विराट कोहलीला आयसीसी सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार
- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली २०१८चा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार (सर गारफील्ड सोबर्स ट्रॉफी) जाहीर केला आहे.
- याबरोबरच एकदिवसीय व कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही विराटने पटकावला आहे.
- याशिवाय आयसीसीच्या वार्षिक वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार म्हणूनही विराटचीच निवड करण्यात आली आहे.
- आयसीसीचे हे तीनही पुरस्कार एकाच वर्षी पटकावणारा विराट हा क्रिकेट इतिहासातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.
- या पुरस्कारांसाठी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८चा कालावधी ग्राह्य धरला गेला. यादरम्यान भारताने ६ कसोटी जिंकल्या, तर ७ कसोटी गमावल्या.
- २०१८वर्षात कोहलीने १३ कसोटी सामन्यांत ५५.08च्या सरासरीने १३२२ धावा केल्या आहेत आणि त्यात ५ शतकांचा समावेश आहे.
- १४ वन-डे सामन्यांत त्याने १३३.५५ च्या सरासरीने १२०२ धावा काढल्या आहेत आणि त्यात ६ शतकांचा समावेश आहे. तसेच १० ट्वेंटी-२० सामन्यांत त्याने २११ धावा केल्या आहेत.
- त्याने २०१८मध्ये ३७ सामन्यांत ४७ डावांमध्ये ६८.३७च्या सरासरीने एकूण २७३५ धावा केल्या आहेत. त्यात ११ शतके आणि ९ अर्धशतकांचा समावेश आहे.
- आयसीसीचा सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार जिंकणारा कोहली हा चौथा भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी राहुल द्रविड (२००४), सचिन तेंडुलकर (२०१०) आणि आर अश्विन (२०१६) यांनी हा मान पटकावला.
- हा मान २ वेळा जिंकण्याचा पराक्रम मात्र फक्त कोहलीने करून दाखवला आहे. कोहलीने २०१७मध्येही सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार जिंकला होता.
- सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटूचा मान विराटने यापूर्वी २०१७ आणि २०१२मध्ये पटकावला होता. तर सर्वोत्तम कसोटीपटूचा पुरस्कार कोहलीने प्रथमच जिंकला आहे.
पुरस्कार विजेते
- आयसीसी सर्वोत्तम क्रिकेटपटू: विराट कोहली
- आयसीसी सर्वोत्तम कसोटीपटू: विराट कोहली
- आयसीसी सर्वोत्तम वनडे क्रिकेटपटू: विराट कोहली.
- सर्वोत्तम उदयोन्मुख क्रिकेटपटू: भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंत. त्याने २०१८मध्ये कसोटी पदार्पण करत फलंदाजी आणि यष्टीरक्षणात छाप पाडली. इंग्लंडमध्ये कसोटी शतक करणारा तो पहिला भारतीय यष्टीरक्षक ठरला.
- सर्वोत्तम पंच (डेव्हिड शेफर्ड ट्रॉफी): कुमार धर्मसेना (श्रीलंका)
- आयसीसी स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कार: न्यूझीलंड कर्णधार केन विल्यमसन. (लढतीदरम्यान आदर्श वर्तन आणि संघासाठी चोख उदाहरण)
- फॅन मोमेंट्स ऑफ दी इयरः भारताने पटकावलेले युवा वर्ल्डकपचे जेतेपद.
अमित वाईकर यांना प्रवासी भारतीय सन्मान
- शांघाय येथील इंडियन असोसिएशनचे माजी अध्यक्ष व चीनमधील डोहलर ग्रुपचे वरिष्ठ उपाध्यक्ष (विक्री) अमित वाईकर यांना यंदाचा प्रवासी भारतीय सन्मान जाहीर झाला आहे.
- हा सन्मान प्राप्त करणारे ते पहिले नागपूरकर आणि चीनमधील पहिले भारतीय आहेत. २१ ते २४ जानेवारी दरम्यान वाराणसी येथे आयोजित प्रवासी भारतीय दिवस सोहळ्यात त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.
- सुवर्णपदक आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असेल. तसेच २६ जानेवारीला दिल्लीतील गणराज्यदिनाच्या परेडमध्ये विशेष अतिथी म्हणून हे पुरस्कार विजेते उपस्थित राहतील.
- अमित हे उर्दूचे गाढे अभ्यासक असून शांघाय येथील इंडियन असोसिएशनचे नेतृत्व त्यांनी केले आहे.
- नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने भारताबाहेर विविध देशांमध्ये वास्तव्यास असलेल्या ५० लाख भारतीयांमधून केवळ ३० लोकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते.
- भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, परराष्ट्र सचिव यांच्यासह ५ जणांच्या समितीने या पुरस्कार विजेत्यांची निवड केली आहे.
प्रवासी भारतीय दिवस
- दरवर्षी भारतामध्ये ९ जानेवारी रोजी प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो. ९ जानेवारी १९१५ रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेहून भारतात परतले होते.
- या घटनेच्या स्मृतीप्रित्यर्थ २००३पासून दरवर्षी अनिवासी भारतीय नागरिकांच्या भारताच्या प्रगतीमधील योगदानासाठी प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जात आहे.
- या कार्यक्रमात अनिवासी भारतीयांची विदेशातील प्रगती, त्यांच्या प्रगतीबाबतच्या कल्पना, विदेशी धोरण आदी बाबतीत चर्चा आणि विचारविनिमय होत असतो.
- १५वा प्रवासी भारतीय दिवस समारोह २१ ते २३ जानेवारी २०१९ दरम्यान वाराणसी (उत्तर प्रदेश) येथे आयोजित केला गेला.
- यावर्षी प्रवासी भारतीय दिनाची मुख्य थीम ‘नवीन भारताच्या उभारणीमध्ये अनिवासी भारतीयांची भूमिका’ अशी होती.
- उत्तर प्रदेश सरकारच्या सहकार्याने विदेश मंत्रालय (एमईए) मंत्रालयाद्वारे हा समारोह आयोजित करण्यात आला. याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे मॉरिशसचे पंतप्रधान प्रवीण जग्नाथ यांनी केले.
- यापूर्वीचा १४वा प्रवासी भारतीय दिवस ७-९ जानेवारी २०१७ दरम्यान बंगळूरू (कर्नाटक) येथे आयोजित करण्यात आला होता. त्याची थीम ‘Redefining engagement with the Indian diaspora’ ही होती.
- २०१९पासून प्रवासी भारतीय दिवस उत्सव हा एक द्विवार्षिक कार्यक्रम असेल म्हणजे प्रत्येक २ वर्षांतून एकदा या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. यापूर्वी हा उत्सव प्रतिवर्षी आयोजित केला जात होता.
कवयित्री रंजनी मुरली यांना वूमन्स व्हॉइस अवॉर्ड
- भारतीय वंशाच्या कवयित्री रंजनी मुरली यांना एपीजे कलकत्ता साहित्य महोत्सवामध्ये ‘वूमन्स व्हॉइस अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. या पुरस्कार विजेत्याला १ लाख रुपये पुरस्कारस्वरूप दिले जातात.
- प्रभा खैतान वूमन्स व्हॉइस अवॉर्ड हा वूमन्स व्हॉइस अवॉर्ड या नावानेही ओळखला जातो. हा पुरस्कार भारतातील रचनात्मक लेखन क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिलांना प्रदान केला जातो.
- स्त्रियांना प्रेरणा देणे हा या पुरस्काराचा उद्देश आहे. ऑक्सफर्ड बुकस्टोर आणि प्रभा खैतान फाऊंडेशनचा हा संयुक्त उपक्रम आहे.
एपीजे कलकत्ता साहित्य उत्सव
- एपीजे कलकत्ता साहित्य उत्सव (AKLF) हा भारताचा पहिला साहित्यिक महोत्सव होता. पुस्तकांच्या दुकानाद्वारे संचालित हा एकमेव साहित्यिक उत्सव आहे.
- या महोत्सवात पुस्तके, संगीत, कला आणि चित्रपट यासारख्या विषयांवर चर्चा केली जाते.
यूएनसीसीडी COPच्या १४व्या सत्राचे भारतात आयोजन
- यूएनसीसीडीच्या (संयुक्त राष्ट्रसंघाचा वाळवंटीकरण प्रतिरोधक कार्यक्रम) कॉन्फरंस ऑफ पार्टीजच्या १४व्या सत्राचे आयोजन भारतात केले जाणार आहे.
- या सत्रात, वाळवंटीकरण आणि जमिनीची घटत्या उत्पादकतेवर चर्चा केली जाईल. ऑक्टोबर २०१९मध्ये भारतामध्ये हे सत्र आयोजित केले जाईल. यात १००पेक्षा जास्त देश सहभागी होण्याचा अंदाज आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाचा वाळवंटीकरण प्रतिरोधक कार्यक्रम
- यूएनसीसीडी: युनायटेड नेशन्स कन्वेन्शन टू कॉम्बॅट डीसर्टीफिकेशन
- यूएनसीसीडीची स्थापना १९९४मध्ये करण्यात आली होती. यासाठीच्या करारावर १४ ऑक्टोबर १९९४ रोजी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
- मातीची उत्पादकता कायम राखण्यासाठी कार्य करणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. एकूण १९७ देश याचे सदस्य आहेत.
- यांच्या कॉन्फरंस ऑफ पार्टीज (COP) सत्राचे आयोजन दर २ वर्षांनी वेगवेगळ्या ठिकाणी केले जाते. अशा पहिल्या सत्राचे आयोजन १९९७मध्ये रोम (इटली) येथे करण्यात आले होते.
नेपाळ, भूतानला जाण्यासाठी आधार कार्ड वैध
- नेपाळ, भूतानला जाण्यासाठी आता १५ वर्षांखालील आणि ६५ वर्षांवरील व्यक्तींचे आधार कार्ड एक वैध कागदपत्र म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे.
- १५ वर्षांखालील आणि ६५ वर्षांवरील व्यक्ती वगळता अन्य वयोगटातील व्यक्तींना मात्र या दोन देशांमधील प्रवासासाठी आधारचा वापर करता येणार नाही.
- भूतान आणि नेपाळमध्ये जाताना लागणाऱ्या वैध ओळखपत्रांबाबत जारी केलेल्या नियमावलीत हा नवा नियम समाविष्ट करण्यात आला आहे.
- भारताने भूतान आणि नेपाळ या दोन देशांसोबत देशाची दारे खुली करणाऱ्या ‘ओपन डोअर पॉलिसी’चा अवलंब केला आहे.
- त्यामुळे भारतीयांकडे भारत सरकारतर्फे जारी केलेले एक छायाचित्र ओळखपत्र असल्यास त्यांना नेपाळ, भूतानमध्ये विनासायास प्रवेश मिळतो. त्यासाठी तेथील व्हिसा काढण्याची गरज नसते.
- यापूर्वी १५ वर्षांखालील व ६५ वर्षांवरील भारतीयांना आपले पॅन कार्ड, वाहनचालक परवाना, केंद्रीय आरोग्य सेवा (सीजीएचएस) हे दाखविल्यानंतर त्यांना या देशांना भेट देता येत असे. आधार कार्डाचा आधीच्या नियमावलीत समावेश नव्हता.
रु.१००पेक्षा अधिक मूल्याच्या नोटांवर नेपाळमध्ये बंदी
- भारतीय चलनातील १०० रुपयापेक्षा अधिक मूल्याच्या नोटांवर नेपाळमध्ये नेपाळ नॅशनल बँकेने (नेपाळची मध्यवर्ती बँक) बंदी घातली आहे.
- नवीन नियमांनुसार, नेपाळचे नागरिक या नोटा भारतव्यतिरिक्त इतर देशात घेऊन जाऊ शकत नाहीत.
- तसेच नेपाळचे नागरिक बंदी घातलेल्या या नोटा इतर देशांमधून नेपाळमध्ये घेऊन जाऊ शकत नाहीत.
- नेपाळच्या मध्यवर्ती बँकेने नेपाळी पर्यटक, बँका तसेच वित्तीय संस्थांना परिपत्रक जारी करून, १०० रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या नोटा वापरण्यावर बंदी घातली आहे.
- परिपत्रकानुसार नेपाळमध्ये भारतीय चलनातील २००, ५०० आणि २००० रुपयांच्या नोटा व्यवसाय किंवा इतर कामासाठी वापरल्या जाऊ शकत नाहीत.
- आता केवळ १०० रुपये आणि त्याहून कमी मूल्याच्या भारतीय चलनी नोटा नेपाळमध्ये वापरल्या जाऊ शकतात.
नेपाळ नॅशनल बँक
- नेपाळ नॅशनल बँक ही नेपाळची मध्यवर्ती बँक आहे. तिची स्थापना २६ एप्रिल १९५६ रोजी करण्यात आली. या बँकेचे मुख्यालय नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये स्थित आहे.
- ही बँक नेपाळच्या व्यापरी बँकांचे नियंत्रण करते तसेच त्यांच्यासाठी मौद्रिक धोरण जारी करते. याशिवाय ती देशातील परकीय चलन साठा व परकीय चलन विनिमय दरांचे व्यवस्थापन करते.
जागतिक आर्थिक मंचाची वार्षिक परिषद
- स्वित्झर्लंडच्या दावोस येथे २२ जानेवारी २०१९ रोजी जागतिक आर्थिक मंचाची वार्षिक परिषद सुरू झाली. या बैठकीत जगभरातील नेते सहभागी होत आहेत.
- जागतिक आर्थिक समस्या, आर्थिक संकटे, हवामानातील बदल, प्रदूषणाची वाढतीण पातळी, जागतिक सहकार्याच्या समोरील आव्हाने व जागतिकीकरण या मुद्द्यांवर चर्चा केली जाईल.
- जागतिक आर्थिक मंच २०१९ मुख्य संकल्पना (थीम): जागतिकीकरण ४.०: चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या युगात जागतिक संरचनेला आकार देणे.
- या बैठकीमध्ये सहभागी होणारे प्रमुख नेते: जर्मन चँसलर अँजेला मर्केल, स्वित्झर्लंडचे राष्ट्रपती युएली, ब्राझिलियन अध्यक्ष जेयर बोल्सोनारो, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू, ब्रिटनचे प्रिन्स विल्यम, जगातील मोठ्या कंपन्याचे सीईओ; आयएमएफ, डब्ल्यूटीओ, वर्ल्ड बँक आणि ओईसीडीसारख्या महत्वाच्या संस्थांचे प्रमुख; भारतातून कैलाश सत्यार्थी व करण जौहर तसेच १००हून अधिक भारतीय कंपन्यांचे सीईओ.
जागतिक आर्थिक मंच
- WEF: World Economic Forum
- स्थापना: जानेवारी १९७१
- मुख्यालय: कॉलॉग्नी, स्वित्झर्लंड
- डब्ल्यूईएफ ही एक आंतरराष्ट्रीय संस्था असून, त्याची स्थापना क्लॉस एम श्वाब यांनी सार्वजनिक-खाजगी सहकार्याने जागतिक स्थिती सुधारण्यासाठी केली आहे.
- ही एक ना-नफा तत्वावर कार्य करणारी संस्था आहे. इतर आंतरराष्ट्रीय संघटनांच्या सहाय्याने ती कार्य करते.
- व्यवसाय, राजकारण, शिक्षण आणि समाजातील अग्रगण्य लोकांना एकत्र आणून जागतिक परिस्थिती सुधारण्यासाठी ही संस्था कटिबद्ध आहे.
- जागतिक संस्था, राजकीय पुढारी, बुद्धिवादी लोकांना तसेच पत्रकारांना चर्चा करण्यासाठी या संस्थेने एक महत्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
पीडब्ल्यूसी ग्लोबल इकोनॉमी वॉच रिपोर्ट
- अलीकडेच प्राइसवॉटरहाउस कूपर्स (पीडब्ल्यूसी) ग्लोबल इकोनॉमी वॉच रिपोर्ट प्रकाशित झाला.
- या अहवालात जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या मुद्द्यांचे परीक्षण केले जाते. या अहवालाचे मुख्य मुद्दे पुढीलप्रमाणे:
- २०१९मध्ये भारत व फ्रान्स जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांच्या क्रमवारीत युनायटेड किंग्डमला मागे टाकतील आणि युके सध्याच्या पाचव्या स्थानावरुन घसरून सातव्या स्थानावर पोहोचेल.
- या अहवालात असे म्हटले आहे की, समांतर विकासामुळे फ्रान्स व युनायटेड किंग्डम यांच्या स्थानांमध्ये वारंवार अदलाबदल झाले आहेत.
- या अहवालात भारताला सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून चिन्हांकित करण्यात आले आहे. भारतीय लोकसंख्या आणि लोकसंख्येच्या संरचनेमुळे वेगाने विकसित होण्याची क्षमता भारतात आहे.
- या अहवालात २०१९मध्ये युनायटेड किंगडमचा जीडीपी वृद्धीदर १.६ टक्के, फ्रान्सचा जीडीपी वृद्धीदर १.७ टक्के आणि भारताचा जीडीपी वृद्धीदर ७.६ टक्के राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
- व्यापाराची समस्या नसेल आणि तेल पुरवठा संबंधित कोणतीही मोठी समस्या न उद्भवल्यास भारताची अर्थव्यवस्था ७.६ टक्के दराने वाढेल.
- जीएसटी आणि नवीन धोरणांमुळे भारताच्या वृद्धीदर बळकट होईल.
- २०१९मध्ये सरासरी जागतिक अर्थव्यवस्थेचा विकास दर मंदावेल.
- २०१९मध्ये जागतिक व्यापारयुद्ध अधिक तीव्र होऊ शकते. यामध्ये अमेरिका-चीन या देशांमधील तणाव मुख्य भूमिका निभावेल.
वैश्विक विश्वासार्हता निर्देशांक
- एडलमन ट्रस्ट बॅरोमीटर अहवाल हा एक आंतरराष्ट्रीय अभ्यास आहे, जो व्यापार, सरकार, माध्यमे आणि गैर-सरकारी संस्थांवरील विश्वासाचे मोजमाप करतो.
- हा अहवाल २७ बाजारपेठांमध्ये आयोजित ऑनलाइन सर्वेक्षणावर आधारित आहे, ज्यामध्ये ३३ हजार लोक सहभागी झाले होते.
- या अहवालाच्या आधारे वैश्विक विश्वासार्हता निर्देशांक (ग्लोबल ट्रस्ट इंडेक्स) तयार केला जातो. या अहवालाचे मुख्य मुद्दे:
- वैश्विक विश्वासार्हता निर्देशांकांमध्ये ३ अंकांची वाढ झाली असून, तो आता ५२वर पोहोचला आहे.
- सरकार, माध्यमे, व्यापार आणि एनजीओ यांच्यातील विश्वासार्हतेच्या बाबतीत भारत सर्वाधिक विश्वासार्ह देशांपैकी एक आहे. परंतु भारताच्या ब्रँड्सवरील विश्वास तुलनेने कमी आहे.
- जागृत जनतेच्या श्रेणीत भारत दुसऱ्या स्थानी तर सामान्य लोकसंख्येच्या श्रेणीत भारत तिसऱ्या स्थानी आहे. या दोन्ही श्रेण्यांमध्ये चीन प्रथम स्थानी आहे.
- ज्या कंपन्यांचे मुख्यालय जर्मनी, कॅनडा व स्वित्झर्लंडमध्ये आहे, त्यांची विश्वासार्हता सर्वाधिक आहे.
- तसेच स्वित्झर्लंड, जर्मनी आणि कॅनडातील ब्रँड्सच्या विश्वासार्हतेची गुणसंख्या ७० आहे तर जपानची विश्वासार्हतेची गुणसंख्या ६९ आहे.
- विश्वासार्हतेच्या बाबतीत भारत, मेक्सिको आणि ब्राझिलमध्ये मुख्यालय असलेल्या कंपन्या सर्वात खाली आहेत. त्याखालोखाल चीन आणि दक्षिण कोरियाचा क्रमांक लागतो.
- या अहवालाच्या मते, निराशावादी दृष्टिकोनात खूप वाढ होत असून, जगातील ३ पैकी फक्त एका व्यक्तीला विश्वास आहे की, पुढील ५ वर्षांत त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती अधिक चांगली असेल.
- पाचपैकी केवळ एका व्यक्तीचा सरकारवर विश्वास आहे आणि ७० टक्के लोकांना बदल इच्छितात.
- रोजगाराचा चांगला दर असूनही लोकांना नोकरी गमावण्याची भीती जास्त आहे.
- बातम्यांच्या विश्वासार्हतेच्या बाबतीत सर्च आणि पारंपारिक माध्यमांना ६६ गुण मिळाले, तर सोशल मीडियाला केवळ ४४ गुण मिळाले.
२१ जानेवारी: त्रिपुरा, मणिपूर आणि मेघालय राज्य दिवस
- २१ जानेवारी रोजी त्रिपुरा, मणिपूर आणि मेघालय या राज्यांनी ४७वा राज्य दिवस साजरा केला.
- २१ जानेवारी १९७२ रोजी त्रिपुरा, मणिपूर आणि मेघालय या राज्यांना पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला होता.
- स्वातंत्र्यावेळी ईशान्य भारत पुढील ३ भागात विभागलेला होता: ब्रिटिश भारतातील आसाम प्रांत, मणिपूर व त्रिपुराची देशी संस्थाने, उत्तर-पूर्व फ्रंटियर एजन्सी.
- मणिपूर आणि त्रिपुराला १९४९मध्ये केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला होता. १ डिसेंबर १९६३ रोजी नागालँडला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला.
- आसाम पुनर्गठन (मेघालय) अधिनियम १९६९नुसार मेघालयला आसाममध्येच स्वायत्त राज्याच्या दर्जा देण्यात आला.
- मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा यांना पूर्वोत्तर पुनर्गठन अधिनियम १९७२द्वारे १९७२ साली पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला.
- आसामच्या मिझो टेकड्यांना आणि नेफाला केंद्रशासित प्रदेश बनविण्यात आले होते. १९८६च्या मिझो करारानुसार १९८७मध्ये मिझोराम पूर्ण राज्य बनले.
- नेफालादेखील १९८७मध्ये पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला, जे अरुणाचल प्रदेश म्हणून ओळखले जाऊ लागले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा