स्वदेशी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र ‘प्रहार’ची यशस्वी चाचणी
- भारताने जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या स्वदेशी बनावटीच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र ‘प्रहार’ची २० सप्टेंबर २०१८ रोजी यशस्वी चाचणी केली.
- संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) तयार केलेल्या या क्षेपणास्त्राची चाचणी ओडिशाच्या बालासोर येथील इंटिग्रेटेड टेस्ट रेंजवरून (आयटीआर) करण्यात आली.
- कमी पल्ल्याची मल्टी-बॅरल रॉकेट प्रणाली ‘पिनाका’ आणि मध्यम श्रेणीतील बॅलिस्टिक क्षेपणास्त्र ‘पृथ्वी’ यामधील पल्य्याची दरी हे क्षेपणास्त्र भरून काढेल.
- हे अत्याधुनिक क्षेपणास्त्रामध्ये घन इंधनाचा वापर केला आहे. कमी पल्ल्यावरील लक्ष्याचा वेध घेण्यासाठी या क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात आली आहे.
प्रहार क्षेपणास्त्राबद्दल
- प्रहार हे घन इंधनाचा वापर करणारे, जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे कमी पल्ल्याचे सामरिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे.
- या क्षेपणास्त्राची मारक क्षमता १५० किमी आहे. याची लांबी ७.३२ मीटर असून, याचा व्यास ४२० मिमी आहे.
- याचे वजन १.२८ टन असून, २०० किलोपर्यंत स्फोटके वाहून नेण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे.
- ही एक अत्याधुनिक शस्त्रप्रणाली आहे, ज्यामध्ये एकाचवेळी वेगवेगळ्या दिशेतील अनेक लक्ष्यांचा अत्यंत अचूक वेध घेण्याची क्षमता आहे.
- याद्वारे एकाच ठिकाणावरून ६ क्षेपणास्त्रे वेगवेगळ्या दिशेने एकाच वेळी सोडले जाऊ शकतात.
- हे क्षेपणास्त्र मोबाईल लाँचरद्वारे, कोणत्याही ऋतूमध्ये किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये डागले जाऊ शकते.
- हे क्षेपणास्त्र डागण्याची तयारी करण्यासाठी फक्त २ ते ३ मिनिटे लागतात.
पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्लीत कन्व्हेन्शन सेंटरची पायाभरणी
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील द्वारका येथे भारत इंटरनॅशनल कन्व्हेन्शन ॲण्ड एक्स्पो सेंटरची (आयआयसीसी) पायाभरणी केली.
- हे परिषद केंद्र दिल्लीमधील एक छोटे शहर असेल जिथे एकाच ठिकाणी प्रदर्शन, बैठका, बाजारपेठा, कार्यालये आणि मनोरंजन केंद्र असतील.
- पर्यावरणाच्या संरक्षणाप्रती भारताची सजगता, भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि आर्थिक प्रगती आयआयसीसी प्रतिबिंबित करेल.
- जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि व्यवसाय सुलभतेला महत्त्व देण्याच्या सरकारच्या दूरदृष्टीचा हा एक भाग आहे.
- आयआयसीसी भारताला बैठका, प्रोत्साहन, परिषदा या क्षेत्रांमध्ये नवी ओळख मिळवून देईल, असा दावा मोदींनी केला आहे.
- प्रस्तावित प्रदर्शन केंद्र, परिषद केंद्र आणि बहुउद्देशीय घडामोडींमुळे ५ लाखांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा दावाही सरकारने केला आहे.
स्वदेशी डॉपलर हवामान रडारचे अनावरण
- भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) चेअरमन डॉ. के. सिवान यांनी सतीश धवन स्पेस सेंटर, श्रीहरिकोटा येथे एस-बँड पोलरमिट्री डॉपलर हवामान रडारचे अनावरण केले.
- डॉपलर हवामान रडारचा वापर ५०० किलोमीटरच्या क्षेत्रातील हवामानाच्या निरीक्षणासाठी करण्यात येणार आहे.
- ही स्वदेशी रडार भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडद्वारे तयार करण्यात आली आहे. ‘मेक इन इंडिया’अंतर्गत तयार केलेली ही ७वी रडार आहे.
- या रडारमुळे हवेचा प्रवाह आणि संरचनेबद्दल माहिती मिळेल. तसेच पावसाच्या अंदाजाचा अचूकपणा वाढेल. या रडारच्या मदतीने चक्रीवादळांची माहितीदेखील मिळू शकेल.
- यामुळे विपरीत हवामानाविषयीची धोक्याची सूचना वेळेवर देणे शक्य होईल. ज्यामुळे वित्त आणि जीवितहानी कमी करण्यास मदत होईल.
निधन: ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ वि. वि. चिपळूणकर
- ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ विद्याधर विष्णू अर्थात वि. वि. चिपळूणकर यांचे १८ सप्टेंबर रोजी वयाच्या ९०व्या वर्षी निधन झाले.
- राज्यात गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण देण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबविले. 'चिपळूणकर समिती'च्या अहवालामुळे ते सर्वदूर परिचित झाले.
- त्यांचा जन्म १३ एप्रिल १९२९ रोजी विर्लेपार्ले, मुंबई येथे झाला. त्यांनी १९७६ ते १९८६ या कालावधीत राज्याचे शिक्षणसंचालक म्हणून काम पाहिले होते.
- निवृत्तीनंतर त्यांनी राष्ट्रीय शिक्षण व नियोजन प्रशासन संस्थेत सल्लागार म्हणूनही अनेक वर्ष काम केले.
- त्यांनी माध्यमिक शिक्षक, विद्यानिकेतनचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य अशा विविध पदांवर काम केले होते.
- यासोबतच ते बालभारतीचे माजी संचालकही होते. बालभारतीच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता.
- तत्कालीन शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शासकीय विद्यानिकेतनची संकल्पना साकारली. ‘उद्धरावा स्वंयआत्मा’ हे विद्यानिकेतनचे ब्रीदवाक्य होते.
- निवासी शाळांसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. गुणवत्तेचे शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे.
- पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना नापास करू नये, अशी त्यांनी केलेली सूचना राज्य सरकारने मान्य केली. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी शाळांमधील व्यवस्थापनातील बदलांसाठी प्रयत्न केले.
- गीता अभ्यासाचे फार मोठे अधिष्ठान त्यांना लाभले होते. ज्ञानेश्वरीचा त्यांचा गाढा अभ्यास होता. ज्ञानेश्वरीतील ओव्यांचे सुंदर, रसाळ विवेचन ते करीत असत.

ग्लोबल टीबी रिपोर्ट २०१८
- जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) ग्लोबल टीबी रिपोर्ट २०१८ प्रसिद्ध केला आहे. या अहवालात क्षयरोगाबाबत विस्तृत आणि नवीनतम निरीक्षणेनोंदविण्यात आली आहेत.
- जागतिक, राष्ट्रीय आणि प्रादेशिक क्षयरोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी कोणते पाऊल उचलले जात आहेत आणि त्यामध्ये काय प्रगती केली गेली आहे, याविषयी माहिती या अहवालात देण्यात आली आहे.
या अहवालातील ठळक मुद्दे:
- जगातील अनेक देश अजूनही क्षयरोगाला आळा घालण्यासाठी ज्या उपाययोजना करायला पाहिजेत, त्या करत नाहीत.
- गेल्यावर्षी जगभरात १ कोटी व्यक्तींना (५८ लाख पुरुष आणि ३२ लाख महिला) क्षयरोगाची लागण झाली. त्यापैकी २७ टक्के व्यक्ती भारतातील आहेत.
- जगातील एकूण क्षयरोग रुग्णांपैकी दोन-तृतीयांश रुग्ण ८ देशांत आहेत. त्यात भारत (२७ टक्के), चीन (९ टक्के), इंडोनेशिया (८ टक्के), फिलीपाईन्स (६ टक्के), पाकिस्तान (५ टक्के), नायजेरिया (४ टक्के), बांग्लादेश (४ टक्के) आणि दक्षिण आफ्रिकेत (३ टक्के) या देशांचा समावेश होतो.
- जगभरात क्षयरोगामुळे दररोज सुमारे ४,००० लोक दगावतात. जगात आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंचे दहावे सर्वात मोठे कारण क्षयरोग आहे.
- जागतिक आरोग्य संघटनेने २०३०पर्यंत जगभरातून क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
क्षयरोगाच्या प्रतिबंधाच्या अपयशाची कारणे:
- क्षयरोगाच्या रोगास प्रतिबंध करण्यासाठी, क्षयरोगाच्या रुग्णांना ओळखण्यासाठी आणि उपचार करण्यासाठी घेतलेली पावले अपुरी पडत आहेत.
- २०१७मध्ये टीबीची लागण झालेल्या १ कोटी व्यक्तींपैकी केवळ ६४ लाख लोकांचीच सरकारी आकडेवारीमध्ये अधिकृतपणे नोंदणी झाली.
- याचा अर्थ ३६ लाखांहून अधिक रुग्णांना योग्यवेळी ओळखता आले नाही. परिणामी त्यांच्यावर त्यांना योग्य उपचारही दिला गेला नाही.
- डब्ल्यूएचओच्या मते क्षयरोगाने ग्रस्त रुग्णांची ओळख आणि उपचार करण्याचे प्रमाण ६४ टक्क्यांवरून ९० टक्क्यांपर्यंत वाढले पाहिजे, तरच या रोगाचे समूळ उच्चाटन शक्य होईल.
चीन आणि नेपाळचा माउंट एव्हरेस्ट मैत्री युद्ध सराव
- चीन आणि नेपाळ दरम्यानचा ‘माउंट एव्हरेस्ट मैत्री युद्ध सराव’ (सागरमाथा मैत्री २०१८) हा संयुक्त लष्करी सराव चीनमधील सिंचुआ प्रांतात १७ ते २८ सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला.
- या युद्ध सरावाची ही दुसरी आवृत्ती आहे. दहशतवाद विरोधी कारवाया आणि आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण यावर भर असलेला हा युद्ध सराव १२ दिवस चालेल.
- माउंट एव्हरेस्ट मैत्री नेपाळ आणि चीन सैन्याचा दुसरा संयुक्त सैन्य अभ्यास आहे. याआधी २०१७मध्ये, नेपाळ आणि चीनच्या सैन्याने काठमांडूमध्ये संयुक्त सैन्य अभ्यास केला होता.
- हा संयुक्त सैन्य अभ्यास चीनबरोबर नेपाळच्या वाढत्या लष्करी मैत्रीचा संकेत आहे. याव्यतिरिक्त नेपाळ भारत आणि अमेरिकेबरोबरही दीर्घ काळापासून संयुक्त युद्ध सरावात सहभागी झाला आहे.
- नेपाळ गेल्या १३ वर्षांपासून भारताबरोबर ‘सूर्यकिरण’ या युद्ध सरावात सहभागी होत आहे. यात दोन्ही देशांचे सुमारे ३०० सैनिक सहभागी होतात.
- आपत्ती व्यवस्थापन, जंगल युध्द कौशल्य, दहशतवादी हल्ल्याचा सामना यासारख्या विषयावर हा सराव आयोजित करण्यात येतो.
- टीप: माउंट एव्हरेस्टला नेपाळी भाषेत सागरमाथा म्हणतात.
२१ सप्टेंबर: आंतरराष्ट्रीय शांतता दिवस
- जगभरात २१ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय शांतता दिवस म्हणून पाळण्यात येतो. जागतिक शांतता दिन सर्व देशांमध्ये आणि लोकांमध्ये स्वातंत्र्य, शांतता आणि आनंदाचे प्रतिक म्हणून ओळखला जातो.
- संपूर्ण पृथ्वीवर शांतता आणि अहिंसा स्थापित करण्यासाठी 'जागतिक शांतता दिन' साजरा केला जातो.
- शांतता व सुसंवाद यांच्या प्रसारासाठी आणि युद्ध व हिंसेपासून दूर राहण्यासाठी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.
- यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने कला, साहित्य, सिनेमा, संगीत आणि क्रीडा क्षेत्रातील नामवंत व्यक्तींची शांतीदूत म्हणून नेमणूक केली आहे.

आंतरराष्ट्रीय शांतता दिवस
- १९८१मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय शांतता दिवसाला सुरुवात केली. २००२मध्ये शांतता दिवसासाठी २१ सप्टेंबर या दिनाची निवड करण्यात आली.
- या दिवसाची सुरुवात संयुक्त राष्ट्र मुख्यालयात (न्यूयॉर्क) युनायटेड नेशन्स पीस बेल (शांती घंटा) वाजवून करण्यात येते.
- तसेच या दिवशी अनेक देशांमध्ये पांढरे कबूतर उडविले जातात. ही फार जुनी परंपरा आहे. पांढरे कबुतर शांततेचे प्रतिक मानले जाते.
भारत आणि जागतिक शांतता
- जागतिक शांततेसाठी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पाच मूलभूत सिद्धांत दिले होते, त्यांना पंचशील तत्वे म्हणतात. ही पाच तत्वे म्हणजे:
- एकमेकांच्या प्रादेशिक अखंडत्व आणि सार्वभौमत्वाचा आदर करणे.
- कोणत्याही कारणास्तव परराष्ट्रावर आक्रमण न करणे.
- एकमेंकाच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप न करणे.
- परस्परांना हितावह होईल असा समानतेचा व्यवहार करणे.
- शांततामय सहजीवनाचा आणि आर्थिक सहकार्याचा अंगीकार करणे.
निधन: व्हिएतनामचे राष्ट्रपती त्रान दाई क्वांग
- व्हिएतनामचे राष्ट्रपती त्रान दाई क्वांग यांचे २१ सप्टेंबर २०१८ रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते.
- त्रान दाई क्वांग मार्च २०१८मध्ये तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी बिहारमधील बोधगया येथील पवित्र बौद्ध तीर्थस्थळास भेट दिली होती.
त्रान दाई क्वांग यांच्याबद्दल
- त्यांचा जन्म व्हिएतनाममध्ये १२ ऑक्टोबर १९५६ रोजी झाला. त्यांनी कायद्यामध्ये पीएचडी संपादन केली होती.
- ते कम्युनिस्ट पार्टी ऑफ व्हिएतनामच्या पोलिटब्युरोचे सदस्य होते. सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस गुयेन फु ट्रोंग याच्यानंतर ते देशाचे दुसरे सर्वोच्च नेते होते.
- कम्युनिस्ट पक्षाचे वर्चस्व असेलेल्या राष्ट्रीय संसदेने एप्रिल २०१६मध्ये त्यांची राष्ट्रपतीपदी निवड केली. त्यापूर्वी ते सार्वजनिक सुरक्षा मंत्री होते.
- क्वांग यांनी सुरक्षा विभागाचे आणि सुरक्षा निदेशालयाचे महासंचालक म्हणून तसेच सार्वजनिक सुरक्षा समितीचे उपसभापती म्हणून कार्य केले होते.
- व्हिएतनाममध्ये एक पक्षीय शासन व्यवस्था आहे. यामध्ये देशाची सत्ता कोणत्याही एका नेत्याच्या हाती नसून, देशाचे शासन मुख्यत्वे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि कम्युनिस्ट पक्षाचे प्रमुख चालवितात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा