त्रिपुरा राज्य, ICAR, CISF यांच्या चित्ररथाला पुरस्कार
- ७०व्या प्रजासत्ताक दिनाच्या विविध चित्ररथांच्या पथसंचलनातील विजेत्यांना संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
- या पथसंचलनात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे १६ आणि विविध शासकीय विभागांचे ६ असे एकूण २२ चित्ररथ सहभागी झाले होते.
- शासकीय विभागामधील चित्ररथांमध्ये भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) यांच्या चित्ररथास संयुक्तरित्या प्रथम पुरस्कार प्राप्त झाला.
- भारतीय कृषी संशोधन परिषदेचा चित्ररथ ‘किसान गांधी – मिश्रित खेती, खुशीयों की खेती’ या संकल्पनेवर आधारित होता.
- या चित्ररथाद्वारे ग्रामीण समृद्धीसाठी दुधाचे उत्पादन, स्वदेशी जातींचा उपयोग आणि सेंद्रिय शेती दर्शविण्यात आली होती.
- केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा चित्ररथ ‘राष्ट्रीय मालमत्तेची सुरक्षा - ५० गौरवशाली वर्षे’ या संकल्पनेवर आधारित होता.
- केंद्रीय सार्वजनिक कार्य विभागच्या ‘वंदे मातरम्’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथाला विशेष पुरस्कार देण्यात आला.
- राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या श्रेणीमध्ये ‘गांधीवादी मार्गाने ग्रामीण अर्थव्यवस्थेचे सशक्तीकरण’ या संकल्पनेवर आधारित त्रिपुरा राज्याच्या चित्ररथाला प्रथम पुरस्कार मिळाला.
- तर द्वितीय पुरस्कार ‘गांधीजींच्या आशेचा किरण : आपली संयुक्त संस्कृती’ या संकल्पनेवर आधारित जम्मू व काश्मीर राज्याचा चित्ररथास मिळाला.
- पंजाब राज्याचा चित्ररथाला तृतीय पुरस्कार मिळाला. त्यांचा चित्ररथ ‘जालियनवाला बाग' या संकल्पनेवर आधारित होता.
- या प्रजासत्ताक दिनाला महाराष्ट्राच्या वतीने १९४२च्या 'भारत छोडो' आंदोलनाच्या संकल्पनेवर आधारित साकारण्यात चित्ररथ सदर ज्कारण्यात आला.
- नामवंत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली २० कलावंतांनी हा चित्ररथ उभारला असून प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांची स्वरबद्ध केलेले 'वंदे मातरम' गीत या चित्ररथाचे आकर्षण होते.
पियुष गोयल यांना कार्नोट पारितोषिक
- केंद्रीय रेल्वे मंत्री आणि कोळसा व कॉर्पोरेट अफेयर्स मंत्री पियुष गोयल यांना चौथे कार्नोट पारितोषिक (२०१८) देऊन गौरविण्यात आले.
- ऊर्जा क्षेत्रातील उत्कृष्ट प्रदर्शन आणि शाश्वत ऊर्जा उपायांमध्ये केलेल्या अमूल्य कार्याबद्दल त्यांना क्लेनमन सेंटर फॉर एनर्जी पॉलिसीतर्फे या पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.
- हे पारितोषिक स्वीकारताना पियुष गोयल यांनी पुरस्काराची रक्कम आंतरराष्ट्रीय सौर आघाडीला दान करत असल्याचे जाहीर केले.
- पियुष गोयल यांनी २०१४ ते २०१७ दरम्यान ऊर्जा आणि नूतनीकरणक्षम ऊर्जा मंत्री म्हणून त्यांनी ग्रामीण विद्युतीकरण कार्यात अमुल्य योगदान दिले होते.
- त्यांनी १८,००० दुर्गम गावांमधील जलद विद्युतीकरण, जगातील सर्वात मोठा एलईडी बल्ब वितरण कार्यक्रम, ऊर्जा क्षेत्रातील सुधारणांसाठी व्यापक असा उदय कार्यक्रम, जगातील सर्वात मोठा नूतनीकरणक्षम ऊर्जा विस्तार कार्यक्रम या सारख्या योजना राबवून उर्जा क्षेत्रात परिवर्तन घडवून आणले.
- ऊर्जा क्षेत्रातील प्रतिष्ठित अशा या पारितोषिकाचे नाव फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ निकोलस साडी कार्नोट यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे, ज्याने हे ओळखले होते की वाफेच्या इंजिनची शक्ती मानवी विकासातील ‘एक महान क्रांती’ ठरेल.
- कार्नोट पारितोषिक (२०१८) हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली उर्जा दारिद्र्य निर्मूलनाच्या आणि शाश्वत उर्जा वापराच्या दिशेने भारताच्या प्रयत्नाची घेतलेली दखल आहे.
पियुष गोयल
- भारतीय जनता पक्षाचे नेते असलेले पियुष गोयल यांचा जन्म १३ जून १९६४ रोजी मुंबईमध्ये झाला.
- मे २०१४ ते सप्टेंबर २०१७ ते दरम्यान नवीन आणि नूतनीकरणक्षम ऊर्जा (स्वतंत्र प्रभार) मंत्री होते.
- नोव्हेंबर २०१४ ते सप्टेंबर २०१७ दरम्यान ते कोळसा मंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि ऊर्जा मंत्री (स्वतंत्र प्रभार) होते.
- सप्टेंबर २०१७पासून ते रेल्वे मंत्री आणि कोळसा व कॉर्पोरेट अफेयर्स मंत्री म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.
- अलीकडेच अर्थमंत्री अरुण जेटली यांची प्रकृती ठीक नसल्या कारणाने गोयल यांच्याकडे अर्थमंत्रीपदाचा अतिरिक्त प्रभारही देण्यात आला आहे.
बीएआरसी इंडियाच्या अध्यक्षपदी पुनित गोएंका
- ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च कौन्सिल ऑफ इंडियाच्या (बीएआरसी इंडिया) अध्यक्ष पदावर झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेसचे (ZEEL) एमडी व सीईओ पुनित गोएंका यांची नियुक्ती झाली आहे.
- बीएआरसीचे संस्थापक अध्यक्ष म्हणून पुनित गोएंका यांनी बीएआरसीच्या विकासात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
बीएआरसी इंडिया
- ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च कौन्सिल ऑफ इंडिया (बीएआरसी इंडिया) २०१०मध्ये स्थापन झालेली संयुक्त उद्योग कंपनी आहे, जी प्रसारक, जाहिरातदार आणि जाहिरात व मीडिया एजन्सींचे प्रतिनिधीत्व करते.
- इंडियन ब्रॉडकास्टिंग फाऊंडेशन, इंडियन सोसायटी ऑफ ॲडव्हर्टायझर्स आणि ॲडव्हर्टायझिंग एजन्सी असोसिएशन ऑफ इंडिया हे बीएआरसी इंडियाचे प्रवर्तक आहेत.
- केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार बीएआरसी इंडियाची स्थापना झाली आहे.
- अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर बीएआरसी इंडिया पारदर्शी, अचूक आणि सर्वसमावेशी टीव्ही प्रेक्षकांची मोजमाप प्रणाली म्हणून विकसित झाली आहे.
- बीएआरसी भारतीय प्रसारकांना आणि जाहिरातदारांना महत्वाची माहिती प्रदान करते.
- बीएआरसी इंडिया १९.७ दशलक्ष घरांमधील सुमारे ८३६ दशलक्ष दर्शकांच्या टीव्ही सवयींचे विश्लेषण करते. यामुळे ही टीव्ही प्रेक्षकांचे विश्लेषण करणारी जगातील सर्वात मोठी सेवा ठरते.
मुख्यमंत्री बेबी केअर किट योजना
- महाराष्ट्रात बालमृत्यू व कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी जन्मणाऱ्या नवजात बालकांसाठी ‘मुख्यमंत्री बेबी केअर किट योजना’ महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सुरु केली आहे.
- शासकीय रुग्णालय अथवा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रसूती होणाऱ्या महिलांना पहिल्या प्रसूतीवेळी त्यांच्या नवजात बालकांसाठी सरकारतर्फे २ हजार रुपयांचे बेबी केअर किट मोफत देण्यात येणार आहे.
- दोन हजार रुपयांच्या रकमेच्या या किटमध्ये सुमारे १७ विविध वस्तूंचा समावेश आहे. ही योजना सरकारी रुग्णालयात प्रसूती झालेल्या सर्व वर्गातील महिलांसाठी लागू आहे.
- २६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनापासून या योजनेची अंमलबजावणी सुरु झाली आहे. या योजनेसाठी पहिल्या टप्प्यात २० कोटी रुपये उपलब्ध केले असून भविष्यात त्यात वाढ केली जाईल.
- ही योजना एकात्मिक बालविकास सेवा योजना केंद्र सरकारद्वारा पुरस्कृत असून, ० ते ६ वर्षे वयोगटांतील मुलांच्या विकासाकडे लक्ष देण्याच्यादृष्टीने या उपक्रमात विविध उपक्रम राबविले जातात.
- या किटमधील साहित्य: लहान मुलांचे कपडे, मच्छरदाणी, प्लास्टिक लंगोट, लहान मुलांच्या झोपण्याची गादी, लहान मुलांचे टॉवेल, थर्मामीटर, तेल, गरम ब्लँकेट, खेळणी, प्लास्टिक चटई, मुलांची नखे काढण्यासाठी नेलकटर, हात मोजे व पायमोजे, हात धुण्याचे लिक्विड, मुलाला गुंडाळून ठेवण्यासाठी कापड, आईसाठी लोकरीचे कापड, बॉडी वॉश लिक्विड, सर्व साहित्य ठेवण्यासाठी बॅग
- राज्यात सर्वसाधारणपणे वर्षाला २० लाख महिला प्रसूत होत असतात. त्यापैकी आठ लाख महिला शहरी भागांत, १२ लाख महिला आदिवासी, ग्रामीण भागांतील असतात.
- यात सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र व सरकारी रुग्णालयात प्रसूती होणाऱ्या महिलांची संख्या १० लाखांच्या आसपास आहे. त्यात पहिल्या प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या सुमारे ४ लाख आहे.
- बहुतांश विकसित देशांमध्ये बालमृत्यू रोखण्यासाठी बेबी केअर किटचा वापर झाल्याचे निदर्शनास आले आहे.
- या धर्तीवर भारतात तेलंगणा, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये नवजात बालकांना बेबी केअर किट उपलब्ध करून देत बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यात यश प्राप्त झाले आहे.
नौदलाच्या उपप्रमुखपदी मुरलीधर सदाशिव पवार
- नौदलाच्या उपप्रमुखपदी (डीसीएनएस) व्हाइस ॲडमिरल मुरलीधर सदाशिव पवार यांची नियुक्ती झाली आहे. ते आतापर्यंत पूर्व नौदल कमांडचे चीफ ऑफ स्टाफ होते.
- व्हाइस ॲडमिरल पवार हे मूळ महाराष्ट्रातील आहेत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमार्फत जुलै १९८२ला ते नौदलात रुजू झाले.
- विविध युद्धनौकांचे सारथ्य केल्यावर त्यांची नियुक्ती महाराष्ट्र, गोवा व गुजरातचे नौदल प्रमुख म्हणून झाली होती. तिथून पूर्व कमांडच्या नियुक्तीनंतर आता ते नौदल मुख्यालयात डीसीएनएसपदी रुजू झाले आहेत.
- पश्चिम नौदल कमांड प्रमुखपदी व्हाइस ॲडमिरल पी. अजित कुमार यांची नियुक्ती होत आहे. ३१ जानेवारीला ते पदभार स्वीकारतील.
- पश्चिम कमांडचे प्रमुख व्हाइस ॲडमिरल गिरीश लुथरा हे निवृत्त झाल्यामुळे त्यांची जागा सध्या नौदल मुख्यालयात उपप्रमुख (व्हीसीएएस) असलेले व्हाइस ॲडमिरल पी. अजित कुमार घेतील.
- अजित कुमार यांना अलिकडेच प्रजासत्ताक दिनी परम विशिष्ट सेवा पदक घोषित झाले. ते जून १९८१ ला नौदलात रुजू झाले होते. महत्त्वाच्या युद्धनौकांचे सारथ्य त्यांनी केले आहे.
- अजित कुमार यांच्याजागी व्हाइस ॲडमिरल जी. अशोक कुमार यांची नियुक्ती झाली आहे. ते आता नौदलाचे नवीन उपप्रमुख (व्हीसीएएस) असतील. आतापर्यंत ते डीसीएनएस होते.
राजीव चोप्रा एनसीसीचे नवे महानिरीक्षक
- लेफ्टनंट जनरल राजीव चोप्रा यांची राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी: नॅशनल कॅडेट कॉर्प्स) महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- ते राष्ट्रीय संरक्षण अकादमी (खडकवासला) व भारतीय सैन्य अकादमी (डेहराडून) माजी विद्यार्थी आहेत. २०१८मध्ये त्यांना विशेष सेवा पदक देऊन सन्मानित करण्यात आले होते.
राष्ट्रीय छात्र सेना
- राष्ट्रीय छात्र सेना ही भारतातील देशांतर्गत असुरक्षित प्रसंगी नागरी संरक्षण व नागरी सेवकासाठी मोलाचे कार्य करणारी छात्र सेवा संघटना आहे.
- एनसीसीचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. ‘एकता आणि शिस्त’ हा एनसीसीचा सिद्धांत आहे.
- २६ नोव्हेंबर १९४८ला विशेष कायदा मंजूर करून एनसीसीची स्थापना करण्यात आली. देशातील सर्व बहुतेक शाळा व महाविद्यालयांमधून ही योजना राबवली जाते.
- यामध्ये देशभरातील शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांतील विद्यार्थी स्वेच्छेने भाग घेतात. त्यांना सैन्य प्रशिक्षण दिले जाते.
- यातून देशाप्रती आदर, निष्ठा, प्रेम असलेले साहसी युवक तयार करणे हाच संघटनेचा उद्देश आहे.
- ही एक त्रि-सेवा संस्था आहे. यात भूदल , नौदल आणि वायुदल तरुणांना देशभक्त आणि शिस्तप्रिय नागरिक बनवण्यासाठी एकत्रितपणे काम करतात.
युएई आणि सौदीचे संयुक्त डिजिटल चलन: अबेर
- संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबियाच्या मध्यवर्ती बँकांनी अलीकडेच ‘अबेर’ नामक सामायिक डिजिटल चलन सुरू केले आहे.
- ब्लॉकचेन व डिस्ट्रिब्यूटेड लेजर्स टेक्नोलॉजीद्वारे या दोन्ही देशांमधील आर्थिक देवाण-घेवाणीसाठी अबेर या डिजिटल चलनाचा वापर केला जाईल.
- या डिजिटल चलनामुळे वित्तीय विनिमयासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होईल. सुरुवातीला हे चलन मर्यादित बँकांमध्ये वापरले जाणार आहे.
- या चलनाच्या तांत्रिक, आर्थिक आणि कायदेशीर गरजांचा अभ्यास केल्यानंतर, या चलनाचा वापर वाढविला जाणार आहे.
- अबेर हे डिजिटल चलन मध्यवर्ती बँका आणि अन्य बँका यांच्यातील डिस्ट्रिब्यूटेड डेटाच्या वापरावर अवलंबून आहे. हे ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित असते.
ब्लॉकचेन तंत्रज्ञान
- ब्लॉकचेन हे एक प्रकाचे डिजिटल पुस्तक आहे. यामध्ये माहिती अतिशय सुरक्षितरीत्या साठवली जाऊ शकते. माहितीचे डिजिटल प्रकारात सर्वत्र वितरण केले जाणे हा या तंत्रज्ञानाचा मुलभूत हेतू आहे.
- थोडक्यात, कोणताही व्यवहार दोन व्यक्ती/ संस्थांमध्ये पार पडला असता त्याची एंट्री ही असंख्य संगणक/ सर्वरवर जगभरात साठवली जाते. या माहितीचा एक ब्लॉक (ठोकळा) तयार होतो.
- या माहितीमध्ये बदल करणे अथवा हॅक करणे हे अशक्य असते. कारण ही माहिती बहुकेंद्रित प्रकारे साठवली जाते.
- कुणाही एका ठिकाणाहून यांचे नियंत्रण होणे शक्य नसते आणि कुठेही त्यात बदल करण्याचा प्रयत्न झाला तर इतर ठिकाणच्या माहितीशी तुलना करून तो बदल नाकारला जातो.
- अशा प्रत्येक व्यवहार/प्रक्रियेचा एक ब्लॉक तयार होत जातो. प्रत्येक टप्प्यावर त्याची शृंखला तयार होत जाते.
- याद्वारे संपूर्ण प्रक्रियेचा मार्ग सहज तपासता येतो, तसेच त्यात बदल करणे कुणासही शक्य होऊ शकत नाही.
- काही राष्ट्रे डिजिटल चलन न स्वीकारता ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचे इतर उपयोग विविध प्रणाली कशी भक्कम करता येईल यासाठी करत आहेत.
- हे तंत्रज्ञान अतिशय सुरक्षित व पारदर्शी आहे. क्रिप्टोकरन्सीमध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. याव्यतिरिक्त याचा वापर आर्थिक व्यवहार, प्रशासन, माहिती साठवणूक आणि इंटरनेट ऑफ थिंग्स इत्यादींमध्ये केला जातो.
- दहा वर्षापूर्वी सतोशी नाकामोटो या जपानी संशोधकाने ब्लॉकचेन प्रणालीचा शोध लावला असे सांगितले जाते. मात्र सदर व्यक्तीच्या अस्तित्वाचे पुरावे दिसून येत नाहीत.
रोहित पौडेल: अर्धशतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू
- नेपाळचा तरुण खेळाडू रोहित पौडेल याने १६ वर्षे आणि १४६ दिवसांच्या वयात अर्धशतक झळकावताना सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे.
- युएई विरुद्धच्या सामन्यात अर्धशतक झळकावत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू ठरण्याचा मान मिळवला.
- यापूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर व एकदिवसीय क्रिकेटमध्ये शाहिद अफरीदी यांच्या नावे सर्वात कमी वयात अर्धशतक झळकाविण्याचा विक्रम होता.
- सचिन तेंडुलकरने १६ वर्षे व २१३ दिवसांच्या वयात पाकिस्तानविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये आपले पहिले अर्धशतक झळकावले होते.
- शाहिद अफरीदीने १६ वर्षे व २१७ दिवसांच्या वयात श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपले पहिले अर्धशतक झळकावले होते.
- एकूण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेची महिला क्रिकेटर जोहानरी लोग्टेनबर्गच्या नावे आहे. तिने वयाच्या १४व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक केले होते.
न्यूयॉर्क टाईम्स ट्रॅव्हल शोमध्ये भारताला उत्कृष्टता पुरस्कार
- न्यूयॉर्क टाईम्स ट्रॅव्हल शो २०१९मध्ये (NYTTS 2019) भारताला ‘बेस्ट इन शो’साठी उत्कृष्टता पुरस्कार मिळाला.
- हा उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठा ट्रॅव्हल शो असून, याचे आयोजन २५ ते २७ जानेवारी दरम्यान न्यूयॉर्कमध्ये करण्यात आले होते.
- भारताच्या केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने या ट्रॅव्हल शोमध्ये ‘प्रेझेन्टिंग पार्टनर’ म्हणून सहभाग घेतला होता. अमेरिकेतील पर्यटनाला चालना देणे आणि तेथील भारताचे अस्तित्व वाढविणे हा त्यामागील उद्देश होता.
- या परिषदेत केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे सचिव योगेंद्र त्रिपाठी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय मंडळाने या कार्यक्रमात भाग घेतला.
- या ट्रॅव्हल शोमध्ये भारतासंबंधी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उदा.फोकस ऑन इंडिया, ग्राहक सेमिनार, भारतीय सांस्कृतिक कार्यक्रम, इंडियन फूड एक्झिबिशन्स इत्यादी
- याप्रासंगी न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजच्या क्लोझिंग बेल समारंभादरम्यान भारताला सन्मानित करण्यात आले.
मामिच्या अध्यक्षपदी अभिनेत्री दिपीका पदुकोण
- मुंबई शहराची सांस्कृतिक ओळख म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई ॲकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेजच्या (मामि) अध्यक्षपदी अभिनेत्री दिपीका पदुकोणची निवड करण्यात आली आहे.
- तर यापूर्वी अभिनेता आमिर खान यांची पत्नी किरण राव ही ‘मामि’ची अध्यक्ष होती. परंतु आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त असल्यामुळे तिने अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता.
- त्यानंतर झालेल्या मामिच्या सदस्य मंडळाच्या बैठकीमध्ये अध्यक्षपदासाठीच्या उमेदवारांसाठी वोटिंग करण्यात आली. यामध्ये दिपीका सर्वाधिक मत मिळवून विजयी झाली.
- दिपीका सध्याच्या घडीला बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. गेल्या वर्षभरापासून तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहेत.
- ओम शांती ओम चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या दिपीकाचा अलीकडेच प्रदर्शित झालेला संजय लिला भन्साळींच्या पद्मावत हा चित्रपट गाजला होता.
- दिपीका लवकरच ॲसिड हल्लापिडीत लक्ष्मी अगरवाल हिच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे.