चालू घडामोडी : ८ ऑगस्ट

कापड उद्योगातील ३२८ वस्तूंवरील आयात शुल्कात वाढ

 • केंद्र सरकारकडून कापड उद्योगातील ३२८ वस्तूंवरील आयात शुल्क सध्याच्या १० टक्क्यांवरून वाढवून २० टक्के करण्यात वाढवण्यात आले आहे.
 • मेक इन इंडियातंर्गत देशातंर्गत उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने आयात शुल्क वाढीचा हा निर्णय घेतला आहे.
 • आयात महाग केल्यामुळे स्थानिक कापड उद्योजकांच्या व्यवसायाला बळकटी मिळेल असा केंद्र सरकारचा अंदाज आहे.
 • तसेच कापड उद्योगात मोठया प्रमाणावर रोजगार निर्मितीची क्षमता असून, स्थानिक पातळीवर उत्पादन वाढल्यास नव्या नोकऱ्यांची निर्मिती होऊ शकते.
 • या निर्णयाचा चीन, व्हिएतनाम, टर्की, श्रीलंका आणि बांगलादेश या देशांबरोबर होणाऱ्या कापड व्यापारावर परिणाम होणार आहे.
 • भारत आणि श्रीलंकेमध्ये असलेल्या व्यापार करारामुळे आयात शुल्क वाढीच्या या निर्णयातून श्रीलंकेला काही प्रमाणात सवलत मिळू शकते.
 • परदेशी कंपन्यांनी या निर्णयावर टीका केली आहे. यामुळे कपडयांच्या किंमती वाढतील त्याचा परिणाम खरेदीवर होईल असे या कंपन्यांचे म्हणणे आहे.
 • सरकारने गेल्या महिन्यातही याच प्रकारचा निर्णय घेऊन वस्त्रोद्योगातील ५० वस्तूंवरील आयातशुल्क वाढवले होते.

पी ८-आय विमानांच्या खरेदी व्यवहारावर कॅगचे प्रश्नचिन्ह

 • अमेरिकन कंपनी बोईंगकडून खरेदी करण्यात आलेल्या पी ८-आय या पाणबुडी विरोधी विमानांच्या खरेदी व्यवहारावर कॅगने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
 • २००९साली काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळात भारतीय नौदलासाठी बोईंग कंपनीकडून या विमानांची खरेदी करण्यात आली होती.
 • भारतीय नौदलाला या कराराप्रमाणे आठ पी-८ आय विमाने मिळाली असून चीन आणि पाकिस्तानच्या पाणबुडयांवर हालचालींवर लक्ष ठेवण्याची या विमानाची मुख्य जबाबदारी आहे
 • याच प्रकारची आणखी चार विमाने खरेदी करण्यासाठी १ अब्ज डॉलरचा करार झाला असून, २०२०पर्यंत ही विमाने भारताला मिळतील.
 • पी-८ च्या समावेशानंतर नौदलाने रशियन बनावटीची टीयू-१४२ टेहळणी विमाने सेवेतून निवृत्त करण्यात आली होती.
 कॅगच्या अहवालातील मुद्दे 
 • या करारासाठी अमेरिकन बोईंग आणि स्पेनच्या ईएडी / सीएएसए या कंपन्यांमध्ये मुख्य स्पर्धा होती.
 • अमेरिकन कंपनी बोईंगला प्राधान्य देण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने या करारात ईएडी / सीएएसएच्या ए-३१९ विमानांची किंमत वाढवून दाखवली.
 • ईएडी / सीएएसएपेक्षा बोईंग बरोबरचा पी-८ आय विमान खरेदीचा व्यवहार जास्त महागडा होता. या करारात पक्षपातीपणा करुन अमेरिकन कंपनीला २.१३ अब्ज डॉलरचे कंत्राट बहाल करण्यात आले.
 • बोईंगने दिलेल्या या अत्याधुनिक विमानामध्ये जी साधनसामग्री आहे ती सांगितल्याप्रमाणे काम करत नाही.
 • या विमानामध्ये जी रडार सिस्टीम देण्यात आलीय त्याला काही मर्यादा आहेत. अद्याप सरकारने पाण्याखालील पाणबुडीच्या हालचाली आणि आवाज टिपण्याची आधुनिक यंत्रणा खरेदी केलेली नाही. त्यामुळे वापरामध्ये असलेल्या पी-८ आय विमानांचा क्षमतेनुसार वापर होत नाही.

एस्कॉर्टचे अध्यक्ष व एमडी राजन नंदा यांचे निधन

 • एस्कॉर्ट उद्योगसमूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजन नंदा यांचे ५ ऑगस्ट रोजी निधन झाले.
 • एस्कॉर्ट या कंपनीची सुरुवात राजन यांचे वडील हरप्रसाद आणि काका युदी नंदा यांनी लाहोरमध्ये १९४४ साली केली.
 • राजन नंदा हे १९६५पासून या कंपनीत कार्यरत झाले आणि १९९४मध्ये त्यांनी कंपनीच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली.
 • तेव्हापासून, उद्योगसमूह म्हणून एस्कॉर्ट्सच्या विविधांगी वाढीला चालना देण्याचे प्रयत्न त्यांनी केले होते.
 • ‘सीआयआय’ या भारतीय उद्योग महासंघाचे ते पदाधिकारी होते. या महासंघाच्या कृषी-उद्योग शाखेचे प्रमुखही होते
 • अभिनेते राज कपूर यांची कन्या रितू या त्यांच्या पत्नी, तर अमिताभ बच्चन यांची कन्या श्वेता ही त्यांची सून होत.

सतीश मराठे व एस गुरुमूर्ती यांची आरबीआय संचालक मंडळावर नियुक्ती

 • ‘सहकार भारती’ या राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत सहकारी अर्थचळवळीचे प्रणेते, जनकल्याण आणि युनायटेड वेस्टर्न बँक आदींचे माजी अध्यक्ष सतीश मराठे यांची केंद्र सरकारने रिझव्‍‌र्ह बँकेच्या संचालक मंडळावर नियुक्ती केली आहे.
 • तसेच स्वदेशी जागरण मंचात सक्रिय असणारे सनदी लेखापाल स्वामिनाथन गुरुमूर्ती यांचीही पुढील चार वर्षांसाठी रिझव्‍‌र्ह बँकेच्या संचालक मंडळावर नियुक्ती झाली.

रा. रं. बोराडे यांना साहित्यसेवा जीवनगौरव पुरस्कार

 • सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांची घोषणा ७ ऑगस्ट रोजी करण्यात आली.
 • या साहित्य पुरस्काराचे यंदाचे २७वे वर्ष असून पुढील वर्षी क्रीडा क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तीला या पुरस्कारांमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे.
 • २५ ऑगस्ट रोजी पद्मश्री डॉ. विखे ११८व्या जयंतीनिमित्त प्रवरानगर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल.
 • ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक, माजी प्राचार्य रा. रं. बोराडे यांच्या साहित्य सेवेचा गौरव व्हावा म्हणून यंदाचा साहित्यसेवा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान केला जाणार आहे. १ लाख रुपये, स्मृतिचिन्ह असे या पुरस्कराचे स्वरूप आहे.
 • बाबाराव मुसळे यांच्या झळाळ कादंबरीला दिला जाणारा पुरस्कार ५१ हजार रुपयांचा आहे. इतरही पुरस्कारांचे स्वरुप रोख रक्कम व स्मृतिचिन्ह असे आहे.
 • पुरस्कार विजेते
  • साहित्य जीवनगौरव पुरस्कार : ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक रा. रं. बोराडे.
  • उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार : बाबाराव मुसळे यांच्या झळाळ कादंबरीला.
  • उत्कृष्ट कवितासंग्रहाचा पुरस्कार : महेश लोंढे यांच्या ‘निद्रानाशाची रोजनिशी’ला.
  • कलागौरव : अभिनेते मिलिंद शिंदे
  • समाजप्रबोधनासाठी पुरस्कार : कीर्तनकार हभप शामसुंदर महाराज सोन्नर.
  • नाट्यगौरव पुरस्कार : दत्ता पाटील
  • पत्रकार-लेखक पुरस्कार : डॉ. बाळ बोठे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा