चालू घडामोडी : २ ऑगस्ट

एआयसीटीई अध्यक्षपदी अनिल सहस्रबुद्धे यांची फेरनिवड

  • प्रा. अनिल सहस्रबुद्धे यांची अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) अध्यक्षपदी त्यांची फेरनिवड करण्यात आली आहे.
  • १९८०मध्ये हुबळीतील महाविद्यालयातून त्यांनी तंत्रशिक्षण व अभियांत्रिकीची पदवी सुवर्णपदकासह घेतली. त्यानंतर बेंगळुरुच्या इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्समधून त्यांनी डॉक्टरेट मिळवली.
  • मूळचे कर्नाटकचे असलेल्या सहस्रबुद्धे यांनी १९८३मध्ये इंडियन इस्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये वैज्ञानिक अधिकारी म्हणून कारकीर्दीला सुरुवात केली. काही महिन्यांनी ते टाटा कन्सल्टन्सीमध्ये रुजू झाले.
  • एकंदर ३१ वर्षांच्या देदीप्यमान कारकीर्दीत त्यांनी शैक्षणिक तसेच संशोधन व महत्त्वाच्या प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
  • इटानगर, गुवाहाटी येथील महाविद्यालयात तसेच पुण्यातील नामांकित अशा कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग येथे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
  • त्यांच्या कामाची दखल घेऊन विविध तज्ज्ञ समित्या तसेच विद्यापीठ अनुदान आयोगासारख्या महत्त्वपूर्ण संस्थांमध्येही काम करण्याची संधी मिळाली.
  • तंत्रज्ञान क्षेत्रातील विकासाबाबतचे योगदान तसेच उद्योगप्रवणतेला चालना देणारे उपक्रम राबविल्याबद्दल ‘प्राज’ उद्योगाकडून त्यांना गौरवण्यात आले आहे.
 एआयसीटीई (AICTE) 
  • AICTE : All India Council for Technical Education
  • अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद ही भारत सरकारची देशातील पदविका अभ्यासक्रमामध्ये सुसूत्रता आणि किमान दर्जा राखण्यासाठी व्यापक विचारमंथन घडवून, ठोस धोरण आखण्याच्या उद्देशाने स्थापन केलेली संस्था आहे.
  • तंत्रशिक्षणाच्या अभ्यासाचा दर्जा सुधारणे, त्या संस्थांमध्ये समन्वय ठेवणे हे या परिषदेचे एक प्रमुख काम आहे.
  • याशिवाय नवीन तंत्रशिक्षण संस्था स्थापन करणे, तंत्रशिक्षण संस्थांमधील प्रवेश क्षमतेमध्ये बदल करणे यासाठी देखील ही परिषद मंजुरी देण्याचे कार्य करते.
  • नोव्हेंबर १९४५मध्ये सल्लागार संस्था म्हणून या संस्थेची स्थापना करण्यात आली. १९८७ साली या संस्थेला संसदेने वैधानिक दर्जा दिला.
  • या संस्थेचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. याशिवाय मुंबई, कोलकाता, चैन्नई, कानपुर, चंडीगढ, भोपाळ आणि बंगळूर येथे या परिषदेची क्षेत्रीय कार्यालये आहेत.

भारतीय वंशाचे अक्षय व्यंकटेश यांचा फिल्ड्स मेडलने गौरव

  • ऑस्ट्रेलियात शिक्षण घेतलेले पण मूळचे भारतीय वंशाचे अक्षय व्यंकटेश यांचा गणिताचे प्रख्यात फिल्ड्स मेडलने गौरव करण्यात आला आहे.
  • अक्षयसह केंब्रिज विद्यापीठतील प्राध्यापक कौचर बिरकर, स्वीस फेडरल इस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या एलिसो फिगाली आणि बॉन विद्यापीठातील पीटर स्कूल्ज या ३ गणितींचादेखील फिल्ड्स पदकाने सन्मान करण्यात आला आहे.
  • हे पदक स्वीकारणाऱ्या अक्षय व्यंकटेश यांचे वय केवळ ३६ वर्षे आहे. फिल्ड्स पदक मिळवणारे ते दुसरे ऑस्ट्रेलियन आहेत. (पहिले टेरेंस टाव)
  • अक्षय व्यंकटेश हे मंजूळ भार्गव (२०१४चे फिल्ड्स पदक विजेते) यांच्यानंतर हा पुरस्कार पटकविणारे दुसरे भारतीय वंशाचे व्यक्ती ठरले आहेत.
  • अक्षय यांचा जन्म नवी दिल्लीमध्ये झाला असून, ते डायनामिक्स थिअरीमधील योगदानाबद्दल प्रसिद्ध आहेत.
  • त्यांनी वयाच्या १६व्या वर्षी त्यांनी गणितामध्ये उत्तम गुणांसह पदवी संपादन केली. असे करणारे ते सर्वात कमी वयाचे विद्यार्थी होते.
  • वयाच्या २०व्या वर्षी त्यांनी पीएचडी पदवी संपादित केली. अगदी अल्पकाळामध्ये ते गणितातील संशोधक म्हणून जागतिक पातळीवर प्रसिद्ध झाले.
  • त्यानंतर त्यांनी मॅसॅच्युसेटस इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलजीमध्ये प्रवेश घेतला. तेथे संशोधनकार्य केल्यानंतर ते आता स्टॅनफर्ड विद्यापिठात प्राध्यापक आहेत.
  • अक्षय व्यंकटेश यांना आजवर इन्फोसिस प्राइज, सालेम प्राइज, शास्त्र रामानुजन प्राइज विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
 फिल्ड्स मेडल 
  • गणित विषयात उत्तम कामगिरी व मुलभूत संशोधन करणाऱ्या ४०हून कमी वय असणाऱ्या उभरत्या गणितज्ज्ञांना दर ४ वर्षांनी फिल्ड्स मेडलने गौरविले जाते.
  • या पुरस्काराला गणितातील नोबेल म्हणून ओळखले जाते. हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय गणित संघाकडून जाहीर केला जातो.
  • १५ हजार कॅनडीयन डॉलर, सुवर्ण पदक आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

अॅट्रॉसिटी कायदा पुनर्स्थापित करण्याचा निर्णय

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अॅट्रॉसिटी कायद्यातील मूळ तरतुदी पूर्ववत करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
  • सर्वोच्च न्यायालयाने २० मार्च रोजी अॅट्रॉसिटी कायदा निष्प्रभ करणारा निकाल दिला होता. त्यामुळे देशभरातील दलित आणि आदिवासींमध्ये रोष निर्माण झाला होता.
  • त्यामुळे हा कायदा पुनर्स्थापित करण्यासाठी संसदेत घटनादुरुस्ती विधेयक मांडण्यात येणार आहे.
  • अॅट्रॉसिटी कायद्यात दलित आणि अनुसूचित जाती-जमातींवर अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला अटकपूर्व जामीन मिळण्याची सोय नव्हती.
  • पोलिसांकडे तक्रार येताच कोणत्याही प्राथमिक चौकशीविना गुन्हा नोंदवून आरोपीला अटक करण्यात येत होती. मात्र, या तरतुदींचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत असल्याच्या तक्रारी केल्या जात होत्या.
  • हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने आरोपींना तत्काळ अटक होऊ नये आणि अटकेपूर्वी आरोपीची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी असा निर्णय देत या जाचक तरतुदी निष्प्रभ केल्या होत्या.
  • मात्र, या निकालावरून देशभरात रोष व्यक्त झाल्यानंतर केंद्र सरकारने अॅट्रॉसिटी कायद्यातील मूळ तरतुदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रध्वजाचे रचनाकार पिंगली वेंकैया यांची १४२वी जयंती

  • भारतीय राष्ट्रध्वजाचे म्हणजेच तिरंग्याचे आद्य रचनाकार पिंगली वेंकैया यांची २ ऑगस्ट रोजी १४२वी जयंती साजरी झाली.
  • २ ऑगस्ट १८७६ रोजी त्यांचा सध्याच्या आंध्रप्रदेश राज्यातील मच्छलीपट्टनम येथील भतलाम पेनूमारू या गावात जन्म झाला होता.
  • वयाच्या १९व्या वर्षीच ते ब्रिटीश लष्करात भरती झाले. ते दक्षिण आफ्रिकेमधील अँग्लो-बोअर युद्धामध्ये सैनिक म्हणून ब्रिटिशांच्या बाजूने लढले.
  • या काळात त्यांची आणि महात्मा गांधींची दक्षिण आफ्रिकेत भेट झाली. त्यानंतर पुढील ५० वर्षाहून अधिक काळ हे दोन्ही नेते एकमेकांच्या संपर्कात होते.
  • ते हिरे खाण उत्खन्नातील तज्ञ होते. त्यामुळे त्यांना 'डायमंड वेंकैया’ हे टोपणनाव देण्यात आले होते.
  • त्याचप्रमाणे कापसावरील संशोधनामध्ये त्यांना विशेष स्वारस्य असल्याने त्यांना कॉटन वेंकैया नावानेही ओळखले जायचे.
  • त्यांना उर्दू तसेच जपानी भाषेबरोबरच इतरही अनेक भाषा अवगत होत्या. त्यांच्याकडे जियोलॉजी विषयातील डॉक्टरेट पदवीही होती.
  • सुमारे ५ वर्षे अभ्यास केल्यानंतर त्यांनी राष्ट्रध्वजाची रचना तयार केली. एस बी बोमान आणि उमर सोमानी यांनी पिंगानी यांना या कार्यात मदत केली.
  • ३१ मार्च १९२१ मध्ये विजयवाडा येथे झालेल्या काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीमध्ये त्यांनी भगव्या आणि हिरव्या रंगाचा झेंडा भारतीय राष्ट्रध्वज म्हणून सादर केला.
  • लाला हंसराज यांनी या झेंड्यावर चर्खा असावा असा सल्ला दिला. तर गांधीजींनी भगव्या आणि हिरव्या रंगाच्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या पट्टी असावी असा सल्ला दिला. आणि अशाप्रकारे तिरंग्याचा जन्म झाला.
  • १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पिंगली यांच्या कल्पनेतून साकारलेल्या तिरंगी झेंड्याला भारताचा राष्ट्रध्वज म्हणून मान्यता मिळाली
  • भारतीय संविधान समितीने २२ जुलै १९४७ रोजी तिरंगा झेंडा भारताचा राष्ट्रध्वज असल्याचे जाहीर केले.
  • १९६३साली पिंगली यांचा मृत्यू झाला. स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यासाठी भारतीय पोस्ट खात्याने २००९ साली त्यांच्या सन्मानार्थ पोस्टाचे तिकीट जारी केले.
  • २०११साली भारतरत्न पुरस्कारासाठी (मरणोत्तर) त्यांच्या नावाची शिफारसही करण्यात आली होती.

धावपटू नवीन डागर उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी

  • गुवाहाटीमध्ये झालेल्या आंतरराज्य ॲथलेटिक्स स्पर्धेत स्टीपलचेस धावपटू नवीन डागरने उत्तेजक पदार्थाचे सेवन केल्याचे सिद्ध झाले आहे.
  • आंतरराज्य स्पर्धेत त्याने मेल्डोनियम या बंदी असलेल्या उत्तेजक पदार्थाचे सेवन केल्याचे राष्ट्रीय उत्तेजकविरोधी संस्थेने (नाडा) घेतलेल्या चाचणीत सिद्ध झाले आहे.
  • भारतीय ॲथलेटिक्स महासंघाकडून डागरवर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
  • २०१४मध्ये इन्चॉन येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत डागरने कांस्यपदक जिंकले होते.
  • गुवाहाटीत आंतरराज्य ॲथलेटिक्स स्पर्धेत डागरने ८:४१ सेकंद अशी वेळ नोंदवून आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली होती.
  • परंतु त्याच्यावरील उत्तेजकाचे सावट दूर झाले नाही, तर आशियाई क्रीडा स्पर्धेतील ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारात भारताचा सहभाग नसेल.
  • उत्तेजकांचे सेवन केल्याप्रकरणी दोषी आढळलेला डागर हा या आठवड्यातील दुसरा ॲथलीट आहे. यापूर्वी भालाफेकपटू अमित कुमारही उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी सिद्ध झाला आहे.

रिलायन्स जिओ व स्टेट बँकेमध्ये करार

  • रिलायन्स जिओ व स्टेट बँक ऑफ इंडियाने डिजिटल भागीदारीसाठी करार केला आहे. यानुसार एसबीआय योनो ही स्टेट बँकेची डिजिटल बँकिंग सेवा आता माय जिओवर उपलब्ध होणार आहे.
  • यामुळे स्टेट बँकेच्या ग्राहकांना अधिक वेगवान व सर्वसमावेशक सेवा मिळेल. तर, जिओच्या ग्राहकांना स्टेट बँकेकडून देण्यात येणाऱ्या डिजिटल बँकिंग व अन्य आर्थिक सेवा मिळू शकतील.
  • याशिवाय जिओ प्राइमच्या माध्यमातून जिओ व स्टेट बँकेच्या ग्राहकांना रिलायन्स रिटेल, जिओ, पार्टनर ब्रँड्स यांतील विशेष ऑफरचा लाभ मिळू शकेल. ही डिजिटल भागीदारी दोन्हीकडील ग्राहकांसाठी उपयुक्त ठरेल.

१ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट : जागतिक स्तनपान साप्ताह (World Breastfeeding Week)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा