चालू घडामोडी : ५ सप्टेंबर

ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तपदी रुची घनश्याम

  • ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तपदी रुची घनश्याम यांची नियुक्ती कारण्यात आली. हे महत्त्वाचे पद भूषवणाऱ्या त्या केवळ दुसऱ्या भारतीय महिला आहेत.
  • यापूर्वी विजयालक्ष्मी पंडित या ब्रिटनमधील भारताच्या पहिल्या महिला उच्चायुक्त होत्या. १९५४ ते १९६१ असा सर्वाधिक काळ पंडित या पदावर होत्या.
  • १९८२च्या आयएफएस (भारतीय परराष्ट्र सेवा) बॅचच्या अधिकारी असलेल्या रुची यांनी मानसशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे.
  • त्या सध्या परराष्ट्र खात्यात पश्चिम विभागाच्या सचिव आहेत. यापूर्वी दक्षिण आफ्रिका, घाना या देशांमध्ये त्यांनी उच्चायुक्त पदावर काम पाहिले आहे.
  • पश्चिम युरोप या महत्त्वाच्या विभागात त्यांनी सहसचिव आणि अतिरिक्त सचिव या पदांची जबाबदारी सांभाळली. ब्रसेल्स आणि काठमांडू येथील वकिलातींमध्येही त्यांची नियुक्ती झाली होती.
  • राष्ट्रकुल राष्ट्रप्रमुखांच्या नुकत्याच लंडनमध्ये झालेल्या शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गेलेल्या शिष्टमंडळात त्यांचा समावेश होता.
  • ब्रेग्झिटोत्तर ब्रिटनबरोबर राजकीय आणि व्यापारी संबंधांची फेरआखणी आणि फेरजुळणी करण्याचे महत्वाचे आव्हान रुची घनश्याम यांचासमोर आहे.
  • याशिवाय विजय मल्या, नीरव मोदी अशा आर्थिक घोटाळेबाजांच्या प्रत्यार्पणाची लढाईदेखील त्यांना राजनैतिक पातळीवरूनही लढावी लागणार आहे.

निधन: ‘चांद्रयान १’चे प्रमुख निरीक्षण संशोधक पॉल स्पुडिस

  • भारताच्या ‘चांद्रयान १’ मोहिमेचे प्रमुख निरीक्षण संशोधक आणि नासाचे वैज्ञानिक असलेले पॉल स्पुडिस यांचे २९ ऑगस्ट रोजी निधन झाले.
  • केवळ चंद्राचा अभ्यास हेच जीवनध्येय असलेल्या स्पुडिस यांनी ‘माणसासाठी चंद्र महत्त्वाचा का आहे’ हे शोधण्यातच आयुष्य खर्ची घातले.
  • स्पुडिस हे मूळचे भूगर्भशास्त्रज्ञ. ब्राऊन विद्यापीठातून ग्रहांच्या भूशास्त्राचा अभ्यास करून नंतर त्यांनी चांद्रभूमीचा अभ्यास सुरू केला.
  • अमेरिकेतील ह्युस्टन येथील ल्यूनर अँड प्लॅनेटरी इन्स्टिटय़ूट या संस्थेत त्यांनी उपसंचालक म्हणून काम केले. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या अप्लाइड फिजिक्स लॅबोरेटरी या प्रयोगशाळेतही त्यांनी काम केले.
  • १९९४मध्ये नासा व बॅलिस्टिक मिसाइल डिफेन्स ऑर्गनायझेशन यांच्या क्लेमंटाइन या संयुक्त मोहिमेचे ते एक सदस्य होते.
  • चांद्रयान १ या मोहिमेचे प्रमुख संशोधक या नात्याने, मिनी-सार या उपकरणाने घेतलेल्या प्रतिमांचा अर्थ लावण्याचे काम त्यांच्याकडे होते.
  • ल्यूनर रेकनसान्स ऑर्बिटर या नासाच्या मोहिमेतील मिनी आरएफ उपकरणाच्या माहितीचे विश्लेषण करण्याचे काम त्यांनीच केले होते.
  • माणसाला परत चंद्रावर पाठवण्यासाठी १९९०च्या सुरुवातीला सिंथेसिस गट स्थापन करण्यात आला होता, त्याचे ते सदस्य होते.
  • अमेरिकेच्या अवकाश संशोधन धोरणाच्या अंमलबजावणी आयोगातही त्यांनी काम केले होते. मून एक्स्प्रेस या कंपनीचे ते प्रमुख संशोधक होते.

ओमप्रकाशला विश्व अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक

  • भारतीय नेमबाज ओमप्रकाश मिठारवालने आयएसएसएफ विश्व अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेच्या ५० मीटर पिस्तूल प्रकारात प्रथमच सुवर्णपदक जिंकले.
  • ओमप्रकाशने गोल्डकोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या १० मीटर एअर पिस्तूल आणि ५० मीटर पिस्तूल प्रकारांमध्ये कांस्यपदके पटकावली होती.
  • याचप्रमाणे कनिष्ठ गटात आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता सौरभ चौधरी आणि अभिज्ञा पाटील यांनी १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक गटात कांस्यपदक पटकावले.
  • २०२०च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी विश्व अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धा ही पहिली पात्रता स्पर्धा आहे.
  • या स्पर्धेतून १५ नेमबाजी प्रकारांमधील अव्वल ६० खेळाडू २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणार आहेत.
  • या स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकारात भारताच्या अंजूम मुदगिल आणि अपूर्वी चंदेला या महिला खेळाडू अनुक्रमे रौप्यपदक आणि चौथे स्थान मिळवून टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्या आहेत.

  • देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिन देशभरात ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
  • ५ सप्टेंबर १९६२मध्ये सर्वप्रथम शिक्षक दिन साजरा करण्यात आला होता. त्यावेळी राधाकृष्णन हे देशाचे (दुसरे) राष्ट्रपती होते.

पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदी डॉ. आरिफ अलवी

  • पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे (पीटीआय) डॉ. आरिफ अलवी यांची पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
  • पीटीआयच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेले डॉ. अलवी हे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे जवळचे सहकारी आहेत.
  • २०१३मध्ये ते कराचीमधून पहिल्यांदा निवडून आले होते. २०१८मध्ये पुन्हा त्यांना विजय मिळाला.
  • डॉ. अलवी पाकिस्तानचे १३वे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. याशिवाय ज्यांचे पूर्वज भारतीय होते असे पाकिस्तानचे ते तिसरे राष्ट्राध्यक्ष आहेत.
  • याआधीचे राष्ट्राध्यक्ष ममनून हुसैन तसेच माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचे कुटुंबही भारतातून पाकिस्तानात स्थलांतरित झालेले होते.
  • डॉ. अलवी टंचा जन्म १९४७मध्ये कराची येथे झाला. त्यांचे वडील डॉ. हबीब उल रेहमान इलाही अलवी हे फाळणीपूर्वी जवाहरलाल नेहरू यांचे डेंटिस्ट होते.
  • डॉ. आरिफ अलवी हेही डेंटिस्ट आहेत. त्यांची राजकीय कारकीर्द ५ दशकांपूर्वी सुरु झाली. ते जनरल अयूब खान यांच्या हुकुमशाही विरोधातील आंदोलनांमध्ये सहभागी झाले होते.
  • त्यांनी पाकिस्तान डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. तसेच ते १९८१मध्ये झालेल्या पहिल्या पाकिस्तान आंतरराष्ट्रीय डेंटल परिषदेचे अध्यक्षही होते.
  • २००६मध्ये एशिया पॅसिफिक डेंटल फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. तर २००७मध्ये एफडीआय वर्ल्ड डेंटल फेडरेशनचे सल्लागार म्हणून निवड झालेले ते पहिले पाकिस्तानी व्यक्ती ठरले.

रुद्र प्रताप सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

  • २००७च्या टी-२० विश्वचषक विजयात महत्वाची भूमिका बजावणारा खेळाडू रुद्र प्रताप सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
  • या डावखुऱ्या गोलंदाजाने १४ कसोटी, ५८ वन डे आणि १० टी-२० सामन्यांत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. त्याच्या नावे कसोटीमध्ये ४०, वन-डेमध्ये ६९ तर टी-२०मध्ये १६ बळी आहेत.
  • ४ सप्टेंबर २००५ रोजी झिम्बाब्वेविरुद्ध त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. सप्टेंबर २०११मध्ये तो अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला.

जपानला जेबी वादळाचा तडाखा

  • गेल्या २५ वर्षातील सर्वात मोठ्या जेबी वादळाचा तडाखा जपानला बसला आहे. जपानच्या किनारवर्ती प्रदेशाचे त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
  • या वादळामुळे पाऊस, वेगवान वारे आणि भूस्खलन झाल्यामुळे ११ लोकांचे प्राण गेले आहेत, तर ३०० लोक जखमी झाले आहेत.
  • या वादळाने जपानला तडाखा दिला तेव्हा त्याचा वेग प्रतीताशी २१६ किमी इतका होता. १९९३नंतर आलेले जपानमधील हे सर्वात विनाशकारी वादळ आहे.

अॅमेझॉनचे बाजारमुल्य १ हजार अब्ज डॉलर्स

  • ऑनलाईन सेवेद्वारे वस्तू पुरविणारी कंपनी अॅमेझॉनच्या आंतरराष्ट्रीय बाजारमुल्याने ५ सप्टेंबर रोजी १ हजार अब्ज डॉलर्सचा टप्पा पार केला.
  • अशी कामगिरी करणारी अॅमेझॉन ही अमेरिकेची दुसरी आणि जगातील तिसरी कंपनी बनली आहे.
  • अॅपल कंपनीने ऑगस्ट २०१८मध्ये १ हजार अब्ज डॉलर्सचा टप्पा पार केला होता. तर २००७मध्ये शांघायच्या शेअर बाजारात पेट्रोचाइना या कंपनीचे बाजारमुल्य १ हजार अब्जवर पोहोचले होते.
  • या पार्श्वभूमीवर अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस जगातील सर्वात श्रीमंत बनले आहेत. १६६ अब्जांच्या संपत्तीचे मालक असलेले जगात सर्वाधिक श्रीमत आहेत.

  • दिलेल्या मुदतीमध्ये निवडणूक न घेतल्याने जागतिक तिरंदाजी संघटनेने (वर्ल्ड आर्चेरी) भारतीय तिरंदाजी संघटनेविरुद्ध (एएआय) कठोर निर्णय घेताना त्यांच्यावर बंदीची कारवाई

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा