चालू घडामोडी : ५ ऑगस्ट
जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधूला उपविजेतेपद
- चीनमध्ये सुरु असलेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूला अंतिम सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मरीनने पराभूत केले.
- मरीनने सिंधूला २१-१९, २१-१० अशा सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले. त्यामुळे सिंधूला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. तर मरीनने सुवर्णपदकावर नाव कोरले.
- या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मरीनने भारताच्याच सायना नेहवालला, तर सिंधूने जपानच्या अकाने यामागुची हिला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
- सिंधूने याच स्पर्धेत गेल्यावर्षीही रौप्यपदक पटकावले होते. त्यापूर्वी २०१३ आणि २०१४ या वर्षांमध्ये सिंधूला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते.
- या सामन्यापूर्वी सिंधू आणि मरिन यांच्यामध्ये १२ सामने झाले होते. या दोघींनीही १२ पैकी प्रत्येकी ६ सामने जिंकले होते.
- यापूर्वी झालेल्या थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीतही पी व्ही सिंधूला पराभवाला सामोरे जावे लागले होते.
जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी गीता मित्तल
- जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी न्या. गीता मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या त्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश ठरल्या आहेत.
- १९५८मध्ये दिल्लीत गीता मित्तल यांचा जन्म झाला. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी एलएलबी केले. १९८१ ते २००४ या काळात त्यांनी अनेक न्यायालयांत वकिली केली.
- २००४मध्ये त्यांची दिल्ली उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीशपदी नियुक्ती झाली. २००८मध्ये नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या कार्यकारी मंडळाच्या संचालक पदावर त्यांची नियुक्ती झाली.
- २०१३मध्ये नवी दिल्लीच्या दी इंडियन लॉ इन्स्टिटय़ूट या संस्थेच्या प्रशासकीय समितीवर त्यांची नियुक्ती झाली.
- त्यांनी दिल्लीतील कनिष्ठ न्यायालयात जिवास धोका असलेल्या साक्षीदारांसाठी न्यायालयीन प्रकल्प सुरू केला. त्यासाठी वेगळ्या प्रकारची न्यायालये सुरू केली. भारतातील असे पहिले न्यायालय त्यांच्या प्रयत्नातून २०१२मध्ये दिल्लीत सुरू झाले.
- लैंगिक गुन्हेगारी मार्गदर्शक तत्त्वे अंमलबजावणी समिती, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळवणुकी विरोधातील समिती, तसेच न्यायालयीन कामाशी निगडित अनेक समित्यांवरही त्यांनी काम केले.
- २०१२च्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर न्या. जे एस वर्मा समितीच्या अहवालात वीरेंदर विरुद्ध सरकार या खटल्यात मित्तल यांनी दिलेला निकाल हाच मुख्य आधार होता.
- त्यांचे व्यक्तिमत्त्व चतुरस्र असून, २०१८मध्ये त्यांना नारीशक्ती पुरस्कार मिळाला होता.
गुंतवणूक क्षमता निर्देशांकात दिल्ली अग्रेसर
- राष्ट्रीय उपयोजित आर्थिक संशोधन परिषदेने (एनसीएईआर) जारी केलेल्या गुंतवणूक क्षमता निर्देशांकात दिल्लीने सर्वोच्च स्थान पटकावले आहे.
- पायाभूत सोयी व आर्थिक स्थिती आधारे दिल्लीने निर्देशांकात सर्वोच्च स्थान पटकावले. तर तामिळनाडू दुसऱ्या स्थानी आहे.
- मार्च २०१६मध्ये हा निर्देशांक सुरू केला होता. आर्थिक शासन, स्पर्धात्मकता व वृद्धीच्या संधी यांचा निर्देशांकात विचार केला जातो.
- याचा लाभ धोरणकार, व्यावसायिक, संभाव्य गुंतवणूकदार यांना निर्णय घेताना होणार आहे.
गगनजित भुल्लरला युरोपियन गोल्फ मालिकेचे विजेतेपद
- भारताच्या गगनजित भुल्लरने ऑस्ट्रेलियाच्या अँथोनी क्वाएलला पराभूत करत युरोपियन गोल्फ मालिकेतील आपल्या पहिल्या विजेतेपदावर नाव कोरले.
- भुल्लरने यापूर्वी आशियाई मालिकेत ८ स्पर्धामध्ये विजेतेपद मिळवले आहे. त्याचे कारकीर्दीमधील हे नववे आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद आहे. गतवर्षी त्याने मकाऊ खुल्या स्पर्धेत अजिंक्यपद मिळवले होते.
- यापूर्वी भारताच्या अर्जुन अटवाल व ज्योती रंधवा यांनी प्रत्येकी ८ स्पर्धा जिंकल्या आहेत.
नोबेल विजेते भौतिकशास्त्रज्ञ बर्टन रिश्टर यांचे निधन
- अणूतील उपकणांचा शोध लावणारे नोबेल पुरस्कार विजेते भौतिकशास्त्रज्ञ बर्टन रिश्टर यांचे १८ जुलै रोजी निधन झाले.
- १९७६मध्ये चार्म क्वार्क नावाच्या नव्या अणू उपकणांचा शोध लागला होता, त्यात रिश्टर यांचे संशोधन महत्त्वाचे ठरले. त्यासाठी त्यांना नोबेल पुरस्कार विभागून मिळाला होता.
- मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून पीएचडी केल्यानंतर ते स्टॅनफर्डमध्ये प्राध्यापक झाले. तेथील ऊर्जा प्रयोगशाळेचे नेतृत्व त्यांनी केले.
- सरकारच्या विज्ञान धोरणांवर सकारात्मक उद्दिष्टांसाठी प्रभाव टाकण्याचे काम केले. त्यातूनच त्यांनी हवामान बदलांच्या अलीकडे चर्चेत असलेल्या प्रश्नावर पुस्तकही लिहिले होते.
- स्टॅनफर्डमधील उच्च ऊर्जा कण त्वरणक व प्रगत कण शोधक अशा दोन यंत्राची रचना, उभारणी व नवीन कणांच्या शोधातील योगदान एवढी मोठी कामगिरी त्यांनी केली.
- १० नोव्हेंबर १९७४ रोजी त्यांनी भौतिकशास्त्रात मूलभूत संशोधन करताना अशा एका कणाचे अस्तित्व शोधून काढले ज्याचे गुणधर्म वेगळे होते. त्याला नंतर ‘चार्म क्वार्क’ असे नाव देण्यात आले.
- या कणांच्या शोधातून द्रव्याच्या रचनेविषयी नवीन सिद्धांताला त्यामुळे पाठबळ मिळण्यास मदत झाली. त्या वेळी त्यांनी या कणाचा लावलेला शोध नोव्हेंबर क्रांती म्हणून ओळखला गेला होता.
- त्याचवेळी मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीचे भौतिकशास्त्रज्ञ सॅम्युअल सी. सी. टिंग यांनीही हेच गुणधर्म असलेल्या कणाचे संशोधन केले होते. रिश्टर व टिंग यांना १९७६मध्ये या शोधासाठी नोबेल मिळाले.
- आपले विश्व ज्या द्रव्याचे बनलेले आहे त्याच्या आकलनात या शोधाने मोठी भर टाकली होती. द्रव्याचा अधिक सखोल अभ्यास यात शक्य झाला.
- २०१४मध्ये त्यांना अमेरिकेतील प्रतिष्ठेचे विज्ञान पदक मिळाले होते. अनेक विज्ञान संस्थांचे ते मानद सदस्यही होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा