चालू घडामोडी : २३ जानेवारी

एनडीआरएफला सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार

  • एनडीआरएफच्या ८व्या बटालियनची पहिल्या नेताजी सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
  • २३ जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
  • देशात आपत्ती व्यवस्थापनामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना सन्मानित करण्यासाठी केंद्र सरकारने ‘सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार’ सुरू केले.
  • आपत्तीच्या वेळी लोकांना मदत करणाऱ्या व्यक्ती आणि संघटनांच्या प्रयत्नांचा सन्मान करणे, हा या पुरस्कारांचा उद्देश आहे.

सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार

  • राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार दरवर्षी ३ पात्र संस्था आणि व्यक्तींना ‘सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार’ देण्यात येईल.
  • प्रमाणपत्र आणि ५ लाख ते ५१ लाख रुपये रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारांसाठी फक्त भारतीय नागरिक आणि भारतीय संस्था पात्र असतील.
  • एखाद्या पुरस्कार विजेत्या व्यक्तीसाठी पुरस्काराशी रक्कम ५ लाख रुपये असेल, तर संस्थेसाठी पुरस्काराशी रक्कम ५१ लाख रुपये असेल.
  • संस्थांसाठी ही पुरस्काराची रक्कम केवळ आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कामांसाठी वापरली जाऊ शकते.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल

  • NDRF: National Disaster Response Force
  • एनडीआरएफ हे आपत्तीदरम्यान त्वरित कारवाई करणारे दल आहे. याची स्थापन २००६मध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५द्वारे करण्यात आली.
  • एनडीआरएफचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. हे दल केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते.
  • एनडीआरएफसाठी धोरण, नियोजन आणि मार्गदर्शक तत्वे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे (एनडीएमए) तयार केले जाते.
  • नैसर्गिक आपत्ती, मानव निर्मित आपत्ती, अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीत एनडीआरएफ मदत आणि बचावकार्य करते.
  • या काळात एनडीआरएफ जीवित आणि मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी स्थानिक संस्थांच्या सहकार्याने कार्य करते.
  • सध्या एनडीआरएफच्या १२ बटालियन देशाच्या वेगवेगळ्या भागात तैनात करण्यात आल्या आहेत.


सीतांशु यशश्चंद्र यांना सरस्वती सन्मान


  • गुजराती साहित्यविश्वातील प्रतिभावंत, ज्येष्ठ लेखक व नाटककार सीतांशु यशश्चंद्र यांना २७वा ‘सरस्वती सन्मान’ देऊन गौरविण्यात आले.
  • २००९मध्ये प्रकाशित झालेल्या ‘वखार’ कविता संग्रहासाठी हिंदीतील प्रसिद्ध कवी गुलजार यांच्या हस्ते त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • सीतांशु यशश्चंद्र यांचा जन्म १९४१मध्ये गुजरातच्या भुज जिल्ह्यात झाला. त्यांना आतापर्यंत राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
  • केम मकानजी क्यां चाल्या, ए माणस मद्रासी लागे छे, खग्रास, अश्वत्थामा आजे पण जीवे छे, नक्कामो माणस छे नरसिंह मेहता, आखानी ओळखाणो, तोखर, एक सपनुं बडुं शैतानी यांसारख्या त्यांच्या नाटकांनी गुजराती रंगभूमी समृद्ध केली आहे.
  • सीमांकन अने सीमोल्लंघन, रमणीयतानो वाग्विकल्प, अस्य सर्ग विधाओ या ग्रंथांतून त्यांचे सैद्धांतिक विवेचन, तौलनिक साहित्याभ्यास व समीक्षणात्मक लेखन प्रसिद्ध झाले आहे.
  • केतन मेहतांच्या ‘माया मेमसाब’ या प्रसिद्ध चित्रपटाची पटकथा सीतांशुंनी लिहिली आहे. आयनेस्कोच्या ‘द लेसन’चा गुजराती अनुवाद ही त्यांची महत्त्वाची कृती आहे.
  • मात्र भारतीय साहित्य पातळीवर त्यांची ओळख कवी म्हणून आहे. ओडिस्युसनुं हलेसु, जटायु, अश्वत्थामा आणि वखार हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत.
  • २००६मध्ये केंद्र सरकारद्वारे त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या जटायू या काव्यसंग्रहाला १९८७साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.
  • सीतांशु यांना मिळालेले पुरस्कार: रणजीतराम सुवर्णचंद्रक, नर्मद सुवर्णचंद्रक, गुजरात साहित्य परिषद व गुजरात साहित्य अकादमीचे पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, राष्ट्रीय कबीर सन्मान, गंगाधर मेहर सन्मान, पद्मश्री, कवी कुसुमाग्रज राष्ट्रीय काव्य पुरस्कार इत्यादी.

सरस्वती सन्मान

  • सरस्वती सन्मान हा के. के. बिर्ला फाउंडेशनद्वारे देण्यात येणार साहित्य पुरस्कार आहे. याची सुरुवात १९९१मध्ये करण्यात आली होती. प्रशस्तीपत्र, मानचिन्ह आणि १५ लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • संविधानाच्या आठव्या परिशिष्टामध्ये समाविष्ट भाषांमध्ये, गेल्या १० वर्षांमध्ये प्रकाशित झालेल्या उत्कृष्ट साहित्यकृतीला हा सन्मान दरवर्षी दिला जातो.
  • यापूर्वीचा २६वा सरस्वती सन्मान कोकणी भाषेतील साहित्यिक महाबळेश्वर सैल यांना त्यांच्या हावठण या कादंबरीसाठी देण्यात आला होता.


प्रवासी तीर्थ दर्शन योजना


  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच प्रवासी तीर्थ दर्शन योजनेची सुरवात केली. या योजनेची मुख्य वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:
  • या योजनेच्या अंतर्गत, भारतीय वंशांच्या अनिवासी लोकांना वर्षातून २ वेळा सरकारद्वारे प्रायोजित धार्मिक स्थळांच्या यात्रेसाठी नेले जाईल.
  • निवडलेल्या लोकांना भारतातील सर्व प्रमुख धार्मिक स्थळांचे दर्शन करविण्यात येईल.
  • या भेटींचा खर्च सरकार करेल. (ज्या देशात ते राहतात, तेथून भारतापर्यंतचे हवाई भाडेही सरकारद्वारे दिले जाईल)
  • या योजनेचा लाभ फक्त भारतीय वंशाच्या ४५-६५ वयोगटातील व्यक्तींना घेता येईल.
  • या योजनेअंतर्गत गिरमिटिया देशांमधील लोकांना प्राधान्य दिले जाईल.

गिरमिटिया देश

  • सुमारे १००हून अधिक वर्षापूर्वी शेतांवर काम करण्यास फिजी, मॉरीशस, दक्षिण आफ्रिका, त्रिनिदाद व टोबॅगो, सुरीनाम आणि दक्षिण अमेरिकन देशांमध्ये गेलेल्या लोकांच्या वंशजांना गिरमिटिया म्हणतात.
  • गिरमिटिया हा शब्द प्रथम महात्मा गांधीजींनी वापरला होता. ते स्वतःला पहिले गिरमिटिया मनात होते.
  • ज्या देशांमध्ये हे गिरमिटिया भारतीय मजुर स्थयिक झाले त्यांना गिरमिटिया देश असे म्हटले जाते.


सायरील राम्फोसा: प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख अतिथी


  • दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सायरील राम्फोसा भारताच्या २०१९च्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाचे प्रमुख अतिथी असणार आहेत. २५ व २६ जानेवारी रोजी ते भारत दौऱ्यावर येतील.
  • भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सामील होणारे ते दक्षिण अफ्रिकेचे दुसरे नेते आहेत. यापूर्वी नेल्सन मंडेला १९९५मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सामील झाले होते.
  • सायरील राम्फोसा अँटी-अपार्थीड नेते आणि महात्मा गांधींचे अनुयायी आहेत.
  • डिसेंबर २०१७मध्ये जेकब झुमा यांनी राजीनामा दिल्यानंतर ते दक्षिण आफ्रिकेचे ५वे राष्ट्राध्यक्ष झाले. ते २०१४ ते २०१८ दरम्यान उपराष्ट्राध्यक्षही होते.
  • एप्रिल २०१८मध्ये त्यांनी ‘गांधी वॉक’ नावाच्या कार्यक्रमात ५ हजार लोकांचे नेतृत्व केले होते.
  • दक्षिण आफ्रिका हे भारताचा महत्त्वपूर्ण सहकारी असून ब्रिक्सचा सदस्यही आहे.

पार्श्वभूमी

  • भारतीय संविधानाची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० रोजी झाली आणि भारत एक प्रजासत्ताक देश बनला आणि म्हणूनच आपण २६ जानेवारी हा दिवस देशाचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो.
  • सामान्यतः प्रजासत्ताक दिनाला सामरिकदृष्ट्या महत्वाच्या देशांच्या प्रमुखांना मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित केले जाते.
  • ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम या १० आसियानच्या सदस्य देशांचे प्रमुख २०१८च्या प्रजासत्ताक दिनाचे मुख्य अतिथी होते.


२३ जानेवारी: नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती


  • २३ जानेवारी रोजी देशभरात महान स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी केली जाते.
  • सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी ब्रिटिश भारतातील कटक येथे झाला होता.
  • कटक महापालिकेत ते काही काळ काम करत होते तसेच बंगालचे विधानसभेचे सदस्य ही होते. इंग्रज सरकार ने त्यांना रायबहाद्दर हा किताब दिला होता.
  • १९२१ साली इंग्लंडला जाऊन, सुभाष भारतीय नागरी सेवेच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. परंतु इंग्रज सरकारची चाकरी करण्यास नकार देऊन त्यांनी राजीनामा दिला व ते मायदेशी परतले.
  • सुरुवातीला ते कॉंग्रेसमध्ये समिल झाले. १९३८-३९ दरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष होते. नंतर कॉंग्रेसमध्ये झालेल्या मतभेदांमुळे त्यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिला आणि फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना केली.
  • त्यांनी आझाद हिंद फौज स्थापन करून त्याद्वारे देशाला स्वतंत्र करण्याचा प्रयत्न केला. आझाद हिंद फौजची स्थापना २१ ऑक्टोबर १९४३ रोजी सिंगापूर येथे झाली.
  • नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांनी प्रभावित होऊन रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद फौजेची स्थापना केली होती.
  • ही एक सशस्त्र फौज होती, ज्याचा उद्देश ब्रिटीश नियंत्रणापासून भारत मुक्त करणे हा होता. सुभाषचंद्र बोस या फौजेचे सर्वोच्च कमांडर होते.
  • या सेनेने सिंगापूरमध्ये आझाद हिंद सरकारची स्थापना केली. या सरकारला जर्मनी, जपान, फिलिपाईन्स, चीन, इटली आणि आयर्लंडसारख्या ९ देशांनी मान्यता दिली.
  • नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिलेल्या ‘चलो दिल्ली’ या प्रसिद्ध नाऱ्यासह आझाद हिंद फोज २१ मार्च १९४४रोजी भारतात दाखल झाली.
  • आझाद हिंद सेनेने इंग्रज सैन्याशी निकराने लढा दिला. परंतु डोंगराळ व जंगली प्रदेश आणि प्रतिकूल हवामान यामुळे नोव्हेंबर १९४४मध्ये आझाद हिंद सेनेला पराभवाला तोंड द्यावे लागले.
  • ऑगस्ट १९४५मध्ये तैवानला जात असताना नेताजींचे विमान अपघातामध्ये निधन झाले आणि सशस्त्र क्रांतीद्वारे भारताला स्वतंत्र करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला.
  • १९९२साली सुभाषचंद्र बोस यांना मरणोत्तर भारतरत्‍न सन्मान प्रदान करण्यात आला होता. परंतु सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या एका जनहित याचिकेचा आधार घेऊन हा पुरस्कार परत काढून घेण्यात आला.
  • नेताजींच्या मृत्यूचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्‍न’ पुरस्कार देणे अवैध आहे असा युक्तिवाद या याचिकेत करण्यात आला होता.


गोदावरी-कावेरी जोड प्रकल्प लवकरच सुरु होणार


  • केंद्रीय जल संसाधन, नदी विकास व गंगा पुनरुज्जीवन मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्र सरकार लवकरच गोदावरी-कावेरी जोड प्रकल्प सुरु करणार असल्याची घोषणा केली.
  • गोदावरी-कृष्णा-पेन्नार-कावेरी जोडप्रकल्पाचा विस्तृत अहवाल तयार असून तो लवकरच मंजुरीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मांडला जाणार आहे.
  • मंजुरीनंतर या प्रकल्पासाठी जागतिक बँक किंवा आशियाई विकास बँकेकडून अर्थसहाय्य मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले जातील.
  • गोदावरी-कावेरी जोड प्रकल्पासाठी ६० हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
  • गोदावरी नदीतील ११०० टीएमसी पाणी सध्या समुद्राला जाऊन मिळते, हे पाणी रोखून त्याचा योग्य वापर करणे प्रकल्पामुळे शक्य होणार आहे.
  • या प्रकल्पांतर्गत गोदावरीचे पाणी तामिळनाडूच्या अंतिम टोकापर्यंत पोहोचविण्याची योजना आहे.
  • याशिवाय तामिळनाडू, कर्नाटक, केरळ आणि पाँडिचेरी या राज्यांमधील जल वाटपावरून असलेले वाद सोडविण्याचा प्रयत्नही सरकार करीत आहे.


आघाडीच्या कंटेनर वाहतूक बंदरांमध्ये जेएनपीटीचा समावेश


  • लॉयड्स अहवालाद्वारे जारी करण्यात आलेल्या जगातील टॉप १०० कंटेनर वाहतूक बंदरांच्या यादीत भारतातील प्रमुख कंटेनर वाहतूक बंदर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचा (जेएनपीटी) समावेश आहे.
  • जेएनपीटीने या क्रमवारीत गेल्या वर्षाच्या तुलनेत ५ स्थानांची प्रगती करत २८वे स्थान मिळविले आहे.
  • लॉयड्सच्या जगातील टॉप १०० कंटेनर वाहतूक बंदरांच्या यादीत टॉप ३०मध्ये सूचीबद्ध झालेले जेएनपीटी हे भारताचे एकमेव बंदर ठरले आहे.

जेएनपीटीच्या क्रमवारीतील सुधारणेची कारणे

  • व्यवसाय सुलभतेसाठी सुरु केलेल्या उपक्रमांतर्गत या बंदराच्या व्यापारात वाढ लक्षणीय वाढ झाली आहे.
  • आयात-निर्यात व्यवसायातील नव्या प्रक्रियांमुळे वेळेची बचत झाली आहे तर कार्चाठी घट झाली आहे. यामुळे एकूण व्यापारात वाढ झाली आहे.
  • कन्साइनमेंट ट्रॅकिंगसाठी जेएनपीटीने मोबाईल ॲप्लीकेशन सुरु केले. या ॲपद्वारे, व्यापारी त्यांच्या कन्साइनमेंटबद्दल आवश्यक माहिती त्वरित मिळवू शकतात.
  • लॉयड्सचा जगातील टॉप १०० कंटेनर वाहतूक बंदरांचा अहवाल प्रत्येक पोर्टबद्दल तपशीलवार माहितीचे विश्लेषण प्रदान करतो.
  • हा अहवाल सर्व १०० बंदरांविषयी विस्तृत माहिती प्रदान करतो. यामध्ये सर्व बंदरांचे प्रोफाइल, टर्मिनल ऑपरेटर, बॉक्स व्हॉल्युम्स, अलीकडच्या काळातील प्रगती आणि भविष्यातील प्रकल्पांचे मूल्यांकन करण्यात आले आहे.


रिओ दी जनेरोला वास्तुकलेच्या जागतिक राजधानीचा दर्जा


  • संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेने (यूनेस्को) रिओ दी जनेरो शहराला २०२०साठी ‘वास्तुकलेच्या जागतिक राजधानी’चा (वर्ल्ड कॅपिटल ऑफ आर्किटेक्चर) दर्जा बहाल केला आहे.
  • जुलै २०२०मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय वास्तुविशारद संघटनेच्या (यूआयए) जागतिक कॉंग्रेसचे यजमानपद ब्राझीलची राजधानी असलेल्या रिओ दी जनेरोकडे असेल.
  • २०२०च्या या जागतिक कॉंग्रेसची मुख्य संकल्पना (थीम) ‘ऑल द वर्ल्ड्स. जस्ट वन वर्ल्ड’ अशी आहे.

वर्ल्ड कॅपिटल ऑफ आर्किटेक्चर

  • शहरी भागातील वास्तुशास्त्रीय वारसा जतन करण्याच्या युनेस्को आणि यूआयएच्या सामायिक बांधिलकीचे पालन करण्यासाठी वर्ल्ड कॅपिटल ऑफ आर्किटेक्चर उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
  • वर्ल्ड कॅपिटल ऑफ आर्किटेक्चरचे नामनिर्देशन युनेस्कोद्वारे यूआयए सोबत केलेल्या करारानुसार केले जाते.
  • वर्ल्ड कॅपिटल ऑफ आर्किटेक्चर प्रत्येक ३ वर्षांनी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय वास्तुविशारद संघटनेच्या जागतिक कॉंग्रेसचे आयोजन करते.
  • संस्कृती, सांस्कृतिक वारसा, शहरी नियोजन व वास्तुकलेच्या दृष्टीकोनातून जागतिक आव्हानांवर चर्चा करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय मंच बनणे, हा वर्ल्ड कॅपिटल ऑफ आर्किटेक्चरचा उद्देश आहे.

युनेस्को

  • संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना अर्थात युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायन्टीफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन.
  • युनेस्को ही संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था आहे. तिची स्थापना १६ नोव्हेंबर १९४५ रोजी करण्यात आली.
  • दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक शांततेसाठी अमेरिकेच्या सहकार्याने युनेस्कोची स्थापना करण्यात आली होती.
  • ही संस्था प्रामुख्याने शिक्षण, विज्ञान आणि संस्कृतींमधील आंतरराष्ट्रीय सहयोग वाढवून जगामध्ये शांतता व सुरक्षा कायम ठेवण्याचे काम करते.
  • युनेस्कोचे मुख्यालय पॅरिसमध्ये असून जगभरात ५० पेक्षा अधिक कार्यालये आहेत. सद्यस्थितीत १९३ देशांचा या संघटनेत समावेश आहे.
  • जगभरात युनेस्कोला जागतिक ऐतिहासिक वारसा कार्यक्रमासाठी ओळखले जाते. ही संस्था जगभरातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन करण्यास मदत करते.
  • याचबरोबर प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य, लैंगिक समानता व महिलांना साक्षर करण्यास प्रोत्साहन देण्याचे कामही युनेस्कोंतर्गत केले जाते.


ऑक्सफॅमचा वार्षिक संपत्ती अहवाल २०१९


  • जागतिक आर्थिक मंचाच्या (डब्लूईएफ) दावोस (स्वित्झर्लंड) येथील वार्षिक बैठकीच्या पार्श्वभूमीवर ऑक्सफॅम वार्षिक संपत्ती अहवाल २०१९ प्रसिध्द करण्यात आला आहे.
  • या अहवालातील माहिती व आकडेवारी सार्वजनिकपणे उपलब्ध असलेल्या व्यापक माहिती स्रोतांवरील माहितीवर आधारित होते.

या अहवालातील ठळक मुद्दे

  • जगभरातील २६ अब्जाधीशांकडे जगातील अर्ध्या गरीब लोकसंख्येच्या (३.८ अब्ज लोक) संपत्तीएवढी संपत्ती आहेत.
  • २०१८मध्ये श्रीमंत लोकांच्या संपत्तीमध्ये आणि गरीब लोकांच्या दारिद्र्यात वाढ झाली.
  • संपत्तीच्या असमान वितरणामुळे दारिद्र्य निर्मूलनाची समस्या दूर करण्यात अडचणी येत आहेत.
  • २०१८मध्ये २२०० अब्जाधीशांच्या संपत्तीमध्ये ९०० अब्ज डॉलर्सची (प्रतिदिन २.५ अब्ज डॉलर्सची वाढ) वाढ झाली.
  • जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस (ॲमेझॉन कंपनीचे संस्थापक) यांची संपत्ती ११२ अब्ज डॉलर्स आहे. इथियोपिया नामक देशाचे आरोग्य बजेट जेफ बेझोसच्या एकूण मालमत्तेच्या केवळ १ टक्के एवढेच आहे.
  • गेल्या १० वर्षात अब्जाधीशांची संख्या दुप्पट झाली आहे. २०१७-१८ दरम्यान दर २ दिवसात एक नवीन व्यक्ती अब्जाधीश बनली.

भारतातील असमानता

  • भारतातील १ टक्के श्रीमंत लोकांच्या एकूण संपत्तीमध्ये ३९ टक्के वृद्धी झाली. तर देशातील सर्वधिक गरीब वर्गातील लोकांच्या एकूण संपत्तीत फक्त ३ टक्के वाढ झाली.
  • गेल्या वर्षात भारतीय अब्जाधीशांच्या संपत्तीमध्ये प्रतिदिन २२०० कोटी रुपयांची वाढ झाली.
  • भारतातील सर्वात गरीब वर्गामध्ये ६ कोटी लोक आहेत, ते २००४पासून कर्जात आहेत.
  • भारतातील सर्वात श्रीमंत १० टक्के लोकांकडे एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा ७७.४ टक्के वाटा आहे.
  • आरोग्य, स्वच्छता आणि जलपुरवठा यासाठी केंद्र व राज्य सरकारांचा एकूण महसूल आणि भांडवली खर्च २.०८ लाख कोटी रुपये आहे, जे मुकेश अंबानीच्या एकूण संपत्तीपेक्षा कमी आहे.
  • भारतासह अनेक देशांमधील काही भागांमध्ये दर्जेदार शिक्षण व आरोग्यसेवा खूप महाग झाल्या आहेत.
  • गरीब कुटुंबातील मुलांचा त्यांच्या पहिल्या वाढदिवसापूर्वी मृत्यू होण्याची शक्यता श्रीमंत कुटुंबातील मुलांच्या तुलनेत तिप्पट आहे.


वैश्विक प्रतिभा स्पर्धात्मक निर्देशांक


  • ईनसिड (INSEAD) बिझनेस स्कूलने टाटा कम्युनिकेशन्स आणि अडेक्को ग्रुपच्या सहकार्याने तयार केलेला वैश्विक प्रतिभा स्पर्धात्मक निर्देशांक (ग्लोबल टॅलेंट कम्पिटीटीव्ह इंडेक्स) प्रसिद्ध करण्यात आला.
  • जागतिक आर्थिक मंचाच्या दावोस (स्वित्झर्लंड) येथे आयोजित वार्षिक बैठकीच्या पहिल्या दिवशी हा निर्देशांक प्रसिद्ध करण्यात आला.
  • देश किंवा शहर प्रतिभावान व्यक्ती कशा विकसित करतात, त्यांना कसे आकर्षित करतात आणि त्यांना टिकवून ठेवण्यात किती यशस्वी आहेत याचे मोजमाप हा निर्देशांक करतो.
  • या निर्देशांकात जगभरातील १२५ देश आणि ११४ शहरांचे मूल्यांकन करण्यात आले आहे.

भारत आणि वैश्विक प्रतिभा स्पर्धात्मक निर्देशांक

  • या निर्देशांकात भारत एक स्थानाची प्रगती करून ८०व्या स्थानी पोहचला आहे. परंतु ब्रिक्स देशांच्या यादीत भारत फार मागे आहे.
  • कमी उत्पन्न मिळविणाऱ्या देशांमध्ये प्रतिभेच्या विकासामध्ये भारताला ४८व्या आणि विकासाच्या संधींमध्ये ४१व्या स्थानावर समाधान मानावे लागले.
  • भारतासमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे प्रतिभेला आकर्षित करणे आणि त्यांना येथे टिकवून ठेवणे आहे, ज्यामध्ये भारत अनुक्रमे ९५व्या आणि ९६व्या स्थानी आहे.

जग आणि वैश्विक प्रतिभा स्पर्धात्मक निर्देशांक

  • या निर्देशांकातील प्रथम पाच देश (अनुक्रमे): स्वित्झर्लंड, सिंगापूर, अमेरिका, नॉर्वे आणि डेन्मार्क.
  • या निर्देशांकातील प्रथम पाच शहरे (अनुक्रमे): वॉशिंग्टन, कोपेनहेगन, ओस्लो, विएन्ना आणि झुरिच.
  • गेल्या ५ वर्षांत उच्च उत्पन्न असणाऱ्या देशांमध्ये आणि कमी उत्पन्न मिळविणाऱ्या देशांमधील अंतर लक्षणीयरित्या वाढले आहे.
  • आशिया, लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकेतील देशांमधील प्रतिभांमध्ये सतत घट होत आहे.
  • देशांच्या तुलनेत शहरे प्रतिभा केंद्र म्हणून मजबूत भूमिका बजावत आहेत. जागतिक प्रतीभांच्या दृश्यात बदल घडवून आणण्यासाठी शहरे महत्त्वपूर्ण ठरतील.
  • या क्रमवारीत चीनची २ स्थानांनी घसरण झाली. चीन या क्रमवारीत ४५व्या स्थानी आहे. ब्रिक्स देशांमध्ये चीन सर्वात आघाडीवर आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा