सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. बलबीर सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखालील २१व्या विधी आयोगाचा कार्यकाळ ३१ ऑगस्ट रोजी संपला.
या आयोगाने सल्ला व सूचनावजा रिफॉर्म ऑफ फॅमिली लॉ अहवाल जारी करताना धर्मस्वातंत्र्य व प्रसाराचा धर्मनिरपेक्ष लोकशाहीतील अधिकार मान्य केला आहे.
धार्मिक रूढीच्या नावाखाली तिहेरी तलाक, बालविवाह हे सामाजिक गैरप्रकार मान्य करता येणार नाहीत असे आयोगाने म्हटले आहे.
या अहवालात आयोगाने देशद्रोह विषयक कायद्याचाही ऊहापोह करताना विचारस्वातंत्र्याची पूर्ण पाठराखण केली आहे.
निधन: राष्ट्रसंत जैन मुनी तरूण सागर महाराज
समाजातील अनिष्ट रुढी-परंपरांवर परखड शब्दांमध्ये प्रहार करणारे राष्ट्रसंत जैन मुनी तरूण सागर महाराज यांचे दिल्लीमध्ये १ सप्टेंबर रोजी वयाच्या ५१व्या वर्षी निधन झाले.
गेल्या २० दिवसांपासून काविळीने त्रस्त असलेल्या तरूण सागर यांना अशक्तपणा आला होता. त्यामुळे त्यांना मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
प्रकृतीत सुधारणाच होत नसल्यामुळे त्यांनी उपचार थांबवून चातुर्मास स्थळी जाऊन संथारा घेण्याचा निर्णय घेतला होता. (संथारा म्हणजे जैन धर्मानुसार मृत्यू समीप पाहून अन्न-पाण्याचा त्याग करणे.) पूर्व दिल्लीतील राधापुरी जैन मंदिरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
कडव्या विचारासांठी आणि परखड बोलण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या तरुण सागर यांनी अनेक कुप्रथांवर परखड शब्दांमध्ये प्रहार केला. त्यांच्या अनुयायांची संख्या खूप मोठी आहे.
तरुण सागर यांचा जन्म २६ जून १९६७ रोजी मध्य प्रदेशच्या दमोह जिल्ह्यात झाला. त्यांचे मूळ नाव पवन कुमार जैन असे होते.
जैन मुनी होण्यासाठी त्यांनी १३व्या वर्षी गृहत्याग केला आणि ८ मार्च १९८१ रोजी त्यांनी छत्तीसगडमध्ये संत परंपरेची दिक्षा घेतली.
तरुण सागर यांनी मध्य प्रदेश आणि हरियाणा विधानसभेत प्रवचन दिले होते. हरियाणा विधानसभेतील त्यांच्या प्रवचनावरुन मोठा वाद निर्माण झाला होता.
मध्य प्रदेश सरकारने ६ फेब्रुवारी २००२ रोजी त्यांना राजकीय अतिथीचा दर्जा दिला होता.
आशियाई क्रीडा स्पर्धा: चौदावा दिवस
बॉक्सिंगमध्ये अमित पांघलला सुवर्णपदक
आशियाई क्रीडा स्पर्धांच्या अखेरच्या दिवशी ४९ किलो वजनी गटात भारताचा बॉक्सर अमित पांघलने सुवर्णपदकावर नाव कोरले.
अंतिम फेरीत अमितने उझबेगिस्तानच्या हसनबॉय दुस्तमतॉवचा पराभव केला. यंदाच्या स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक मिळवणारा अमित एकमेव बॉक्सर ठरला.
हरयाणाच्या अमितने यापूर्वी २०१७मध्ये आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.
ब्रिजमध्ये पुरुष दुहेरी गटात भारताला सुवर्णपदक
ब्रिज क्रीडा प्रकारात प्रणब बर्धन आणि शिबनाथ डे यांनी पुरुष दुहेरी गटात भारतासाठी सुवर्णपदकाची कमाई केली. या स्पर्धेतील भारताचे हे १५वे सुवर्णपदक ठरले.
त्यांनी ३८४ गुणांची कमाई केली. चीनला ३७८ गुणांसह रौप्य, तर इंडोनेशियाला ३७४ गुणांसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
भारताचे ब्रिज प्रकारातील हे तिसरे पदक आहे. भारताने याआधी दोन कांस्यपदक जिंकली आहेत.
भारतीय महिला स्क्वॉश संघाला रौप्यपदक
भारतीय महिला स्क्वॉश संघाला अंतिम लढतीत हाँगकाँग संघाने पराभूत केल्यामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
दीपिका पल्लीकल, जोश्ना चिनप्पा, तन्वी खन्ना आणि सुनन्या कुरूविल्ला यांचा भारतीय संघात समावेश होता.
यापैकी दीपिका आणि जोश्ना यांनी महिला एकेरीत कांस्यपदक जिंकले आहे. त्यांना उपांत्य फेरीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला.
पुरुष एकेरीत सौरव घोषालने विक्रमी कांस्यपदक जिंकले. २००६ ते २०१८ दरम्यान चारही आशियाई स्पर्धेत पदक जिंकणारा तो पहिला भारतीय स्क्वॉशपटू आहे.
भारतीय हॉकी संघाला कांस्यपदक
कांस्यपदकासाठीच्या सामन्यात भारतीय हॉकी संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला २-१ अशी पराभूत करत कांस्यपदकावर नाव कोरले आहे.
भारताकडून सामन्यात आकाशदीप सिंग आणि हरमनप्रीत सिंहने प्रत्येकी एक गोल केला. पाकिस्तानकडून मोहम्मद आतिकने एकमेव गोल केला.
सुवर्णपदकाच्या आशेने स्पर्धेची सुरुवात केलेल्या भारताला शेवटी कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
अभयकुमार यांच्या कवितांचे लायब्ररी ऑफ काँग्रेस येथे ध्वनिमुद्रण
राजनैतिक अधिकारी व कवी अभयकुमार यांच्या कवितांचे वॉशिंग्टन डीसीमधील ‘लायब्ररी ऑफ काँग्रेस’ येथे ध्वनिमुद्रण करण्यात आले आहे.
‘दी पोएट्री ॲण्ड पोएट’ मालिकेत त्यांच्या कवितांचा समावेश करण्यात आला आहे. हा मान मिळालेले ते पहिले भारतीय कवी आहेत.
या ध्वनिमुद्रणात आतापर्यंत १९९७पासून रॉबर्ट हास, रिचर्ड ब्लांको, इव्हान बोलॅण्ड, बिली कॉलिन्स, रिटा डव्ह, लुईस ग्लक, डोनल हॉल, टेरान्स हेस, टेड कुसर, फिलीप लीव्हाइन, व्ही.एस मेरविन, नोमी शिहाबा ने, रॉबर्ट पिनस्की, चार्ल्स सिमिक, नताशा ट्रेथवे, मोनका युन, ट्रॅसी स्मिथ यांच्या कवितांचा समावेश झाला आहे.
बिहारमधील नालंदा जिल्ह्यात १९८० साली अभयकुमार यांचा जन्म झाला. पदवीसाठी त्यांनी भूगोलाचा अभ्यास केला, पण नंतर ते साहित्याकडे वळले.
२०व्या वर्षी त्यांनी ‘रिव्हर व्हॅली टू सिलिकॉन व्हॅली-स्टोरी ऑफ थ्री जनरेशन्स ऑफ ॲन इंडियन फॅमिली’ हे आठवणीपर पुस्तक लिहिले.
मगाही, हिंदी, इंग्रजी, रशियन, नेपाळीया भाषा त्यांना येतात. तसेच संस्कृत, स्पॅनिश भाषा चांगल्या समजतात.
परराष्ट्र सेवेची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांची पहिली नेमणूक मॉस्कोत झाली. सध्या ते ब्राझीलमध्ये राजनैतिक अधिकारी आहेत.
ते नुसते लेखकच नाहीत तर चित्रकारही आहेत. सेंट पीट्सबर्ग, नवी दिल्ली, पॅरिस येथे त्यांच्या चित्रांची प्रदर्शने झाली आहेत.
त्यांनी परराष्ट्र सेवेच्या माध्यमातून देशोदेशीच्या कवींना वेगळ्या माध्यमांतून एकत्र आणण्याचा प्रयत्न केला.
आतापर्यंत अभयकुमार यांच्या कवितांचा समावेश किमान ६० आंतरराष्ट्रीय साहित्य नियतकालिकांत झाला आहे.
द सिडक्शन ऑफ दिल्ली (२०१४), द एट आइड लॉर्ड ऑफ काठमांडू (२०१७), द प्रॉफेसी ऑफ ब्राझिलिया (२०१८) हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.
‘अर्थ अँथेम’ हे त्यांचे काव्यगीत ३० भाषांमध्ये अनुवादित झाले असून, ‘नॅशनल थिएटर ऑफ ब्राझिलिया’ या संस्थेने त्याची संगीतमय रचना तयार केली आहे. त्यात व्हायोलिनवादक डॉ. एल. सुब्रमणियम यांनी संगीत दिले असून कविता कृष्णमूर्ती यांनी ते गायले आहे.
‘कॅपिटल्स ॲण्ड १०० ग्रेट इंडियन पोएट्स’ या पुस्तकाचे ते संपादक आहेत. २०१३मध्ये त्यांना सार्कचा साहित्य पुरस्कार मिळाला आहे.
युथ बॉक्सिंग चॅम्पिअनशिप स्पर्धेत भारताला २ सुवर्णपदके
बुडापेस्ट येथे सुरु असलेल्या युथ बॉक्सिंग चॅम्पिअनशिप स्पर्धेत भारताच्या नितूने सलग दुसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली.
४८ किलो वजनी गटात नितूने थायलंडच्या निलादा मेकॉनचा पराभव केला. २०१७मध्ये गुवाहटीत झालेल्या स्पर्धेतही तिने सुवर्णपदक जिंकले होते.
याशिवाय ५७ किलो वजनी गटात भारताच्या साक्षी चौधरीने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. साक्षीने क्रोएशियाच्या निकोलीना कॅसिकचा पराभव केला.
तर भारताच्या ५१ किलो वजनी गटात अनामिकाला आणि ६४ किलो वजनी गटात मनिषाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
याचसोबत भारताच्या जॉनी, अस्था पहावा, भावेश कट्टीमणी, अंकित खटाना, नेहा यादव, साक्षी गायधनी या बॉक्सर्सना उपांत्य फेरीतील पराभवामुळे कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा