चालू घडामोडी : ११ ऑगस्ट
मालदीवकडून भारताला सैनिक, हेलिकॉप्टर मागे घेण्याची सूचना
- मालदीवमधील तैनात असलेले भारतीय सैनिक आणि हेलिकॉप्टर भारतात माघारी पाठविण्याची सूचना मालदीव सरकारने भारताला केली आहे.
- भारताने मालदीवमध्ये दोन हेलिकॉप्टर आणि त्यांच्या वैमानिकांसह ५० सैनिक तैनात केले आहेत. अत्यवस्थ रुग्णांना उपचारांसाठी वाहून नेण्याच्या कामी त्यांचा वापर होत होता.
- मात्र आता त्यासाठी मालदीवने स्वत:च्या सोयीसुविधा विकसित केल्या असून भारताच्या हेलिकॉप्टर आणि सैनिकांची गरज उरलेली नाही.
- तसेच यासंबंधी भारत आणि मालदीवदरम्यान झालेला करार जुन २०१८मध्ये संपुष्टात आला आहे, त्यामुळे आता मालदीव सरकारने हा निर्णय घेतला आहे.
- आजवर भारताने मालदीवला लष्करी आणि नागरी मदत केली आहे. मात्र आता मालदीवमधील भारताच्या प्रभावाला चीनने आव्हान देण्यास सुरुवात केली असून, चीन या देशात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहे.
- मालदीवमध्ये राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांचे सरकार आहे. ते चीनचे समर्थक असल्यामुळे मालदीवमध्ये भारताविरोधात वातावरण निर्माण करण्यात येत आहे.
- यामुळे पुढील काळात मालदीववरून भारत आणि चीनमध्ये जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.
- याचा परिणाम भारताकडून हिंदी महासागरातील छोट्या देशांना होत असलेल्या संरक्षण विषयक मोहिमांवर झाला आहे.
- भारत या देशांना आर्थिक क्षेत्र विकसित करून देणार आहे. तसेच आतापर्यंत सामुद्री चाचांपासून संरक्षण देत आला आहे.
- काही दिवसांपूर्वीच मालदीवच्या यामीन सरकारने राजकीय विरोधकांविरोधात मोहिमा चालिवल्या होत्या. याला भारताने कडाडून विरोध केला होता.
निधन : बजाज इलेक्ट्रिकल्सचे एमडी अनंत बजाज
- बजाज इलेक्ट्रिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) अनंत बजाज यांचे १० ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने येथे निधन झाले.
- अनंत बजाज हे बजाज इलेक्ट्रिकल्सचे अध्यक्ष शेखर बजाज यांचे पुत्र तर प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांचे पुतणे होत.
- त्यांच्याकडे बजाज इलेक्ट्रिकल्सच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार होता. वयाच्या ४१व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
- अनंत बजाज यांचा जन्म १८ मे १९७७ रोजी मुंबई येथे झाला. त्यांनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले होते. याशिवाय २०१३मध्ये हॉवर्ड बिझनेस स्कूलमध्ये ओनर प्रेसिडेंट मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले होते.
- त्यानंतर १९९९मध्ये बजाज इलेक्ट्रिकल्समध्ये त्यांनी प्रकल्प समन्वयक म्हणून त्यांच्या करिअरला सुरवात केली. त्यानंतर २००५मध्ये त्यांना जनरल मॅनेजर म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
- त्यांच्या गुणवत्तेमुळे त्यांची बजाज इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
- दोन महिन्यांपूर्वीच त्यांची बजाज इलेक्ट्रिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली होती.
यूएनमधील अधिकारी रवी करकरा यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप
- संयुक्त राष्ट्राच्या लैंगिक समानता आणि महिला सबलीकरणासाठी काम करणाऱ्या (यूएन वूमन) विभागातील भारतीय अधिकारी रवी करकरा यांच्यावर लैंगिक छळ केल्याचे आरोप करण्यात आले आहेत.
- रवी करकरा हे यूएन वूमनमध्ये स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप अँड अॅडवोकसी टू द असिस्टंट सेक्रेटरी जनरल यांचे आणि याच विभागाचे डेप्युटी डायरेक्टर यांचे वरिष्ठ सल्लागार आहेत.
- रवी यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करुन आपल्यावर लैंगिक अत्याचार केले असा ८ पुरुषांनी आरोप केला आहे.
- या आरोपानंतर तपास सुरु करण्यात आला असून, या तपासाला प्राधान्य देऊन अत्यंत सखोल चौकशी करण्यात येणार आहे.
- करकरा यांनी युनीसेफ, यूएन वूमन तसेच सेव्ह द चिल्ड्रेनसाठी याआधी काम केले आहे. यूएन हॅबिटॅटमध्येही ते सल्लागार म्हणून काम पाहातात. वर्ल्ड वी वॉन्ट २०१५ या योजनेचे ते सहअध्यक्ष होते.
निधन : ज्येष्ठ सहकार नेते वसंतराव धोत्रे
- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळातील सहकार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्यातील ज्येष्ठ सहकार नेते वसंतराव धोत्रे यांचे १० ऑगस्ट वृद्धापकाळाने रोजी निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते.
- अकोल्यासह अमरावती विभागाच्या राजकारण व सहकारक्षेत्रावर वसंतराव धोत्रे यांची छाप होती.
- त्यांचा जन्म अकोला जिल्ह्यातील पळसो बढे येथे १४ फेब्रुवारी १९३७ रोजी झाला. सहकार व राजकीय क्षेत्रातील अनेक महत्त्वाची पदे त्यांनी भूषविली होती.
- देशातील पहिल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक, जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि राज्यमंत्री अशी त्यांची राजकीय कारकीर्द आहे.
- त्यांनी १९८५ ते ९० दरम्यान अकोल्याच्या बोरगावमंजू विधानसभा मतदार संघाचे विधानसभेत प्रतिनिधीत्व केले. १९८६ ते १९८८ या काळात ते सहकार खात्याचे राज्यमंत्री होते.
- अमरावती येथे मुख्यालय असलेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे ते १० वर्षे अध्यक्ष होते. अकोला बाजार समिती, खरेदी विक्री संघ, अकोला जिल्हा बँकेवरही त्यांची पकड होती.
- शरद पवारांचे विदर्भातील कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख होती. १९९९मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यावर त्यांना साथ देणाऱ्या विदर्भातील प्रमुख नेत्यांत त्यांचा समावेश होता.
- त्यांच्या निधनाने राजकीय आणि सहकार क्षेत्रातला एक मार्गदर्शक हरवला आहे.
आयकिया कंपनीचे हैदराबादमध्ये पहिले दालन सुरू
- थेट विदेशी गुंतवणुकीद्वारे देशातील विक्री क्षेत्रात (सिंगल ब्रॅण्डेड) व्यवसायास पहिली परवानगी मिळविलेल्या आयकिया कंपनीच्या भारतातील व्यवसायाला अखेर ५ वर्षांनंतर सुरुवात झाली.
- स्वीडनच्या या फर्निचर विक्रेता कंपनीचे पहिले दालन हैदराबाद येथे ९ ऑगस्ट रोजी सुरू झाले. कंपनीने या दालनासाठी ४५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
- या दालनासाठी १३ एकर जागेवर ४ लाख चौरस फूट बांधकाम करण्यात आले असून, यामार्फत ९५० प्रत्यक्ष, तर १५०० अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहे.
- या कंपनीच्या ७५०० उत्पादित वस्तूंपैकी १ हजारपेक्षा अधिक वस्तू केवळ २०० रुपयांत मिळणार आहेत.
- २०२५पर्यंत २५ दालने सुरू करण्याचा मनोदय असलेल्या आयकियाला २०१३मध्ये १०,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास परवानगी मिळाली होती.
- हैदराबादनंतर नवी मुंबई, बंगळूरु तसेच दिल्ली परिसरात दालने सुरू करून, कंपनी १५,००० कर्मचारी भरती करणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा