राष्ट्रीय मीठ सत्याग्रह स्मारकाचे लोकार्पण
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधल्या नवसारी जिल्ह्यात दांडी येथे उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय मीठ सत्याग्रह स्मारकाचे ३० जानेवारी रोजी लोकार्पण झाले.
- महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी महात्मा गांधी आणि त्यांच्या ८० सत्याग्रहींच्या पुतळ्यांचे अनावरण देखील झाले.
- त्याशिवाय या स्मारकात ऐतिहासिक दांडी यात्रेचे वर्णन करणारे २४ भित्तीशिल्प लावण्यात आलेली आहेत.
- या स्मारकामध्ये ४१ सोलार ट्री उभारण्यात आले आहेत, जे दररोज १४४ किलोवॅट विजेचे उत्पादन करतील. स्मारकासाठी लागणारी वीजेची गरज यातून भागविली जाणार आहे. या स्मारकासाठी ११० कोटी रुपये खर्च आला आहे.
- १९३० साली महात्मा गांधींनी ब्रिटीश सरकारविरोधात केलेल्या ऐतिहासिक दांडी यात्रेची स्मृती म्हणून हे स्मारक उभारण्यात आले आहे.
- १२ मार्च ते ६ एप्रिल १९३० दरम्यान महात्मा गांधींनी साबरमती आश्रमापासून दांडी येथे २४१ मैलांचा प्रवास करून मिठावरील कराचा कायदा मोडला होता.
- भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात १९३० साली झालेल्या दांडी यात्रेचे विशेष महत्त्व आहे. या यात्रेपासूनच महात्मा गांधींनी ब्रिटीश साम्राज्याविरोधात सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली होती.
- महात्मा गांधी यांचा स्वदेशीचा आग्रह, स्वच्छाग्रह आणि सत्याग्रह या तीन मूल्यांचे या स्मारकातून स्मरण होणार आहे.
- हातमागाने देशातली गरीबी दूर करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे असे सांगत ७ ऑगस्ट हा दिवस दरवर्षी हातमाग दिन म्हणून साजरा केला जाईल अशी घोषणा पंतप्रधानांनी यावेळी केली.
दांडी यात्रा
- महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्य लढ्यादरम्यान, झालेला मिठाचा सत्याग्रह हा भारतातील तत्कालीन ब्रिटिश शासनाने मिठासारख्या जीवनावश्यक गोष्टीवर लावलेल्या कराच्या विरोधात १९३० साली घडलेला सत्याग्रह होता. यालाच दांडी सत्याग्रह असेही म्हणतात.
- १४ फेब्रुवारी १९३० रोजी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसने जनतेला गांधीजींच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंग करण्याचा आदेश दिला. मिठाचा सत्याग्रह याच चळवळीचा भाग होता.
- मिठाच्या सत्याग्रहाची सुरुवात दांडी यात्रेने झाली. ही दांडी यात्रा साबरमती आश्रमापासून १२ मार्च १९३० रोजी सुरू झाली.
- गांधीजींच्या बरोबर त्यांचे ७८ निवडक अनुयायी होते. त्यात सरोजिनी नायडू, इला भट यांचा समावेश होता.
- ही यात्रा २४ दिवस चालली आणि ६ एप्रिल १९३० रोजी दांडी येथे समुद्रकिनारी पोहोचली. तेव्हा गांधीजींनी चिमूटभर मीठ उचलून कायदेभंग केला. कायदेभंगाच्या मोठ्या प्रमाणावरील चळवळीची ती सुरुवातच ठरली.
साहित्य अकादमी पुरस्कार २०१८
- भारतीय साहित्यविश्वातील प्रतिष्ठेच्या साहित्य अकादमी पुरस्कार २०१८च्या विजेत्यांना २९ जानेवारी रोजी पुरस्कार प्रदान करण्यात आले.
- देशातल्या विविध २४ प्रादेशिक भाषांमधील उत्कृष्ट साहित्यकृतींसाठी दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. १ लाख रूपये, ताम्रपत्र आणि शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
- यंदा ७ कवितासंग्रह, ६ कादंबऱ्या, ६ लघुकथा, ३ समीक्षा आणि २ निबंध या साहित्यकृतींची निवड साहित्य अकादमी पुरस्कारासाठी करण्यात आली.
- मराठी भाषेतील साहित्यासाठी लेखक म. सु. पाटील यांच्या ‘सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध’ या समीक्षा ग्रंथाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- हिंदी भाषेतील उत्कृष्ट साहित्यकृती म्हणून चित्रा मुद्गल यांच्या ‘पोस्ट बॉक्स नं. २०३ – नाला सोपारा’ या कादंबरीची निवड झाली आहे.
- उर्दू साहित्यासाठी रहमान अब्बास यांच्या ‘रोहजीन’ या कांदबरीला तर कोकणी भाषेसाठी परेश नरेंद्र कामत यांना व इंग्रजी साहित्यासाठी अनीस सलीम यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- यंदाच्या ‘भाषा सन्मान’ पुरस्कारासाठी पुण्याच्या लेखिका डॉ. शैलजा बापट यांची निवड झाली. त्यांनी ‘ए क्रिटिकल स्टडी ऑफ ब्रह्मसूत्राज’ हा तीन खंडांतील संशोधनपर ग्रंथ लिहिला आहे.
पुरस्कार विजेते
- काव्यसंग्रह: सनंता तांती (आसामी), परेश नरेंद्र कामत (कोंकणी), एस. रामेशन नैयर (मल्यालम), डॉ. रमा कान्त शुक्ला (संस्कृत), डॉ. मोहनजीत (पंजाबी). डॉ. राजेश कुमार व्यास (राजस्थानी) आणि खिमान मौलानी (सिन्धी)
- लघुकथा: संजीब चट्टोपाध्याय (बंगाली), मुश्ताक अहमद मुश्ताक (कश्मीरी), प्रोफेसर बिना ठाकुर (मैथिलि), ऋतुराज बसुमतारी (बोडो), प्रोफेसर बुधिचंद्र हेइसनंबा (मणिपुरी) आणि नाथ उपाध्याय चापगैन (नेपाली)
- कादंबरी: इन्द्रजीत केसर (डोगरी), अनीस सलीम (इंग्रजी), चित्रा मुद्गल (हिंदी), श्याम बेसरा (संथाली), रामकृष्णन (तमिळ) आणि रहमान अब्बास (उर्दू)
- समीक्षा: के.जी. नगराजप्पा (कन्नड़), म. सु. पाटील (मराठी) आणि प्रोफेसर दसरथी दास (ओडिया)
- निबंध: प्रोफेसर शरीफा विजलिवाला (गुजराती) तथा डॉ. कोलाकलपुरी एनोच (तेलुगु)
- भाषा सम्मान २०१७ व २०१८: योगेन्द्र नाथ शर्मा (उत्तर क्षेत्र), गंगेंद्र नाथ दास (पूर्व क्षेत्र), जी. वेंकटसुबैया (दक्षिण क्षेत्र), शैलजा बापट (पश्चिमी जोन).
अनुवादासाठीचे पुरस्कार
- प्रफुल्ल शिलेदार यांनी ज्ञानेंद्रपती यांच्या हिंदीतून अनुवादीत केलेल्या 'संशयात्मा' काव्यसंग्रहास साहित्य अकादमीतर्फे अनुवादासाठी दिल्या जाणारा पुरस्कार मिळाला आहे.
- ज्ञानेंद्रपती यांना या 'संशयात्मा' काव्यसंग्रहाला २००६ साली साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आता अनुवादालाही हा पुरस्कार मिळाला आहे.
- अकादमीने २०१८मधील अनुवादित साहित्यकृतींच्या पुरस्कारांची घोषणा केली. यंदा २४ भाषांमध्ये अनुवाद झालेल्या पुस्तकांना पुरस्कार घोषित झाला आहे.
- राजवाडे लेखसंग्रह या विश्वनाथ राजवाडे लिखित मराठी निबंधांच्या कोंकणी अनुवादासाठी नारायण भास्कर देसाई यांनाही पुरस्कार जाहीर झाला.
- फ्रॉम गंगा टू ब्रह्मपुत्राच्या आसामी अनुवादासाठी पार्थ प्रतिम हजारिका यांना पुरस्कार घोषित झाला.
- ५० हजार रूपये रोख, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. अनुवादित पुस्तकांत मूळ हिंदी साहित्यकृती सर्वात जास्त आहेत. त्याखालोेखाल बंगाली साहित्याचा अनुवाद करणाऱ्यांचा आहे.
साहित्य अकादमी
- ही एक भारतीय भाषांचे संवर्धन करणारी स्वायत्त भारतीय संस्था आहे. या संस्थेची स्थापना १२ मार्च १९५४ रोजी झाली. या संस्थेचे मुख्यालय दिल्लीमध्ये आहे.
- साहित्य अकादमी ही साहित्याच्या क्षेत्रात वेगवेगळे उपक्रम राबवत असते. तसेच साहित्य अकादमी ‘पुस्तके व समकालीन भारतीय साहित्य’ हे हिंदी भाषा भाषेतील द्विमासिक नियतकालिक ही प्रकाशित करते.
- साहित्य अकादमीद्वारे दरवर्षी देशातल्या विविध २४ प्रादेशिक भाषांमधील उत्कृष्ट साहित्यकृतींसाठी पुरस्कार दिले जातात. १ लाख रूपये, ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
- पुढील २४ भाषांमधील योगदानासाठी साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात येतो: आसामी, इंग्रजी, उर्दू, ओरिया, कन्नड, काश्मिरी, कोंकणी, गुजराती, डोग्री, तमिळ, तेलुगू, नेपाळी, पंजाबी, बंगाली, बोडो, मणिपुरी, मराठी, मलयालम, मैथिली, राजस्थानी, संथाळी, संस्कृत, सिंधी व हिंदी.
औद्योगिक धोरण आणि प्रवर्तन विभागाचे नामांतर
- अलीकडेच औद्योगिक धोरण आणि प्रवर्तन विभागाचे (डीआयपीपी) नामांतर उद्योग प्रवर्तन आणि अंतर्गत व्यापार विभाग असे करण्यात आले आहे. हा विभाग केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत काम करेल.
- राष्ट्रपतींनी जारी केलेल्या आदेशानुसार, हा विभाग स्टार्टअप, व्यवसाय सुलभता आणि या संबंधित इतर कार्ये करेल.
- यापूर्वी केंद्रीय ग्राहक मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेला अंतर्गत व्यापार हा विषय, आता उद्योग प्रवर्तन आणि अंतर्गत व्यापार विभागाअंतर्गत कार्य करणार आहे.
- आता या नवीन आदेशामुळे अंतर्गत आणि बाह्य हे दोन्ही व्यापार आता वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत आणण्यात आले आहेत.
- यामुळे या दोन्ही विभागांमधील समन्वय वाढेल आणि पर्यायाने दोन्ही विभागांच्या व्यापारामध्ये देखील वाढ होईल.
- ऑल इंडिया ट्रेडर्स फेडरेशनने अनेक वर्षांपासून अंतर्गत व्यापारासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची मागणी करत आहे.
- अंतर्गत व बाह्य व्यापारांचे विलीनीकरण हे या विभागासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याच्या दिशेने एक पाउल मानले जात आहे.
आयुषमान भारतसाठी तीन मॉडेल प्रस्तावित
- पंतप्रधान जन आरोग्य योजनेच्या (आयुषमान भारत) अंमलबजावणीसाठी राज्यांना खालील तीन मॉडेल सुचविण्यात आले आहेत.
- विमा मॉडेल: याअंतर्गत विमा कंपनीला प्रीमियम देण्यात येईल, जी नंतर दाव्याची रक्कम लाभार्थ्याला देईल.
- ट्रस्ट-आधारित मॉडेल: याअंतर्गत प्रत्येक राज्य आपल्या स्तरावर या योजनेसाठी एक ट्रस्ट तयार करेल आणि दाव्याची रक्कम केंद्र आणि राज्य सरकार निर्मित निधीमधून करण्यात येईल.
- हायब्रीड मॉडेल: या मॉडेलअंतर्गत दाव्याचा काही भाग विमा मॉडेल अंतर्गत येतो, तर उर्वरित ट्रस्ट मॉडेल अंतर्गत येतो.
पंतप्रधान जन आरोग्य योजना
- आयुषमान भारत अर्थात पंतप्रधान जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी २५ सप्टेंबर २०१८पासून सुरु झाली.
- ही जगातील सर्वात मोठी सरकारी आरोग्य योजना असून, या अंतर्गत एका कुटुंबाला दरवर्षी ५ लाख रुपयांचे आरोग्य विमा संरक्षण प्रदान केले जाईल.
- कोणत्याही सरकारी व काही खासगी रुग्णालयांमध्ये याचा लाभ घेता येऊ शकतो. या योजनेमध्ये, सामाजिक आर्थिक जनगणना २०११मधील चिन्हांकित कुटुंबांना समाविष्ट केले जाणार आहे.
- ही योजना राष्ट्रीय आरोग्य एजन्सीद्वारे लागू केली जाईल. राज्यांना या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य आरोग्य एजन्सी स्थापन करावी लागेल आणि जिल्हा पातळीवरही अशीच एजन्सी स्थापन करावी लागेल.
- तेलंगणा, केरळ, ओडिशा आणि दिल्लीने आयुषमान भारत योजनेच्या एमओयु (MoU)वर स्वाक्षऱ्या केलेल्या नाहीत. तर पश्चिम बंगाल या योजनेतून बाहेर पडला आहे.
- या योजनेअंतर्गत देशातील १० कोटींपेक्षा जास्त कुटुंबांना म्हणजेच सुमारे ५० कोटींपेक्षा जास्त लोकांना मोफत आरोग्य विमा मिळणार आहे.
- कर्करोग, हृदयाचे आजार, किडनी, लिवरचे आजार, डायबिटीज यासह १३०० आजारांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे.
- या योजनेमुळे गरीबांनाही खासगी रुग्णालयात चांगले उपचार मिळतील.
- १३ हजार रुग्णालये या योजनेमध्ये सहभागी झाली आहेत.
- या योजनेंतर्गत १.५० लाख गावांमध्ये आरोग्य केंद्र सुरु होणार.
- जे राज्य या योजनेशी जोडली आहेत त्या राज्यातील लोक दुसऱ्या राज्यात गेले तरी त्यांना या योजनेचा लाभ मिळेल.
- या योजनेसाठीची आर्थिक तरतूद केंद्राकडून ६० टक्के तर राज्यांकडून ४० टक्के केली जाणार आहे.
- युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज (यूएचसी) आणि शाश्वत विकास उद्दिष्ट-३ साध्य करण्यासाठी भारताने प्रगतीला गती देणे, हादेखील या योजनेचा हेतू आहे.
योजनेचे मुख्य मुद्दे
- या योजनेचा फायदा घेण्यासाठी कुटुंबातील सदस्यांची संख्या आणि वय यावर मर्यादा नाही.
- याअंतर्गत हॉस्पिटलमध्ये भरती होण्यापूर्वीचा व नंतरचा खर्च समाविष्ट केले जातील.
- हॉस्पिटलायझेशनच्या २ दिवस पूर्वीपासूनची औषधे, चाचण्या आणि बेडच्या शुल्काचा यात समावेश आहे.
- या व्यतिरिक्त हॉस्पिटलायझेशनच्या काळातील आणि त्यानंतरच्या १५ दिवसांचा खर्चही या योजनेमध्ये सामील आहे. हॉस्पिटलायझेशनसाठी परिवहन खर्चही रुग्णाला देण्यात येणार आहे.
- उपचारांची किंमत सरकारद्वारे आधीच घोषित केलेल्या पॅकेज दराने दिली जाईल. पॅकेज दरामध्ये उपचारांशी संबंधित सर्व खर्चाचा समावेश आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेश या खर्चाच्या मर्यादेमध्ये बदल करू शकतात.
- या योजनेअंतर्गत, रुग्णाचे हॉस्पिटलायझेशन संपूर्ण देशात विनामुल्य होईल. याचा लाभ देशाच्या बऱ्याच गरीब लोकांना होईल आणि जास्त लोकांना आरोग्य सुविधा देखील मिळेल.
- या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी सरकारद्वारे चिन्हांकित केलेल्या कोणत्याही सरकारी किंवा खाजगी हॉस्पिटलमधून उपचार घेऊ शकतात.
- या योजनेसाठी. आधार कार्ड, मतपत्र किंवा राशनकार्ड पडताळणीसाठी आवश्यक असेल.
- संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त सत्राला संबोधित करताना ३१ जानेवारी रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पंतप्रधान जन आरोग्य योजनेतून १० लाखांहून अधिक लोकांना लाभ झाल्याचे जाहीर केले.
लोकपाल शोध समितीची पहिली बैठक पार पडली
- सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली लोकपाल शोध समितीची पहिली बैठक आयोजित करण्यात आली.
- लोकपालचे अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती करण्याच्या प्रक्रियेसंदर्भात या बैठकीत चर्चा झाली.
लोकपाल शोध समितीचे सदस्य
- न्यायमूर्ती सखाराम सिंह यादव
- माजी एसबीआय अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य
- सेवानिवृत्त आयएएस अधिकारी रणजीत कुमार
- माजी गुजरात पोलिस प्रमुख ललित के. पंवर
- इलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश शब्बीर हुसेन एस. खांडवाला
- प्रसार भारतीचे अध्यक्ष ए. सूर्यप्रकाश
- इस्रोचे माजी प्रमुख ए. एस. किरण कुमार
अंतिम मुदत
- सर्वोच्च न्यायालयने लोकपाल शोध समितीला लोकपाल अध्यक्ष आणि सदस्यांच्या निवडलेल्या नावांची यादी पाठविण्यासाठी फेब्रुवारी अखेरपर्यंतची मुदत दिली आहे.
लोकपालची निवड
- पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील निवड समितीद्वारे लोकपाल शोध समितीने सदार केलेल्या नावांची तपासणी केली जाईल.
- निवड समितीचे सदस्य: पंतप्रधान (अध्यक्ष), लोकसभा सभापती, लोकसभेतील विरोधी पक्षनेता, देशाचे सरन्यायाधीश किंवा त्यांनी नामनिर्देशित केलेले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि उर्वरित चार सदस्यांच्या शिफारशीने राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेले ख्यातनाम विधिज्ञ.
- राष्ट्रपतींनी भारताचे माजी महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांना या समितीत ख्यातनाम विधिज्ञ म्हणून नामनिर्देशित केले आहे.
नोएडा चित्रपट महोत्सवात ‘एक होतं पाणी’ला पुरस्कार
- तत्कालीन ज्वलंत विषय मांडणारा न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज व काव्या ड्रीम मुव्हीज प्रस्तुत ‘एक होतं पाणी' या मराठी चित्रपटाने सहाव्या नोएडा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष ज्युरी पुरस्कार मिळविला आहे.
- एका दुष्काळग्रस्त गावाची गोष्ट या सिनेमातून मांडण्यात आली आहे. पाणी हे जीवन आहे त्याचा वापर जपून करायला हवा असा मौलिक संदेश देणारा हा चित्रपट आहे.
- या चित्रपटाच्या कथेचे लेखन आशिष निनगुरकर यांनी केले आहे. तर दिग्दर्शन रोहन सातघरे यांनी केले आहे.
- हंसराज जगताप, उपेंद्र दाते, अनंत जोग, जयराज नायर, गणेश मयेकर, रणजित जोग, श्रिया मस्तेकर, रणजित कांबळे, त्रिशा पाटील, शीतल कल्हापुरे, शीतल शिंगारे आदि कलाकारांच्या यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
३० जानेवारी: शहीद दिवस
- ३० जानेवारी हा दिवस भारतात हा शहीद दिवस म्हणून पाळला जातो. १९४८मध्ये याच दिवशी नथुराम गोडसेने गांधीजींची हत्या केली होती.
- या दिवशी देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री राजघाट येथे गांधीजींच्या समाधीला श्रद्धांजली वाहतात.
- तसेच देशासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्यांसाठी या दिवशी सकाळी ११ वाजता दोन मिनिट शांत उभे राहून शहीदांना आदरांजली वाहण्यात येते.
महात्मा गांधी
- मोहनदास करमचंद गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात.
- अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले.
- रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना ‘महात्मा’ (अर्थ: महान आत्मा) ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत.
- त्यांना भारताचे राष्ट्रपिताही म्हटले जाते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी १९४४मध्ये पहिल्यांदा त्यांना ‘राष्ट्रपिता’ असे संबोधले, असे म्हणतात.
- त्यांचा जन्मदिवस २ ऑक्टोबर (१८६९) हा भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो.
- असहकार आणि अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधींनी प्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये, तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला.
- ९ जानेवारी १९१५ मध्ये भारतात परत आल्यावर त्यांनी चंपारणमधील शेतकऱ्यांना जुलुमी कर व जमीनदार यांच्याविरुद्ध लढण्यासाठी एकत्र केले. (यामुळे ९ जानेवारी हा दिवस भारतात प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा केला जातो.)
- १९२१ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सूत्रे सांभाळल्यानंतर गरिबी निर्मूलन, आर्थिक स्वावलंबन, स्त्रियांचे समान हक्क, सर्व-धर्म-समभाव, अस्पृश्यता निवारण आणि स्वराज्य यासाठी देशभरात चळवळ चालू केली.
- गांधींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा पुरस्कार केला. त्यांनी खेड्यांना खऱ्या भारताचे मूळ म्हणून पाहिले आणि स्वयंपूर्णतेचा पुरस्कार केला.
- भारत पाकिस्तान फाळणीमुळे व्यथित झालेल्या गांधींनी त्यांच्या शेवटच्या वर्षांमध्ये हिंदू-मुस्लीम दंगे थांबवण्यासाठी प्रयत्न केले.
२३ मार्च
- २३ मार्च रोजी भगतसिंह, शिवराम राजगुरू आणि सुखदेव थापर यांची पुण्यतिथी पंजाब राज्यात शहीद दिवस म्हणून पाळली जाते.
३० जानेवारी: जागतिक कुष्ठरोग निर्मूलन दिन
- ३० जानेवारी हा दिवस जगभरात जागतिक कुष्ठरोग निर्मूलन दिन म्हणून साजरा केला जातो.
- कुष्ठरोगाचे निर्मूलन करणे आणि कुष्ठरोगग्रस्त लोकांविरुद्ध असलेला भेदभाव दूर करणे, या हेतूने हा दिन साजरा केला जातो.
- कुष्ठरोगग्रस्त व्यक्तीला सामाजिक भेदभावमुळे अनेकदा नैराश्य येते. कुष्ठरोग ग्रस्तांना उपचारांसाठी मल्टी-ड्रग थेरपीची गरज असते. याअंतर्गत त्यांना ६ महिने ते एक वर्षासाठी औषधे घेणे आवश्यक आहे.
कुष्ठरोग
- कुष्ठरोग हा सावकाश पसरणारा जिवाणूजन्य आजार आहे. ‘मायकोबॅक्टेरियम लेप्रि’ या जिवाणूमुळे हा रोग होतो.
- याचा परिणाम त्वचा, हाता-पायातील परिघवर्ती चेता, नाकाची अंतत्वचा, घसा आणि डोळ्यावर होतो.
- चेतांच्या टोकावर परिणाम झाल्याने परिणाम झालेल्या भागाची संवेदना नष्ट होते. संवेदना नाहिशी झाल्याने हाता पायाची बोटे वाकडी होतात किंवा गळून पडतात. हात-पाय विद्रूप होणे हे या रोगात प्रामुख़्याने आढळते.
- भारत सरकारने या रोगाच्या समूळ उच्चाटनासाठी राष्ट्रीय कुष्ठरोग कार्यक्रम राबविला. त्यामुळे आता भारतात १० हजार लोकांमध्ये १ पेक्षा कमी कुष्ठरोगाचे रुग्ण आहेत.
बाबा आमटे
- मुरलीधर देवीदास आमटे ऊर्फ बाबा आमटे हे एक मराठी समाजसेवक होते. कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी त्यांनी चंद्रपूर, महाराष्ट्र येथे आनंदवन नावाचा आश्रम सुरू केला.
- कुष्ठरोग्यांसाठी आणि समाजातील इतर उपेक्षितांसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. बाबा आमटे यांना हे आधुनिक भारताचे संत या नावाने गौरवले जाते.
- कुष्ठरोग्यांसाठी बाबा आमटेंनी महारोगी सेवा समिती, आनंदवन, अशोकवन, लोकबिरादरी प्रकल्प (हेमलकसा) अशा अनेक संस्था सुरु केल्या.
- या समाज कार्यासाठी त्यांना पद्मश्री, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, टेंपल्टन बहुमान, संयुक्त राष्ट्रांचा मानवी हक्क पुरस्कार, गांधी शांतता पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले.
सिक्कीममधील पहिल्या स्वदेश दर्शन प्रकल्पाचे उद्घाटन
- सिक्कीमची राजधानी गंगटोक येथील झिरो पॉइंटमध्ये सिक्कीम राज्यामधील पहिल्या स्वदेश दर्शन प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.
- या प्रकल्पासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने जून २०१५मध्ये ९८.०५ कोटी रुपयांची तरतूद केली होती.
- या प्रकल्पाचे अधिकृत नाव ‘ईशान्य परीक्रमांचा विकास: रांगपो-रोरथांग-अरितर-फदामचेन-नाथंग-शेराथांग-त्सोंग्मो-गंगटोक-फोदोंग-मांगन-लाचुंग-युमथांग-लाचेन-थांगु-गुरुदोंग्मेर-मंगन-गंगटोक-तुमिनलिंगी-सिंगताम’ आहे.
- या प्रकल्पांतर्गत केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने पर्यटक माहिती केंद्र, ट्रेकिंग मार्ग, सार्वजनिक शौचालय, क्राफ्ट बाजार, राफ्टींग केंद्र, पर्यटन मदत केंद्र, पार्किंग इत्यादी सुविधांचा विकास केला आहे.
स्वदेश दर्शन योजना
- देशात विषय (थीम) आधारित पर्यटन परिक्रमा (सर्किट) प्रकल्प विकसित करण्याच्या उद्देशाने ‘स्वदेश दर्शन योजना’ ९ मार्च २०१५ रोजी सुरू करण्यात आली.
- या पर्यटन प्रकल्पांना एका एकात्मिक पद्धतीने उच्च पर्यटन मूल्य, स्पर्धात्मकता आणि स्थायित्व अश्या सिद्धांतांवर विकसित केले जाणार आहे.
- देशाच्या पर्यटनासाठी पायाभूत घटकांचा विकास करणे आणि देशातील पर्यटनाला चालना देणे, हे या योजनेचे मुख्य हेतू आहे.
- या योजनेंतर्गत विकासासाठी सुरुवातीला पुढील १३ पर्यटन परिक्रमा प्रकल्प निवडण्यात आले: बुद्धिस्ट परिक्रमा, ईशान्य भारत परिक्रमा, सागरकिनारा परिक्रमा, हिमालय परिक्रमा, कृष्ण परिक्रमा, वाळवंट परिक्रमा, पर्यावरणीय परिक्रमा, वन्यजीव परिक्रमा, आदिवासी परिक्रमा, ग्रामीण परिक्रमा, धार्मिक परिक्रमा, रामायण परिक्रमा आणि वारसा परिक्रमा.
- ही १०० टक्के केंद्र पुरस्कृत योजना आहे. या प्रकल्पांसाठी राज्यांना त्यांनी तयार केलेल्या प्रकल्पाच्या अहवालानुसार निधी देण्यात येणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा