१६ सप्टेंबर: आंतरराष्ट्रीय ओझोन दिन
- ओझोन थराच्या संरक्षणासाठी १६ सप्टेंबर १९८७ रोजी कॅनडातील मॉन्ट्रिएल शहरात जगभरातील प्रतिनिधींनी एका आंतरराष्ट्रीय करारावर सह्या केल्या.
- ओझोनच्या थरास हानीकारक ठरणाऱ्या पदार्थांचा वापर कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी हा करार होता.
- या दिवसाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी १६ सप्टेंबर हा दिवस १९९५पासून संयुक्त राष्ट्र संघटनेच्या पर्यावरण कार्यक्रम विभागातर्फे ‘आंतरराष्ट्रीय ओझोन दिन’ म्हणून साजरा केला जातो.
- यावर्षीच्या ओझोन दिनाचा मुख्य विषय ‘Keep Cool and Carry On: The Montreal Protocol’ हा होता.
ओझोन
- ओझोन हा वायु मुळात प्राणवायु ऑक्सिजनचे संयुग आहे. ओझोन ऑक्सिजनच्या ३ अणूंपासून बनलेला असून त्याचे रेणुसुत्र O3 असे आहे.
- १९१३ मध्ये फ्रेंच भौतिक शास्त्रज्ञ चार्लस फॅब्री आणि हॅन्री बुइसन यांनी ओझोन थराचा शोध लावला.
- ओझोनचा थर हा पृथ्वीपासून १६ ते २३ किलोमीटरच्या उंचीवरील पट्ट्यात आढळतो. तो सूर्यापासून येणाऱ्या अतिनील (Ultraviolet) किरणांपासून पृथ्वीवरील सजीवसृष्टीचा बचाव करतो.
- क्लोरोफ्लुरोकार्बन, हेलॉन, कार्बन टेट्राक्लोराईड यांसारख्या पदार्थांमुळे ओझोनचा थर नष्ट होत आहे.
मॉन्ट्रिएल करार
- ओझोन थराच्या संरक्षणासाठी १९८७साली कॅनडातील मॉन्ट्रिएल शहरात या करारावर सह्या केल्या गेल्या
- क्लोरोफ्लुरोकार्बन अर्थात सीएफसीच्या उत्पादनावर बंदी आणणे, त्यांना पर्यायी रसायने शोधणे व कालांतराने सीएफसींची निर्मिती आणि वापर पूर्णपणे थांबविणे या उद्देशाने हा करार करण्यात आला.
- या करारातील अटी १९८९पासून लागू झाल्या. त्यानुसार सीफसीचा वापर कमी करण्यासाठीच्या उपाययोजनांची पद्धतशीरपणे अंमलबजावणी विकसित आणि विकसनशील देशांत सुरू झाली.
- ह्या अटींची काटेकोर अंमलबजावणी झाल्यास २०५०पर्यंत ओझोनचा थर पूर्ववत व्हावा असा अंदाज आहे.
- या अटी जगभरातील अनेक देशांनी मान्य करून त्यांच्या पालनास सुरुवात केली असल्यामुळे आंतरराष्ट्रीय सहकाराचे ते उत्कृष्ट उदाहरण ठरले.
- १९९१साली ओझोन थराच्या संरक्षणासाठी भरलेल्या विएन्ना परिषदेमध्ये भारताने ह्या कार्यक्रमास पाठिंबा जाहीर करून १९९२साली मॉंट्रिएल करारातील उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केली.
अत्याधुनिक रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी
- १५ व १६ सप्टेंबर २०१८ रोजी भारताच्या Man-Portable Anti-Tank Guided Missileच्या (MPATGM) २ यशस्वी चाचण्या महाराष्ट्राच्या अहमदनगर रेंजवर करण्यात आल्या.
- हे स्वदेशी बनावटीचे तिसऱ्या पिढीचे क्षेपणास्त्र भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (DRDO) विकसित केले आहे.
MPATGMची वैशिष्ट्ये:
- हे भारताच्या स्वदेशी ‘नाग’ या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र मालिकेतील अत्याधुनिक क्षेपणास्त्र आहे.
- अशा प्रकारच्या क्षेपणास्त्रामुळे दुर्गम भागातील शत्रूची ठिकाणे आणि रणगाडे नष्ट करण्यास भारतीय सैन्याला मदत मिळेल.
- खांद्यावर ठेवून चालविता येणाऱ्या या क्षेपणास्त्राचा पल्ला २.५ ते ४ किमीपर्यंत आहे. त्याचे वजन १४.५ किलो आहे.
- या क्षेपणास्त्रामुळे भारताच्या मेक ईन इंडिया कार्यक्रमाला प्रात्साहन मिळणार आहे.
- हे जगातील सर्वोत्तम क्षेपणास्त्र असून, सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतर याचा वापर सध्याच्या फ्रांसच्या Milan आणि रशियाच्या Konkur या क्षेपणास्त्रांच्या जागी करण्यात येईल.
इस्त्रोकडून २ ब्रिटीश उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
- भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोने १६ सप्टेंबर रोजी पीएसएलव्ही सी-४२च्या सहाय्याने नोव्हासार (NovaSAR) आणि एस१-४ या २ ब्रिटीश उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले.
- सरे सॅटेलाईट टेक्नॉलॉजीज लिमिटेडने हे उपग्रह विकसित केले आहेत. पृथ्वीपासून ५८३ किमी उंचीवर हे उपग्रह सोडण्यात आले.
- हे पूर्णत: व्यावसायिक प्रक्षेपण होते. ते श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून करण्यात आले. या प्रक्षेपणासोबत एकही भारतीय उपग्रह नव्हता.
- या दोन्ही उपग्रहांचे एकत्रित वजन ८८९ किलो आहे. या उपग्रहामुळे पृथ्वीवर होणारे पर्यावरणीय बदल, नैसर्गिक आपत्तीबाबत माहिती घेणे शक्य होणार आहे.
- नोव्हासार उपग्रह वने, हिमाच्छादित भागाचे सर्वेक्षण, जमिनीचा वापर, पूर व इतर नैसर्गिक आपत्तींवर देखरेख यासाठीवापरण्यात येणार आहे.
- तर एस१-४ उपग्रह पृथ्वीचे निरीक्षण, पर्यावरणावर देखरेख, स्रोतांचे सर्वेक्षण, शहर व्यवस्थापन आणि आपत्ती पर्यवेक्षण यासाठी वापरला जाणार आहे.
- इस्रोचे प्रमुख: के. सिवान
पीएसएलव्ही
- PSLV: Polar Satellite Launch Vehicle (धृवीय उपग्रह प्रक्षेपक वाहन)
- हे इस्रोचे तिसऱ्या पिढीचे भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान आहे. इस्त्रोच्या तिरुअनंतपुरम येथील विक्रम साराभाई अवकाश केंद्रात ते विकसित करण्यात आले आहे.
- भारतातील विश्वासार्ह प्रक्षेपण यानांमध्ये पीएसएलव्हीची गणना केली जाते. भारताने आपल्या सुदूर संवेदी उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी पीएसएलव्ही विकसित केले.
- यामध्ये द्रव आणि घनरूप इंधनाचा वापर केला जातो. १००० ते १६०० किलो वजनापर्यंतचे उपग्रह वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे.
- पीएसएलव्हीनी प्रक्षेपित केलेले यान व उपग्रह: चांद्रयान १, मंगलयान, ॲस्ट्रोसॅट इत्यादी.
हैदराबादमध्ये देशातील पहिले डॉग पार्क
- तेलंगणातील हैदराबादमध्ये कुत्र्यांसाठी सर्व प्रकारच्या आधुनिक सुविधा उपलब्ध असलेले विशेष ‘डॉग पार्क’ बनवण्यात आले आहे.
- बृहन मुख्य हैदराबाद महानगरपालिकेने कोंडापुर येथे साधारण १.३ एकर परिसरात १.१ कोटी रुपये खर्च करून हे उद्यान विकसित केले आहे.
- यापूर्वी डंम्पिंग ग्राऊंड (यार्ड) असलेल्या या जागेवर आता हे सुंदर आणि सुशोभित असे हे डॉग पार्क बनवण्यात आले आहे.
- या डॉग पार्कची वैशिष्ट्ये:
- भारतातील हे पहिले आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रमाणित डॉग पार्क आहे. केनेल क्लब ऑफ इंडियाने हे पार्क प्रमाणित केले आहे.
- यामध्ये चालण्यासाठी वॉकिंग पार्क आणि प्रथमोपचार केंद्राचीही सुविधा देण्यात आली आहे. तसेच यामध्ये दोन लॉन, स्प्लॅश पूल आणि एम्फीथिएटरसुद्धा असणार आहे.
- याशिवाय या पार्कमध्ये कुत्र्यांसाठी ट्रेनिंग आणि व्यायामासाठी जागाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- नागरिक या पार्कमध्ये त्यांच्या पाळलेल्या कुत्र्यांना आणू शकतात. येथे पशु चिकित्सक, कुत्र्यांचे प्रशिक्षक, कुत्र्यांना मोफत लसीकरणची सुविधाही असणार आहे.
केनियाचा धावपटू इल्युड किपचोगचा विश्वविक्रम
- केनियाचा धावपटू इल्युड किपचोगने बर्लिन मॅरेथॉन २ तास १ मिनिट आणि ३९ सेकंद अशा विक्रमी वेळेत पूर्ण करत नवा विश्वविक्रम नोंदवला आहे.
- यापूर्वी २०१४मध्ये बर्लिनमध्येच डेनिस किमेटो याने २ तास २ मिनिटे आणि ५७ सेकंदात मॅरेथॉन पूर्ण करण्याचा विक्रम केला होता.
- हा विक्रम एका मिनिटाहून अधिक वेळेच्या फरकाने ३३ वर्षीय किपचोगने मोडित काढला आहे.
- यापूर्वी त्याने ५,००० मीटर धावण्याच्या शर्यतीत २००३मध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेतील सुवर्ण, तर २००७मध्ये रौप्यपदक मिळवले होते.
- याच क्रीडा प्रकारात त्याने २००४ व २००८च्या ऑलिम्पिक स्पर्धेत अनुक्रमे कांस्य व रौप्यपदक जिंकले आहे. त्याने आतापर्यंत ११ वेळा विविध आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन शर्यती जिंकल्या आहेत.
राजस्थानमध्ये लायन सफारीचे उद्घाटन
- राजस्थानमधील पहिल्या लायन (सिंह) सफारीचे नाहरगढ जैव उद्यानामध्ये उद्घाटन झाले. ऑक्टोबर २०१८पासून ते पर्यटकांसाठी खुले होईल.
- अरवली पर्वताच्या पायथ्याशी दिल्ली-जयपूर राष्ट्रीय महामार्गवर गुलाबी शहर जयपूरपासून १२ किमी अंतरावर हे उद्यान आहे.
- हा लायन (सिंह) सफारी प्रकल्प नाहरगढ जैव उद्यानात ३८ हेक्टर परिसरामध्ये पसरलेला आहे. या उद्यानाचे उद्घाटन जून २०१६मध्ये राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी केले होते.
- या पार्कमधील सिंहांना जुनागड (गुजरात) येथून आणले आहे. टप्याटप्याने या उद्यानामध्ये १० सिंह सोडण्यात येतील.
- या उद्यानाचा वापर सिंहाच्या प्रजननासाठी तसेच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी करण्यात येणार आहे.
- या उद्यानात पर्यटक बंद कुंपणातील सिंहाना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात बघू शकतील. सिंहाव्यतिरिक्त या उद्यानात कोल्हे, लांडगे आणि तरस हे प्राणीदेखील आहेत.
- केंद्र सरकारने नुकतीच ३२८ फिक्स्ड डोज कॉम्बिनेशन (एफडीसी) औषधांवर तात्काळ बंदी घातली होती.
- याविरोधात मोठ्या औषध कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेत या निर्णयाविरोधात आवाज उठविला होता.
- यावर आज सर्वोच्च न्यायालयाने सॅरिडॉनसह अन्य २ औषधांच्या विक्रीवरील बंदी तात्पुरती उठविली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा