चालू घडामोडी : २७ जानेवारी

ऑस्ट्रेलियन ओपन २०१९

  • सर्बियाचा अव्वल मानांकित नोव्हाक जोकोव्हिचने स्पेनच्या राफेल नदालला ६-३, ६-२, ६-३ असे सरळ सेट्समध्ये नमवत ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद पटकावले.
  • जोकोव्हिचचे ऑस्ट्रेलियन ओपनचे हे सातवे जेतेपद ठरले. याबरोबरच ऑस्ट्रेलियन ओपनची सर्वाधिक जेतेपदे पटकाविण्याचा मान जोकोव्हिचने मिळविला आहे.
  • यासह त्याने स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आणि ऑस्ट्रेलियाच्या रॉय एमर्सनला मागे टाकले. या दोघांच्या नावे ऑस्ट्रेलियन ओपनच्या प्रत्येकी ६ जेतेपदांची नोंद आहे.
  • त्याच्या कारकिर्दीतील हे त्याचे १५वे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले. यासह त्याने सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या यादीत अमेरिकेच्या पीट सॅम्प्रसला मागे टाकत तिसऱ्या स्थानावर धडक मारली.
  • पीट सॅम्प्रसच्या नावे १४ ग्रँडस्लॅमची नोंद आहे. या यादीत फेडरर २० ग्रँडस्लॅमसह अव्वल स्थानावर आहे. त्यापाठोपाठ नदाल (१७) दुसऱ्या स्थानी आहे.
  • जोकोव्हिचचे १५ ग्रँडस्लॅम किताब
    • ऑस्ट्रेलियन ओपन: २००८, २०११, २०१२, २०१३, २०१५, २०१६, २०१९.
    • फ्रेंच ओपन: २०१६.
    • विम्बल्डन: २०११, २०१४, २०१५, २०१८.
    • अमेरिकन ओपन: २०११, २०१५, २०१८.
महिला एकेरीमध्ये नाओमी ओसाकाचा विक्रम
  • या स्पर्धेच्या महिला एकेरीमध्ये जपानच्या नाओमी ओसाकाने अंतिम सामन्यात चेक प्रजासत्ताकच्या पेट्रा क्विटोवाचा पराभव करत, ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले.
  • ओसाकाने पेट्रा क्विटोवावर ७-६ (२), ५-७, ६-४ अशी मात केली. ही लढत अडीच तास चालली.
  • अशी कामगिरी करणारी ती जपानची पहिलीच खेळाडू ठरली. यासह तिने जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानही निश्चित केले.
  • जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर पोचणारी ओसाका ही जपानची आणि आशियाची पहिलीच टेनिसपटू आहे.
  • ओसाकाचे हे दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले. गेल्या मोसमात ओसाकाने अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली होती.
हर्बर्ट-माहुत जोडीचे करिअर ग्रँडस्लॅम पूर्ण
  • फ्रान्सच्या पियरे-ह्युजेस हर्बर्ट आणि निकोलस माहुत या जोडीने हेन्री कोटिंनेन-जॉन पियर्सचा पराभव करत पुरुष दुहेरीचा किताब जिंकला.
  • त्यांनी ६-४, ७-६ अशा फरकाने विजयाची नोंद केली. यासह या जोडीने आपले करिअर ग्रँडस्लॅम पूर्ण केले. असा विक्रम करणारी ही जगातील ८वी जोडी ठरली.
ऑस्ट्रेलियन ओपन अंतिम विजेते
  • पुरुष एकेरीः नोवाक जोकोविच.
  • महिला एकेरीः नाओमी ओसाका.
  • मिश्र दुहेरीः बारबोरा क्रेचिकोवा (चेक प्रजासत्ताक) व राजीव राम (अमेरिका).
  • पुरुष दुहेरीः पियरे-ह्युजेस हर्बर्ट व निकोलस माहुत (फ्रांस).
  • महिला दुहेरीः समांथा स्तोसुर (ऑस्ट्रेलिया) व झांग शुई (चीन).

लान्सनायक नजीर वानी मरणोत्तर अशोक चक्र प्रदान

  • काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात झालेल्या चकमकीत ६ दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या लान्सनायक नजीर वानी यांना मरणोत्तर 'अशोक चक्र' देऊन सन्मानित करण्यात आले.
  • नजीर वानी पत्नी महजबिन यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा सन्मान स्वीकारला.
  • याबरोबरच लान्सनायक नजीर वानी हे अशोक चक्र मिळविणारे पहिले काश्मिरी नागरिकही ठरले आहे.
  • लष्कराच्या सेवेत येण्यापूर्वी नजीर वानी यांचा दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग होता. मात्र, लष्करात आल्यानंतर त्यांनी देशसेवा केली. त्यांच्या या कार्याचा गौरव 'अशोक चक्र' देऊन करण्यात आला आहे.
  • लान्सनायक नजीर वानी लष्करातील ३४ राष्ट्रीय रायफल्समध्ये कार्यरत होते. मागील वर्षी शोपिया जिल्ह्यात झालेल्या चकमकीत त्यांनी ६ दहशतवाद्यांना ठार केले होते. या ऑपरेशनदरम्यान ते हुतात्मा झाले होते.
  • दहशतवाद्यांविरोधात त्यांनी केलेल्या कारवाईची दखल घेत त्यांना यापूर्वी दोनदा लष्कराकडून सन्मान करण्यात आले असून, लष्कराचे पदकही मिळाले आहे.
  • नजीर यांचे कुटुंब काश्मीर खोऱ्याच्या कुलगाम जिल्ह्यातील चेकी अश्मुजी गावात राहत आहे. त्यांच्यामागे त्यांची आई, पत्नी आणि दोन मुले आहेत.
शौर्य पुरस्कार
  • अशोक चक्र हा शांतिकाळात देण्यात येणार देशातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे. त्यानंतर किर्ती चक्र आणि शौर्य चक्र हे पुरस्कार येतात. युद्धक्षेत्रातील दाखवलेले शौर्य किंवा आत्मबलिदान यासाठी हे सन्मान प्रदान करण्यात येतात.
  • परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्य सैन्य पुरस्कार असून युद्धकाळात गाजवलेल्या अतुलनीय कामगिरी बाबत हा पुरस्कार देण्यात येतो.
  • शहीद वानी यांच्याबरोबरच इतर ४ सैन्य अधिकाऱ्यांना आणि जवानांना किर्ती चक्रने तर १२ जवानांना शौर्य चक्र सन्मान जाहीर झाला आहे.
  • प्रजास्तात्तक दिनाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाने यंदा एकूण ४११ जणांना शौय पुरस्कार जाहीर केले आहेत.

नारीशक्ती: हिंदी वर्ड ऑफ द इयर २०१८

  • ऑक्सफर्ड डिक्शनरीद्वारे हिंदी वर्ड ऑफ द इयर २०१८ म्हणून ‘नारीशक्ती’ हा शब्द निवडला गेला आहे. याबाबतची घोषणा जयपूर साहित्य महोत्सवात करण्यात आली.
  • संस्कृतमधून आलेला नारीशक्ती हा शब्द स्वतःच्या जीवनाची जबाबदारी घेण्यास सक्षम असलेल्या महिलांचे प्रतीक आहे
  • ‘नारी’चा अर्थ महिला असून, ‘शक्ती’चा अर्थ ताकद असा आहे. देशभरात हा शब्द विविध मार्गांनी वापरला जात असून, सरकारी योजनांमध्येही त्याचा वापर केला जातो.
  • महिलांचे अधिकार व प्रत्येक क्षेत्रातील त्यांच्या प्रतिनिधीत्वासंदर्भात ‘नारीशक्ती’ या हिंदी शब्दाचा उपयोग केला जातो.
  • महिलांचे अधिकार बळकट करण्यासाठी नागरी समाज, स्वयंसेवी संस्था आणि विद्यापीठेही ‘नारीशक्ती’ शब्दाचा वापर करतात.
  • २०१७पासुन ऑक्सफर्ड डिक्शनरीद्वारे हिंदी वर्ड ऑफ द इयर जाहीर करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार २०१८मध्ये ‘आधार’ या शब्दाची हिंदी वर्ड ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आली होती.
‘नारीशक्ती’ शब्दाची निवड करण्याची कारणे
  • भारत सरकारच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या प्रसंगी ‘नारीशक्ती पुरस्कारां’ची घोषणा केल्यानंतर नारीशक्ती शब्दाचा वापर लक्षणीयरित्या वाढला आहे.
  • तिहेरी तलाकवरील बंदी व केरळच्या सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशासाठी परवानगी याबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांमुळेही नारीशक्ती शब्दाचा वापर वाढला होता.

मध्यप्रदेश सरकारची युवा स्वाभिमान योजना

  • मध्यप्रदेश सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी देण्यासाठी ‘युवा स्वाभिमान योजने’ची घोषणा केली आहे.
  • ही योजना राज्यातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील तरुणांना रोजगार पुरवेल. शहरी भागात, दुर्बल आर्थिक वर्गातील तरुणांना १०० दिवसांचा रोजगार देण्यात येईल.
  • याशिवाय युवकांना कौशल्य प्रशिक्षण देण्यातही येईल. कौशल्य विकासामुळे युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
  • त्यासाठी मध्य प्रदेश सरकारने औद्योगिक धोरणात बदल करण्याचीही घोषणा केली आहे. जे उद्योग ७० टक्के कर्मचारी मध्यप्रदेशातून भरती करतील त्यांना प्रोत्साहनपार रक्कम देण्याचा प्रस्तावही विचाराधीन आहे.
  • मनरेगा योजनेचा लाभ घेऊ न शकलेल्या बेरोजगार तरुणांना या योजनेमध्ये समाविष्ट केले जाईल. मनरेगा योजना मुख्यत्वे ग्रामीण भागात रोजगार निर्मितीचे कार्य करते.

एलआर-एसएएमची यशस्वी चाचणी

  • ओडिशाच्या किनाऱ्यावरून लांब पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची (एलआर-एसएएम) यशस्वीरित्या चाचणी घेण्यात आली.
  • एलआर-एसएएमने कमी उंचीवरील आपल्या लक्ष्याचा अचूक भेद घेतला. आता हे क्षेपणास्त्र सशस्त्र सेनांमध्ये समाविष्ट केले जाऊ शकते.
एलआर-एसएएमची वैशिष्ट्ये
  • या क्षेपणास्त्राची निर्मिती संरक्षण संशोधन व विकास संघटना (डीआरडीओ) आणि इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज यांनी भारतीय नौदलांसाठी संयुक्तपणे केली आहे.
  • या क्षेपणास्त्राची प्रथम चाचणी आयएनएस कलकत्तावरून २०१५मध्ये केली होती, ही चाचणी देखील यशस्वी झाली होती.
  • याचा पल्ला ७५ किलोमीटरपर्यंत आहे. ते जेट, विमान, अँटी-शिप मिसाईल, यूएव्ही आणि रॉकेटला नष्ट करू शकते.
  • या क्षेपणास्त्राची लांबी ४.५ मीटर आहे व त्याचे वजन २५७ किलोग्राम आहे. हे क्षेपणास्त्र भारतीय लष्कर आणि नौदलामध्ये समाविष्ट केले जाईल.
  • LR-SAM: Long Range Surface-to-Air Missile

समानता एक्स्प्रेस

  • इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) दीक्षाभूमीवरून सुरू होऊन देशातील सर्व प्रमुख बौद्ध धर्माच्या स्थळांचे दर्शन घडविणारी समानता एक्स्प्रेस नावाची भारत दर्शन रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
  • ही विशेष रेल्वेगाडी १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता दीक्षाभूमी अर्थात नागपूरवरून सोडण्यात येणार आहे.
  • ही समानता एक्स्प्रेस गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित महत्वाच्या ठिकाणांना जोडते.
  • १४ ते २४ फेब्रुवारी असे १० दिवस ११ रात्रीचा हा प्रवास असून, यात नागपुरातील दीक्षाभूमीसह मुंबईतील चैत्यभूमी, महू येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थान, बुद्धगया, सारनाथ, लुंबिनी, कुशीनगर (गोरखपूर) या बुद्धस्थळांचे दर्शन करता येणार आहे.
  • यातून प्रवास करणाऱ्यांसाठी विशेष पॅकेज ठरविण्यात आले आहेत. त्यात रेल्वे प्रवास, बसद्वारे पर्यटन स्थळांपर्यंत, धर्मशाळेतील निवास आणि शाकाहारी भोजन यांचा समावेश आहे.
  • समानता एक्स्प्रेसमध्ये (स्टँडर्ड क्लास) स्लिपर क्लाससाठी प्रति प्रवासी १०,३९५ रुपये आणि थर्ड एसीसाठी (कम्फर्ट क्लास) १२,७०५ रुपये प्रवासभाडे आकारण्यात येणार आहे.
  • १६ कोचच्या या गाडीत १२ स्लिपर, १ एसी थ्री टायर आणि ३ जनरल कोच राहतील. प्रवासात १०० कर्मचारी प्रवाशांच्या सेवेसाठी हजर राहतील.
  • १९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपुरात आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. त्यामुळे या विशेष गाडीचा प्रारंभ दीक्षाभूमीवरून म्हणजे नागपुरातून होणार आहे.
समानता एक्स्प्रेसचा प्रवास
  • महु (इंदौर): याठिकाणी १४ एप्रिल १८९१ रोजी डॉ. आंबेडकर यांचा जन्म झाला.
  • चैत्यभूमी (मुंबई): याठिकाणी ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. आंबेडकरांचे निधन झाले.
  • बोधगया (गया): येथील बोधी वृक्षाखाली बसून भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती.
  • सारनाथ (वाराणसी): येथे गौतम बुद्धांनी पहिला उपदेश दिला होता.
  • लुंबिनी: येथे गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता.
  • कुशीनगर (गोरखपूर): या ठिकाणी गौतम बुद्धांचा मृत्यू झाला.
  • दीक्षाभूमी (नागपूर): येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारला.

नो प्रेझेन्ट्स प्लीज या कादंबरीला डीएससी पुरस्कार

  • दक्षिण आशियाई साहित्यासाठीचा डीएससी पुरस्कार २०१८ ‘नो प्रेझेन्ट्स प्लीज’ या कादंबरीला मिळाला आहे.
  • ही कादंबरी म्हणजे जयंत कैकिनी यांच्या कन्नड कादंबरीचा इंग्रजी अनुवाद आहे. तेजस्विनी निरंजना यांनी ही कादंबरी इंग्रजीत अनुवादित केली आहे.
  • टाटा स्टीलच्या कलकत्ता साहित्यिक संमेलनादरम्यान हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. प्रसिद्ध लेखक रस्किन बॉण्ड यांच्या हस्ते हा पुरस्कार जयंत कैकिनी आणि अनुवादक तेजस्विनी निरंजना यांना प्रदान करण्यात येईल.
  • एखाद्या अनुवादित साहित्यास हा पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. या कादंबरीमध्ये मुंबईतील जीवन चित्रित केले आहे.
दक्षिण आशियाई साहित्यासाठीचा डीएससी पुरस्कार
  • या पुरस्काराची सुरुवात २०१०मध्ये झाली. हा पुरस्कार प्रतिवर्षी उत्कृष्ट दक्षिण आशियाई साहित्यकृतीसाठी दिला जातो.
  • दक्षिण आशियाचे राजकारण, संस्कृती, इतिहास याबाबत लिखाण करणाऱ्या कोणत्याही देशाच्या लेखकांना हा पुरस्कार दिला जाऊ शकतो.
  • सुरीना नरुला आणि मनहद नरुला यांनी इंग्रजीतील लिखित किंवा अनुवादित कादंबरींसाठी २०१०मध्ये हा पुरस्कार सुरू केला.

जन शिक्षण संस्थांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी

  • केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाने जन शिक्षण संस्थांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
  • न शिक्षण संस्थांणा अधिक उपयुक्त बनविणे हा त्यामागील उद्देश आहे. जन शिक्षण संस्थांसाठीची नवीन मार्गदर्शक तत्त्वे खालीलप्रमाणे:
  • प्रशिक्षणाला मान्यताप्राप्त बनविण्यासाठी जन शिक्षण संस्थांचा अभ्यासक्रम राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्कप्रमाणे तयार केला जाईल.
  • जिल्हा प्रशासनास जबाबदाऱ्या व स्वातंत्र्य प्रदान करण्यासाठी शक्तींचे विकेंद्रीकरण करणे.
  • जिल्ह्यातील कौशल्य विकासाद्वारे पारंपारिक कौशल्यांची ओळख करून त्यांना प्रोत्साहन द्या.
  • सुलभ ऑनलाइन प्रमाणन (सर्टीफिकेशन).
  • उत्तरदायित्व व पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी जन शिक्षण संस्थांना सार्वजनिक वित्त व्यवस्थापन प्रणालीशी जोडणे.
  • राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थांद्वारे प्रशिक्षकांना प्रशिक्षण देणे.
जन शिक्षण संस्था
  • अशिक्षित, अर्धशिक्षित आणि शालेय शिक्षणामधून गळती झालेले या लोकांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी जन शिक्षण संस्थेची स्थापना केली आहे.
  • सुरुवातीला जन शिक्षण संस्था मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अधीन होत्या, आता त्या केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या अधीन आहेत.
  • केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाने जन शिक्षण संस्थांसाठी www.jss.gov.in वेबसाइट सुरू केली आहे, या वेबसाइटवर विविध प्रकारची माहिती उपलब्ध असेल.
जन शिक्षण संस्थेची कार्ये
  • व्यावसायिक प्रशिक्षणासाठी योग्य अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण मॉड्यूल तयार करणे.
  • प्रौढ शिक्षण संचालनालय, राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्था आणि रोजगार व प्रशिक्षण महासंचालक यांच्याशी समांतर अभ्यासक्रमाची निर्मिती करणे.
  • प्रशिक्षण देण्यासाठी मास्टर ट्रेनरला प्रशिक्षित करणे.
  • सामान्य परीक्षा आयोजित करणे आणि प्रमाणपत्र प्रदान करणे.
  • प्रशिक्षण घेणाऱ्या व्यक्तींना नोकरी मिळवून देण्यासाठी रोजगार निर्मात्या कंपन्यांशी करार करणे.

जम्मू-काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयक २०१४ला मंजुरी

  • जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जम्मू-काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयक २०१४ला मंजुरी दिली आहे.
  • या विधेयकाद्वारे पहाडी समुदायाच्या लोकांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यात येईल.
  • या विधेयकात, विशेष सांस्कृतिक, जातीय व भाषिक समानता असणाऱ्या पहाडी समुदायांसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे.
  • या विधेयकामध्ये पहाडी समुदायाच्या लोकांसाठी एक स्वतंत्र श्रेणी निर्माण केली आहे. ही श्रेणी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय वर्गाच्या अंतर्गत तयार करण्यात आली आहे.
  • या विधेयकाद्वारे, जम्मू आणि काश्मीर सरकारला पहाडी समुदायाला ओळखण्याची आणि चिन्हांकित करण्याची शक्ती देण्यात आली आहे.
  • पहाडी समुदायात इंडो-आर्यन लोक समाविष्ट आहेत, जे भारत आणि नेपाळच्या हिमालयीन प्रदेशात निवास करतात.
  • हा समुदाय शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात इतर समुदायांपेक्षा मागासलेला आहे. हे अंतर कमी करण्यासाठी, पहाडी समुदायासाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

प्रवासी लाभांश पेन्शन योजना

  • केरळ सरकारने प्रवासी लाभांश पेन्शन योजना सुरू केली असून, केरळचे राज्यपाल पी. सदाशिवम यांनी राज्य विधानसभेत याबाबत घोषणा केली.
  • केरळ सरकारकडून अनिवासी मल्याळी लोकांच्या कल्याणासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
  • या योजनेअंतर्गत अनिवासी केरळी लोकांनी एकरक्कमी ५ लाख रुपये दिल्यास त्यांना नियमित पेन्शनची सुविधा दिली जाईल.
  • पायाभूत सुविधांच्या विकास प्रकल्पांना आर्थिक मदत पुरविण्यासाठी हे ५ लाख रुपये केरळ इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट फंड बोर्डमध्ये जमा केले जातील.
  • या प्रसंगी राज्यपालांनी केरळच्या अनिवासी नागरिकांच्या माहिती व तक्रारींसाठी आंतरराष्ट्रीय टोल फ्री टेलिफोन सेवादेखील सुरु केली.
  • याशिवाय विविध देशांमधील नोकरीच्या संधींबद्दल माहिती देण्यासाठी, ऑनलाइन प्रमाणीकरण व भर्ती प्रक्रियेच्या माहितीसाठी एका पोर्टलचेही अनावरण करण्यात आले.
केरळमधील अनिवासी भारतीय
  • केरळचे अनिवासी भारतीय नागरिक (एनआरआय) केरळच्या कल्याणामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात.
  • मार्च २०१७पर्यंत अनिवासी भारतीयांद्वारे केरळमध्ये १,५२,३४८ कोटी रुपये पाठविण्यात आले होते.
  • केरळमधील २.१ दशलक्ष लोक परदेशात राहतात, यापैकी सुमारे ९० टक्के लोक मध्य-पूर्वेकडील देशांमध्ये राहतात.
  • अनिवासी केरळवासीयांच्या कौशल्यांचा व स्त्रोतांचा उपयोग राज्याच्या विकास आणि वाढीसाठी करण्याच्या उद्देशाने केरळ सरकारने लोक केरळ सभेची सुरूवात केली होती.
  • लोक केरळ सभेद्वारे नवीन केरळ राज्याच्या उभारणीसाठी योजना लागू करण्याच्या संदर्भात आपले मत मांडण्यासाठी अनिवासी समुदायाला एक मंच प्रदान केला जातो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा