चालू घडामोडी : २ सप्टेंबर

भारतीय पोस्ट पेमेंट बँकेचे लोकार्पण

  • टपाल खात्याच्या भारतीय पोस्ट पेमेंट बँकेचे (आयपीपीबी) सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ सप्टेंबर रोजी लोकार्पण केले.
  • १९ ऑगस्ट २०१५ रोजी रिझर्व बँकेकडून आयपीपीबीला पेमेंट बँकेचा परवाना प्राप्त झाला. पेमेंट बँकेचा परवाना प्राप्त झालेली आयपीपीबी एअरटेल व पेटीएमनंतरची तिसरी संस्था आहे.
  • आयपीपीबीची पहिल्या शाखा ३० जानेवारी २०१७ रोजी रायपूर आणि रांची येथे प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आल्या.
  • देशभरातील सुमारे १.५५ लाख टपाल कार्यालये, ३ लाख पोस्टमन व ग्रामीण डाक सेवक यांच्यामार्फत आयपीपीबी घरपोच बँकसेवा पोहोचविणार आहे.
  • पोस्ट पेमेंट बँकेच्या देशभरात ६५० शाखा, ३२५० केंद्रे व ११ हजार मायक्रो एटीएम असतील. ३१ डिसेंबरपर्यंत केंद्रांची संख्या १५ हजारांपर्यंत वाढवण्यात येईल.
  • या बँकेत प्रत्येक खातेधारकाकडून १ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी स्वीकारल्या जाणार आहेत. त्यापेक्षा अधिक रकमेच्या ठेवींचे रूपांतर आपोआप टपाल कार्यालय बचत खात्यामध्ये होणार आहे.
  • खातेधारकांना आपल्या आयपीपीबी खात्यामधून सुकन्या समृद्धी, आवर्ती योजना, स्पीड पोस्ट आदी योजनांचाही लाभ घेता येईल.
  • शाखेतील काउंटर सेवा, एटीएम, मोबाइल ॲप, एसएमएस आणि आयव्हीआर (इंटरॅक्टिव्ह व्हॉईस रिस्पॉन्स) याद्वारे ग्राहकांना आयपीपीबीच्या विविध सेवांचा लाभ घेता येईल.
  • या बँकेला केवळ मुदत ठेवी स्वीकारता येणार आहेत. अन्य बँकांप्रमाणे या बँकेला कर्जे आणि क्रेडिट कार्ड वितरित करता येणार नाही.
  • कर्ज व विमा यासाठी आयपीपीबी पंजाब नॅशनल बँक, बजाज अलिअन्स लाइफ इन्शुरन्स फॉर थर्ड पार्टीसारख्या आर्थिक सेवांशी जोडण्यात येणार आहे.
  • सुमारे ४० हजार पोस्टमन पेमेंट बँकेच्या ग्राहकांना घरपोच सेवा देतील. कोणीही सामान्य व्यक्ती वा व्यावसायिक वा संस्था बँकेत खाते उघडू शकतो.
  • पोस्ट पेमेंट बँकेला देण्यात येणारे अर्थसहाय्यसरकारने ८० टक्क्यांनी वाढवून १,४३५ कोटी केले आहे. त्यामुळे ही बँक एअरटेल आणि पेटीएम यांसारख्या पेमेंट बँकांना टक्कर देऊ शकेल.
  • टपाल बचत बँकांमधील (पीएसबी) सुमारे १७ कोटी खाती आयपीपीबीला संलग्न करण्याची परवानगीही देण्यात आली आहे. खाजगी पेमेंट बँकांच्या स्पर्धेत याचाही मोठा लाभ आयपीपीबीला होईल.
  • देशातील १.५५ लाख टपाल कार्यालयांपैकी १.३० लाख शाखा ग्रामीण भागांत आहेत. ही संख्या देशातील बँक जाळ्याच्या अडीचपट असल्याने ही बँक नागरी आणि ग्रामीण अर्थकारणाला चालना देणारी ठरणार आहे.
  • आयपीपीबीचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक : सुरेश सेठी
 आयपीपीबीची वैशिष्ट्ये: 
  • आयपीपीबी १०० टक्के सरकारी आणि टपाल खात्याच्या अखत्यारित स्थापन. बँकेवर नियंत्रण आरबीआयचे असणार.
  • एअरटेल आणि पेटीएमनंतर पेमेंट बँक म्हणून परवाना लाभलेली तिसरी बँक.
  • १००हून अधिक देयकांचा भरणा आणि आर्थिक व्यवहार पार पाडण्याची सोय.
  • बचत आणि चालू खात्यांची सेवा उपलब्ध.
  • निधी हस्तांतरण, लाभार्थी अनुदान हस्तांतरण, गॅस/दूरध्वनी/वीज आदी देयकांचा भरणा, सेवामूल्यांचा भरणा, एटीएम आणि डेबिट कार्ड, नेटबँकिंग आदी सेवा उपलब्ध.
  • खाते उघडण्यासाठी आधारचा वापर, तर वैधता, व्यवहार आणि पैसे भरण्यासाठी बायोमेट्रिक यंत्रणेचा वापर.
  • खात्यात किमान ठेवीची अट नाही.
  • कमाल ठेवीची मर्यादा १ लाख रुपयांपर्यंतच.
  • त्यापुढील ठेवी या थेट टपाल कार्यालय बचत खात्यांत जमा होणार.
  • बचत खात्यावर ४ टक्के व्याजदर.
  • मायक्रो एटीएम, मोबाइल बँकिंग ॲप, एसएमएस आदींद्वारे सेवा.
 पेमेंट बँक म्हणजे काय? 
  • पेमेंट बँक म्हणजे आकाराने छोट्या असणाऱ्या बँका. या बँका शक्यतो मोबाइल फोनच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत विविध सेवा पोहोचवतात.
  • त्यामुळे बँकेकडून देण्यात येणाऱ्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी ग्राहकाला प्रत्यक्ष बँकेच्या शाखेपर्यंत जाण्याची आवश्यकता भासत नाही.
  • कोणीही सामान्य व्यक्ती वा व्यावसायिक वा संस्था पेमेंट बँकेत खाते उघडू शकतो. पेमेंट बँक प्रत्येक खातेधारकाकडून १ लाख रुपयांपर्यंतची रक्कम स्वीकारू शकते.
  • सामान्य बँकांच्या तुलनेत पेमेंट बँकांची कार्यपद्धती थोडी वेगळी असते. या बँका कर्जे अथवा क्रेडीट कार्ड सेवा देऊ शकत नाही.
  • या बँका केवळ रक्कम जमा करून घेणे अथवा परकी चलन स्वीकारू शकतात. याशिवाय त्या इंटरनेट बँकिंग आणि अन्य विशिष्ट सेवाही प्रदान करतात.

आयडिया आणि व्होडाफोन विलीनीकरण पूर्ण

  • आयडिया सेल्युलर आणि व्होडाफोन इंडिया या कंपन्यांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
  • विलीनीकरणानंतर तयार झालेल्या नव्या कंपनीचे नाव व्होडाफोन आयडिया लिमिटेड असे असून, ही कंपनी भारतातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी बनली आहे.
  • नवीन कंपनीमध्ये व्होडाफोनचा हिस्सा ४५.१ टक्के आहे. तर आयडिया सेल्युलरची मालकी असलेल्या आदित्य बिर्ला समूहाकडे २६ टक्के हिस्सा असेल.
  • असे असले तरीही दोन्ही समूहांकडे समान अधिकार असून, येत्या काही वर्षात दोन्ही समूहांचा हिस्सा समान केला जाईल.
  • विलीनीकरण झाले असले तरी व्होडाफोन आणि आयडिया हे ब्रँड कायम राहणार आहेत. दोघांचा मिळून महसुलातील ३२.२ टक्के बाजारहिस्सा कंपनीकडे असेल.
  • नव्या कंपनीसाठी १२ सदस्यांचे संचालक मंडळ स्थापन केले आहे. त्यात ६ स्वतंत्र संचालक आहेत. कुमारमंगलम बिर्ला हे नव्या कंपनीचे चेअरमन आहेत.
  • याशिवाय व्होडाफोन इंडियाचे सीओओ बालेश शर्मा यांची सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • नव्या कंपनीच्या ग्राहकांची संख्या सुमारे ४०.८ कोटी असून, या कंपनीचा टेलिकॉम क्षेत्रातील एकूण महसुलात हिस्सा ३२.२ टक्के आहे.
  • याआधी पहिल्या क्रमांकावर असलेली भारती एअरटेल आता दुसऱ्या क्रमांकावर गेली आहे. या कंपनीचे ३४.४५ कोटी ग्राहक असून टेलिकॉम क्षेत्रातील महसुलात हिस्सा ३०.५ टक्के आहे.
  • २१.५२ कोटी ग्राहकांसह रिलायन्स जिओ तिसरी दूरसंचार कंपनी आहे. जिओचा टेलिकॉम क्षेत्रातील महसुलातील हिस्सा १८.७८ टक्के आहे.
  • रिलायन्स जिओचे दूरसंचार क्षेत्रात आगमन झाल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत दोन्ही कंपन्यांचे विलीनीकरण करण्यात आले आहे.
  • या कंपनीवर १,०९,२०० कोटी रुपयांचे कर्ज असून, या कंपनीला १४ हजार कोटी रुपयांचे वार्षिक उत्पन्न अपेक्षित आहे. विलीनीकरणामुळे कंपनीच्या महसुली खर्चात ८४०० कोटींची बचत होणार आहे.
  • विलीनीकरण शुल्कापोटी या कंपनीने एकत्रितरित्या दूरसंचार विभागास ७२६८.७८ कोटी रुपये दिले आहेत.

सरन्यायाधीशपदासाठी न्या. गोगोई यांच्या नावाची शिफारस

  • विद्यमान सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे केली असून ते ३ ऑक्टोबर रोजी सरन्यायाधीश म्हणून शपथ घेण्याची शक्यता आहे.
  • कायदा मंत्रालयाने दीपक मिश्रा यांना एक पत्र पाठवून नव्या सरन्यायाधीशांसाठी शिफारस करावी, अशी विनंती केली होती.
  • या पदावर सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्तींना संधी देण्याची परंपरा आहे. यात न्या. गोगोई यांचे नाव सर्वात आघाडीवर असून त्यांच्या नावाची शिफारस दीपक मिश्रा यांनीआपला उत्तराधिकारी म्हणून केली आहे.
  • मुळचे आसामचे असलेले न्या. गोगोई फेब्रुवारी २००१मध्ये गुवाहाटी हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश बनले.
  • त्यानंतर फेब्रुवारी २०११मध्ये ते पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश झाले. एप्रिल २०१२पासून ते सुप्रीम कोर्टात न्यायदानाचे काम करत आहेत.
  • सध्या त्यांच्यावर एनसीआर (नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन) अपडेट करण्याची जी प्रक्रिया सुरू आहे त्याचे मॉनिटरिंग करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
  • २०१७मध्ये सुप्रीम कोर्टातील वरिष्ठ न्यायधीशांनी जे बंड केले होते त्यात न्या. गोगोई यांचाही समावेश होता. या ५ न्यायाधीशांनी न्यायपालिकेच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

पाकिस्तानची आर्थिक मदत अमेरिकेने रोखली

  • वारंवार सूचना करुनही दहशतवादाविरोधात कारवाई न करणाऱ्या पाकिस्तानला देण्यात येणारी ३०० दशलक्ष डॉलर्सची (२१३० कोटी रुपयांहून अधिक) आर्थिक मदत अमेरिकेकडून रोखण्यात आली आहे.
  • अमेरिकेच्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय स्थरावर पाकिस्तानची प्रतिमा आणखी डागाळली आहे.
  • ‘कोअॅलिशन सपोर्ट फंड’ या नावाने दिला जाणारा हा निधी, पाकिस्तान मदतीच्या बदल्यात केवळ फसवणूक करतो, असा आरोप करत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रोखला आहे.
  • पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान आणि अमेरिकेमध्ये दहशतवादाच्या मुद्यावरुन देशांमध्ये संघर्ष सुरू आहे. अमेरिकेशी पाकिस्तानशी आधीच तणावपूर्ण असलेले सबंध या नव्या निर्णयानंतर ते आणखी बिघडण्याची शक्यता आहे.
  • अमेरिकेकडून आतापर्यंत पाकिस्तानला देण्यात येणारी एकूण ८० कोटी डॉलर्सची रक्कम रोखण्यात आली आहे.
  • पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान अमेरिकेच्या एकतर्फी मागण्या पाकिस्तान मान्य करणार नाही, तसेच पाकिस्तानच्या राष्ट्रीय हिताला बाधक ठरणारे सर्व करार रद्द केले जातील, असा इशारा दिला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा