चालू घडामोडी : २५ जानेवारी

इस्रोद्वारे मायक्रोसॅट-आर व कलामसॅट-व्ही२चे यशस्वी प्रक्षेपण

  • भारतीय अंतराळ संशोधन केंद्राने (इस्रो) २५ जानेवारी रोजी मायक्रोसॅट-आर व कलामसॅट-व्ही२ हे दोन उपग्रह निर्धारित कक्षेत यशस्वीरित्या प्रक्षेपित केले.
  • श्रीहरिकोटाच्या डॉ. सतीश धवन अंतराळ केंद्रातून पीएसएलव्ही-सी४४ (धृवीय उपग्रह प्रक्षेपण यान) प्रक्षेपकाच्या सहाय्याने हे प्रक्षेपण करण्यात आले.
  • उड्डाणानंतर सुमारे १३ मिनिटे २६ सेकंदांनी मायक्रोसॅट-आर २७४ किमीवरच्या कक्षेत स्थापित करण्यात आला. त्यानंतर ४५३ किलोमीटरच्या कक्षेत कलामसॅट-व्ही२ स्थापित करण्यात आला.
  • मायक्रोसॅट-आर हा ७४० किलो वजनाचा लष्करी उपग्रह आहे. खास लष्करी उद्देशांसाठी या उपग्रहाची निर्मिती संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेद्वारे (डीआरडीओ) करण्यात आली आहे.
कलामसॅट-व्ही२
  • कलामसॅट हा विद्यार्थ्यांनी बनवलेला छोटा उपग्रह आहे. अवघ्या १.२६ किलो वजनाचा हा सर्वात हलका उपग्रह आहे.
  • चेन्नईतील स्पेस किड्स इंडिया या स्टार्टअप कंपनीशी संबंधित विद्यार्थ्यांनी अवघ्या ६ दिवसांमध्ये कलामसॅटची निर्मिती केली आहे. यासाठी १२ लाख रुपये खर्च आला आहे.
  • हा एक प्रकारचा संप्रेषण (संचार) उपग्रह आहे, तो रेडिओ प्रेषण आणि वायरलेस संप्रेषणासाठी वापरला जाईल. याचे आयुर्मान २ महिने आहे.
  • देशाचे माजी राष्ट्रपती आणि थोर शास्त्रज्ञ दिवंगत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे नाव या उपग्रहला देण्यात आले आहे.
  • याआधी एका भारतीय विद्यार्थ्याने ६४ ग्रॅमचा उपग्रह तयार केला होता. हा उपग्रह अमेरिकेच्या नासाने प्रक्षेपित केला होता. आतापर्यंत भारतीय विद्यार्थ्यांनी बनवलेल्या ६ उपग्रहांचे प्रक्षेपण झाले आहे.
इस्रोचा प्रयोग
  • पीएसएलव्ही एक ४ टप्प्यांचे रॉकेट आहे. या प्रक्षेपणदरम्यान, इस्रोने रॉकेटच्या डेड स्टेजचा (मृत टप्प्यांना) पुनर्वापर करण्याचा प्रयत्न केला आहे.
  • सामान्यतः पीएसएलव्हीचे ३ टप्पे त्यांचे कार्य केल्यानंतर पृथ्वीकडे पडतात. तर उपग्रहाला त्याच्या योग्य कक्षेमध्ये स्थापित करण्यासाठी चौथा टप्पा अनेकदा थांबविला आणि सुरु केला जातो.
  • इस्रोने चौथ्या टप्प्याला कक्षीय प्लॅटफॉर्ममध्ये रूपांतरित केले आहे. ज्याचा उपयोग अवकाश संशोधकांना शून्य गुरुत्वाकर्षणात प्रयोग करण्यासाठी होईल.
  • मृत टप्प्याला क्रियाशील ठेवण्याचा हा इस्रोद्वारे केला गेलेला पहिलाच प्रयोग आहे.

सी-विजिल २०१९: नौदलाचा तटीय संरक्षण अभ्यास

  • भारतीय नौदलाने पहिल्यांदाच ‘सी-विजिल २०१९’ हा उच्चस्तरीय मल्टी-एजन्सी तटीय (किनारापट्टी) संरक्षण अभ्यास केला. हा अभ्यास २२-२३ जानेवारी २०१९ रोजी आयोजित केला होता.
  • सागरी सुरक्षा व टेहळणी यंत्रणेची तपासणी करणे, हा या सरावाचा उद्देश होता. यामध्ये किनाऱ्यालगतच्या १३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी सहभाग घेतला.
  • या अभ्यासांतर्गत भारताच्या संपूर्ण ७५१६.६ किमी लांब सागर किनाऱ्याची सीमा आणि विशेष आर्थिक क्षेत्र समाविष्ट करण्यात आले होते.
  • या २ दिवसीय अभ्यासात नौदल आणि तटरक्षक दलाची १५० जहाजे, ४० लढाऊ विमाने आणि इतर अनेक विशेष सामरिक वाहनांनी सहभाग घेतला.
  • नौदलाने यापूर्वीही राज्य पातळीवर द्विवार्षिक तटीय संरक्षण सराव आयोजित केला होता. परंतु यावेळी प्रथमच सर्व किनाऱ्यालगतची राज्ये व केंद्रशासित प्रदेश तसेच केंद्र व राज्यांच्या महत्वपूर्ण एजन्सीजनी यात सहभाग घेतला.
  • या सरावाचे आयोजन संरक्षण, गृह, शिपिंग, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू ही मंत्रालये तसेच मत्स्यपालन, सीमाशुल्क विभाग आणि राज्य सरकारांद्वारे संयुक्तपणे करण्यात आले होते.
या सरावाचे उद्देश
  • एकाचवेळी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील तटीय सुरक्षा यंत्रणा सक्रिय करणे.
  • आंतर-एजन्सी समन्वय, माहिती सामायिकरण, तांत्रिक टेहळणी आणि गंभीर क्षेत्रे आणि प्रक्रिया या सर्वांचे मूल्यांकन करणे.
  • २६/११च्या मुंबई हल्ल्यांनंतर घेतलेल्या उपायांची व्यापक आणि समग्र तपासणी करणे. अशा हल्ल्यांना रोखण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेस मजबुती देणे.
  • २६/११च्या मुंबई हल्ल्यांमुळे भारताच्या सुरक्षेतील अनेक त्रुटी समोर आल्या होत्या. त्यानंतर भारतीय नौदलाने या त्रुटी भरून काढण्यासाठी अनेक पाऊले उचलली आहेत.

निधन: प्रख्यात हिंदी साहित्यिक कृष्णा सोबती

  • ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या प्रख्यात हिंदी साहित्यिक कृष्णा सोबती यांचे २५ जानेवारी रोजी निधन झाले.
  • स्त्रियाचे भावविश्व, वेदना, स्वाभिमान आपल्या साहित्यांतून सशक्तपणे मांडणाऱ्या सुप्रसिद्ध साहित्यका अशी त्यांची ओळख होती.
  • पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील गुजरात शहरात एका मध्यमवर्गीय कुटुंबात १८ फेब्रुवारी १९२५ रोजी सोबती यांचा जन्म झाला.
  • त्यांनी १९५०मध्ये ‘लामा’ कादंबरीने साहित्ययात्रा सुरू केली. त्या स्त्री मुक्ती आणि न्यायाच्या पुरस्कर्त्या होत्या.
  • कृष्णा सोबती यांनी लिहिलेल्या जिंदगीनामा, ऐ लडकी, मित्रो मरजानी यांसारख्या अनेक कादंबऱ्या गाजल्या.
  • नफिसा, सिक्का बदल गया, बादलोंके घेरे, बचपन या सोबती यांनी लिहिलेल्या लघुकथाही चांगल्याच लोकप्रिय झाल्या. दूरदर्शनवर गाजलेल्या ‘बुनियाद’ या मालिकेचे लेखनही त्यांनी केले होते.
  • त्यांची ‘गुजरात पाकिस्तान से गुजरात हिंदुस्थान तक’ ही आत्मचरित्रात्मक कादंबरी २०१७मध्ये प्रकाशित झाली.
  • व्यास सन्मान, हिंदी अकादमी (दिल्ली)चा २०००-२००१ या वर्षीचा शलाका सन्मान त्यांना प्रदान करण्यात आले होते.
  • जिंदगीनामा या कादंबरीसाठी त्यांना १९८०मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. १९९६मध्ये त्यांना साहित्य अकादमीची फेलोशिपही देण्यात आली.
  • देशातील असहिष्णुतेचे वातावरण पाहून त्यांनी साहित्य अकादमी पुरस्कार व फेलोशिपही परत केली होती.
  • त्यांना २०१७मध्ये भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला होता.
  • २०१०मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार देण्याबाबतही सरकारकडून विचारणा झाली होती मात्र त्यांनी हा पुरस्कार नाकारला होता.
  • त्यांची साहित्यसंपदा: डार से बिछुडी, मित्रो मरजानी, यारों के यार, तिन पहाड़, बादलों के घेरे, जैनी मेहरबान सिंह, सूरजमुखी अंधेरे के, जिंदगीनामा, ए लडकी, दिलोदानिश, हम हशमत, समय सरगम इत्यादी.

२५ जानेवारी: राष्ट्रीय मतदार दिवस

  • २५ जानेवारी हा दिवस भारतात राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो, यावर्षी राष्ट्रीय मतदार दिनाची ९वी आवृत्ती आहे.
  • देशातील निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी लोकांना मोठ्या संख्येने सहभाग घेण्यास प्रोत्साहित करणे, हा या दिनाचा मुख्य हेतू आहे.
  • २०१९मधील लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या मतदार दिनाची संकल्पना (थीम) ‘एकही मतदार मागे राहू नये’ (No Voter to be Left Behind) अशी ठेवण्यात आली आहे.
  • देशातील सर्व मतदान केंद्रांवरून १८ वर्षे व त्यावरील वयाच्या लोकांना मतदान व्यवस्‍थेत सामावून घेणे, त्यांच्या नावाचा मतदार यादीत समावेश करणे आणि त्यांना ओळखपत्र देणे ही कामे या दिवशी केली जातात.
  • या दिवशी निवडणुकीच्या प्रक्रियेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या निवडणुक अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात येते.
  • निवडणूक आयोगाच्या ६१व्या स्‍थापनादिनी २०११मध्ये पहिला राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला होता.
  • तत्‍कालिन राष्‍ट्रपती प्रतिभा पाटील यांनी निवडणूक आयोगाच्या स्थापना दिनाच्या स्मरणार्थ ही दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी झाली होती.
निवडणूक आयोग
  • भारताला स्‍वातंत्र्य मिळाल्यानंतर २५ जानेवारी १९५० रोजी एक स्‍वायत्त संस्‍था म्‍हणून निवडणूक आयोग राज्यघटनेच्या कलम ३२४ अंतर्गत कार्य करतो.
  • भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील एक घटनात्मक संस्था आहे. याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे स्थित आहे.
  • देशात निपक्ष व पारदर्शी वातावरणात निवडणुका घेणे हे निवडणूक आयोगाचे कार्य आहे.
  • त्याचबरोबर नवमतदारांना मतदान व्यवस्‍थेत सामावून घेणे, त्यांना ओळखपत्र देणे, त्यांच्यात मतदानाबद्दल जाणीव जागृती निर्माण करणे आदी कार्येही आयोगाला करावी लागतात.
  • देशात १८ वर्षांच्यावरील व्यक्‍तीला मतदानाचा अधिकार संविधानाने दिला आहे. त्यानुसार नवमतदारांना मतदान व्यवस्‍थेत सामावून घेण्यासाठी निवडणूक आयोग कार्य करतो.
  • निवडणूक आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती नेमतील इतके अन्य निवडणूक आयुक्त असतात.
  • सामाजिक प्रतिष्ठा, कायद्याचे ज्ञान आणि समृद्ध असा प्रशासकीय अनुभव असलेल्या व्यक्तीची नेमणूक पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्रपती मुख्य निवडणूक आयुक्त पदावर करतात.
  • सुकुमार सेन हे भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते. सध्या सुनील अरोरा भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त (२३वे) आहेत.

२५ जानेवारी: हिमाचल प्रदेश संपूर्ण राज्य दिवस

  • २५ जानेवारीला हिमाचल प्रदेशमध्ये संपूर्ण राज्य दिवस म्हणून साजरा केला जातो. २५ जानेवारी १९७१ रोजी हिमाचल प्रदेशाला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला होता.
  • स्वातंत्र्यानंतर १५ एप्रिल १९४८ रोजी हिमाचल प्रदेशची स्थापना मुख्य आयुक्तांचा प्रांत म्हणून करण्यात आली. नंतर २५ जानेवारी १९५० रोजी हिमाचलला ‘ग’ श्रेणीच्या राज्याचा दर्जा देण्यात आला.
  • १ नोव्हेंबर १९५६ रोजी हिमाचल प्रदेशाला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात आले. १९६६मध्ये पंजाबचा डोंगराळ प्रदेश हिमाचल प्रदेशात समाविष्ट करण्यात आला.
  • डिसेंबर १९७०मध्ये संसदेने हिमाचल प्रदेश कायदा मंजूर केला आणि २५ जानेवारी १९७१ रोजी हिमाचल प्रदेश राज्य अस्तित्वात आले. हिमाचल प्रदेश भारताचे १८वे राज्य होते.
  • शिमला ही हिमाचल प्रदेशची राजधानी आहे. हिमाचल प्रदेशचे क्षेत्रफळ ५५,६७३ चौकिमी आहे.

ब्लूमबर्ग नवोन्मेष निर्देशांक २०१९

  • ब्लूमबर्ग नवोन्मेष निर्देशांक (इनोवेशन इंडेक्स) २०१९च्या ६० नवोन्मेषी देशांच्या यादीत भारताला ५४वे स्थान प्राप्त झाले आहे. भारताला १०० पैकी ४७.९३ गुण मिळाले.
  • या यादीत सलग सहाव्यांदा दक्षिण कोरियाला पहिले स्थान मिळाले आहे. दक्षिण कोरियाला ८७.३८ गुण मिळाले.
  • हा निर्देशांक तयार करताना देशांमधील शिक्षण, उत्पादन, संशोधन आणि विकास या क्षेत्रांचे नवोन्मेषाच्या दृष्टीने विश्लेषण केले जाते.
  • देशांना पुढील ७ निकषांमधील त्यांच्या नवोन्मेषाच्या क्षमतेच्या आधारावर स्थान देण्यात येते. संशोधन व विकास, मूल्यवर्धित उत्पादन, उत्पादनक्षमता, उच्च तंत्रज्ञान क्षमता, तृतीयक कार्यक्षमता, संशोधकांचे प्रमाण, पेटंटच्या क्रिया.
  • या यादीत भारताला पहिल्यांदाच स्थान मिळाले आहे. भारतासह मेक्सिको, व्हिएतनाम आणि सौदी अरेबिया हे देशही या यादीमध्ये पहिल्यांदा समाविष्ट करण्यात आले आहेत.
  • या यादीसाठी ९५ अर्थव्यवस्थांचे मूल्यांकन केले गेले, परंतु ब्लूमबर्गने केवळ ६० देशांची यादी तयार केली. यात प्रत्येक देशाला १०० पैकी गुण देण्यात आले होते.
  • या यादीतील पहिले दहा देश (अनुक्रमे): दक्षिण कोरिया, जर्मनी, फिनलँड, स्वित्झर्लंड, इस्रायल, सिंगापूर, स्वीडन, अमेरिका, जपान, फ्रान्स.
  • विविध निकषांमधील भारताची क्रमवारी: संशोधन व विकास (४७), मूल्यवर्धित उत्पादन (५४), उत्पादनक्षमता (५८), उच्च तंत्रज्ञान क्षमता (२९), तृतीयक कार्यक्षमता (५१), संशोधकांचे प्रमाण (५९), पेटंटच्या क्रिया (३६).

इंडिया-अफ्रिका फील्ड ट्रेनिंग व्यायाम २०१९

  • पुण्यातील औंध मिलिटरी स्टेशन आणि मिलिटरी इंजिनियरिंग कॉलेजमध्ये इंडिया-अफ्रिका फील्ड ट्रेनिंग व्यायाम (आयएएफटीएक्स २०१९) आयोजित केले जाईल.
  • या अभ्यासाचे आयोजन १८ ते २७ मार्च २०१९ दरम्यान आयोजित केले जाईल. या अभ्यासात भारतासह १२ आफ्रिकन देशदेखील सहभागी होणार आहेत.
  • आफ्रिकन देशांना मदत करून चीन आपले प्रभुत्व वाढवीत असताना, हा अभयस आयोजित केला जात आहे.
  • हा संयुक्त अभ्यास म्हणजे आफ्रिकन देशांसोबत वाढत्या राजकीय आणि लष्करी संबंधांच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. यामुळे या देशांसोबतचे भारताचे धोरणात्मक सहकार्य मजबूत होईल.
  • संयुक्त राष्ट्रांच्या पीसकीपिंग ऑपरेशन्सशी समन्वय साधण्याच्या हेतूने हा अभ्यास करण्यात येणार आहे.
  • या अभ्यासामुळे आफ्रिकन देशांशी भारताचे अधिक चांगले लष्करी संबंध तयार होतील आणि भारताचा आफ्रिकेत विस्तार होण्यास मदत होईल.
  • हा अभ्यासात सहभागी आफ्रिकन देश: इजिप्त, घाना, नायजेरिया, सेनेगल, सुदान, दक्षिण आफ्रिका, टांझानिया, नामिबिया, मोझांबिक, युगांडा, नायजर आणि झांबिया.

भारत पोलाद २०१९: प्रदर्शन आणि परिषद

  • भारत पोलाद २०१९ प्रदर्शन आणि परिषद मुंबईत २२ ते २४ जानेवारी २०१९ दरम्यान आयोजित करण्यात आली.
  • या परिषदेचे आयोजन पोलाद मंत्रालयाने केले असून, दर दोन वर्षांनी हे प्रदर्शन व परिषद आयोजित केली जाते.
  • या परिषदेत १५ देशांमधल्या २५०हून अधिक कंपन्या सहभागी झाल्या. देश-विदेशातील सुमारे १० हजार उद्योग प्रतिनिधींनी या परिषदेला भेट दिली.
  • या परिषदेत पोलाद क्षेत्राच्या भविष्यातील विकासाबाबत चर्चा झाली. सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योजकांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव असलेल्या कंपन्या यात सहभागी झाल्या होत्या.
  • पोलाद उत्पादने, तंत्रज्ञान आणि पोलादनिर्मितीत जगभरातल्या सर्वोत्तम पद्धती प्रदर्शनात पाहण्यासाठी उपलब्ध होत्या.
भारतीय पोलाद उद्योग
  • २०१८मध्ये भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा कच्च्या पोलादाचा उत्पादक देश ठरला होता.
  • भारत जगातील सर्वात मोठा लोह उत्पादक देश आहे.
  • अमेरिका आणि चीननंतर भारत पोलादाचा तिसरा सर्वात मोठा ग्राहक देश आहे.
  • राष्ट्रीय पोलाद धोरण २०१७नुसार २०३०-३१पर्यंत भारताने ३०० दशलक्ष टन पोलाद उत्पादनाचे लक्ष्य ठेवले आहे.
  • देशांतर्गत पोलाद उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारी खरेदीदरम्यान भारतीय पोलाद उत्पादकांना प्राधान्य दिले जाते.
  • २०१४-१५मध्ये एकूण ९१.४६ दशलक्ष टन पोलाद भारतात उत्पादित करण्यात आले होते.

अँड्री राजोएलिना: मादागास्करचे नवीन राष्ट्रपती

  • अँड्री राजोएलिना यांनी मादागास्करचे नवीन राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. ते मादागास्करचे ६वे राष्ट्रपती आहेत. राष्ट्रपती पदासाठीच्या झालेल्या निवडणुकीत त्यांना ५६ टक्के मते मिळाली होती.
  • अँड्री राजोएलिना यांचा जन्म ३० मे १९७४ रोजी मादागास्करच्या अंतसिराबे शहरात झाला. ते एक बिझनेसमॅन आणि राजकारणी आहेत.
  • यंग मलगासीज डीटरमिंड नावाच्या राजकीय पक्षाशी ते संबंधित आहेत. डिसेंबर २००७ ते फेब्रुवारी २००९ दरम्यान ते अंतानानारिव्होचे महापौर होते.
  • त्यानंतर २१ मार्च २००९ ते २५ जानेवारी २०१४ पर्यंत ते हाय ट्रांझिशनल अथॉरीटी ऑफ मादागास्करचे अध्यक्ष होते.
मादागास्कर
  • मादागास्कर हा पूर्व आफ्रिकेपासून सुमारे ४०० किमी अंतरावरील एक द्वीप-देश आहे. अंतानानारिव्हो ही या देशाची राजधानी आहे.
  • याच्या चारही बाजुंना हिंदी महासागर आहे. हे जगातील सर्वात मोठ्या बेटांपैकी एक आहे. याचे क्षेत्रफळ ५,८७,०४१ चौरस किलोमीटर आहे.
  • मादागास्करची अधिकृत भाषा मलागासी आणि फ्रेंच आहे. २६ जून १९६० रोजी मादागास्करला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा