८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारताच्या मनजीत सिंह आणि जिनसन जॉन्सन यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदकाची कमाई केली. मनजीतने १:४६:१५, तर जिनसनने १:४६:३५ अशी वेळ नोंदवली.
४ बाय ४०० मी. मिश्र रिले प्रकारात भारताच्या हिमा दास, पुवम्मा राजू, मोहम्मद अनास आणि अरोकिवाराजीव यांनी रौप्यपदक जिंकले. ४ बाय ४०० मी. अंतर पार करण्यासाठी भारतीय संघाने ३:१५:७१ मिनिटे एवढा वेळ लागला.
मिश्र रिले शर्यतीचा या एशियाडमध्ये प्रथमच समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेत बहारिनच्या संघाने सुवर्णपदक तर कझाकस्तानच्या संघाने कांस्यपदक पटकावले.
तिरंदाजी: पुरुष व महिला संघाला रौप्यपदक
पुरुष तिरंदाजी संघाने अटीतटीच्या लढतीत रौप्यपदकाची कमाई केली आहे. दक्षिण कोरियाच्या संघाने भारतीय संघावर मात करत सुवर्णपदक पटकावले.
भारतीय पुरुष संघाचे खेळाडू: अभिषेक वर्मा, रजत चौहान, अमन सैनी
महिलांनाही सांघिक तिरंदाजी प्रकारात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्यांचाही पराभव दक्षिण कोरियाच्या महिला संघाने केला.
भारतीय महिला संघाच्या खेळाडू: मुस्कार किरार, मधुमिता कुमारी, ज्योती सुरेखा वेन्नाम
अत्यंत निकराची झुंज देऊनही भारतीय पुरुष आणि महिलांना दक्षिण कोरियाकडून निसटता पराभव सहन करावा लागला.
२०१४च्या आशियाई स्पर्धांमध्ये भारतीय पुरुष संघाने या प्रकारात सुवर्ण पटकावले होते, तर महिला संघाने याच प्रकारात कांस्यपदक पटकावले होते.
टेबल टेनिस: भारतीय संघाला कांस्यपदक
भारताच्या टेबल टेनिस संघाला दक्षिण कोरियाने ०-३ असे पराभूत केल्यामुळे भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
भारतीय संघ: जी. सत्ययन, मानव ठक्कर, हरमीत देसाई, अचंता थरथ कमाल आणि ए. अमलराज
आशियाई स्पर्धेत टेबल टेनिसमधील भारताचे हे पहिले पदक ठरले.
बॅडमिंटन: रौप्यपदक जिंकणारी सिंधू पहिली भारतीय महिला
महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताच्या पी. व्ही. सिंधूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. चीन तैपेईच्या ताई त्झु यिंगने सिंधूवर मात केली.
आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी तसेच रौप्यपदक जिंकणारी सिंधू पहिली भारतीय महिला आहे.
भारताने यावेळी प्रथमच एकाच आशियाई स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये २ पदके जिंकली आहेत. यापूर्वी साईना नेहवालने महिला एकेरीत कांस्यपदक जिंकले आहे.
कुराश: भारताला एक रौप्य व एक कांस्यपदक
कुराश या अभिनव खेळप्रकारात ५२ किलो वजनी गटात भारताच्या पिंकी बलहाराने रौप्य तर मलप्रभा जाधव हिने कांस्यपदकाची कमाई करून भारताच्या पदकतालिकेत मोलाची भर घातली.
अंतिम फेरीत पिंकीला उझबेकिस्तानच्याच सुलयमॅनोवा गुलनोरने थेट १० -० असे मोठ्या फरकाने पराभूत केले.
कुराश हा कुस्तीप्रमाणेच खेळला जाणारा एक खेळ आहे.
एस. के. अरोरा यांना तंबाखू विरोधी दिन २०१८ पुरस्कार
दिल्ली सरकारचे आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक एस. के. अरोरा यांना जागतिक आरोग्य संघटनेच्या मानाच्या तंबाखू विरोधी दिन २०१८ या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
तंबाखू नियंत्रणाच्या कामामध्ये अमूल्य योगदानाबद्दल अरोरा यांना या मानाच्या पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे.
अरोरा यांनी वेगवेगळ्या माध्यमांतून तंबाखूचे सेवन व धूम्रपान यावर नियंत्रण मिळवले. दक्षिण व आग्नेय आशियातून हा पुरस्कार जिंकणारे अरोरा हे एकमेव व्यक्ती आहेत.
जागतिक प्रौढ तंबाखू सर्वेक्षणानुसार दिल्लीमधील तंबाखू सेवनाचे प्रमाण २७ टक्क्यांनी कमी झाले आहे. त्याच्या तुलनेत देशभरातील तंबाखू सेवनाचे सरासरी प्रमाण १७ टक्क्यांनी कमी झाले आहे.
अशाच प्रकारे दिल्लीतील धुम्रपान करणाऱ्यांचे प्रमाण ३५ टक्क्यांनी घटले आहे. तर देशभरातील हेच प्रमान २३ टक्क्यांनी कमी झाले आहे.
गेल्या सहा वर्षात दिल्लीतील तंबाखूचे सेवन ६.५ टक्क्यांनी कमी झाले आहे. ही टक्केवारी उर्वरित देशातील सरासरीपेक्षाही जास्त आहे.
हे साध्य करण्यासाठी अरोरा यांनी दिल्लीत तंबाखू व सिगारेटच्या छुप्या जाहिरातींवरही नियंत्रण ठेवले.
त्यांनी सीबीएसई व एनसीईआरटी यांना पत्रे पाठवून तंबाखू नियंत्रणाचे पाठ अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यास सांगितले. सहावी ते बारावी या वयोगटातच मुलांना तंबाखूविरोधी धडे दिले तर ते परिणामकारक ठरते असा त्यांचा अनुभव आहे.
रुग्णालये, शाळा, सरकारी कार्यालये येथे त्यांनी तंबाखूविरोधी मोहीम जोरात राबवली. त्यांच्याच प्रयत्नांतून तंबाखू कंपन्या व त्यांच्या उत्पादनांच्या जाहिराती करणारे अभिनेते यांना नोटिसा देण्यात आल्या.
दिल्लीतील हुक्का पार्लरवर त्यांनी कठोर कारवाई केलीच; शिवाय ई-सिगारेटवरही बंदी घातली. ई-सिगारेटवर एक आंतरराष्ट्रीय प्रदर्शन होणार होते, तेही त्यांनी हाणून पाडले.
देशाच्या २०१७च्या आरोग्य धोरणानुसार तंबाखू सेवनाचे प्रमाण २०२०पर्यंत १५ टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
वॉरेन बफेट यांच्याकडून पेटीएममध्ये गुंतवणूक
ख्यातनाम उद्योगपती वॉरेन बफेट भारतातील आघाडीची डिजिटल वॉलेट कंपनी पेटीएममध्ये गुंतवणूककरणार आहे.
या गुंतवणुकीबाबत वॉरेन बफेट यांच्या बर्थशायर हॅथवे आणि पेटीएममध्ये बोलणी सुरू असून येत्या २ ते ३ आठवड्यांमध्ये याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.
बर्थशायर हॅथवे पेटीएममध्ये २,४४८ कोटी रुपयांची गुंतवणूककरत सुमारे ३ ते ४ टक्के समभाग खरेदी करणार आहेत.
त्यामुळे बफेट यांच्या बर्थशायर हॅथवे या कंपनीची गुंतवणूक असलेली पेटीएम ही भारतातील पहिली कंपनी ठरणार आहे.
पेटीएममध्ये या आधीच चीनच्या अलीबाबा आणि जपानच्या सॉफ्टबँकच्या वन-९७ कम्युनिकेशन या कंपनीची सुमारे १० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आहे.
जपानच्या सॉफ्टबँकेने गेल्या वर्षी सुमारे ९ हजार कोटी रुपयांना पेटीएममधील २० टक्के भांडवल विकत घेतले होते.
या गुंतवणूकीमुळे प्रतिस्पर्धी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी पेटीएमला अधिक बळ मिळणार आहे. त्याचबरोबर गुंतवणुकीचे व्यवस्थापन आणि ई-व्यापार क्षेत्रात पुढे जाणेही शक्य होणार आहे.
पेटीएमने भारतातील पेमेंट सुविधेत व आर्थिक सेवेत आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. देशातील ५० कोटी नागरिकांना मुख्य आर्थिक प्रवाहात आणणे हे पेटीएममचे उद्दिष्ट आहे.
पेटीएमचे सीईओ: विजयशेखर शर्मा
ओडिशामध्ये विधान परिषद अस्तित्वात आणण्याचा निर्णय
बिजू जनता दलाची सत्ता असलेल्या ओडिशा राज्यात विधान परिषद अस्तित्वात आणण्याचा निर्णय तेथील राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनात यावर शिक्कामोर्तब केले जाईल.
पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची राजकीय सोय लावण्याकरिता हा निर्णय घेतलाचे स्पष्ट आहे.
देशात सध्या ७ राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात असून, ओडिशा हे विधान परिषद असलेले आठवे राज्य ठरेल.
विधान परिषद अस्तित्वात असलेली राज्ये : महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्रप्रदेश, तेलंगणा
पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना मुदतवाढ
महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना सेवेमध्ये तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. पडसलगीकर सेवाज्येष्ठतेनुसार ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होणार होते.
पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर हे १९८२च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
पुण्यातील एल्गार परिषदेशी संबंधीत डाव्या विचारसरणींच्या विचारवंतांवर देशभरात महाराष्ट्र पोलिसांकडून सध्या छापेमारी आणि अटकसत्र सुरु आहे. यांपैकी ४ जणांचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पडसलगीकर यांची निवृत्ती पुढे ढकलण्यात आली आहे.
द्रमुकच्या अध्यक्षपदी एम के स्टॅलिन
एम. करुणानिधी यांच्या निधनानंतर तामिळनाडूतील द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाच्या (द्रमुक) अध्यक्षपदी त्यांचे पुत्र एम के स्टॅलिन यांची निवड करण्यात आली आहे.
पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत स्टॅलिन यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. एम. करुणानिधी यांच्यानंतर ते पक्षाचे दुसरे अध्यक्ष बनले आहेत.
या बैठकीत दुरई मुरुगन यांची पक्षाच्या खजिनदारपदी निवड करण्यात आली. तसेच करुणानिधी यांना भारतरत्न पुरस्कार देण्याच्या मागणीचा ठरावही मंजूर करण्यात आला.
स्टॅलिन हे दीर्घकाळापासून करुणानिधींसोबत पक्षाचे कामकाज पाहत होते. काही वर्षांपूर्वी त्यांची डीएमकेचे कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.
स्टॅलिन यांनी तमिळनाडूचे उपमुख्यमंत्रिपद, २ वेळा चेन्नईचे महापौरपद सांभाळले आहे. तसेच डीएमके सत्तेत असताना त्यांनी अनेक मंत्रीपदेही भूषविली आहेत.
तमिळनाडूतील विधानसभा निवडणूकीत त्यांनी करूणानिधींच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती.
सुमारे सहा दशकांपासून तामिळनाडू आणि देशाच्या राजकारणावर आपला ठसा उमटवणारे तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे प्रमुख एम. करुणानिधी यांचे ७ ऑगस्ट रोजी निधन झाले होते.
करुणानिधी हयात असतानाच त्यांचे पुत्र स्टॅलिन आणि अलागिरी यांच्यात पक्षातील वर्चस्वावरुन वाद निर्माण झाला होता. अलागिरी यांची २०१४मध्ये पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा