चालू घडामोडी : २४ ऑगस्ट

निधन: अष्टपैलू अभिनेते विजय चव्हाण

  • ‘मोरूची मावशी’ या नाटकातील मावशी अजरामर करणारे प्रसिद्ध अष्टपैलू अभिनेते विजय चव्हाण यांचे २४ ऑगस्ट रोजी वयाच्या ६३व्या वर्षी दिर्घ आजाराने निधन झाले.
  • रंगभूमीसोबतच सिनेमा आणि टीव्ही मालिकांमधून रसिकांना खळखळून हसवणारे विजय चव्हाण गेली ४० वर्षे अभिनय क्षेत्रात कार्यरत होते.
  • विजय चव्हाण यांचा जन्म लालबागमधला. शालेय शिक्षण दादरच्या इंग्लिश स्कूलमध्ये झाल्यावर त्यांनी रूपारेल कॉलेजमधून बी.ए.ची पदवी घेतली.
  • कॉलेजमध्ये असल्यापासून ते एकांकिकांमध्ये भाग घेत असत. पुरुषोत्तम बेर्डे यांच्या ‘टुरटुर’ नाटकाद्वारे त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले. त्यानंतर सुणारे १५ व्यावसायिक नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या.
  • मोरूची मावशी हे विजय चव्हाण यांच्या कारकिदीर्तील सगळ्यात गाजलेले नाटक. या नाटकात त्यांनी मावशीचे स्त्री पात्र अतिशय ताकदीने रंगवले होते, ते प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिले.
  • ‘मोरूची मावशी’ हे नाटक आचार्य अत्रेंनी लिहिले. इंग्रजी नाटक ‘चार्लीज आंट’चा हा स्वैर अनुवाद होता.
  • नाटकातून आपल्या अभिनयाच पाया पक्का केलेल्या चव्हाण यांनी १९८५मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वहिनीची माया’ या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
  • त्यांनी सुमारे ४०० चित्रपटांमध्ये दर्जेदार काम केले. झपाटलेला, पछाडलेला, भरत आला परत जत्रा, माहेरची साडी यांसारख्या अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या.
  • विजय चव्हाण यांना एप्रिल २०१८मध्ये राज्य सरकारने चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले होते.
  • तसेच २०१७चा ‘संस्कृती कलादर्पण’च्या जीवनगौरव पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
  • त्यांची गाजलेली नाटके: कशात काय लफड्यात पाय, कशी मी राहू तशीच, कार्टी प्रेमात पडली, खोली नं. ५, झिलग्यांची खोली, जाऊ बाई हळू, टुरटूर, देखणी बायको दुसऱ्याची, बाबांची गर्लफ्रेंड, मोरूची मावशी, हयवदन, श्रीमंत दामोदर पंत, तू तू मी मी, अशी ही फसवा फसवी, नवरा म्हणू नये आपला, ती तिचा दादला आणि मधला
  • काही गाजलेले चित्रपट: वहिनीचा माया, घोळात घोळ, धुमाकूळ, शेम टू शेम, माहेरची साडी, बलिदान, शुभमंगल सावधान, एक होता विदूषक, माझा छकुला, चिकट नवरा, धांगडधिंगा, पछाडलेला, अगंबाई अरेच्चा, जत्रा, चष्मे बहाद्दर, इश्श्य, जबरदस्त बकुळा, नामदेव घोटाळे, वन रुम किचन, श्रीमंत दामोदर पंत, पछाडलेला, झपाटलेला.
  • मालिका: असे पाहुणे येती, येऊ का घरात, माहेरची साडी, रानफूल, लाइफ मेंबर.

आशियाई क्रीडा स्पर्धा : सहावा दिवस

  • टेनिस: रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण जोडीला सुवर्ण
  • भारताच्या रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण जोडीने टेनिस पुरुष दुहेरी प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केली.
  • अंतिम फेरीत भारतीय जोडीने कझाकिस्तानच्या डेनिस येवस्येव आणि अलेक्झांडर बब्लिक या जोडीवर ६-३, ६-४ अशी मात केली.
  • नौकानयन: भारताला १ सुवर्ण आणि २ कांस्यपदक
  • भारताने नौकानयन स्पर्धेत १ सुवर्ण पदक आणि २ कांस्यपदकांची कमाई केली.
  • नौकानयनमधील क्वाडरपल स्कल्स सांघिक प्रकारात स्वर्ण सिंह, दत्तू भोकनळ, ओमप्रकाश आणि सुखमीत सिंग यांच्या चमूने दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.
  • भारतीय संघाने ६ मिनिटे १७ सेकंद वेळेत शर्यत पूर्ण करत सुवर्ण पदक पटकावले. यंदाच्या स्पर्धेतील भारताचे पाचवे सुवर्णपदक ठरले.
  • याशिवाय रोईंग लाइटव्हेट सिंगल स्कल्स प्रकारात एकेरीमध्ये दुष्यंत चौधरीने तर दुहेरीत रोहित कुमार आणि भगवान सिंह यांनी कांस्यपदक पटकावले.
  • दुष्यंतने ७:१८:७६ अशी वेळ नोंदवली. त्याने यापूर्वी २०१४च्या इंचेऑन आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक सुद्धा जिंकले होते.
  • कबड्डी: भारतीय महिला संघाला रौप्यपदक
  • कबड्डीमध्ये भारताला पुरुषांपोठापाठ महिला संघालाही सुवर्णपदक मिळविण्यात अपयश आले.
  • महिला कबड्डीच्या अंतिम फेरीत इराणने भारताला २७-२४ असे पराभूत करत सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
  • महाराष्ट्रात बऱ्याच कबड्डीपटूंना घडवणाऱ्या शैलजा जैन या इराणच्या सुवर्णपदक विजेत्या संघाच्या प्रशिक्षिका त्यांच्या विजयाच्या शिल्पकार आहेत.
  • नेमबाजी: हिना सिद्धूला कांस्यपदक
  • भारताची नेमबाज हिना सिद्धूने १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्यपदकावर नाव कोरले.
  • सिद्धूने २१९.२ गुणांसह तिसरे स्थान पटकावत कांस्यपदकाची कमाई केली. तर याच प्रकारात मनू भाकर पाचव्या स्थानावर राहिली.
 दत्तू भोकनळ 
  • महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यातल्या तळेगांवचा दत्तू भोकनळ हा एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी रोइंगपटू (नौकानयन खेळाडू) आहे.
  • त्याने २०१४मधील राष्ट्रीय रोइंग स्पर्धेत २ सुवर्णपदके जिंकली. तसेच २०१६साली चीनमध्ये झालेल्या १६व्या आशियाई रोइंग स्पर्धेत त्याने रौप्यपदक मिळवले होते.
  • दक्षिण कोरियात पार पडलेल्या फिसा एशियन ॲन्ड ओशॅनिक ऑलिंपिक क्वालिफिकेशन या नौकानयनाच्या स्पर्धेत पुरुषांच्या एकेरी सामन्यात त्याने रौप्यपदक जिंकले होते.
  • २०१६सालच्या रिओ ऑलिंपिक स्पर्धेसाठी भारताकडून रोइंगसाठी पात्र ठरलेला तो एकमेव खेळाडू होता.

जगात सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांच्या यादी प्रसिद्ध

  • जगात सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप-१० अभिनेत्यांच्या यादीत बॉलिवूड अभिनेते अक्षयकुमार आणि सलमान खान यांना स्थान मिळाले आहे.
  • फोर्ब्स या नियतकालिकाने जारी केलेल्या या यादीत अक्षयकुमार सातव्या, तर सलमान खान नवव्या स्थानी आहे.
  • फोर्ब्सने १ जून २०१७ ते १ जून २०१८ या काळातील अभिनेत्यांनी केलेल्या एकूण कमाईच्या आधारे ही यादी तयार केली आहे.
  • जगातील टॉप-१० अभिनेत्यांची एकत्र कमाई ७४८.५ दशलक्ष डॉलर इतकी आहे. या यादीत हॉलिवूड अभिनेता जॉर्ज क्लुनी सर्वोच्च स्थानी आहे.
  • अभिनेता अक्षयकुमारची कमाई ४०.५ दशलक्ष डॉलर, तर सलमान खानची कमाई ३८.५ दशलक्ष डॉलर आहे.
  • या यादीत नेहमी स्थान मिळविणाऱ्या शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांचा मात्र यंदा या यादीत समावेश नाही.
  • गेल्या महिन्यात जारी झालेल्या जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या १०० अभिनेत्यांमध्येही अक्षयकुमार (७६) आणि सलमान खान (८२) या दोघांनी स्थान मिळविले होते.

स्कॉट मॉरिसन ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान

  • ऑस्ट्रेलियाचे अर्थमंत्री स्कॉट मॉरिसन यांची देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • सध्याचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांच्याविरोधातील स्वपक्षीयांच्या बंडानंतर त्यांच्याजागी स्कॉट मॉरिसन यांची निवड करण्यात आली आहे.
  • या निवडणुकीत माल्कम टर्नबुल यांचे जवळचे सहकारी स्कॉट मॉरिसन यांचा ४५ मतांनी विजय झाला. ऑस्ट्रेलियात गेल्या ११ वर्षात ६ पंतप्रधानाची निवड झाली आहे.
  • गेल्या आठवड्यात अविश्वास प्रस्तावानंतर लेबर पार्टीने पुन्हा सिनेटमध्ये माल्कम टर्नबुल यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला असून, पुन्हा निवडणुका घेण्याचे घोषित केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा