांनी प्रगतीची नवी शिखरे पादाक्रांत केली असून २०२२ साली भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या ७५व्या वर्धापन दिनी अवकाशवीर तिरंगा हातात घेऊन अंतराळात जाईल आणि अंतराळाला गवसणी घालणारा भारत जगातील चौथा देश बनेल.
  • भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) शास्त्रज्ञांचंही मोदींनी कौतुक केले.
  • काळा पैसा
  • काळा पैसा आणि भ्रष्टाचाराला सरकार माफ करणार नाही. कितीही संकट आली तरी, मी यासाठी माघार घेणार नाही.
  • सरकारी योजनांमध्ये असलेल्या सुमारे ६ कोटी बोगस लाभार्थ्यांना बाहेर काढल्याने, योजनांमध्ये तब्बल ९० हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे.
  • मुद्रा योजना
  • मुद्रा योजनेच्या माध्यमातून सुमारे ४ कोटी लाभधारकांना लहान उद्योगासाठी १३ कोटी रुपये देण्यात आले.
  • आल्याचे सांगताना हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
  • काश्मीर समस्या
  • ‘न गाली से न गोली से, काश्मीर की समस्या सुलझेगी गले लगाने से’ असे म्हणत काश्मीरमधील समस्येवर भाष्य केले.
  • अटल बिहारी वाजपेयी यांच्या उद्गारांचा दाखला देत नरेंद्र मोदींनी काश्मीरची समस्या गले लगाने से म्हणजे प्रेमाने संपेल असे सांगितले.
  • जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही संस्थांना आणखी मजबूत करण्यासाठी पंचायत आणि पालिका निवडणुका घेण्याची तयारी सुरू केली आहे.
  • बलात्काराच्या घटनांचा निषेध
  • भारतातल्या वाढत्या बलात्काराच्या घटनांचीही त्यांनी दखल घेतली. पुरूषांच्या सैतानी वृत्तीला महिला बळी पडत असून, या राक्षसी मनोवृत्तीला देशातून हद्दपार केले पाहिजे.
  • शेतकरी समस्या
  • कृषी क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल आणण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे मोदी म्हणाले. आमच्या सरकारने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव दिला आहे.
  • शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२पर्यंत ‘बीज से बाजार तक’ याअंतर्गत दुप्पट करण्याचे ध्येय आहे.
  • स्वच्छ भारत अभियान
  • स्वच्छ भारत अभियानामुळे लाखो लहान मुलांना आरोग्यदायी जीवन मिळाल्याचा दावा मोदींनी केला.
  • उज्ज्वला व सौभाग्य या योजनांचीही प्रशंसा करताना सर्वसामान्य भारतीयांचे जीवन बदलत असल्याचे त्यांनी सांगितले.
  • तिहेरी तलाक
  • तिहेरी तलाकमुळे अनेक महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. तिहेरी तलाकविरोधात आम्ही कायदा करतोय, मात्र त्याला काही जण विरोध करत आहेत. परंतु मुस्लिम महिलांना मी आश्वासन देते की, हा कायदा आणणारच.
  • गरिबी
  • गेल्या २ वर्षांमध्ये ५ कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढण्यात आले. भारतातली गरीबी संपवण्यासाठी गेल्या ५ वर्षांमध्ये आमच्या सरकारने प्रयत्न केला आहे.

एमपीएससीचा बायोमेट्रिक पडताळणी करण्याचा निर्णय

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांवेळी दोन ओळखपत्रे दाखवण्याचा नियम रद्द करण्यात आला आहे.
  • आता बायोमेट्रिक पडताळणी सुरू करण्यात आल्याने उमेदवारांना परीक्षेवेळी एकच ओळखपत्र दाखवणे पुरेसे ठरणार आहे.
  • एमपीएससी परीक्षांना डमी विद्यार्थी बसवून काही उमेदवार अधिकारी झाल्याचा प्रकार उजेडात आल्यानंतर उमेदवारांना परीक्षेसाठी दोन ओळखपत्र दाखवणे बंधनकारक करण्यात आले होते.
  • पॅन कार्ड, वाहन परवाना, निवडणूक ओळखपत्र, आधारकार्ड, पासपोर्ट असे पर्याय त्यासाठी देण्यात आले. मात्र, या निर्णयाने उमेदवारांना मनस्ताप झाला.
  • आता हा निर्णय बदलून एकच ओळखपत्र दाखवणे पुरेसे ठरणार असल्याचे आयोगाने परिपत्रकाद्वारे जाहीर केले.
  • नवीन निर्णयानुसार उमेदवारांनी नमूद केलेल्या ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र आणि त्याची छायांकित प्रत परीक्षेवेळी दाखवणे आवश्यक आहे.
  • यातील कोणत्याही ओळखपत्राच्या मूळ प्रतीऐवजी साक्षांकित प्रत, छायांकित प्रत ग्राह्य धरली जाणार नाही.
  • त्याशिवाय एमपीएससीच्या परीक्षांमधील गैरप्रकार टाळण्यासाठी, उमेदवारांची ओळख तपासण्यासाठी डिजिटल स्वरूपात बोटाचे ठसे किंवा बुबुळाच्या आधारे बायोमेट्रिक पडताळणी केली जाणार आहे.

राज्य सरकारकडून भूमिहीन कुटुंबांना मोफत शेतजमीन

  • महाराष्ट्रातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन कुटुंबांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत मोफत शेतजमीन देण्यात येणार आहे.
  • त्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार ४ एकर जिरायत जमिनीसाठी प्रतिएकरी ५ लाख याप्रमाणे २० लाख रुपये आणि २ एकर बागायती जमिनीसाठी प्रतिएकरी ८ लाख याप्रमाणे १६ लाख रुपये अनुदान देणार आहे.
  • सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समित्या काम करतील.
  • त्यांना मदत करण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक तालुक्यात उपसमित्या स्थापन करण्यात येणार आहेत.
  • लाभार्थ्यांची निवड, जमिनींची खरेदी आणि त्यांचे वाटप याची जबाबदारी या समित्यांवर असेल. ३४ जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवाण्यात येणार आहे.
  • या योजनेसाठी संबंधित कुटुंब भूमिहीन असणे आवश्यक आहे. परंतु अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील बहुतांश कुटुंबे अत्यल्प भूधारक असल्यामुळे ते भूमिहीन या निकषात बसत नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गरीब कुटुंबे या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
  • अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील गरीब कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी सर्वप्रथम २००४-०५साली जमीन देण्याची योजना सुरू करण्यात आली.
  • मात्र त्या वेळी लाभार्थ्यांना जमिनीच्या किमतीच्या ५० टक्के रक्कम भरावी लागत होती. लाभार्थ्यांना त्यासाठी बँकेचे कर्ज काढावे लागत होते.
  • सरकार ४ एकर जिरायत किंवा २ एकर बागायतीसाठी प्रतीएकरी ३ लाख रुपये याप्रमाणे अनुदान देत होते.
  • परंतु जमिनीच्या किमती वाढल्यानेया रकमेत जमीन मिळणे अशक्य होते. शिवाय, दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींना बँकांचे कर्ज मिळणेही अशक्य होत असे.
  • त्यामुळे सरकारने अनुदानाच्या रकमेत वाढ करण्याबरोबरच योजनेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.

कॉसमॉस बँकेवर हॅकर्सचा हल्ला

  • पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावरील कॉसमॉस बँकेच्या मुख्यालयातील एटीएम स्विच सर्व्हरवर हॅकर्सनी हल्ला चढवत रुपे कार्ड आणि व्हिसा कार्डधारकांची गोपनीय माहिती चोरून ९४.४२ कोटी रुपयांची रक्कम काढली.
  • सायबर हल्ला करणाऱ्या या हॅकर्सनी बँकेच्या खात्यातील रक्कम २८ देशांमधील विविध एटीएममधून काढून हाँगकाँग येथील हॅनसेंग बँकेच्या खात्यात जमा केली.
  • इंटरनॅशनल व्हिसाच्या कार्डच्या सुमारे १२ हजार तर रुपे डेबिट कार्डाद्वारे भारताच्या एटीएममधून सुमारे २८०० व्यवहारांची नोंद झाली.
  • सुमारे २ तास हे व्यवहार चालू होते. यावर शंका आल्याने बँकेच्या वतीने तातडीने व्हिसा व रुपे डेबिट कार्ड यंत्रणा बंद करण्यात आली.
  • हा मालवेअर हल्ला बँकेच्या सीबीएस प्रणालीवर नसल्याने त्याचा खातेदारांवर परिणाम होणार नाही, अशी ग्वाही बँकेने दिली आहे.
  • कोणत्याही संशयास्पद व्यवहारांची रक्कम ही खातेदारांच्या खात्यातून काढण्यात आलेली नाही, असेही बँकेने नमूद केले आहे.
  • ही घटना उघडकीस आल्यानंतर बँकिंग आणि विशेषतः सहकारी बँकांच्या सायबर सुरक्षेबाबतही मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
  • बँकेने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली असून, पोलीस तपासाअंती एकूण रकमेचा आकडा समोर येईल, असे बँकेने म्हटले आहे.
  • तपासासाठी पुणे शहर पोलिसांनी आर्थिक गुन्हे शाखा व गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची एकत्रित विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या पथकात पोलीस अधिकाऱ्यांसह सायबर तज्ञांचा समावेश असणार आहे.

९२वे मराठी साहित्य संमेलन यवतमाळमध्ये

  • अखिल भारतीय साहित्य महामंडळाने ९२वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळमध्ये होणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सुमारे ४५ वर्षांनंतर यवतमाळला साहित्य संमेलन होणार आहे.
  • याआधी यवतमाळमध्ये १९७३मध्ये अ. भा. मराठी साहित्य संमेलन झाले होते. ग. दि. माडगूळकर या संमलेनाचे अध्यक्ष तर ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण उद्घाटक होते.

केरळमध्ये मदतीसाठी लष्कराचे ऑपरेशन सहयोग

  • केरळमध्ये ८ ऑगस्टपासून सुरू असलेल्या पावसामुळे पावसाने हाहाकार माजवला असून, अतिवृष्टीमुळे झालेल्या मृतांचा आकडा ७० पेक्षा अधिक झाला आहे. केरळच्या १२ जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
  • भारतीय लष्कराकडून मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरु असून, केरळमधील बचावकार्याला ‘ऑपरेशन सहयोग’ असे नाव देण्यात आले आहे.
  • लष्कराने मदतकार्याचा वेग वाढवला असून पुण्याहून इंजिनिअर टास्क फोर्सची विशेष टीम केरळला रवाना झाली आहे.
  • केरळमध्ये गेल्या १५ दिवसांपासून पावसाने थैमान घातल्याने संपूर्ण जीवन कोलमडून गेले आहे.
  • मुसळधार पावसामुळे केरळच्या इतिहासात प्रथमच ३९ पैकी ३५ धरणांचे दरवाजे उघडावे लागले आहेत.
  • संपूर्ण राज्यात बचाव मोहिम सुरु असून लोकांना मदत छावण्यांमध्ये पोहोचवले जात आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राजनाथसिंह यांनीही फोन करुन केरळचे मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांच्याशी पूरस्थितीबाबत संवाद साधला.

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी रमेश पोवार

  • भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी माजी फिरकीपटू रमेश पोवार यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) नियुक्ती करण्यात आली आहे.
  • निर्धारित षटकांच्या सामन्यासाठी असलेल्या संघाचे प्रशिक्षकपद पोवार यांना देण्यात आले आहे. ३० नोव्हेंबर २०१८पर्यंत पोवारकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
  • पोवारच्या प्रशिक्षकपदाखाली भारतीय संघ श्रीलंका दौरा, ऑक्टोबरमधील वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका आणि नोव्हेंबरमध्ये विंडीजमध्ये होत असलेली वर्ल्डकप टी-२० स्पर्धा यात खेळणार आहे.
  • तुषार आरोठे यांनी वादग्रस्त पद्धतीने प्रशिक्षकपद सोडल्यानंतर रमेश पोवार यांना या संघाचे प्रभारी प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
  • ४० वर्षीय रमेश पोवार भारतासाठी २ कसोटी सामने खेळले असून, या २ सामन्यात त्यांनी ६ विकेट्स घेतले होते.
  • याशिवाय त्यांनी ३१ एकदिवसीय सामन्यात ३४ गडी बाद केले आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पोवार यांनी १४८ सामन्यात ४७० विकेट्स घेतल्या आहेत.

छत्तीसगडचे राज्यपाल बलरामजीदास टंडन यांचे निधन

  • छत्तीसगडचे राज्यपाल बलरामजीदास टंडन यांचे वयाच्या ९०व्या वर्षी १४ ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यांनी १८ जुलै २०१४ रोजी छत्तीसगडच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली होती.
  • बलरामजी दास टंडन हे वर्ष १९५१ ते १९५७ पर्यंत पंजाब जनसंघाचे सचिव आणि १९९५ ते ९७ पर्यंत पंजाब भाजपाचे अध्यक्ष होते.
  • १९६९-७० मध्ये पंजाबमध्ये अकाली दल-जनसंघाच्या आघाडीच्या सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री होते. तर १९७७-७९ आणि १९९७-२००२ मध्ये पंजाबच्या प्रकाशसिंह बादल सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री होते.
  • केंद्रीय गृहमंत्रालयाने मार्च २०१८मध्ये राज्यपालांच्या वेतनात वाढ केली होती. परंतु, टंडन यांनी वाढीव वेतन घेण्यास नकार दिला होता. त्यांच्या या निर्णयाचे खूप कौतुक झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा