चालू घडामोडी : १० सप्टेंबर

मिलेक्स-१८: बिमस्टेक सदस्य देशांचा लष्करी सराव

  • बिमस्टेक सदस्य देशांच्या लष्करी क्षेत्रीय प्रशिक्षण सराव ‘मिलेक्स-१८’चे उद्घाटन १० सप्टेंबर रोजी पुण्यातील औंध लष्करी तळावर झाले. १६ सप्टेंबरपर्यंत हा सराव चालणार आहे.
  • यात भारतासह, बांगलादेश, नेपाळ, म्यानमार, भूतान, थायलंड व श्रीलंका हे बिमस्टेकचे सदस्य देश सहभागी होणार आहेत. प्रत्येक सदस्य राष्ट्रांचे ३० सैनिक या सरावात सहभागी होतील.
  • या सरावासाठी सातही राष्ट्रांचे लष्करप्रमुख उपस्थित राहणार आहेत.यात सहभागी होणाऱ्या राष्ट्रांसमोरील समस्यांबाबत लष्करप्रमुखांमध्ये चर्चा होणार आहे.
  • दहशतवादविरोधी मोहिमांच्या आखणीबाबत प्रशिक्षण हा या सरावाचा हेतू आहे. एकमेकांच्या पद्धती, बांधणी, विशेष तंत्र यांचा अभ्यास या सरावाअंतर्गत केला जाणार आहे.
नेपाळचा सामील होण्यास नकार
  • बिम्सटेकचा लष्करी सराव हा बिम्सटेकच्या अजेंड्याचा भाग नसल्याचे कारण देत नेपाळने या संयुक्त लष्करी सरावात भाग घेण्यास नकार दिला आहे.
  • त्यामुळे नेपाळ या सरावासाठी फक्त तीन सदस्यीय निरीक्षक पथक पाठविणार आहे.
  • नेपाळ व्यतिरिक्त थायलंडही या सरावात सहभागी होणार नसून, या सरावासाठी ते फक्त निरीक्षक पथक पाठवतील.
बिमस्टेक
  • बिमस्टेक (BIMSTEC): बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्‍टरल टेक्‍निकल अँड इकॉनॉमिक को-ऑपरेशन
  • या संघटनेची स्थापना ६ जून १९९७ रोजी बॅंकॉक येथे झाली. या संस्थेचे मुख्यालय बांगलादेशची राजधानी ढाका येथे आहे.
  • स्थापनेच्या वेळी भारत, बांगलादेश, थायलंड आणि श्रीलंका हे देश संघटनेचे सदस्य होते. त्यानंतर म्यानमार, भूतान व नेपाळ या देशांना सदस्यत्व दिले.
  • बंगालच्या उपसागराच्या क्षेत्रातील दक्षिण आणि आग्नेय आशियाई देशांमध्ये तंत्रज्ञान व आर्थिक सहकार्याचे वातावरण वृद्धींगत होण्यासाठी प्रयत्न करणे हे या संघटनेचे उद्दिष्ट्य आहे.
  • सदस्य देशांना त्यांच्या नावाच्या क्रमानुसार (Alphabetical Order) या संघटनेचे अध्यक्षपद मिळते. सर्वप्रथम बांगलादेशकडे १९९७-९९ या काळासाठी अध्यक्षपद होते.
  • भूतानने नकार दिल्यानंतर २००६-०९ या कालावधीसाठी भारताकडे या परिषदेचे अध्यक्षपद होते.

नोव्हाक जोकोव्हीचला अमेरिकन ओपनचे जेतेपद

  • सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हीचने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत अर्जेन्टिनाच्या जुआन डेल पोत्रोला पराभूत करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
  • यंदाच्या हंगामातील जोकोव्हीचचे हे सलग दुसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद ठरले. त्याने यंदाचे विम्बल्डन विजेतेपदही मिळविले होते.
  • त्याने डेल पोत्रोला ६-३, ७- ६ (७-४), ६-३ असे पराभूत करताना तिसऱ्यांदा अमेरिकन ओपन स्पर्धा .(२०११, २०१५, २०१८) जिंकली.
  • या जेतेपदाबरोबर त्याने पीट सॅम्प्रास यांच्या १४ ग्रॅंडस्लॅम जेतेपदाच्या विक्रमाशी बरोबरी केली.
  • जोकोव्हिच सर्वाधिक ग्रॅंडस्लॅम जेतेपद जिंकणाऱ्या खेळाडूंत रॉजर फेडरर (२०) आणि राफेल नदाल (१७) यांच्यानंतर तिसऱ्या स्थानी आहे.
नोव्हाक जोकोव्हिचचे ग्रँडस्लॅम जेतेपद:
  • ऑस्ट्रेलियन ओपन: ६(२००८, २०११, २०१२, २०१३, २०१५, २०१६)
  • फ्रेंच ओपन: १(२०१६)
  • विंबल्डन:४ (२०११, २०१४, २०१५, २०१८)
  • यूएस ओपन: ३(२०११, २०१५, २०१८)
ग्रँडस्लॅम (टेनिस)
  • ग्रँडस्लॅममध्ये सर्वात प्रथम विम्बल्डन स्पर्धा १८७७साली सुरु झाली. त्यापाठोपाठ १८८१मध्ये अमेरिकन ओपन, १८९१मध्ये फ्रेंच ओपन आणि १९०५मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा सुरु झाली.
  • ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जानेवारीमध्ये, फ्रेंच ओपन मे-जूनमध्ये, विम्बल्डन जून-जुलैमध्ये आणि अमेरिकन ओपन ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये भरवली जाते.
  • ऑस्ट्रेलियन ओपन व अमेरिकन ओपन या स्पर्धा हार्ड कोर्टवर, फ्रेंच ओपन तांबड्या मातीच्या कोर्टवर तर विंबल्डन स्पर्धा हिरवळीच्या कोर्टवर खेळवली जाते.
  • अमेरिकन ओपन आणि ऑस्ट्रेलियन ओपन या स्पर्धांमध्ये सामने रात्री कृत्रिम प्रकाशातही सामने खेळले जातात. अशा सामन्यांची सुरुवात सर्वप्रथम अमेरिकन ओपनमध्ये झाली.

समुद्रांच्या स्वच्छतेसाठी ओशियन क्लीनअप मोहीम

  • जगभरातील समुद्र प्रदूषणमुक्त करण्यासाठी तसेच समुद्राची सफाई करण्यासाठी ‘ओशियन क्लीनअप’ ही जगातील सर्वात मोठी मोहीम कॅलिफोर्निया येथे ८ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली.
  • समुद्रातून प्लास्टिक कचरा आणि अन्य टाकाऊ पदार्थ काढून टाकणे आणि समुद्र प्रदूषित होण्यापासून वाचविणे हा या मोहिमेचा मुख्य हेतू आहे.
  • या मोहिमेची सुरुवात २४ वर्षीय बोयान स्लाट या युवकाने केली. त्यांच्या या मोहिमेला जगभरातील शास्त्रज्ञांनी पाठिंबा दर्शवला होता.
प्रोजेक्ट ओशियन क्लीनअप
  • या मोहिमेअंतर्गत सुरुवातीला कैलिफॉर्नियापासून हवाईपर्यंत सुमारे ६ लाख किमी परिसरातील सागरी क्षेत्राच्या साफसफाईचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
  • या परिसरात ८० हजार टन म्हणजे सुमारे ५०० जंबो जेट्स विमानांच्या वजनाइतका प्लास्टिक कचरा असल्याचा अंदाज आहे.
  • सागरी क्षेत्रातून दरवर्षी जवळपास ५० टन कचरा काढून टाकणे ही या मोहिमेचे ध्येय आहे.
  • समुद्रातून काढून टाकल्यानंतर या प्लास्टिक कचऱ्याची पुनर्निर्मिती करण्यासाठीही योजना आखण्यात आली आहे.

८ सप्टेंबर: आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन

  • जगभरात ८ सप्टेंबर २०१८ रोजी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा केला गेला. संपूर्ण जगामध्ये साक्षरता वाढवण्यासाठी हा दिन साजरा केला जातो.
  • साक्षरता आणि कौशल्य विकास (Literacy and skills development) हा या वर्षीच्या साक्षरता दिनाचा मुख्य विषय होता.
  • वैयक्तिक, सामाजिक आणि सामाजिक साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित करणे हे साक्षरता दिन साजरा करण्यामागचा उद्देश आहे.
  • जगातल्या सर्व लोकांना (मुले, प्रौढ, महिला आणि वृद्ध) शिक्षित करणे ही साक्षरता दिन साजरा करण्याचे मुख्य ध्येय आहे.
  • पहिला आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन ८ सप्टेंबर १९६६ रोजी साजरा करण्यात आला. या दिवशी युनेस्को पॅरिसमधील आपल्या मुख्यालयात आंतरराष्ट्रीय साक्षरता पुरस्कार प्रदान करते.
  • राष्ट्रीय साक्षरता अभियान प्राधिकरण भारतातील राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च एजन्सी आहे. या प्राधिकरणाद्वारे १९८८पासून देशात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा केला जातो.
भारतातील साक्षरता
  • २०११च्या जनगणनेनुसार, भारतातील २२ टक्के लोक अशिक्षित आहेत.
  • केरळ देशातील सर्वाधिक साक्षर राज्य असून, तेथील ९३.९१ टक्के लोक शिक्षित आहेत. त्याखालोखाल लक्षद्वीप (९२.२८ टक्के), मिझोराम (९१,५८ टक्के) यांचा क्रमांक लागतो.
  • बिहार (६३.८२ टक्के) आणि तेलंगणामध्ये (६६.५० टक्के) साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे.
  • धार्मिक आधारावरील आकडेवारीनुसार, देशातील सर्वाधिक ४२.७२ टक्के मुस्लिम अशिक्षित आहेत. हिंदू, शीख, बौद्ध व ख्रिश्चन धर्मातील अनुक्रमे ३६.४०, ३२.४९, २८.१७ व २५.६६ टक्के लोक अशिक्षित आहेत.
  • जैन धर्मातील ८६.७३ टक्के लोक शिक्षित असून, हाभारतातील सर्वात सुशिक्षित लोक असलेला धर्म आहे.
  • भारतातील ६१.६ टक्के पुरुष आणि ३८.४ टक्के महिलांचे पदवी किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण झालेले आहे.

हिमा दास आसामची स्पोर्ट्स अॅम्बेसेडर

  • भारताला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ट्रॅक प्रकारात ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या हिमा दासला आसाम राज्याची ‘स्पोर्ट्स अॅम्बेसेडर’ म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
  • जागतिक अजिंक्यपद (२० वर्षांखालील) स्पर्धेत आसामच्या हिमाने ५१.४६ सेकंदाची वेळ नोंदवून ४०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले.
  • अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आणि त्याशिवाय ट्रॅक प्रकारातील भारताचे हे पहिलेच सुवर्ण ठरले.
  • याशिवाय आशियाई स्पर्धा २०१८मध्येही तिने १ सुवर्ण (महिला ४ बाय ४०० रिलेमध्ये) आणि २ रौप्य (महिला ४०० मी. आणि मिश्र ४ बाय ४०० रिलेमध्ये) पदकांची कमाई केली.
  • आशियाई स्पर्धेमध्ये ४०० मीटर अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्यासाठी तिने ५१.०० सेकंदात ४०० मीटर अंतर पार करून राष्ट्रीय विक्रम केला होता.
  • आसामचे मुख्यमंत्री: सरबानंद सोनोवाल

अलिबाबाचे जॅक मा यांची निवृत्तीची घोषणा

  • अलिबाबा या चीनमधील प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनीचे सहसंस्थापक व कार्यकारी अध्यक्ष जॅक मा यांनी २०१९मध्ये निवृत्त होणार असल्याचे जाहीर केले आहे.
  • कंपनीचे सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॅनियल झांग हे त्यांचे उत्तराधिकारी असतील अशी घोषणा जॅक मा यांनी केली आहे.
  • झांग १० सप्टेंबर २०१९ रोजी कार्यकारी अध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारतील. तर जॅक मा २०२०पर्यंत अलिबाबाच्या संचालक मंडळावर सदस्य म्हणून राहतील.
  • जॅक मा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांची एकूण संपत्ती ३६.६ अब्ज डॉलर्स आहे. निवृत्तीनंतर ते अध्यापनाच्या क्षेत्राकडे वळणार आहेत.
जॅक मा यांच्याबद्दल
  • जन्म: १० सप्टेंबर १९६४ (चीन)
  • हांगझोऊ शहरात सामान्य कुटुंबात जन्मलेले जॅक मा इंग्रजी विषयाचे अध्यापक होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात टूरिस्ट गाइड म्हणून केली.
  • १९९० साली त्यांनी नोकरी सोडून अलिबाबा कंपनीची स्थापना केली. २०१३मध्ये ते या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनले.
  • अलिबाबा जगातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांपैकी एक आहे. आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये या कंपनीची कमाई ३९.९ अब्ज डॉलर्सहोती.
  • जॅक मा जपानी कॉर्पोरेशनच्या सॉफ्टबँक समूहाच्या संचालक मंडळाचेही सदस्य आहेत.
  • त्यांनी २०१४मध्ये जॅक मा फाऊंडेशनची स्थापना केली. या संस्थेचा उद्देश चीनच्या ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा दर्जा सुधारणे आहे.
  • फोर्ब्स नियतकालिकानुसार जॅक मा चीनमध्ये सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. त्यांची संपत्ती २.७ लाख कोटी रुपये आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा