तिहेरी तलाकबाबतच्या अध्यादेशाला मंजुरी
- तिहेरी तलाकला गुन्ह्याच्या कक्षेत आणणाऱ्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
- अध्यादेश काढल्याने हे विधेयक राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी पाठविण्यात आले असून, पुढील ६ महिन्यात सरकारला ते संसदेत सादर करून, मंजूर करून घ्यावे लागणार आहे.
- ऑगस्ट २०१७मध्ये सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाक संबंधी निकाल देताना तिहेरी तलाकला घटनाबाह्य, बेकायदा ठरवले होते. तसेच केंद्र सरकारला यासंबंधी कायदा करण्यासही सांगितले होते.
- त्यानुसार तिहेरी तलाक संबंधीचे विधेयक लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात मंजूर केले गेले. परंतु राज्यसभेत ते मंजूर करुन घेण्यात अद्याप सरकारला यश आलेले नाही.
या विधेयकातील तरतुदी:
- नव्या सुधारणांनुसार प्रस्तावित कायदा अजामिनपात्र आहे. अजामिनपात्र गुन्हा असल्यामुळे पोलीस परस्पर आरोपीची सुटका करु शकत नाहीत.
- पण खटला चालू होण्यापूर्वी आरोपी जामिनासाठी न्याय दंडाधिकाऱ्याकडे दाद मागू शकतो.
- पतीने तीनवेळा तलाक शब्द उच्चारुन तलाक दिल्यास त्याला पोलीस तात्काळ अटक करू शकतात. यासाठी त्याच्या पीडित पत्नीने तक्रार करायला हवी.
- रक्ताचे नाते किंवा लग्नाच्या नात्यातील व्यक्तींनी तक्रार केल्यासही पतीला अटक होऊ शकते. शेजारी किंवा अज्ञात व्यक्ती या प्रकरणात तक्रार दाखल करू शकत नाही.
- त्यानंतर पीडित पत्नी पतीबरोबर तडजोड करण्यास तयार असेल तर न्यायाधीश आपल्या अधिकाराचा वापर करुन तोडगा काढू शकतात. अशावेळी गुन्हा मागे घेता येऊ शकतो.
- कायद्यानुसार दंडाधिकारी पतीला जामिन देऊ शकतात. परंतू त्यांना आधी त्या महिलेची बाजू ऐकून घ्यावी लागणार आहे.
- तिहेरी तलाकविरोधी कायद्यामध्ये लहान मुलांचा ताबा पत्नीकडे देण्याची तरतूद आहे. या मुलांच्या खर्चाचे अधिकार दंडाधिकारी ठरवतील. ठरेल तेवढी रक्कम पतीने महिलेला द्यायची आहे.
निधन: पहिल्या महिला आयएएस अण्णा रजम मल्होत्रा
- स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला आयएएस अधिकारी अण्णा रजम मल्होत्रा यांचे १७ सप्टेंबर रोजी वयाच्या ९१व्या वर्षी निधन झाले.
- केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यात १९२७साली त्यांचा जन्म झाला होता. त्यावेळी त्यांचे नाव अण्णा रजम जॉर्ज असे होते.
- देशातील अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि देशाच्या प्रगतीमध्ये योगदान दिले.
- १९५१साली भारतीय प्रशासकीय सेवत पदार्पण केले होते. त्यावेळी रजम यांनी प्रशासकीय सेवेसाठी मद्रासची निवड केली होती.
- भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये (आयएएस) सामील होणाऱ्या अण्णा रजम मल्होत्रा या पहिल्या भारतीय महिला आहेत.
- अण्णा यांनी आर. एन. मल्होत्रा यांच्याशी विवाह केला, मल्होत्रा हे सन १९८५ ते १९९० दरम्यान रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर होते.
- मुंबईजवळील आधुनिक जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टच्या स्थापनेत अन्ना रजम यांचे मोठे योगदान होते. त्यामुळेच त्यांच्याकडे जेएनपीटीचे अध्यक्षपद देण्यात आले होते.
- १९८२च्या दिल्लीत आयोजित आशियाई स्पर्धांदरम्यान त्यांनी राजीव गांधींसोबत काम केले. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासोबत त्या ८ देशांच्या दौऱ्यावरही गेल्या होत्या.
- निवृत्त झाल्यानंतर त्यांनी हॉटेल लीला व्हेंचर लिमिटेडचे संचालक म्हणून काम केले.
- १९८९साली प्रशासकीय सेवा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीसाठी भारत सरकारकडून त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
EyeROV TUNA: भारतातील पहिला अंडरवॉटर ड्रोन
- डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ)ने भारतातील पहिला जलमग्न (अंडरवॉटर) रोबोटिक ड्रोन ‘EyeROV TUNA’ विकसित केला.
- डीआरडीओने हा ड्रोन नौसेनेच्या भौतिक आणि समुद्री प्रयोगशाळेच्या (एनपीओएल) ताब्यात दिला.
EyeROV TUNA
- हा ड्रोन समुद्रात ५० मीटर खोलीवर जाऊन जहाजे आणि समुद्रातील इतर पदार्थांचे उच्च क्षमतेचे रिअलटाइम व्हिडिओ आणि छायाचित्रे पाठविण्यास सक्षम आहे.
- हा ड्रोन समुद्रातील जहाजांच्या तसेच इतर समुद्री वाहनांची दुरुस्ती करण्याच्या कामात फायदेशीर ठरणार आहे.
- नेवल फिजिक्स अँड मरीन लॅबोरेटरीद्वारे (एनपीओएल) संशोधन आणि विकास कार्यांसाठी हा ड्रोनचा वापर केला जाईल.
IROV टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड
- ही केरळ स्टार्ट-अप मिशन, बीपीसीएल आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभागाद्वारे सुरू करण्यात आलेला स्टार्ट-अप (उपक्रम) आहे.
- जॉन मथाई आणि कन्नप्पा पल्लानीप्पन हे या कंपनीचे संस्थापक आहेत. तर डीआरडीओ, भारतीय नौसेनेचे माजी कर्मचारी या कंपनीचे सल्लागार आहेत.
केरळ पर्यटन विभागाला २ सुवर्ण पुरस्कार
- केरळ पर्यटन विभागाने अभिनव विपणन (मार्केटिंग) मोहिमेसाठी पॅसिफिक एशिया ट्रॅव्हल असोसिएशनचे दोन सुवर्ण पुरस्कार जिंकले.
- मलेशियामध्ये आयोजित ‘पॅसिफिक एशिया ट्रॅव्हल असोसिएशन ट्रॅव्हल मार्ट २०१८’ या कार्यक्रमादरम्यान हे पुरस्कार वितरीत केले जातील.
ठळक मुद्दे
- केरळ पर्यटन विभागाला पहिला पुरस्कार आखाती देशांमध्ये राबविलेल्या ‘यल्ला केरला’ नामक प्रिंट मीडिया मोहिमेसाठी प्रदान करण्यात आला.
- यात केरळच्या हिरव्यागार निसर्गाच्या व शांत पाण्याच्या चित्रांचा वापर आखाती देशांमधील पर्यटकांना केरळकडे आकर्षित करण्यासाठी केला आहे. ‘यल्ला केरला’ ही या मोहिमेचे पंचलाइन आहे.
- दुसरा पुरस्कार कोच्चि-मुजिरीस द्विवार्षिक उत्सवासाठी डिझाइन करण्यात आलेल्या पोस्टरसाठी देण्यात आला. या पोस्टरमध्ये बोट आणि मच्छिमारांची छायाचित्रे वापरण्यात आली आहेत.
- कोच्चि-मुजिरीस द्विवार्षिक उत्सव दक्षिण आशियातील सर्वात मोठा समकालीन कला उत्सव आहे.
पॅसिफिक एशिया ट्रॅव्हल असोसिएशन अवॉर्ड
- हा पुरस्कार पॅसिफिक एशिया ट्रॅव्हल असोसिएशनतर्फे दिला जातो. तसेच मकाऊ सरकारच्या पर्यटन कार्यालयाद्वारे प्रायोजित केलेला आहे.
- हा पुरस्कार विपणन शिक्षण व प्रशिक्षण, पर्यावरण, वारसा आणि संस्कृती या चार मुख्य श्रेणींमध्ये दिला जातो.
- पॅसिफिक एशिया ट्रॅव्हल असोसिएशनचा मुख्य उद्देश आशिया-पॅसिफिक प्रदेशात पर्यटनाला प्रोत्साहन देणे आहे.
टेहळणी जहाज आयसीजीएस विजयचे अनावरण
- भारतीय तटरक्षक दलाने नुकतेच चेन्नई, तामिळनाडु येथे अलीकडेच संपूर्ण स्वदेशी बांधणी केलेल्या टेहळणी जहाज ‘आयसीजीएस विजय’चे अनावरण केले.
- ९८ मीटरच्या श्रेणीतील भारतीय तटरक्षक दलाद्वारे संचालित करण्यात आलेले दुसरे टेहळणी जहाज (ऑफशोर पेट्रोल व्हेसल: ओपीव्ही) आहे.
आयसीजीएस विजय
- या ९८ मीटर लांबीच्या ऑफशोर पेट्रोल व्हेसलची बांधणी लार्सन अँड टुब्रोने कुट्टापल्ली शिपयार्ड येथे केली आहे.
- हे जहाज १ ट्विन इंजिन हेलीकॉप्टर आणि ४ हाय स्पीड बोट वाहून नेण्यासाठी सक्षम आहे.
- हे जहाज आधुनिक दिशादर्शन यंत्रणा, संचार उपकरणे, सेन्सर यांनी सज्ज आहे. यामध्ये ३० मिमी आणि १२.७ मिमीच्या २ बंदुकाही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
- ओडिशाच्या पॅरादीप बंदरात हे जहाज ठेवण्यात येणार आहे. या जहाजावर १२ अधिकारी व ९१ सैनिक तैनात केले जातील.
- विशेष आर्थिक क्षेत्रात टेहळणी आणि देखरेखीसाठी हे जहाज तैनात करण्यात येणार आहे. यामुळे पूर्वेकडील समुद्री क्षेत्रातील सुरक्षा व्यवस्था मजबूत होईल.
- या जहाजामध्ये महासागरात तेलगळतीमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपकरणेदेखील आहेत.
- या जहाजाचा वापर शोध व बचाव कार्यात तसेच समुद्री क्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी करण्यात येणार आहे.
हैदराबाद विमानतळाला ग्राहक सेवेमध्ये पहिले स्थान
- हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळाला (राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ) आंतरराष्ट्रीय विमानतळ सेवा गुणवत्ता परिषदेने ५-१५ दशलक्ष प्रवाशांच्या श्रेणीत (वार्षिक प्रवाशांची संख्या) जगात प्रथम स्थान दिले आहे.
- हैदराबाद विमानतळाला हा सन्मान मिळण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी २०१६मध्येही हैदराबादला प्रथम क्रमांक मिळाला होता.
- ग्राहक सेवेमध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी हैदराबाद विमानतळाला हा सन्मान देण्यात आला आहे.
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ
- हे आंतरराष्ट्रीय विमानतळ तेलंगानाची राजधानी हैदराबादच्या दक्षिणेला २४ किमी अंतरावर शमशाबाद येथे स्थित आहे.
- या विमानतळाचे संचालन सार्वजनिक-खाजगी उपक्रम जीएमआर हैदराबाद इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडद्वारे केले जाते.
- २३ मार्च २००८ रोजी वाहतूकीस खुले करण्यात आलेले हे विमानतळ सरकारी-खाजगी भागीदारीद्वारे बांधण्यात आलेले भारतातील दुसरे विमानतळ होते. (पहिले कोचीन विमानतळ)
- आंध्रप्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांनी हैदराबाद विमानतळाला भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव दिले.
- सध्या हे विमानतळ भारतामधील सर्वोत्तम विमानतळांपैकी एक मानले जात असून येथून भारतामधील सर्व प्रमुख शहरांसाठी थेट प्रवासी सेवा उपलब्ध आहे.
- हे हैदराबाद शहरासोबत ११.६ किमी लांबीच्या द्रुतगती महामार्गाद्वारे जोडला गेला आहे. रहदारीच्या दृष्टीने हे भारतातील सहावे व्यस्त विमानतळ आहे.
निधन: प्रतिष्ठित लेखक, ज्येष्ठ कवी विष्णू खरे
- हिंदीचे प्रतिष्ठित लेखक, पत्रकार, निवेदक, ज्येष्ठ कवी आणि हिंदी अकादमीचे उपाध्यक्ष विष्णू खरे यांचे १९ सप्टेंबर रोजी दीर्घकालिन आजाराने निधन झाले.
- मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे २ फेब्रुवारी १९४० रोजी खरे यांचा जन्म झाला. इंदुरच्या ख्रिश्चन कॉलेजमधून इंग्रजी साहित्यातून एमए केल्यानंतर त्यांनी हिंदी पत्रकारितेतून आपल्या करिअरला सुरुवात केली.
- सुरुवातीला दैनिक इंदुरमध्ये उपसंपादकपदी काम केल्यानंतर ते नवभारत टाइम्सचे संपादक झाले.
- समीक्षक, कवी, पटकथा लेखक आणि निवेदक म्हणूनही त्यांनी अतिशय कमी कालावधीत आपली ओळख निर्माण केली.
- त्यांनी साहित्यनिर्मितीही केली. त्यांनी लिहीलेला ‘आलोचना की पहली किताब’ या ग्रंथावर बरीच चर्चा झाली.
- त्यांच्या साहित्यातील योगदानामुळे त्यांना साहित्यिक योगदान पुरस्कार, रघुवीर सहाय्य स्मृती पुरस्कार, भवानी प्रसाद मिश्र स्मृती पुरस्कार आणि मध्य प्रदेश शिखर सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची शिक्षा रद्द
- एव्हनफिल्ड भ्रष्टाचार प्रकरणात इस्लामाबाद हायकोर्टाने पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ, त्यांची मुलगी मरियम नवाज आणि जावई मोहम्मद सफदर यांच्यावरील शिक्षेला स्थगिती दिली आहे.
- याप्रकरणी ६ जुलै रौजी शरीफ, मरयम आणि नवाज यांना अनुक्रमे १०, ७ आणि २ वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती.
- मात्र, या तिघांच्या विरोधात पुरावा नसल्याचे मान्य करत कोर्टाने त्यांची प्रत्येकी ५० लाख रुपयांच्या जामिनावर सुटका केली आहे.
- नॅशनल अकांउंटिबिलिटी ब्युरोला इंग्लंडमधल्या एव्हनफिल्ड अपार्टमेंटमधील ४ फ्लॅट्सची शरीफ यांची मालकी सिद्ध होईल, असा कुठलाही पुरावा सादर करता आला नाही.
- यापूर्वी पनामा पेपर्स घोटाळ्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने शरीफ यांना पंतप्रधानपदी राहण्यास अपात्र ठरवले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा