भारतासह २३ देशांमध्ये ४ आणि ५ सप्टेंबर 2018 रोजी IOWave18 हा त्सुनामी सराव हिंदी महासागरात घेण्यात आला.
युनेस्कोच्या आंतरसरकारी सागरी विज्ञान आयोगातर्फे या सरावाचे आयोजन करण्यात आले. किनारपट्टीवरील सुमारे १२ राज्यातील हजारो नागरिकांचे स्थलांतर करणे या या सरावाचा एक भाग होता.
या सरावात भारतातर्फे राष्ट्रीय सागरी माहिती सेवा, भूविज्ञान मंत्रालय तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गृहमंत्रालय, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद बल आणि किनारी भागातील राज्ये व केंद्रशासित प्रदेश सहभागी झाले.
दोन दिवस चाललेल्या या सरावादरम्यान जीटीएस, फॅक्स, लघुसंदेश आणि संकेतस्थळांच्या माध्यमातून १५ त्सुनामी वार्तापत्रे जारी करण्यात आली.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे ज्येष्ठ सल्लागार, निवृत्त मेजर जनरल व्ही. के. नाईक यांच्या देखरेखीखाली हा त्सुनामी सराव पार पडला.
दिल्लीमध्ये पहिल्या ग्लोबल मोबिलिटी समीटचे आयोजन
नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे आयोजित पहिल्या ‘मूव्ह: ग्लोबल मोबिलिटी समीट-२०१८’चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
नीती आयोगातर्फे ७ आणि ८ सप्टेंबर असे दोन दिवस या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
मोबिलिटी आणि संबंधित भागधारकांशी संबंधित विविध मुद्यांबाबत जनजागृती वाढविणे, हा या संमेलनामागचा मुख्य उद्देश आहे.
या संमेलनात आंतरशासकीय संघटना, शिक्षणतज्ञ, विचारवंत आणि मोबिलिटी क्षेत्रातील धुरीणांबरोबरच संबंधित क्षेत्रांमधले सुमारे २२०० दिग्गज सहभागी होणार आहेत.
या संमेलनाच्या माध्यमातून देशभरात प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या प्रवासाच्या पद्धतीत क्रांतिकारी बदल घडवून आणणे अपेक्षित आहे.
यावेळी मोदींनी मोबिलिटीवर आधारित 7Cचे (कॉमन, कनेक्टेड, कन्व्हिनिअंट, कंजेशन-फ्री, चार्ज्ड, क्लीन, कटिंग एज) सुत्र सांगितले.
सप्टेंबर २०१८: राष्ट्रीय पोषण महिना
पोषण अभियानांतर्गत केंद्र सरकारतर्फे सप्टेंबर २०१८ हा महिना ‘राष्ट्रीय पोषण महिना’ म्हणून साजरा केला जात आहे.
सक्षम आणि निरोगी देशाची उभारणी करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
२०२०पर्यंत हा उद्देश साध्य करण्यासाठी देशातील सर्व ३६ राज्ये व केंद्रशासित प्रदेश आणि ७१८ जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने विविध उपक्रम राबविले जात आहेत.
महिला आणि बालविकास मंत्री: मनेका संजय गांधी
भारत आणि श्रीलंका द्विपक्षीय नौदल सराव
भारत आणि श्रीलंका यांच्यात त्रिंकोमाली येथे ७ सप्टेंबर ते १३ सप्टेंबरदरम्यान SLINEX-18 हा द्विपक्षीय नौदल सराव आयोजित करण्यात आला आहे.
या सरावासाठी किर्च, सुमित्रा आणि कोरा दिव्ह या भारतीय नौदलाच्या नौका त्रिंकोमालीमध्ये दाखल झाल्या आहेत.
या सरावात सयुराला, समुद्रा आणि सुरनीमाला या श्रीलंकन नौदलाच्या नौकाही सहभागी होणार आहेत.
७ ते १० सप्टेंबर आणि ११ ते १३ सप्टेंबर अशा दोन टप्प्यांमध्ये हा सराव होणार आहे.
SLINEX (SriLanka India Naval Exercise) ही भारतीय नौदल आणि श्रीलंकन नौदलाच्या संयुक्त युद्धसरावाची मालिका आहे. २००५पासून या सरावाचे आयोजन करण्यात येत आहे.
भारत आणि फ्रान्सच्या मोबिलाईज युवर सिटी करारावर स्वाक्षऱ्या
भारत आणि फ्रान्सतर्फे ६ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत ‘मोबिलाईज युवर सिटी’ या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
मोबिलाईज युवर सिटी उपक्रमांतर्गत नागपूर, कोची आणि अहमदाबाद या शहरांची पथदर्शी प्रकल्पांसाठी निवड करण्यात आली आहे.
या शहरांमध्ये वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने स्थानिक पातळीवर परिवहनाशी संबंधित सुधारणा केल्या जाणार आहेत.
भारतासाठी देश स्तरावर शाश्वत परिवहन धोरणात सुधारणा करणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे.
गृहनिर्माण आणि शहर व्यवहार मंत्रालय तसेच एजन्सी फ्रान्स डेव्हलपमेंटतर्फे प्रकल्पाशी संबंधित कामे निश्चित केली जाणार असून त्यानुसार निवडलेल्या तिन्ही शहरांमध्ये अंमलबजावणी केली जाईल.
भारतीय हवाई दलाकडून IL-78 MKI tanker या इंधन असलेल्या विमानातून तेजस या लढाऊ विमानामध्ये हवेतल्या हवेत इंधन भरण्याचा यशस्वी प्रयोग.
उत्साही व कार्यक्षम देशांच्या यादीत भारत ११७वा
जागतिक आरोग्य संघटनेने १६८ देशांमध्ये पाहणी करून जगातील सर्वाधिक उत्साही व कार्यक्षम आणि आळशी देशांची यादी जाहीर केली आहे.
दर आठवड्याला शरीराला ७५ मिनिटांचा तीव्र किंवा १५० मिनिटांचा मध्यम स्वरूपाचा व्यायाम घडत असणारी व्यक्ती सक्रिय असते, हा या पाहणीचा मुख्य निकष होता.
त्यानुसार केलेल्या पाहणीत जगात प्रत्येक ४ व्यक्तींमागे १ व्यक्ती नियमित व्यायाम करीत नसल्याचे आढळून आले.
गरीब देशांमध्ये जास्त शारीरिक कष्ट घेण्याचे प्रमाण जास्त उत्पन्न असलेल्या देशांपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहे.
या निकषावर सर्वाधिक सक्रीय देशांमध्ये युगांडा या देशाने पहिले स्थान मिळवले. तर या यादीत कुवेत हा देश सगळ्यात आळशी ठरला.
भारत या यादीत ११७व्या स्थानी असून, भारताच्या तुलनेत अमेरिका (१४३), ब्रिटन (१२३), सिंगापूर (१२६), ऑस्ट्रेलिया (९७) या देशातील नागरिक अधिक आळशी असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानही याबाबतीत भारताच्या खूप मागे आहे.
सर्वाधिक आळशी देश: कुवेत, अमेरिकन सामोआ, सौदी अरेबिया, इराक, ब्राझिल, कोस्टारिका, सायप्रस, सुरीनाम, कोलंबिया, मार्शल द्वीप.
निधन: हॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते बर्ट रेनॉल्ड्स
हॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते बर्ट रेनॉल्ड्स यांचे ७ सप्टेंबर रोजी वयाच्या ८२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने फ्लोरिडा येथे निधन झाले.
१९६१मध्ये ‘अँजल बेबी’ या चित्रपटातून त्यांनी हॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. अवर मॅन फ्लिंट, व्हाइट लाइटनिंग, द मॅन हू लव्ह्ड कॅट डान्सिंग, लकी लेडी यांसारख्या चित्रपटामुळे ते प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले होते.
डॅन ऑगस्ट आणि गन स्मोक यासारख्या टीव्ही शोमधून त्यांनी विविध भूमिका साकारल्या होत्या.
१९९७मध्ये बुगी नाइट्स या चित्रपटासाठी ऑस्कर नामांकन मिळाले होते. तर इव्हिनिंग शेड्स या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना गोल्डन ग्लोब या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा