तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) पक्षाचे सर्वेसर्वा एम के करूणानिधी यांचे ७ ऑगस्ट रोजी वयाच्या ९४व्या वर्षी निधन झाले.
त्यांच्या निधनानंतर तामिळनाडूत ७ दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. चेन्नई येथील कावेरी रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
गेल्या काही दिवसांपासून प्रकृती खालावल्याने रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण वयोमानामुळे त्यांच्याकडून उपचारांना प्रतिसाद मिळू शकला नाही.
त्यांना उपचारासाठी दाखल केल्यापासून रूग्णालयाबाहेर त्यांचे चाहते आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. राज्यात विविध ठिकाणी प्रार्थना केली जात होती. अनेक कार्यकर्त्यांनी आत्महत्याही केली होती.
भारताच्या सर्वांत ज्येष्ठ नेत्यांमध्ये करूणानिधी यांच्या नावांचा समावेश होता. त्यांच्या निधनामुळे दक्षिण भारतातील राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे.
महाराष्ट्राचे वीरपूत्र मेजर कौस्तुभ राणे शहीद
उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत महाराष्ट्राचे वीरपूत्र मेजर कौस्तुभ प्रकाश राणे शहीद झाले.
२९ वर्षीय कौस्तुभ राणे यांचा प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते सेना पदकाने सन्मान करण्यात आला होता.
मीरा रोडच्या शीतल नगरमधील हिरलसागर इमारतीत राणे राहत होते. ते मूळचे कोकणातील वैभववाडीतील सडूरे गावाचे आहेत.
२०१०मध्ये कम्बाईन डिफेन्स सर्व्हिस परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर चेन्नई येथून त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले.
२०११मध्ये ते सैन्यात लेफ्टनंट पदावर रुजू झाले. २०१३मध्ये त्यांना कॅप्टनपदी तर २०१८मध्ये मेजरपदी बढती मिळाली.
३६व्या बटालियनमध्ये असणारे मेजर कौस्तुभ सध्या उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये तैनात होते.
मेजर कौस्तुभ यांचे पार्थिव विशेष विमानाने मुंबईत आणले जाणार आहे. त्यानंतर मीरा रोड येथील त्यांच्या निवासस्थानी ते अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल.
महाराष्ट्रात बांबू प्रवर्तन प्रतिष्ठानची स्थापना होणार
राज्यात बांबू क्षेत्राचे सशक्तीकरण करण्यासाठी अनेक एजन्सीचा समावेश करून महाराष्ट्र बांबू प्रवर्तन प्रतिष्ठान या कंपनीची स्थापना करण्याचा निर्णय महाराष्ट्र मंत्रिमंडळाने घेतला.
बांबू क्षेत्राच्या सर्वांगिण विकासाकरीता कृती आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने समितीची स्थापना करण्यात आली होती.
सदर समितीने राज्य सरकार, ट्रस्ट, खाजगी कंपन्या, बँका आणि इतर चांगल्या संघटना एकत्रित येवून महाराष्ट्र बांबू प्रवर्तन प्रतिष्ठान सुरू करावे असे सुचविले आहे.
प्रारंभी हे प्रतिष्ठान राज्य शासन व इतर संस्थांकडून कॉर्पस फंडाने सुरूवात करता येईल तसेच सीएसआर निधीचाही वापर करता येईल. नंतर सदर कंपनी स्वत:च्या उत्पन्नातून विविध प्रकल्पाची अंमलबजावणी करेल.
भारतीय फुटबॉल संघाचा अर्जेंटिनावर ऐतिहासिक विजय
भारतीय फुटबॉल संघाने कॉटीफ कप स्पर्धेत सहावेळा २० वर्षांखालील विश्वचषक उंचावणाऱ्या अर्जेंटिनावर २-१ असा आश्चर्यकारक विजय मिळवला.
१० खेळाडूंसह खेळूनही भारतीय संघाने मिळवलेला हा विजय फुटबॉल इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिला गेला.
या सामन्यात भारतासाठी गोल करणारे दीपक तांग्री (४थ्या मिनिटाला) आणि अन्वर अली (६८ मिनिटाला) हे भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
गगनजित भुल्लरला फिजी इंटरनॅशनलचे विजेतेपद
भारतीय गोल्फर गगनजीत भुल्लर याने ऑस्ट्रेलियाच्या अँथोनी क्वाएलला पराभूत करत फिजी इंटरनॅशनलचे विजेतेपद पटकावले.
हे त्याचे युरोपीय टीमवरील पहिले जेतेपद आहे. गतवर्षी त्याने मकाऊ खुल्या स्पर्धेत अजिंक्यपद मिळवले होते.
यासोबतच भुल्लर आशियाई टूरवरील भारताचा सर्वात यशस्वी खेळाडू ठरला आहे. तसेच तो ऑस्ट्रेलिया टूरवर विजेतेपद मिळवणारा पहिला भारतीय आहे.
हे त्याचे एकूण दहावे आंतरराष्ट्रीय विजेतेपद असून, आशियाई टूरवर त्याचा नववा विजय आहे.
यापूर्वी भारताच्या अर्जुन अटवाल व ज्योती रंधवा यांनी प्रत्येकी ८ स्पर्धा जिंकल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा