देशात आयुष्मान भारत योजनेचा शुभारंभ
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे २३ सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा (आयुष्मान भारत) शुभारंभ केला.
- केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी २३ राज्यांनी संमती दर्शविली असून, त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे.
- ही जगातील सर्वात मोठी सरकारी आरोग्य योजना असून, या योजनेचा ५० कोटी पेक्षा जास्त लोकांना फायदा होणार आहे. एकाचवेळी ४४५ जिल्ह्यात ही योजना लागू झाली आहे.
- अमेरिका, कॅनडा आणि मॅक्सिको या तिन्ही देशांच्या एकत्रित लोकसंख्येपेक्षा जास्त लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- या योजनेमुळे गरीबांनाही श्रीमंतांप्रमाणे सर्व सुविधा व उपचार मिळतील तसेच जगातील अनेक संघटना या योजनेचा अभ्यास करतील, असे नरेंद्र मोदी यांनी योजनेचा शुभारंभ करताना सांगितले.
- मोदींनी त्यांच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात या योजनेची माहिती दिली होती. ही योजना लाँच करताना आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा आणि झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास उपस्थित होते.
- १४५५५ या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करुन आयुष्मान भारत योजनेसंबंधी माहिती घेता येऊ शकते.
आयुष्मान भारत योजनेबद्दल
- २५ सप्टेंबरपासून आयुष्यमान योजनेची अंमलबजावणी सुरु.
- या योजनेअंतर्गत देशातील १० कोटींपेक्षा जास्त कुटुंबांना म्हणजेच सुमारे ५० कोटींपेक्षा जास्त लोकांना मोफत आरोग्य विमा मिळणार आहे.
- लाभार्थ्यांना ५ लाखापर्यंत विमा संरक्षण मिळणार.
- कर्करोग, हृदयाचे आजार, किडनी, लिवरचे आजार, डायबिटीज यासह १३०० आजारांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे.
- या योजनेमुळे गरीबांनाही खासगी रुग्णालयात चांगले उपचार मिळतील.
- १३ हजार रुग्णालये या योजनेमध्ये सहभागी झाली आहेत.
- या योजनेंतर्गत १.५० लाख गावांमध्ये आरोग्य केंद्र सुरु होणार.
- जे राज्य या योजनेशी जोडली आहेत त्या राज्यातील लोक दुसऱ्या राज्यात गेले तरी त्यांना या योजनेचा लाभ मिळेल.
- या योजनेसाठीची आर्थिक तरतूद केंद्राकडून ६० टक्के तर ४० टक्के राज्यांकडून केली जाणार आहे.
- तुम्ही पात्र आहात कि, नाही याची माहिती घेण्यासाठी १४५५५ क्रमांकावर संपर्क साधून घेता येऊ शकते.
- आयुष्मान भारत योजनेसाठी शहरी भागातील ११ वर्गातील कुटुंबाचा समावेश केला आहे. यामध्ये कचरावेचक, भिकारी, घरकाम करणारे, फेरीवाले, बांधकाम मजूर आदी वर्गातील कुटुंबे समाविष्ट आहेत.
- ग्रामीण भागामध्ये घराची भौगोलिक स्थिती, कुटुंबातील कमावत्या व्यक्ती, अनुसूचित जाती व जमाती, भूमिहीन शेतकरी आदी वर्गातील कुटुंबांची निवड केली आहे.
- या योजनेसाठी निवड झालेल्या सर्वांना बारकोड असलेले कार्ड दिले जाणार आहे. या कार्डद्वारे सरकारी रुग्णालयांमध्ये वर्षभरात ५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळतील.
योजना ॲशुरन्स पद्धतीने राबविण्याचा पहिलाच प्रयोग
- या योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये विमा कंपन्या वगळून राज्य सरकारमार्फतच ॲशुरन्स पद्धतीने ही योजना संपूर्णपणे राबविली जाईल.
- सध्या दाव्यांची पडताळणी जनआरोग्य योजनेसाठी नियुक्त टीपीए (थर्ड पार्टी ॲडमिनिस्ट्रेशन) मार्फतच केली जाईल. दाव्याची रक्कम ही थेट सरकारकडून दिली जाईल.
- रुग्णालयांकडून करण्यात आलेल्या दाव्यांची तपासणी करण्यासाठी वेगळी स्वतंत्र टीम स्थापित करण्यात येईल.
- सध्या या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विमा कंपन्यांशी करार केलेले नसले तरी पुढील काळात विमा कंपन्यांशी करार केले जाणार आहेत.
आयुष्मान भारत आणि महाराष्ट्र
- या योजनेमध्ये महाराष्ट्रानेही सहभाग दर्शविला असून, राज्यात सद्य:स्थितीला सुरू असलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेसोबतच ही योजना राबविली जाईल.
- या योजनेसाठी राज्यातील सुमारे ८४ लाख कुटुंबांची २०११च्या जनगणनेमधील सामाजिक आणि आर्थिक उत्पन्नांच्या नोंदीवरून निवड केली आहे.
- जनआरोग्य योजनेंतर्गत सुमारे २.२ कोटी कुटुंबाना आरोग्य विम्याचे संरक्षण दिले जाते. यातीलच ८४ लाख कुटुंबांची आयुष्मान भारत योजनेसाठी नोंदणी केली आहे.
- त्यामुळे या योजनेंतर्गत नोंद न झालेल्या परंतु गरजू रुग्णांसाठी राज्यात जनआरोग्य योजना सुरूच राहणार आहे.
- राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात येणार असून ग्रामीण भागातून सुमारे ५८ लाख आणि शहरी भागातून सुमारे २४ लाख कुटुंबांची निवड केली आहे.
- ग्रामीण भागामध्ये जळगाव (३,६९,८०९), नाशिक (३,४१,७२७), यवतमाळ (३,३९,२२६) या जिल्ह्यांमधील सर्वाधिक कुटुंबाची निवड केली आहे.
- शहरी भागामध्ये सर्वाधिक कुटुंबांची निवड मुंबई उपनगर (३,३१,१२६), पुणे (२,७७,६३३) आणि ठाणे (२,६५,२९३) भागांमधून केली आहे.
- महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या ९७१ सेवांव्यतिरिक्त सुमारे ४०० आरोग्यसेवा या योजनेंतर्गत कुटुंबांना मोफत मिळणार आहेत.
- पहिल्या टप्प्यामध्ये राज्य सरकार आणि पालिकेच्या अखत्यारीतील वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांचा यामध्ये समावेश असून पुढील टप्प्यांमध्ये खासगी रुग्णालयेदेखील सहभागी होतील.
निधन: माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे
- माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री व कॉंग्रेसचे जेष्ठ नेते शांताराम पोटदुखे यांचे वयाच्या ८६व्या वर्षी प्रदिर्घ आजाराने २३ सप्टेंबर रोजी निधन झाले.
- १९८० ते १९९६ या कालावधीत ते खासदार होते. आरोग्याच्या तक्रारींमुळे मागील १५ वर्षांपासून ते सक्रिय राजकारणापासून दूर होते.
- माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ते अर्थ राज्यमंत्री होते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग तेव्हा केंद्रीय अर्थमंत्री होते.
- अखिल भारतीय साहित्य संमेलन स्वागताध्यक्ष पद त्यांनी यशस्वीरित्या सांभाळले होते. विदर्भ साहित्य संघाचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी भूमिका निभावली होती.
- सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ व सरदार पटेल मेमोरियल ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील शैक्षणिक विकासात भरीव योगदान दिले.
भारतात दारुमुळे दरवर्षी २.६ लाख जणांचा मृत्यू
- जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या सर्वेक्षणानुसार, भारतात दारुमुळे दरवर्षी २.६ लाख जणांचा मृत्यू होतो.
- या लोकांना यकृताच्या समस्या, कर्करोग यांसारख्या समस्या उद्भवतात. तसेच दारु पिऊन गाडी चालवल्यानेही बरेच अपघात होतात आणि त्यातच अनेकांचा मृत्यू होतो.
- भारतात वर्षाला होणाऱ्या एकूण अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी १ लाख लोकांचे मृत्यू हे अप्रत्यक्षरित्या दारुमुळे होतात.
- तर कर्करोगामुळे मृत्यू झालेल्यांपैकी ३० हजार जण दारु घेत असल्याचे समोर आले आहे.
- तर यकृताच्या आजारांमुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही जास्त असून त्यामुळे १.४ लाख लोकांचा मृत्यू होतो.
- त्यामुळे तरुणांना या व्यसनापासून दूर ठेवणे हे येत्या काळातील मोठे आव्हान असेल.
- तंबाखूच्या संदर्भात ज्याप्रमाणे धोरण असते त्याचप्रमाणे दारुच्या विषयातही राष्ट्रीय धोरण असावे अशी मागणी तज्ञांकडून करण्यात येत आहे.
- देशभरात दारु पिण्यासाठी वयाची एकच अट असावी असे त्यांचे म्हणणे आहे. सध्या महाराष्ट्रात हे वय २५ वर्षे असून गोव्यात ते १८ वर्षे आहे. मात्र हे सगळीकडे सारखेच असावे अशी मागणी होत आहे.
- जगात दिवसाला दारुमुळे ६ हजार जण मृत्युमुखी पडतात. यातील २८ टक्के अपघात हे वाहनांचे अपघात, स्वत:ला इजा करुन घेणे व हिंसा यामुळे होतात.
- तर २१ टक्के पचनाच्या तक्रारीमुळे होतात. १९ टक्के लोकांना हृदयाशी संबंधित तक्रारी उद्भवतात. तर बाकीच्यांना कर्करोग आणि इतर तक्रारी उद्भवतात.
आशियाई स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत भारताला रौप्यपदक
- दोहा येथे सुरु असलेल्या आशियाई सांघिक स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
- पाकिस्तानी संघाने अंतिम फेरीत भारतावर ३-२ ने मात करुन सुवर्णपदकावर नाव कोरले.
- पाकिस्तानच्या बाबर मैशने भारताचा अनुभवी खेळाडू पंकज अडवाणीला पराभवाचा धक्का देऊन पाकिस्तानला आघाडी दिली.
- यानंतर झालेल्या सामन्यात मलकित सिंहने मोहम्मद असिफचा पराभव करुन सामन्यात १-१ अशी बरोबरी केली.
- मात्र दुहेरीच्या सामन्यात मोक्याच्या क्षणी मलकित सिंहला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. त्यामुळे पाकिस्तानी जोडीने सामन्यात बाजी मारली.
बालमजुरीच्या क्षेत्रात भारताचे उल्लेखनीय कार्य: अमेरिका
- घातक स्वरूपाची बालमजुरी संपुष्टात आणण्यासाठी भारताने २०१७मध्ये केलेल्या प्रयत्नांची अमेरिकेने प्रशंसा केली आहे.
- बालमजुरीच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या १४ देशांमध्ये भारताचा समावेशही करण्यात आला आहे.
- अमेरिकेच्या श्रम विभागाच्या वतीने वार्षिक ‘बालमजुरी आणि बेठबिगारी अहवाल’ जारी करण्यात आला. त्यात ही माहिती देण्यात आली.
- यंदा अत्यंत कठोर निकष लावून जगातील १३२ देशांच्या बालमजुरी निवारणाच्या प्रयत्नांचा अभ्यास करण्यात आला आहे.
- ठराविक कायदेशीर आणि धोरणात्मक निकषांचा त्यात समावेश होता. या निकषांचे पालन केवळ १४ देशांनीच केल्याचे दिसून आले आहे.
- अहवालानुसार घातक व्यवसाय आणि प्रक्रियांमध्ये १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना काम करण्यावर बंदी घालण्यासाठी भारत सरकारने आपल्या बालमजुरी कायद्यात सुधारणा केली आहे.
- याशिवाय बालमजुरी रोखण्यासाठी तयार केलेल्या कायद्याची आणि राष्ट्रीय बालमजुरी कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने एक प्लॅटफॉर्मही तयार केला आहे.
- सरकारने चांगले प्रयत्न केले असले तरी भारतातील बालमजुरी अजून संपलेली नाही. घातक स्वरूपाच्या व्यवसायात अजूनही मुलांना कामाला जुंपले जाते. बालकांना बेठबिगार म्हणूनही राबवून घेतले जाते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा