गंगाजल प्रकल्पाचे राष्ट्रार्पण
- आग्रा शहराला अधिक सुनियाजित पाणीपुरवठा करणाऱ्या २८०० कोटी रुपये अंदाजित खर्चाचा गंगाजल प्रकल्प ९ जानेवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्राला अर्पण केला.
- गंगाजल प्रकल्पाद्वारे गंगा नदीचे १४० क्युसेक पाणी आग्रा शहरासाठी आणण्याचे उद्दिष्ट आहे.
- यामुळे आग्रा शहराच्या नागरिकांच्या पेयजलाच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी मदत होणार आहे.
- हा प्रकल्प सर्वप्रथम २००५मध्ये जपान आंतरराष्ट्रीय सहकार एजन्सीच्या सहकार्याने सुरु करण्यात आला होता आणि तो मार्च २०१२मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते.
- परंतु हा प्रकल्प वेळेवर पूर्ण न झाल्यामुळे, २००५मध्ये या प्रकल्पासाठी अपेक्षित असलेला ३४५ कोटी रुपयांची खर्च वाढून २८०० कोटी रुपये झाला आहे.
- या प्रकल्पामुळे आग्रा शहराला पालरा हेडवर्क्स येथील बुलंदशहरच्या अप्पर गंगा कालव्यातून पाइपलाइनद्वारे दररोज पाणी १४० क्यूसेक पाणीपुरवठा होईल.
जपान आंतरराष्ट्रीय सहकार एजन्सी
- जपान आंतरराष्ट्रीय सहकार एजन्सी ही एक जपानी सरकारी संस्था आहे, जी जपान सरकारसाठी अधिकृत विकास सहाय्य समन्वयित करते.
- ही संस्था विकसनशील देशांमध्ये आर्थिक व सामाजिक विकासास मदत करते आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याचा प्रसार करते.
- आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी ही जपानची प्रमुख एजन्सी आहे. १ ऑक्टोबर २००३ ही संस्था स्थापन करण्यात आली. तिचे मुख्यालय जपानची राजधानी टोकियोमध्ये आहे.
वेब-वंडर विमेन मोहीम
- केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने अलीकडेच ‘वेब-वंडर विमेन’ नामक एक ऑनलाइन मोहीम सुरू केली आहे.
- सामाजिक बदलासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून सकारात्मक कार्य करणाऱ्या स्त्रियांच्या उत्कृष्ट उपलब्धतेला अधोरेखित करणे, हा या मोहिमेचा उद्देश आहे.
- या अभियानाद्वारे समाजात बदल घडवून आणण्यासाठी सोशल मीडियाचा चांगला वापर करत असलेल्या भारतीय महिलांना सन्मानित व प्रोत्साहित केले जाणार आहे.
- हे अभियान केंद्रीय आणि महिला विकास मंत्रालयाने ब्रेकथ्रू एनजीओ आणि ट्विटर इंडियाच्या सहकार्याने सुरू केले आहे.
- आरोग्य, मीडिया, साहित्य, कला, क्रीडा, पर्यावरण संरक्षण, फॅशन या क्षेत्रातून आलेल्या नामांकनामधून या अभियानासाठी महिलांची निवड करण्यात येणार आहे.
- या निवड झालेल्या महिलांची यादी सार्वजनिक मतदानासाठी ट्विटरवर प्रसिध्द केली जाईल. त्यानंतर पंचांच्या पॅनेलद्वारे अंतिम विजेत्यांची निवड केली जाईल.
ब्रेकथ्रू एनजीओ
- ब्रेकथ्रू एनजीओ ही जागतिक मानवाधिकार संघटना असून, ती महिला आणि बालिका यांच्या विरोधातील हिंसाचार समाप्त करण्यासाठी कार्यरत आहे.
- या एनजीओच्या काही मुख्य मोहिमा: बेल बजाव, नेशन अगेन्स्ट अर्ली मॅरेज, डिपोर्ट द स्टॅच्यु, #ImHere इत्यादी.
देशातील सर्वात मोठा स्टील केबल सस्पेन्शन पुल
- अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी अप्पर सियांग जिल्ह्यात भारतातील सर्वात मोठ्या सिंगल लेन स्टील केबल सस्पेन्शन पुलाचे उद्घाटन केले.
- हा पूल ३०० मीटर लांब आहे आणि तो ब्योरुंग पुल म्हणून ओळखला जातो.
- या पुलामुळे अरुणाचल प्रदेशमधील यिंगकियोंग आणि टुटिंग दरम्यानचे अंतर ४० किमीने कमी होईल.
- उत्तर-पूर्व क्षेत्र विकास मंत्रालयाच्या नॉन-लॅप्सेबल सेंट्रल पूल ऑफ रिसोर्सेसमधून ४८.४३ कोटी रुपये खर्च करून या पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे.
- सियांग नदीच्या दोन्ही बाजूंना राहणाऱ्या सुमारे २० हजार लोकांना या पुलाचा लाभ होईल. याशिवाय हा पूल भारतीय लष्करासाठीही खूप उपयुक्त ठरेल.
सियांग नदी
- सियांग नदी अरुणाचल प्रदेशची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते.
- हिमालयातील अंग्सी ग्लेशियर येथे उगम पावणारी त्सांग्पो नदी अरुणाचल प्रदेशमध्ये भारतात प्रवेश करते, जिथे तिला सियांग नावाने ओळखले जाते.
- मैदानी प्रदेशात दीबांग आणि लोहित या नद्या सियांग नदीला येऊन मिळतात. त्यानंतर या नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला ब्रह्मपुत्रा नावाने ओळखले जाते.
१० जानेवारी: जागतिक हिंदी दिवस
- १० जानेवारी हा दिवस जागतिक हिंदी दिवस (World Hindi Day) म्हणून साजरा केला जातो.
- हिंदी भाषा बोलली जावी तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही भाषा पोहोचावी या दृष्टीने हा दिवस साजरा केला जातो.
- परदेशातही हिंदीबद्दल जागरुकता निर्माण करणे व हिंदी भाषेचा आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून प्रचार करणे, हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे.
- १० जानेवारी १९७५ रोजी नागपूरमध्ये पहिल्या ‘विश्व हिंदी संमेलना’चे आयोजन करण्यात आले. या संमेलनात जगभरातील ३० देशांनी सहभाग घेतला होता.
- या संमेलनाच्या स्मृतीप्रीत्यर्थ २००६मध्ये भारत सरकारने १० जानेवारी हा ‘विश्व हिंदी दिवस’ म्हणून घोषित केला.
हिंदी दिवस
- प्रतिवर्षी १४ सप्टेंबरला हिंदी दिवस साजरा केला जातो. भारतीय संविधान लागू झाल्यानंतर १४ सप्टेंबर १९४९ रोजी हिंदीला अधिकृत भाषेचा दर्जा प्रदान करण्यात आला होता.
- जागतिक हिंदी दिनाचा उद्देश आंतरराष्ट्रीय पातळीवर हिंदी भाषेला प्रोत्साहन देणे आहे. तर हिंदी दिवस केवळ राष्ट्रीय पातळीवर साजरा केला जातो.
हिंदी भाषेच्या प्रचारासाठी संविधानातील तरतुदी
- आज हिंदी जगात चौथी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. तसेच जगभरातील २५० दशलक्ष लोकांची हिंदी ही मातृभाषा आहे.
- संविधानाने १२०, २१०, ३४३, ३४४ आणि ३४८ ते ३५१ या कलमांमध्ये हिंदी भाषेच्या प्रसारावर जोर दिला आहे.
आशा पारेख व फारूक शेख यांना जीवनगौरव पुरस्कार
- ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख व दिवंगत अभिनेते फारूक शेख यांना ‘बिमल रॉय मेमोरियल अँड फिल्म सोसायटी’कडून देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- अभिनेते परेश रावल, दिग्दर्शक व अभिनेते अनंत महादेवन, दिग्दर्शक अमित राय, अभिनेते जॅकी श्रॉफ यांना ‘बिमल रॉय स्मृती पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले.
- बिमल रॉय हे भारतीय चित्रपट जगताचे १९४०च्या दशकातले सर्वोत्कृष्ट निर्माते व दिग्दर्शक मानले जाते. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
- बिमल रॉय मेमोरियल अँड फिल्म सोसायटी याची स्थापना सन १९९७मध्ये करण्यात आली.
डीआरडीओला एक्झीबिटर ऑफ द ईयर पुरस्कार
- भारताची संरक्षण संशोधन व विकास संस्थेला (डीआरडीओ) १०६व्या इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये ‘एक्झीबिटर ऑफ द ईयर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- जालंधर (पंजाब) येथे ३ ते ७ जानेवारी दरम्यान १०६व्या इंडियन सायन्स काँग्रेसचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेची मुख्य संकल्पना 'फ्यूचर इंडिया: सायन्स अँड टेक्नॉलॉजी' ही होती.
- डीआरडीओने या परिषदेत ‘कलाम्स व्हिजन: डेयर टू ड्रीम’ या विषयावर माहिती प्रदान (एक्झीबिशन) केली. यामध्ये डीआरडीओने विकसित केलेल्या विविध उपकरणांचे प्रदर्शन मांडले होते.
- या एक्झीबिशनचे आयोजन स्वयंपूर्णता आणि राष्ट्रीय अभिमान या संकल्पनेवर करण्यात आले होते.
इंडियन सायन्स काँग्रेस
- इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन इंडियन सायन्स काँग्रेसचे आयोजन दरवर्षी करते. या कार्यक्रमात जगभरातील वैज्ञानिक नवाचार (इनोवेशन) आणि संशोधन यावर चर्चा करतात.
- यावर्षी या कार्यक्रमात जर्मनी, हंगेरी, इंग्लंड अशा ६ देशांमधील नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञही सहभागी होतील.
- याव्यतिरिक्त या कार्यक्रमात इस्रो, डीआरडीओ, विद्यापीठ अनुदान आयोग, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग आणि अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेचे प्रतिष्ठित वैज्ञानिकही सहभागी होतील.
- इंडियन सायन्स काँग्रेसची स्थापना १९१४मध्ये झाली. ३० हजारपेक्षा जास्त वैज्ञानिक आणि शास्त्रज्ञ याचे सदस्य आहेत.
विक्रम मिस्त्री: भारताचे चीनमधील पुढील राजदूत
- वरिष्ठ राजनैतिक अधिकारी विक्रम मिस्त्री यांची भारताचे चीनमधील पुढील राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे. ते गौतम बंबवाले यांची जागा घेतील.
- ते भारतीय परराष्ट्र सेवेतील (आयएफएस) १९८९च्या तुकडीतील अधिकारी आहेत. सध्या ते भारताचे म्यानमारमधील राजदूत म्हणून कार्यरत आहेत.
- त्यांनी याआधी पंतप्रधान कार्यालयात आणि परराष्ट्र मंत्रालयात विविध पदांवर जबाबदारी सांभाळली आहे.
- याशिवाय युरोप, आफ्रिका, आशिया व उत्तर अमेरिकेतील भारतीय दूतावासांमध्ये कार्य करण्याचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे.
- श्रीनगरमध्ये जन्मलेले मिस्त्री यांनी दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू महाविद्यालयातून पदवी तर जमशेदपूरच्या एक्सएलआरआय महाविद्यालयातून एमबीएची पदवी प्राप्त केली आहे.
निकोलस मादुरो सलग दुसऱ्यांदा व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती
- निकोलस मादुरो यांनी दुसऱ्यांदा व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. मे २०१८मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांना ६७.८४ टक्के मते मिळाली होती.
- मादुरो यांच्या शपथ सोहळ्याला ९४ देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ ६ वर्षांचा आहे.
- निकोलस मादुरो यांचा जन्म २३ नोव्हेंबर १९६२ रोजी व्हेनेझुएलाची राजधानी काराकास येथे झाला. ते युनायटेड सोशलिस्ट पार्टीशी संलग्न आहेत.
- मादुरो २००५-२००६ दरम्यान व्हेनेझुएलाच्या नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष होते. त्यांनतर २००६-२०१३ दरम्यान ते देशाचे परराष्ट्र मंत्री होते.
व्हेनेझुएला
- व्हेनेझुएला हा दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागातील एक देश आहे. याची राजधानी काराकास आहे. या देशाचे चलन बोलीवर आहे.
- व्हेनेझुएलाला ५ जुलै १८११ रोजी स्पेनकडून स्वातंत्र्य मिळाले तर १३ जानेवारी १८३० रोजी तो ग्रान कोलंबियाकडून स्वतंत्र झाला. त्याच्या स्वातंत्र्याला २९ मार्च १८४५ रोजी मान्यता देण्यात आली.
आयआयटी मद्रासमध्ये प्रयोगशाळेत स्पेस फ्युएलची निर्मिती
- आयआयटी मद्रासच्या शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेमध्ये प्राथमिक तत्वावर स्पेस फ्युएल (अंतराळातील इंधन) तयार केले आहे.
- अंतर्ग्रहीय परिस्थितींच्या सिम्युलेशनद्वारे कार्बन डायऑक्साईडचा वापर करुन हे स्पेस इंधन तयार करण्यात आले आहे. हे जैवइंधनाला एक स्वच्छ आणि शाश्वत पर्याय आहे.
- या शोधामध्ये वातावरणातील कार्बन डायऑक्साईडला पुढच्या पिढीतील उर्जा स्त्रोतामध्ये रुपांतरित करण्याची क्षमता आहे. यामुळे हरितगृह वायू आणि जागतिक तापमानवाढ नियंत्रित करण्यासही मदत होईल.
- प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल ॲकेडमी ऑफ सायन्समध्ये (PNAS) आयआयटी मद्रासचे हे संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे.
- आयआयटी मद्रासच्या शास्त्रज्ञांनी अतिउच्च निर्वात पोकळीत मिथेनयुक्त क्लेथरेट हायड्रेटची निर्मिती केली. याचे तापमान उणे २६३ अंश सेल्सिअस होते.
- अत्यंत कमी दाब आणि अत्यधिक थंड तापमानात हायड्रेटची निर्मिती अनपेक्षित होती. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार मिथेन व अमोनियाच्जे अणु अवकाशात पृथ्वीपेक्षा अत्यंत भिन्न स्वरूपात आहेत.
हवामान बदलाचा सामना
- क्लेथरेट हायड्रेट घन स्फटिक असतात, ज्यात मिथेन व कार्बन डायऑक्साइड हे वायू पाण्याच्या रेणूमध्ये एकप्रकारे कैद केलेले असतात. असे हे मिथेनयुक्त हायड्रेट्स भविष्यातील इंधन मानले जाते.
- जागतिक तापमानवाढीचा सामना करण्यासाठी हा शोध खूप महत्वाचा आहे. यामुळे वातावरणीय कार्बनडाय ऑक्साईडचा वापर आता घन हायड्रेट तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो.
बाबरी मशीद सुनावणीसाठी ५ सदस्यीय घटनापीठाची स्थापना
- अयोध्येतील रामजन्मभूमी व बाबरी मशीद जमीन वादावर सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखाली ५ सदस्यीय घटनापीठाची स्थापना करण्यात आली होती.
- या ५ पाच सदस्यीय घटनापीठामध्ये न्या. शरद बोबडे, न्या. एन. व्ही. रमण, न्या. यु. यु. लळीत आणि न्या. धनंजय चंद्रचूड यांचा समावेश होता.
- परंतु न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांनी या ५ सदस्यीय घटनापीठातून माघार घेतल्याने, या प्रकरणी पुढील सुनावणी २९ जानेवारीला होणार आहे.
पार्श्वभूमी
- अलाहाबाद उच्च न्यायालयाने २०१०मध्ये या वादावर निर्णय देताना अयोध्येतील २.७७ एकर जमीन ३ समान भागात विभागून देण्याचा निर्णय दिला होता.
- सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि राम लल्ला यांच्यामध्ये समान विभागणी करावी, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये नमूद करण्यात आले होते.
- या निर्णयाला विविध याचिकांच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. यावर निकाल देताना जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते.
रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद
- बाबरी मशीद ही भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्या शहरामधील एक वादग्रस्त मशीद होती.
- मुघल सम्राट बाबर याच्या काळामध्ये १५२७साली बांधली गेलेली ही मशीद ६ डिसेंबर १९९२ रोजी कारसेवकांच्या एका विशाल राजकीय रॅलीदरम्यान झालेल्या एका दंगलीमध्ये उद्ध्वस्त झाली.
- हिंदू देवता राम यांच्या जन्मभूमीवरील मंदिर उद्ध्वस्त करून बाबरने ही मशीद उभारली अशी हिंदूंची भूमिका आहे तर या संबंधित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सादर केलेले पुरावे चुकीचे असल्याचे मुस्लिमांचे म्हणणे आहे.
- या मुद्द्यावर बऱ्याच काळापासून वाद सुरु आहे आणि अजूनही त्यावर तोडगा निघालेला नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा