११वे विश्व हिन्दी सम्मेलन मॉरीशसमध्ये
- ११वे विश्व हिन्दी सम्मेलन १८ ते २० ऑगस्ट २०१८ दरम्यान मॉरीशसची राजधानी पोर्ट लुई येथे आयोजित करण्यात आले.
- या सम्मेलनाचे आयोजन भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाद्वारे मॉरीशस सरकारच्या सहयोगाने करण्यात येत आहे.
- या सम्मेलनाच्या आयोजनाचा निर्णय सप्टेंबर २०१५मध्ये भोपाळ येथे आयोजित १०व्या विश्व हिंदी सम्मेलनामध्ये घेण्यात आला होता.
- या सम्मेलनाच्या पार्श्वभूमीवर मॉरिशस एअरलाइन्सने आपल्या विमानांवर हिंदी भाषेत मजकूर आणि दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्व संबंध दाखवणारा लोगो रंगवला आहे.
- या लोगोमध्ये हिरव्या रंगामध्ये मोर तर भगव्या रंगात मॉरिशसमधील डोडो पक्षी दाखवण्यात आला आहे.
अॅपलचे भांडवली बाजारात मूल्य १ ट्रिलिअन डॉलर
- प्रसिद्ध मोबाईल ब्रॅन्ड आयफोन बनवणारी अॅपल कंपनी ही भांडवली बाजारात १ ट्रिलिअन डॉलर मूल्य असणारी पहिली अमेरिकन कंपनी बनली आहे.
- भारतीय रुपयांमध्ये कंपनीचे भांडवली बाजारातील मूल्य सुमारे ६८,६२० अब्ज रुपये इतके झाले आहे.
- भारतातील २ सर्वाधिक उत्पन्न असलेल्या कंपन्या रिलायन्स इंडस्ट्रिज आणि टीसीएस या कंपन्यांपेक्षाही अॅपल ही १० पट मोठी कंपनी ठरली आहे.
- वर्ल्ड बँकेच्या आकडेवारीनुसार, जगातील १९३ देशांपैकी केवळ १६ देशच असे आहेत ज्यांचा जीडीपी हा अॅपलच्या बाजारमूल्यापेक्षा जास्त आहे. म्हणजेच १७७ देशांपेक्षा अॅपल कंपनी श्रीमंत आहे.
- सध्या अॅपलचे बाजार मूल्य हे इंडोनेशियाच्या जीडीपीइतके आहे. ३ अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था असलेल्या पाकिस्तानपेक्षाही जास्त किंमत तिच्या एकत्रित शेअर्सच्या मूल्याची आहे.
- अॅपलच्या शेअरचा भाव एका वर्षात २३ टक्क्यांनी वाढला आहे. अॅपलचे शेअर सध्या २०७.०५ अमेरिकी डॉलर या आतापर्यंतच्या सर्वाधिक उच्चस्तरावर आहेत.
- अॅपलनंतर त्यांची प्रतिस्पर्धी कंपनी अॅमेझॉनचा क्रमांक असून, या दोन कंपन्यांनंतर अल्फाबेटचा (गुगल) क्रमांक आहे.
- १९७६मध्ये सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांच्या गॅरेजमधून सुरू झालेल्या या कंपनीचा महसूल आज पोर्तुगाल, न्यूझीलंड आणि अन्य काही देशांच्या आर्थिक क्षमतेपेक्षाही मोठा आहे.
- १९९७मध्ये अॅपल कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होती. आपले अस्तित्व कायम ठेवण्यासाठी कंपनीने सहसंस्थापक स्टिव्ह जॉब्स यांना सीईओ म्हणून परत आणले.
- त्यानंतर जॉब्स यांनी आयपॉड आणि आयफोनसारखे उत्पादने आणून अॅपलला एका नव्या उंचीवर नेले. ५ ऑक्टोबर २०११ रोजी त्यांचे निधन झाले.
आरबीआयकडून १०४ एनबीएफसींची नोंदणी रद्द
- रिझर्व्ह बँकेने २७ जुलै ते ३ ऑगस्ट या एका आठवड्यात बिगर बँकिंग वित्त पुरवठा (एनबीएफसी) श्रेणीतील देशभरातील १०४ वित्त संस्थांची नोंदणी रद्द केली आहे.
- बँकिंग व वित्त क्षेत्रात तंत्रज्ञानाचा अवलंब जोमाने सुरू झाला आहे. त्यामुळेच रिझर्व्ह बँकेनेही ‘नो यूअर कस्टमर’ (केवायसी)ची कडक अंमलबजावणी करण्याची सूचना बँका व वित्त संस्थांना दिले आहेत.
- त्याअंतर्गत वित्त साह्य घेणाऱ्या प्रत्येक ग्राहकाची इत्यंभूत माहिती संस्थेकडे असावी, असे रिझर्व्ह बँकेचे निर्देश आहेत. हे निर्देश न पाळणाऱ्या संस्थांवर बँकेने कडक कारवाई सुरू केली आहे.
- त्यामुळे देशभरातील १०४ वित्त संस्थांचे व्यवहार करण्याचे अधिकार काढून घेण्यात आले असून, त्यांचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द केले आहे.
- यात प्रामुख्याने जम्मू-काश्मीर, पंजाब, हरयाणा, पश्चिम बंगाल व तामिळनाडूतील वित्तिय संस्थांचा समावेश आहे.
- रिझर्व्ह बँकेने यापूर्वीही २३ जुलैपर्यंत जवळपास ६५ एनबीएफसींचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द केले होते. त्यामध्ये २७ संस्था महाराष्ट्रातील होत्या.
- एनबीएफसी सहा प्रकारच्या असतात. या संस्था मुख्यत: कर्ज वितरण क्षेत्रात काम करतात. पण अनेक संस्था ठेवीही स्वीकारतात.
- ठेवी स्वीकारणाऱ्या संस्थांचा आकडा १६८ आहेत. त्यात २.५ कोटी ठेवीदारांचा ६५०० कोटी रुपयांहून अधिक पैसा गुंतलेला आहे. त्यामुळेच या संस्थांवर रिझर्व्ह बँकेची करडी नजर आहे.
- याखेरीज या बँकांमध्ये घोटाळा झाल्यास ठेवीदारांचे नुकसान होऊ नये यासाठी बँकेने या संस्थांना याआधीच लोकपालाच्या कक्षेतही आणले आहे.
भारतीय हौशी कबड्डी महासंघावर प्रशासकाची नियुक्ती
- भारतीय हौशी कबड्डी महासंघावर (एकेएफआय) गेली अनेक वर्षे कौटुंबिक वर्चस्व गाजवणाऱ्या व महासंघाचे तहहयात अध्यक्ष असलेल्या जनार्दन सिंह गेहलोत यांना या पदांवरून हटविण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले.
- त्यांच्यासमवेत याच संघटनेच्या अध्यक्ष असलेल्या त्यांची पत्नी मृदुल भदौरिया यांनाही या पदांवरून हटविण्याचे आदेश दिले.
- पुढील ६ महिन्यांत नव्याने निवडणुका घेण्याचे आदेश देताना, न्यायालयाने महासंघावर प्रशासकाची नियुक्ती केली आहे.
- अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू महिपाल सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने सुनावणी करताना संघटनेची घटनादुरुस्ती अनधिकृत असल्याचे नमूद केले आहे.
- न्यायालयाने २०१३ आणि २०१७मध्ये झालेल्या महासंघाच्या निवडणुका अनधिकृत ठरवताना गेहलोत आणि भदौरिया यांची नियुक्तीही अनधिकृत ठरवली आहे.
- त्यामुळे आजीव अध्यक्ष गेहलोत, अध्यक्ष डॉ. मृदुला भदौरिया यांच्यासह संपूर्ण कार्यकारिणी समिती न्यायालयाने बरखास्त केली.
- गेहलोत यांनी २८ वर्षे भारतीय संघटनेचे अध्यक्षपद सांभाळल्यानंतर पाच वर्षांपूर्वी हे पद पत्नीकडे सोपवले. ते आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाचेसुद्धा गेली अनेक वर्षे अध्यक्षपद भूषवत आहेत.
- निवृत्त प्रशासकीय अधिकारी सनत कौल यांची उच्च न्यायालयाने संघटनेवर प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. नवी कार्यकारिणी अस्तित्वात येईपर्यंत ते तात्काळ संघटनेचा कारभार सांभाळतील.
बीएसईमध्ये ‘आस्क मोटाभाई’ या चॅटबॉटची नेमणूक
- मुंबई शेअर बाजारात (बीएसई) आर्टिफिशियल इंटलिजन्सवर आधारित ‘आस्क मोटाभाई’ या चॅटबॉटची नेमणूक करण्यात आली आहे. या चॅटबॉटची निर्मिती मायक्रोसॉफ्ट आणि शेफर्ट्झ यांनी केली आहे.
- या चॅटबॉटच्या मदतीने ग्राहकांना गरजेप्रमाणे डेटा आणि माहिती वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
- छोट्या आणि रिटेल गुंतवणूकदारांना मदत करण्याच्या उद्देशाने या चॅटबॉटची नेमणूक करण्यात आली आहे. या माध्यमातून संबंधितांचे प्रबोधन करून त्यांना शेअर बाजाराची माहिती देण्यात येणार आहे.
- बाजारातील दैनंदिन घडामोडी, शेअरच्या किमती, कॉर्पोरेट वृत्त, व्यवहारांविषयीच्या शंकांचे निरसन, म्युच्युअल फंडांची माहिती, डेरिव्हेटिव्हज आणि आयपीओंची माहितीही या चॅटबॉटच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.
- ‘आस्क मोटभाई'च्या माध्यमातून मुंबई शेअर बाजारातील ब्रोकरना आणि ग्राहकांना सर्व सेवा एकाच छताखाली मिळणे शक्य होणार आहे.
- बीएसईचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ : आशिषकुमार
एनजीटीच्या अध्यक्षपदी जस्टीस आदर्श कुमार गोयल
- जस्टीस आदर्श कुमार गोयल यांनी जुलै २०१८मध्ये राष्ट्रीय हरित प्राधिकरणाच्या (एनजीटी) अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांची ही नियुक्ती पुढील ५ वर्षांसाठी असेल.
- ६ जुलै रोजी जस्टीस गोयल सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावरून निवृत्त झाले होते. जुलै २०१४मध्ये त्यांची या पदावर नियुक्ती झाली होती.
- राष्ट्रीय हरित प्राधिकरण कायद्यान्वये १८ ऑक्टोबर २०१० रोजी एनजीटीची स्थापना झाली आहे.
- या प्राधिकरणाचे मुख्य खंडपीठ दिल्लीत असून, इतर शाखा भोपाळ, पुणे, कोलकाता, शिमला, शिलॉंग, जोधपुर, कोच्ची आणि चेन्नईमध्ये आहेत.
- एनजीटीच्या स्थापनेनंतरचे गोयल हे या प्राधिकरणाचे तिसरे अध्यक्ष आहेत. (पहिले जस्टीस लोकेश्वर सिंह पंत, दुसरे स्वतंत्र कुमार).
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा