डॉ. बसंत कुमार मिश्रा यांना डॉ. बी. सी. रॉय पुरस्कार
मुंबईचे प्रसिध्द न्यूरोसर्जन डॉ. बसंत कुमार मिश्रा यांना प्रतिष्ठेचा डॉ. बी. सी. रॉय मेडिकल पर्सन ऑफ दी यिअर पुरस्कार जाहीर झाला आहे.
भारतातील मेडिकल क्षेत्रातील हा सर्वोच्च पुरस्कार असून, १ जुलै २०१९ रोजी (राष्ट्रीय डॉक्टर दिनी) राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
डॉ. बी. के. मिश्रा हे मुंबईतील पी. डी. हिंदुजा हॉस्पिटलमध्ये शल्यचिकित्सा, न्युरोसर्जरी आणि गॅमा नाईफ रेडिओसर्जरी विभागाचे प्रमुख आहेत.
दक्षिण आशियात गॅमा नाईफ रेडिओसर्जरी करणारे ते पहिले डॉक्टर असून, देशात ब्रेन ट्युमरवर जागृत क्रेनियोटॉमी करणारे ते पहिले सर्जन आहेत.
युनोमध्ये सहसरचिटणीसपदी सत्या त्रिपाठी
भारतीय अर्थतज्ज्ञ सत्या त्रिपाठी यांची संयुक्त राष्ट्रांचे सहसरचिटणीस व संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरणविषयक कार्यक्रमाचे न्यूयॉर्क कार्यालयाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ते आता इलॉट हॅरिस यांची जागा घेतील. त्रिपाठी यांच्याकडे सध्या संयुक्त राष्ट्रांचे विकासविषयक पायाभूत धोरण ठरविण्याबाबतची जबाबदारी होती.
त्रिपाठी यांनी कटकच्या रेवेन शॉ महाविद्यालयात वाणिज्य, गणित, अर्थशास्त्र व वित्त या विषयांत पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला.
१९७९ ते ८२ या कालावधीत ओदिशातील बेहरामपूर विद्यापीठातून त्यांनी पदवी घेतली. पुढे याच विद्यापीठातून ते द्विपदवीधर झाले.
कायदेविषयक अभ्यासात त्यांनी प्रावीण्य मिळवले. पीएचडीसाठी ‘आंतरराष्ट्रीय कायदे’ या विषयावर त्यांनी प्रतिष्ठेच्या अशा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अभ्यास केला.
विविध विषयांत पारंगत अशा त्यांच्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाने संयुक्त राष्ट्रांमध्ये यापूर्वी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. गेली ३५ वर्षे ते संयुक्त राष्ट्रांशी संबंधित आहेत.
विकासवादी अर्थतज्ज्ञ व वकील असलेल्या त्रिपाठींनी आशिया व आफ्रिका खंडांत टिकाऊ विकासाचे प्रारूप, मानवी हक्क, लोकशाहीवादी सरकार व कायदेविषयक बाबींवर महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
यापूर्वी त्रिपाठी यांनी विकसनशील देशांमधील वनांच्या घटत्या प्रमाणाला आळा घालणे तसेच कार्बन उत्सर्जन रोखणे या महत्त्वाच्या विषयांवर संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयाचे संचालक आणि कार्यकारी प्रमुख म्हणून काम पाहिले आहे
याखेरीज ॲच आणि नियास येथे त्सुनामीनंतरची स्थिती तसेच संघर्षांनंतरच्या उभारणीत संयुक्त राष्ट्रांचे समन्वयक म्हणून महत्त्वाचे योगदान दिले आहे.
१९९८पासून त्रिपाठी यांनी युरोप, आशिया व आफ्रिका खंडांत वातावरण बदलांमुळे होणाऱ्या परिणामांबाबत जनजागृती केली आहे.
पर्यावरणाचे संतुलन राखून विविध देशांना प्रगतीसाठी मदत करणे तसेच समन्वय राखण्याचे काम ते करीत आहेत.
रोहिंग्यांच्या वार्तांकनप्रकरणी रॉयटर्सच्या पत्रकारांना शिक्षा
रोहिंग्यांच्या वार्तांकनप्रकरणी रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या वा लोन (वय ३२) आणि क्यूव सो ओ (वय २८) या दोन पत्रकारांना प्रत्येकी ७ वर्षांची शिक्षा म्यानमारमधील न्यायालयाने सुनावली आहे.
रोहिंग्याप्रकरणी वार्तांकन करताना सरकारी गोपनियता कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप या पत्रकारांवर करण्यात आला आहे.
म्यानमारमध्ये रोहिंग्या शरणार्थींवर होत असलेल्या हिंसेचे वार्तांकन केल्याप्रकरणी रॉयटर्सचे हे दोन पत्रकार डिसेंबरपासून कारागृहात आहेत.
पत्रकारांना देण्यात आलेली ही शिक्षा माध्यम स्वातंत्र्यावर घाला असल्याची चर्चा होत असून, रॉयटर्सने पत्रकारांना देण्यात आलेल्या शिक्षेचा निषेध करत त्यांच्या सुटकेची मागणी केली आहे.
म्यानमारमधील संयुक्त राष्ट्र संघाच्या प्रतिनिधीनेही हा प्रकार निंदनीय असल्याचे सांगत माध्यमाच्या स्वातंत्र्यावर हा आघात असल्याचे मत नोंदवले आहे.
जगभरातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या समर्थक कार्यकर्त्यांनी यावर टीका केली आहे. या पत्रकारांच्या सुटकेसाठी मोर्चाही काढण्यात आला आहे.
संयुक्त राष्ट्र संघानेही आपल्या अहवालात म्यानमारमध्ये लष्कराद्वारे रोहिंग्यांवर अत्याचार होत असल्याचे नमूद केले होते.
तसेच दोन्ही पत्रकारांनीही निष्पक्ष वार्तांकन केल्याचे सांगत कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केले नसल्याचे म्हटले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा