चालू घडामोडी : ११ सप्टेंबर

अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्त्यांच्या मानधनात वाढ

  • देशभरातील अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्त्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, ही वाढ पुढील महिन्यापासून लागू होईल.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेनुसार ३००० रुपये मानधन घेणाऱ्या अंगणवाडी सेविकांना आता ४५०० रुपये मिळणार आहेत. तर २२०० रुपये मानधन घेणाऱ्या अंगणवाडी सेविकांना ३५०० रुपये मिळणार आहेत. 
  • अंगणवाडी मदतनीसांचे मानधनही १५०० रुपयांवरुन २२५० रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे.
  • याखेरीज सर्व आशा कार्यकर्त्यांना आणि मदतनीसांना पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेअंतर्गत मोफत विमा संरक्षण दिले जाणार आहे.
  • तसेच ‘कॉमन ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर’ (आयसीडीएस-सीएस) यासारखी तंत्रसाधने वापरणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना कामगिरीवर आधारित अतिरिक्त २५० रुपये ते ५०० रुपये प्रोत्साहन पंतप्रधानांनी जाहीर केले.
‘आशा’बद्दल
  • ASHA: Accredited Social Health Activist (मान्यता प्राप्त सामाजिक स्वास्थ्य कार्यकर्ता)
  • राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत ग्रामस्तरावर आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी ‘आशा’चा उपयोग होतो. ग्रामीण जनता व आरोग्य केंद्र यांच्यामध्ये ‘आशा’ या मध्यस्थीचे काम करतात.
  • गैर-आदिवासी भागात १५०० लोकसंख्येमागे एक ‘आशा’ तर आदिवासी भागामध्ये १००० लोकसंख्येमागे एक ‘आशा’ नियुक्त करण्यात आली आहे.
  • ग्रामीण भागातील लोकांना स्वच्छता, लसीकरण यांचे महत्व पटवून देण्यासाठी त्याचप्रमाणे ताप, हगवण, लहान-मोठया जखमा यावरील प्राथमिक स्वरुपाचे उपचार करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात येते.
  • तसेच DOTS, Folic Acid आणि Chloroquin सारख्या इतरही गोळयांचे वाटप करण्याची कामे ‘आशा’मार्फत केली जातात.
  • आरोग्यविषयक गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास त्याची माहिती संबंधित यंत्रणेला देण्याची जबाबदारीही ‘आशा’वर असते.
  • ग्रामीण भागातील ‘आशा’ या स्वयंसेवक पध्दतीने जरी काम करीत असल्या तरी त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना मानधन व प्रोत्साहनपर भत्ते देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
  • आरोग्यविषयक सामाजिक कार्यकर्ता म्हणुन ‘आशा’ ओळखल्या जातात. समाजात आरोग्य विषयक जागरुकता निर्माण करण्याचे काम ‘आशा’मार्फत केले जाते.
  • पात्रता: आदिवासी क्षेत्रात ‘आशा’ म्हणून नियुक्ती होण्यासाठी ती आठवी उत्तीर्ण स्थानिक विवाहित महिला असावी. तिचे वय २० ते ४५ वर्षे या दरम्यान असावे. बिगरआदिवासी भागात आशा म्हणून काम करणारी स्वयंसेविका दहावी उत्तीर्ण विवाहित महिला असावी.

जागतिक प्रमाणन परिषदेचे नवी दिल्ली येथे उद्घाटन

  • केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ७ सप्टेंबर रोजी चौथ्या जागतिक प्रमाणन परिषदेचे (WOSA-2018) नवी दिल्ली येथे उद्घाटन केले.
  • या परिषदेचा मुख्य विषय ‘निष्पत्ती आधारित प्रमाणीकरणातील आव्हाने आणि संधी’ हा होता. (Challenges and Opportunities in Outcome Based Accreditation)
  • राष्ट्रीय प्रमाणन मंडळाच्याद्वारे (NBA: National Board of Accreditation) या तीन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
  • जगातील शिक्षणाशी संबंधित नवीन ट्रेंडबद्दल माहिती देणाऱ्या अभिनव कल्पनांची या परिषदेत चर्चा झाली.
  • तसेच या परिषदेमुळे शैक्षणिक आणि उद्योग क्षेत्रातील भविष्यातील भागीदारीबाबत विचार-विनिमय करण्याची संधी प्राप्त झाली.
  • WOSA: World Summit on Accreditation
राष्ट्रीय प्रमाणन मंडळ
  • ही मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करणारी एक स्वायत्त संस्था आहे.
  • ही संस्था भारतातील तांत्रिक शिक्षण संस्थांद्वारे प्रदान केलेल्या कार्यक्रमांची गुणवत्ता सुनिश्चित करते.
  • ही संस्था आंतरराष्ट्रीय स्तरावरील निष्पत्ती (Outcome) आधारित प्रमाणनांचा वापर करते.
  • एनबीएला जून २०१४पासून वॉशिंग्टन कराराचा कायमस्वरुपी हस्ताक्षरकर्ता म्हणून दर्जा बहाल करण्यात आला.
  • राष्ट्रीय प्रमाणन मंडळाच्यावतीने दर २ वर्षांनी जागतिक प्रमाणन परिषदेचे आयोजन केले जाते. जगभरातील अनेक प्रमाणन संस्था या परिषदेत सहभागी होतात.
  • आतापर्यंत अशा ३ शिखर परिषदांचे आयोजन अनुक्रमे २०१२, २०१४ आणि २०१६मध्ये करण्यात आले आहे.

परिवर्तनीय कृत्रिम बुद्धीमत्ता आदर्श आंतरराष्ट्रीय केंद्र

  • नीती आयोग, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रीसर्च (टीआयएफआर) आणि इंटेल यांनी ७ सप्टेंबर रोजी परिवर्तनीय कृत्रिम बुद्धीमत्ता आदर्श आंतरराष्ट्रीय केंद्र (आयसीटीएआय) स्थापन करण्यासाठी करार केला.
  • आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आधारित संशोधन प्रकल्पांच्या विकासासाठी आणि अंमलबजावणीसाठी खासगी क्षेत्राच्या सहकार्याने आयसीटीएआय स्थापन करण्यात येणार आहे.
  • बंगळुरूतील हे केंद्र प्रामुख्याने आरोग्य, शेती आणि स्मार्ट परिवहन या तीन क्षेत्रात प्रगत संशोधन करेल.
  • हा उपक्रम नीती आयोगाच्या कृत्रिम बुद्धीमत्तेसाठीच्या राष्ट्रीय धोरणाचा एक भाग आहे.
आदर्श आयसीटीएआय
  • Model International Center for Transformative Artificial Intelligence (परिवर्तनीय कृत्रिम बुद्धीमत्ता आदर्श आंतरराष्ट्रीय केंद्र)
  • बंगलोरस्थित आयसीटीएआय आरोग्य, शेती आणि स्मार्ट परिवहन क्षेत्रात एआय आधारित उपायांवर संशोधन करेल. यामध्ये इंटेल आणि टीआयएफआरच्या तज्ञांचा वापर केला जाईल.
  • आदर्श आयसीटीएआय एआयची मूलभूत संरचना विकसित करेल. माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित धोरणे आणि मानके विकसित करणे, हा या केंद्राचा उद्देश आहे.
  • हे केंद्र अंमलबजावणी आधारित शोधांना प्रोत्साहन देण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा विकास करेल.
  • या केद्राद्वारे विकसित तंत्रज्ञान आणि अभ्यासाचा वापर नीती आयोग देशभरात आयसीटीएआय केंद्रांची स्थापना करण्यासाठी करणार आहे.

वडोदरा येथे देशातील पहिले राष्ट्रीय रेल्वे विद्यापीठ सुरु

  • गुजरातमधील वडोदरा येथे देशातील पहिले राष्ट्रीय रेल्वे विद्यापीठ ५ सप्टेंबर २०१८ रोजी राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरु करण्यात आले.
  • सध्या वडोदरा येथील भारतीय रेल्वे राष्ट्रीय अकादमीमधूनच या विद्यापीठाचे कामकाज सुरु आहे.
  • या विद्यापीठात सध्या केवळ २ पदवी अभ्यासक्रम (बीएससी ट्रांसपोर्टेशन टेक्नॉलॉजी आणि बीबीए ट्रांसपोर्टेशन मॅनेजमेंट) सुरु करण्यात आले आहेत.
राष्ट्रीय रेल्वे विद्यापीठाबद्दल
  • केंद्रीय मंत्रिमंडळाने मानवी संसाधन कौशल्य आणि क्षमता उभारणीसाठी २० डिसेंबर २०१७ रोजी वडोदरा येथे पहिले राष्ट्रीय रेल्वे विद्यापीठ स्थापन करण्यास मान्यता दिली होती.
  • वडोदरा येथील भारतीय रेल्वेच्या राष्ट्रीय अकादमीची (एनएआर) जमीन या विद्यापीठाच्या निर्मितीसाठी वापरण्यात आली आहे.
  • हे विद्यापीठ विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नोवो डिवीजन (मान्यताप्राप्त विद्यापीठ संस्था) कायदा, २०१६अंतर्गत मान्यताप्राप्त विद्यापीठ म्हणून स्थापन करण्यात आले आहे.
  • भारतीय रेल्वेला आधुनिकीकरणाच्या मार्गावर पुढे जाण्यास या विद्यापीठाची मदत होणार आहे. तसेच ते ‘मेक इन इंडिया’ला चालना देण्यासही मदत करेल.
  • हे विद्यापीठ सक्षम तंत्रज्ञान प्रदान करेल. तसेच ‘स्टार्टअप इंडिया’ व ‘स्कील इंडिया’ योजनांना पाठबळ देताना रोजगाराच्या संधी निर्माण करणार आहे.

बंगळूर विमानतळावर फेस रिकग्निशन टेक्नोलॉजी

  • बंगळूर येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ फेस रिकग्निशन टेक्नोलॉजी (चेहरा ओळखणारे तंत्रज्ञान) असलेले आशियातील पहिले विमानतळ ठरणार आहे.
  • यासाठी बंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळाने पोर्तुगीज सॉफ्टवेअर कंपनी ‘व्हिजन बॉक्स’सोबत करार केला आहे.
  • फेस रिकग्निशन टेक्नोलॉजीमुळे प्रवासी बोर्डिंग पासविना विमानप्रवास करू शकतील. त्यांना पासपोर्ट किंवा अन्य दस्तावेज पुन्हापुन्हा दाखवावे लागणार नाहीत.
  • ही योजना २०१९मध्ये सुरू होईल. जेट एअरवेज, एअर एशिया आणि स्पाईसजेट एअरलाइन्स यांच्याकडून हे तंत्रज्ञान वापरण्यात येईल.
  • या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे विमान बोर्डिंग प्रणाली अधिक सोपी आणि कागदरहित (पेपरलेस) होईल.
  • पेपरलेस कामकाज सुरु करणारा भारतीय रेल्वे हा पहिला सरकारी उपक्रम आहे. २०११पासून रेल्वेने प्रवाशांना एसएमएस किंवा ई-तिकीटद्वारे प्रवास करण्याची मुभा दिली आहे.
  • आशियाई देशांमध्ये बायोमेट्रिक बोर्डिंग तंत्रज्ञानाचा वापर करणारा चीन हा पहिला देश आहे.

अमिताभ चौधरी ॲक्सिस बँकेचे भावी सीईओ व एमडी

  • ॲक्सिस बँकेत ९ वर्षांपासून सीईओ व व्यवस्थापकीय संचालक असलेल्या शिखा शर्मा यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०१८ रोजी संपत असून, त्यांची जागा अमिताभ चौधरी घेणार आहेत.
  • चौधरी यांची नियुक्ती १ जानेवारी २०१९ पासून ३ वर्षांसाठी करण्यात आली आहे. सध्या ते एचडीएफसी स्टँडर्ड लाइफ इन्शुरन्स कंपनीचे सीईओ आहेत. 
  • शिखा शर्मा यांच्या कारकिर्दीत बँकेने प्रगती केली. तथापि, बँकेच्या कर्जवसुलीची पातळी त्यांच्याच काळात घटली व तो काळजीचा विषय ठरला.

हिमाचल प्रदेशमध्ये आढळला दुर्मिळ हिमचित्ता

  • हिमाचल प्रदेशमधील किन्नौर जिल्ह्यातील लिप्पा असरांग वन्यजीव अभयारण्यात अतिशय दुर्मिळ असा हिमचित्ता आढळून आला.
  • हिमचित्ता साधारणतः मध्य व दक्षिण आशिया आणि रशियाच्या अल्ताई पर्वतांमध्ये ३००० ते ४५०० मीटर उंचीवर आढळून येतो.
  • भारतामध्ये जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये तो आढळतो.
  • शिकार आणि नैसर्गिक अधिवास नष्ट झाल्यामुळे हिमचित्त्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
  • वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२च्या पहिल्या परिशिष्टामध्ये हिमचित्त्याचा समावेश नामशेष होत असलेल्या प्रजातींमध्ये करण्यात आला आहे.
  • सप्टेंबर २०१७मध्ये आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाने (आययुसीएन) हिमचित्त्याचा समावेश संकटग्रस्त प्रजातींमध्ये केला.
  • हिमचित्ता पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा राष्ट्रीय वारसा प्राणी आहे.
लिप्पा असरांग वन्यजीव अभयारण्य
  • हे हिमाचल प्रदेशातील कन्नौर जिल्ह्यात स्थित अभयारण्य आहे. याची स्थापना १९७४मध्ये करण्यात आली. ते ३,०८९ हेक्टर परिसरात पसरले आहे.
  • या अभयारण्यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे वनस्पती व याक, हिमालय कस्तूरी हरण, अस्वल असे विविध वन्यजीव आढळतात.

नवाज शरीफ यांच्या पत्नीचे निधन

  • पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पत्नी बेगम कुलसुम यांचे वयाच्या ६८व्या वर्षी ११ सप्टेंबर रोजी लंडनमध्ये निधन झाले.
  • दीर्घकाळापासून घशाच्या कर्करोगाने आजारी होत्या. लंडन येथील हार्ले स्ट्रीट क्लिनिकमध्ये जुलै २०१४पासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
  • कुलसुम नवाज यांचा एप्रिल १९७१मध्ये नवाज शरीफ यांच्याशी विवाह झाला होता. 
  • सध्या नवाज शरीफ हे पाकिस्तानच्या रावळपिंडी येथील तुरुंगात पनामा पेपर्स घोटाळ्याप्रकरणी शिक्षा भोगत आहेत. याप्रकरणी नवाज यांना १० वर्षांची तर त्यांची मुलगी मरियम यांना ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा