निधन: ज्येष्ठ पत्रकार, लेखक मानवाधिकार कार्यकर्ते कुलदीप नय्यर
ज्येष्ठ पत्रकार, लेखक, शांततेसाठी काम करणारे मानवाधिकार कार्यकर्ते कुलदीप नय्यर यांचे २२ ऑगस्ट रोजी दिल्लीत वयाच्या ९५व्या वर्षी निधन झाले.
देशातल्या नामवंत वृत्तपत्रांसाठी त्यांनी स्तंभलेखन केले होते. आणीबाणीच्या काळात नय्यर हे तुरुंगातही गेले होते.
कुलदीप नय्यर यांचा जन्म १४ ऑगस्ट १९२३ रोजी पाकिस्तानच्या सियालकोट भागात झाला. लाहोरमध्ये त्यांनी एल.एल.बी.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या मेडिल स्कूल ऑफ जर्नालिझममधून त्यांनी शिष्यवृत्तीवर पत्रकारितेचे शिक्षण घेतले.
‘अंजाम’ नावाच्या एका उर्दू वृत्तपत्रातून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी इंग्रजी पत्रकारितेकडे आपली वाटचाल केली.
दिल्लीतील ‘द स्टेट्समन’या इंग्रजी वृत्तपत्रात संपादक म्हणून काम केल्यानंतर ते ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये रुजू झाले आणि तेथेही संपादकपदही भूषवले.
ते पत्रकारितेच्या १९७५च्या आणीबाणी विरोधातील लढाईचे प्रतीक बनले होते. सरकारी हस्तक्षेपाविरोधात निदर्शनांचे नेतृत्व करणाऱ्या नय्यर यांना अंतर्गत सुरक्षा कायद्याखाली त्यावेळी तुरुंगात टाकण्यात आले होते.
१९९६मध्ये संयुक्त राष्ट्रात गेलेल्या भारताच्या प्रतिनिधीमंडळाचे ते सदस्य होते. ऑगस्ट त्यांची १९९७ साली राज्यसभेवर खासदार म्हणूनही नियुक्ती झाली होती.
१९९०मध्ये ब्रिटनमधील भारताचे उच्चायुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
इंडियन एक्स्प्रेससह डेक्कन हेराल्ड, द डेली स्टार, द संडे गार्डियन, द न्यूज तसेच पाकिस्तानमधील द एक्सप्रेस ट्रिब्युन, डॉन अशा १४ भाषेतील ८०हून अधिक वृत्तपत्रांसाठी त्यांनी स्तंभलेखन केले होते.
इंडिया आफ्टर नेहरु, इमर्जन्सी रिटोल्ड अशा राजकीय, सामाजिक विषयावरील विविध १५ पुस्तकांचे लेखन नय्यर यांनी केले आहे.
‘बिटविन द लाइन्स’ हा त्यांचा सर्वांधिक वाचला जाणारा कॉलमही त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत सुरू होता.
२०१५साली पत्रकारितेतील त्यांच्या देदीप्यमान कार्यासाठी इंडियन एक्स्प्रेस समूहाने रामनाथ गोयंका उत्कृष्ट पत्रकारितेचा जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले.
सत्तेच्या दबावापुढे कधी मान न झुकविणारे, भारत-पाक शांतीपर्वासाठी अव्याहतपणे संघर्ष करणारे मानवतावादी, व्यासंगी आणि निर्भीड पत्रकार म्हणून ते कायम स्मरणात राहतील.
नय्यर यांची काही पुस्तके : बियाँड द लाइन्स, इंडिया - द क्रिटिकल इयर्स, डिस्टंट नेबर्स, सप्रेशन ऑफ जजेस, इंडिया आफ्टर नेहरू, द जजमेंट - इनसाइड स्टोरी ऑफ द इमर्जन्सी इन इंडिया, वॉल अॅट वाघा, विदाऊट फिअर: द लाइफ अँड ट्रायल ऑफ भगत सिंग.
भामला फाऊंडेशनच्या ‘प्लास्टीक जनजागृती’विषयक मोहिमेला संयुक्त राष्ट्र संघटनेकडून ‘जागतिक स्तरावरील प्लास्टीक जनजागृतीविषयक मोहिम’ म्हणून घोषित करण्यात आले.
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या न्यूयार्क (अमेरिका) येथील मुख्य कार्यालयात बोलावून भामला फाऊंडेशनला सन्मानित करण्यात आले.
त्याचबरोबर या प्रभावी सांगितिक मोहिमेला युनोने आपल्या पर्यावरण विषयक मोहिमेतही सामील करून घेतले आहे.
‘टिक, टिक, प्लास्टिक टिक ना पाए रे…’ या यूटय़ूबवर गाजत असलेल्या गाण्याची निर्मिती भामला फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली होती.
या गाण्याचे ५ जून या पर्यावरण दिनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते. या गाण्याला जगभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला.
गाण्याच्या माध्यमातून प्लास्टिकच्या वापराबाबत जनजागृतीचा संदेश देण्यासाठी यामध्ये संगीत आणि बॉलीवूड क्षेत्रातील अनेक दिग्गज सहभागी झाले होते.
शक्य तिथे प्लास्टिकचा वापर टाळा आणि एका वेळेसच वापराच्या दर्जाच्या प्लास्टिकवर बंदी घाला, असा महत्त्वपूर्ण संदेश घेऊ न भामला फाऊंडेशनने या गाण्याची निर्मिती केली होती.
प्रसिद्ध संगीतकार शान यांनी या गाण्याला संगीत दिले असून गीतरचना स्वानंद किरकिरे यांनी केली आहे. तर शामक दावर यांनी नृत्यदिग्दर्शन केले आहे.
शंकर महादेवन, सोनू निगम, अरमान मलिक, सुनिधी चौहान, आयुषमान खुराणा, कनिका कपूर, नीती मोहन, शेखर रावजियानी आदी मान्यवर गायकांनी या गाण्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला होता.
या सांगितिक मोहिमेला याआधी राष्ट्रीय पुरस्कारानेही (नॅशनल ग्रीन अवॉर्ड) सन्मानित करण्यात आले होते.
तसेच भारताच्या पर्यावरण खात्यानेही याच गाण्याला आपल्या पर्यावरणविषयक जनजागृती मोहिमेत सामील करून घेतले आहे. विविध राज्यांमध्ये आणि शाळांमध्ये ही सांगितिक मोहिम यशस्वी झाली आहे.
भामला फाऊंडेशनचे अध्यक्ष: आसिफ भामला
आशियाई क्रीडा स्पर्धा: पाचवा दिवस
नेमबाजी: १५ वर्षीय शार्दुल विहानला रौप्यपदक
भारताचा १५ वर्षीय युवा नेमबाज शार्दुल विहानला पुरुषांच्या डबल ट्रॅप प्रकारात सुवर्णपदकाने हुलकावणी दिली.
दक्षिण कोरियाच्या शिन ह्यूनहू याने विहानला पिछाडीवर टाकत सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे विहानला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
यासह शार्दुल विहान आशियाई स्पर्धांमध्ये पदक जिंकणारा तो भारताचा सर्वांत युवा नेमबाज ठरला आहे.
११ जानेवारी २००३ रोजी जन्मलेला शार्दूल मूळ मेरठचा (उत्तर प्रदेश) आहे. सध्या तो नववी इयत्तेत शिकत आहे. आशियाई स्पर्धेत २ सुवर्णपदके जिंकलेल्या अन्वर सुलतान यांचा तो शिष्य आहे.
गेल्यावर्षी राष्ट्रीय शॉटगन नेमबाजी स्पर्धेच्यावेळी शार्दूल अवघा १४ वर्षांचा होता. त्या स्पर्धेत त्याने चार सुवर्णपदके पटकावली होती.
२०१७मध्ये पार पडलेल्या आयएसएसएफ वर्ल्ड शॉटगन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या ज्युनियर संघाचा तो सदस्य होता.
त्याने जर्मनी येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय ज्युनियर ग्रांप्रीमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
टेनिस: अंकिता रैनाला कांस्यपदक
भारताची टेनिसपटू अंकिता रैनाने महिलांच्या एकेरी स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली. यासह ती टेनिसमध्ये पदक मिळवणारी दुसरी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.
यापूर्वी २००६साली सानिया मिर्झाने दोहा आशियाई स्पर्धेत रौप्य तर २०१०गोंझाऊ आशियाई स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली होती.
अंकिता रैनाला उपांत्य फेरीच्या सामन्यात चीनच्या झ्यँग शुईकडून ४-६, ७-६ अशा पराभवाचा सामना करावा लागला.
कबड्डी: भारताचा धक्कादायक पराभव
सातवेळा आशियाई स्पर्धेचे विजेतेपद मिळवणाऱ्या भारताला इराणने उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभवाचा धक्का दिला.
भक्कम बचावाच्या आधारावर इराणने भारतावर २७-१८ अशी ९ गुणांच्या फरकाने मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
आशियाई स्पर्धेतील भारताचा हा ऐतिहासिक पराभव ठरला. कारण यापूर्वी भारताने सर्व आशियाई स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावले होते.
आशियाई क्रीडा स्पर्धेत कबड्डीला १९९०साली सुरुवात करण्यात आली, तेव्हापासून आतापर्यंत भारताने ७ सुवर्णपदके पटकावली होती.
झुलन गोस्वामीची टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती
भारतीय महिला संघाची अनुभवी क्रिकेटपटू झुलन गोस्वामीने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे.
झुलनने आतापर्यंत ६८ टी-२०, १६८ वन-डे आणि १० कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे.
झुलनने ६८ आंतरराष्ट्रीय टी-२० सामनन्यांमध्ये ५६ विकेट घेतल्या आहेत. वन-डे क्रिकेटमध्ये झुलनच्या नावावर १६९ सामन्यांत २०० विकेट जमा आहेत.
महिला वन-डे क्रिकेटच्या इतिहासात झुलनच्या नावावर सर्वाधिक बळींची नोंद आहे. २०१७साली इंग्लंडमध्ये झालेल्या महिला विश्वचषकातही झुलनने महत्वाची कामगिरी बजावली होती.
२००७साली झुलनने आयसीसीचा सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावला होता.
याव्यतिरीक्त अर्जुन पुरस्कार, पद्मश्री यासारखे मानाचे पुरस्कार झुलन गोस्वामीच्या खात्यात आहेत.
रिलायन्सचे बाजार भांडवल सुमारे ८ लाख कोटी
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे बाजार भांडवल सुमारे ८ लाख कोटींवर पोहोचले.
हा टप्पा ओलांडणारी रिलायन्स ही पहिली कंपनी बनली असून टीसीएस अद्याप २१ हजार कोटींनी मागे आहे.
रिलायन्सच्या जवळ असलेली कंपनी आयटी क्षेत्रातील टीसीएस ही एकमेव आहे. मात्र, रिलायन्स वेगाने पुढे सरकत आहे. टीसीएसचे बाजार मुल्य ७.७९ लाख कोटी रुपये आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा