चालू घडामोडी : १८ सप्टेंबर

देना बँक, विजया बँक आणि बँक ऑफ बडोदाचे विलिनीकरण

  • सार्वजनिक क्षेत्रातील देना बँक, विजया बँक आणि बँक ऑफ बडोदा या तीन बँकाचे विलिनीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
  • अर्थसंकल्पातून केल्या गेलेल्या घोषणेप्रमाणे, सार्वजनिक क्षेत्रातील ३ बँकांच्या विलिनीकरणासाठी सरकारने हे पाऊल टाकले.
  • या विलिनीकरणातून बँका आणखी सशक्त बनण्याबरोबरच, त्यांची पतपुरवठा क्षमताही वाढेल, असा दावा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला.
  • यापूर्वी १ एप्रिल २०१७ रोजी सरकारने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पाच सहयोगी बँका आणि भारतीय महिला बँकेचे स्टेट बँकेमध्ये विलीनीकरण केले होते.
विलिनीकरणाचे परिणाम
  • या तीन बँकांच्या विलिनीकरणातून एकंदर व्यवसायाच्या मानाने तिसऱ्या मोठ्या जागतिकदृष्ट्या स्पर्धाक्षम बँकेची निर्मिती होईल
  • देना बँक ही तीन बँकांतील कमजोर बँक, तर विजया बँक ही तुलनेने सशक्त बँक आहे. विलीनीकरणापश्चात बँक ऑफ बडोदाच्या सध्याच्या अनुप्तादक कर्जामध्ये (एनपीए) घट होणार आहे.
  • विलीनीकरणापश्चात बँक ऑफ बडोदा आणि देना बँकेच्या गुजरात आणि महाराष्ट्रात राज्यातील काही शाखा, एटीएमचे बंद होतील, तर काही शाखांचे विलीनीकरण होईल.
  • विलिनीकरणानंतरही तिन्ही बँकांना भांडवली सक्षमतेसाठी सरकारचे आर्थिक पाठबळ कायम राहील. तिन्ही बँकांच्या नाममुद्रा, व्यावसायिक अस्तित्व अबाधित राहील.
  • बँकांच्या कर्मचाऱ्यांचे हितरक्षण करताना, त्यांच्या विद्यमान सेवा-शर्तीमध्ये कोणताही फरक पडणार नाही.
  • ग्राहकांची संख्या, बाजारपेठ आणि ऑपरेटिंग कौशल्यांमध्ये वाढ होईल. तसेच, ग्राहक अधिक उत्पादने आणि चांगल्या सेवा ऑफर करण्यास सक्षम असतील.
आकडेवारीवर एक नजर
  • सध्या बँक ऑफ बडोदाच्या ५५०२, विजया बँकेच्या २१२९ आणि देना बँकेच्या १८५८ शाखा आहेत. विलीनीकरणानंतर नवीन बँकेच्या ९४८९ शाखा असतील.
  • बँक ऑफ बडोदामध्ये ५६,३६१ कर्मचारी आहेत, विजया बँकेचे १५,८७४ कर्मचारी आहेत आणि देना बँकेचे १३,४४० कर्मचारी आ हेत. नवीन बँकेतील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ८५,६७५असेल.
  • विलीनीकरणानंतर नवीन बँकेचा एकूण व्यवसाय १४.८२ लाख कोटी रुपये होईल.

जर्मनीने पहिल्या हायड्रोजन ट्रेनची निर्मिती

  • जर्मनीने जगातील पहिल्या हायड्रोजन ऊर्जेवर चालणाऱ्या प्रवासी ट्रेनची निर्मिती केली आहे. या ट्रेनला आयलींट हे नाव देण्यात आले आहे. जर्मनीतील कक्सहेवन ते बुक्सटेहूड या १०० किमीच्या अंतरावर ही ट्रेन धावली.
  • या हायड्रोजन ट्रेनची निर्मिती फ्रेंच कंपनी अलस्टोमने केली असून, भविष्यात आणखी अशा १४ ट्रेन चालवण्याची जर्मनीची योजना आहे.
हायड्रोजन ट्रेनची वैशिष्ट्ये
  • या ट्रेनमधून कुठल्याही प्रदूषणकारी घटकांची निर्मिती होणार नाही. त्यामुळे ही ट्रेन संपूर्णपणे प्रदूषण मुक्त आणि पर्यावरण अनुकूल आहे.
  • ग्लोबल वॉर्मिंग आणि वातावरण बदलाला कारणीभूत असलेल्या कार्बन डाय ऑक्साइडचे उत्सर्जन कमी करण्यास या ट्रेनची मदत होईल.
  • हायड्रोजन ट्रेनमध्ये इंधन सेल्स असून, त्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सजन एकत्र करून वीज तयार केली जाते.
  • वाफ आणि पाण्यापासून ही वीज बनते. त्यामुळे यातून कोणत्याही वायूचे उत्सर्जन होत नाही. अतिरिक्त उर्जा लिथियम आयन वीज बॅटऱ्यांमध्ये साठविली जाते.
  • या ट्रेनमध्ये मोबाइल फोन आणि अन्य घरगुती उपकरणांमध्ये वापरण्यात येणाऱ्या लिथियम-आयन विद्युतघटाचा (बॅटरी) वापर करण्यात आला आहे.
  • डिझेल ट्रेन प्रमाणेच या ट्रेनमध्ये इंजिनची रचना आहे. हायड्रोजनच्या सिंगल टँकवर ही ट्रेन १ हजार किलोमीटरपर्यंत अंतर कापू शकते.
  • या एका ट्रेनची किंमत ७० लाख डॉलर आहे. ताशी १४० किमी वेगानेधावण्यास सक्षम आहेत.
  • डिझेल ट्रेनच्या तुलनेत हायड्रोजन ट्रेनची किंमत जास्त आहे. दीर्घकाळाचा विचार केल्यास ही ट्रेन चालवण्यासाठी येणारा खर्च कमी आहे.

स्वामित्व हक्काबाबत महाराष्ट्र आघाडीवर

  • एखाद्या क्षेत्रातील संशोधनाच्या किंवा वस्तू वापराबाबतचे स्वामित्व हक्क (पेटंट) मिळवण्यासाठी देशात महाराष्ट्र आघाडीवर आहे.
  • महाराष्ट्रातून गेल्या वर्षी पेटंट प्राप्तीसाठी साडेतीन हजारांहून अधिक अर्ज करण्यात आले असून याबाबत राज्याने अग्रस्थान घेतले आहे.
  • संशोधनाची मालकी आपली असल्याबाबत सरकारी पातळीवर मिळालेली मान्यता म्हणजे स्वामित्व हक्क अथवा पेटंट होय.
  • देशाच्या नावावर सर्वाधिक पेटंट असणे जागतिक पातळीवर बहुमानाची गोष्ट मानली जाते.
  • पेटंटसाठी अर्ज करण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे तर, सर्वात पिछाडीवर हिमाचल प्रदेश आहे. यामध्ये तामिळनाडू दुसऱ्या तर कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर आहे.
  • विविध राज्यांतून पेटंटसाठी ४५,४४४ अर्ज दाखल झाले. ही संख्या गेल्या वर्षीपेक्षा ३ टक्क्याने कमी आहे.
  • सर्वाधिक १९,६४० पेटंट अर्ज इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स संबंधित विषयात दाखल झाले. रसायनशास्त्र आणि संबंधित विषयांसाठी ९,५१० पेटंट अर्ज दाखल झाले.
  • जैवतंत्रज्ञान, सूक्ष्म जीवशास्त्र आणि संबंधित विषयांसाठी १,७५४ पेटंट अर्ज दाखल केले.
  • महाराष्ट्राला पेटंटमधून २०१६-१७मध्ये ४१०.०३ कोटी एवढा महसूल प्राप्त झाला असून २०१५-१६च्या तुलनेत तो ४ (३९८ कोटी) टक्क्यांने वाढला आहे.

निधन: हिंद केसरी गणपतराव आंदळकर

  • प्रसिध्द हिंद केसरी पैलवान गणपतराव आंदळकर यांचे १७ सप्टेंबर रोजी पुण्यामध्ये निधन झाले.
  • आंदळकर यांचा जन्म १५ एप्रिल १९३५ रोजी सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा तालुक्यातील पुनवत या गावी झाला.
  • शेतकरी कुटुंबात जन्मलेले गणपतराव १९५०मध्ये खास कुस्तीसाठी कोल्हापुरात आले. बाबासाहेब वीर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कुस्तीचे धडे घेतले.
  • आंदळकर यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर देदीप्यमान कामगिरी बजावली. त्यांनी १९६०मध्ये हिंदकेसरीची गदा पटकावली.
  • १९६२मध्ये जकार्ता येथे झालेल्या अशियायी स्पर्धेत त्यांनी सुपर हेवी गटात ग्रीको रोमन स्टाइलमध्ये सुवर्णपदक तर फ्री स्टाइलमध्ये रौप्यपदक पटकावले.
  • १९६४मध्ये टोकिओ ऑलिपिंकमध्ये हेवी गटात भारतीय कुस्ती संघाचे नेतृत्व आंदळकर यांनी केले. तिथे त्यांनी चौथ्या फेरीपर्यंत धडक मारली होती.
  • पाकिस्तानी मल्ल गोगा पंजाबी, दिल्लीचा खडकसिंग पंजाबी, अमृतसरचा बनातसिंग पंजाबी, पतियाळाचा रोहेराम, पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे, या नामवंत मल्लाबरोबरीच्या त्यांच्या लढती गाजल्या होत्या.
  • १९६७पासून त्यांनी मोतीबाग तालमीत कुस्ती प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडताना त्यांनी अनेक मल्ल घडवले, ज्यांनी पुढे जाऊन भारत केसरी, महाराष्ट्र केसरी असे अनेक सन्मान मिळविले.
  • १९६४साली भारत सरकारने त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले. तसेच छत्रपती शाहू स्मारक ट्रस्टच्या शाहू पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
  • महाराष्ट्र सरकारने कुस्ती क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना १९८२मध्ये शिवछत्रपती पुरस्काराने गौरवले आहे. १९९० साली त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

टाइम मासिकाची १९ कोटी डॉलरमध्ये विक्री

  • मेरेडिथ कॉर्प या अमेरिकी कंपनीने मार्क बेनीऑफ आणि त्यांची पत्नी लायनी बेनीऑफ यांना जगप्रसिद्ध ‘टाइम’ मासिक १९ कोटी डॉलरमध्ये (१३८६ कोटी रुपये) विकले आहे.
  • बेनीऑफ क्लाउड कम्प्युटिंगच्या क्षेत्रामधील आघाडीची कंपनी सेल्सफोर्सच्या ४ संस्थापकांपैकी १ आहेत. त्यांची एकूण संपत्ती ६.७ अब्ज डॉलर एवढी आहे.
  • टाइम मासिक विकत घेण्याचा निर्णय बेनिऑफ यांचा वैयक्तिक असून, त्याचा सेल्सफोर्सशी संबंध नाही.
  • गेल्या ९० वर्षांपासून टाइम मासिक आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि राजकारणातील आघाडीचे नियतकालिक आहे. त्यांच्या लेख आणि वृत्तांकनाचा परिणामही मोठा आहे.
  • टाईम मासिकाचा जगभरात प्रचंड खप आहे. १९२३मध्ये हेन्री लूस यांनी हे मॅगझीन सुरु केले होते. टाईम मॅगझीनला जानेवारी २०१८मध्ये मेरेडिथ ग्रुपने खरेदी केले होते.
  • मेरेडिथ कॉर्पने मार्च महिन्यामध्ये टाइम इन्कच्या ४ मासिकांना विकण्याची घोषणा केली होती.
  • नव्या तंत्रज्ञानविषयक उद्योगांमध्ये स्वतंत्र स्थान मिळविल्यानंतर, जुन्या व प्रतिष्ठेच्या माध्यमसमूहांमध्ये गुंतवणूक करण्याचा ट्रेंड दिसून येत आहे.
  • अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी २०१३मध्ये २५ कोटी डॉलरना वॉशिंग्टन पोस्ट हे वृत्तपत्र विकत घेतले आहे.
  • तसेच अलिबाबाचे संस्थापक जॅक मा यांच्याकडे हाँगकाँगमधील साऊथ चायना मॉर्निंग पोस्टची मालकी आहे.

मेदवेद आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत साक्षी मलिकला रौप्य

  • बेलारूस येथे सुरू असलेल्या मेदवेद आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत साक्षी मलिक अंतिम फेरीत पराभूत झाल्यामुळे तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
  • रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती कुस्तीपटू साक्षीला हंगेरीच्या मारियाना सॅस्टीनने ६-२ अशा फरकाने पराभूत केले.
  • याच स्पर्धेत ५७ किलो वजनी गटात भारताच्या पूजा धांडाने कांस्यपदक जिंकले. पूजाने १०-० अशा फरकाने अमेरिकेच्या केल्सी कॅम्बेलचा पराभव केला.

निधन: अर्थतज्ज्ञ दीना खटखटे

  • रिझव्‍‌र्ह बँकेच्या धोरणांना संशोधनाची जोड देऊन भारतीय अर्थव्यवस्थेला दिशा देण्यात मोलाचा वाटा असलेले अर्थतज्ज्ञ दीना खटखटे यांचे अमेरिकेत वॉशिंग्टन येथे निधन झाले.
  • खटखटे यांनी १९५५ ते १९६८ या काळात आरबीआयचे धोरण सल्लागार व संशोधक-संचालक म्हणून मोठी कामगिरी बजावली होती.
  • त्यानंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये सहायक संचालकपदासह अनेक उच्चपदांवर त्यांनी २० वर्षे काम केले. संयुक्त राष्ट्रातही वरिष्ठ सल्लागार म्हणून त्यांनी काम केले.
  • पुढे ते ‘वर्ल्ड डेव्हलपमेंट’ या संशोधनविषयक नियतकालिकाचे संपादक झाले. त्यांनी अर्थशास्त्रातील संशोधनावर अधिक भर दिला.
  • ‘पत अर्थशास्त्र’ हा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता. समाजवाद, केंद्रीय नियोजन, केनेशियन स्थूल अर्थशास्त्र यावर त्यांनी विचार मांडले.


  • महाराष्ट्राच्या क्रांती साळवी यांनी जर्मनीमध्ये पार पडलेल्या बर्लिन मॅरेथॉन शर्यतीत पारंपारिक नऊवारी साडीत ४२ किमीचे अंतर पार करून वेगळा विक्रम आपल्या नावे केला. पारंपारिक नऊवारी साडीत मॅरेथॉन शर्यत पूर्ण करणाऱ्या त्या पहिल्याच धावपटू ठरल्या. क्रांतीने ३ तास ५७ मिनिटात संपूर्ण मॅरेथॉन (४२ किमी) पूर्ण केली.


भारतातील बालमृत्यू दरात लक्षणीय घट

  • संयुक्त राष्ट्राच्या ताज्या अहवालानुसार २०१७मध्ये मागील पाच वर्षांतील सर्वात कमी बालमृत्यू दर नोंदविला गेला आहे. समाजात होत असलेल्या सकारात्मक बदलांचा हा संकेत आहे.
  • युनिसेफच्या मते, बालमृत्यु दराच्या बाबतील भारतात लक्षणीय सुधारणा झाली आहे. भारतात पहिल्यांदाच ० ते ५ वयोगटातील मुलांचा मृत्यूदर आणि जन्मदर समान झाला आहे.
संयुक्त राष्ट्राच्या अहवालातील ठळक मुद्दे:
  • भारतात २०१७मध्ये ० ते ५ वयोगटातील बालमृत्यूंची संख्या ६,०५,००० होती. तर ५ ते १४ वयोगटातील बालमृत्यूंची संख्या १,५२,००० होती.
  • भारतात २०१७मध्ये एकूण ८,०२,००० बालमृत्युंची नोंद झाली. ही संख्या गेल्या ५ वर्षातील सर्वात कमी आहे.
  • २०१६मध्ये भारतातील बालमृत्यु दर प्रतिहजारी ४४ होता. लिंग आधारित बालमृत्यूचा विचार करता २०१७मध्ये मुलांमध्ये हे प्रमाण प्रतिहजारी ३० तर मुलींमध्ये ४० होते.
  • रुग्णालयांमध्ये होणाऱ्या प्रसुतींमध्ये वाढ, नवजात मुलांचे संगोपन करण्याच्या सुविधांचा विकास आणि लसीकरण यामुळे बालमृत्यूच्या प्रमाणात घट होत आहे.
  • गेल्या पाच वर्षांत लिंग गुणोत्तरातही सुधारणा झाली असून, बालिकांच्या जन्मदारात आणि आयुर्मानात वाढ झाली आहे.
बालमृत्यू दर
  • प्रतिवर्षी जन्मलेल्या १००० नवजात शिशुंपैकी एक वर्ष किंवा त्याहून कमी वयात होणाऱ्या मृत्यूंची संख्या म्हणजे बालमृत्यू दर.
  • अतिसारमुळे होणारे निर्जलीकरण हे जगभरातील सर्वाधिक बालमृत्यूंचे सर्वात मुख्य कारण आहे.

अमेरिका व चीनला वादळाचा तडाखा

  • अमेरिकेत फ्लोरेंस वादळाने थैमान घातले आहे. या वादळाचा सर्वाधिक फटका अमेरिकेतील उत्तरी कॅरोलाईना या राज्याला बसला आहे.
  • आत्तापर्यंत या वादळामुळे ११ जणांचा जीव गेला असून हजारो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
  • चीन आणि फिलिपाईन्समध्ये मैंगकूट या वादळाने शिरकाव केला असून या वादळाच्या तडाख्यात आत्तापर्यंत ४९ लोकांचा जीव गेला आहे.
  • या वादळाच्या तडाख्यात फिलिंपींसचा लुजोन द्वीप नेस्तनाबूत झाला आहे. आता, हे वादळ चीनच्या पश्चिमेला धडक देत आहे.
  • येथील जवळपास ५० लाख लोकांना या वादळाचा फटका बसला आहे. या वादळाला यंदाच्या वर्षातील सर्वात मोठे वादळ असल्याचे म्हटले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा