मानव विकास अहवाल २०१८

  • युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (यूएनडीपी)ने जाहीर केलेल्या मानवी विकास निर्देशांकाच्या (एचडीआय) २०१७च्या क्रमवारीमध्ये भारताला १३०वे स्थान मिळाले आहे.
  • यावर्षाच्या मानवी विकास अहवालाचा मुख्य विषय ‘Planning the Opportunities for a Youthful Population’ हा होता.
  • भारताने मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी एका स्थानाने प्रगती केल्यामुळे १८९ देशांमध्ये भारताला १३०वे स्थान प्राप्त झाले. २०१६मध्ये भारताचे एचडीआय मूल्य ०.६२४ होते तर क्रमांक १३१वा होता.
  • एचडीआय आणि भारत
  • भारताचे एचडीआय मूल्य २०१७साठी ०.६४० होते. त्यामुळे भारताची गणना मध्यम मानवी विकास गटात करण्यात आली आहे.
  • भारताचे एचडीआय मूल्य दक्षिण आशियातील एचडीआयच्या ०.६३८ या सरासरी मूल्यापेक्षा जास्त आहे.
  • १९९० ते २०१७दरम्यान भारताचे एचडीआय मूल्य ०.४२७वरून ०.६४०पर्यंत वाढले आहे. देशातील नागरिकांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी केलेल्या यशस्वी प्रयत्नांचे हे द्योतक आहे.
  • १९९०च्या तुलनेत भारताच्या दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये २६६.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारताचे क्रयशक्तीवर आधारित दरडोई उत्पन्न ४.५५ लाख रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
  • आयुर्मानाच्या बाबतीत भारतातील परिस्थिती सुधारली असून, १९९०च्या तुलनेत २०१७मध्ये भारतातील सरासरी आयुर्मानात ११ वर्षांची वाढ झाली आहे. 
  • भारतातील लोकांचे सध्याचे सरासरी आयुर्मान ६८.८ वर्षे आहे. २०१६मध्ये ते ६८.६ वर्षे होते तर १९९०मध्ये ते ५७.९ वर्षे होते.
  • शैक्षणिक विकासाच्या बाबतीतही भारताची परिस्थिती सुधारली आहे.

एचडीआय आणि इतर देश
  • एचडीआय क्रमवारीमध्ये नॉर्वे, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया व जर्मनी हे देश अनुक्रमे पहिल्या ४ स्थानी आहेत.
  • तर नायजर (१८९), मध्य आफ्रिका प्रजासत्ताक (१८८), दक्षिण सुदान (१८७), छाड (१८६) व बुरुंडी (१८५) हे देश या यादीत तळाला आहे.
  • या यादीमध्ये बांगलादेश ०.६०८ एचडीआयसह १३६व्या आणि पाकिस्तान ०.५६२ एचडीआयसह १५०व्या स्थानी आहे.
  • याशिवाय या यादीत ब्राझील ७९व्या, चीन ८६व्या, भूतान १३४व्या, म्यानमार १४८व्या, नेपाळ १४९व्या स्थानी आहेत.
  • या यादीतील १८९ देशांपैकी अनुक्रमे ५९, ५३, ३९, आणि ३८ देशांचा अतिउच्च, उच्च, मध्यम आणि निम्न मानवी विकास श्रेणीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
भारतासमोरील आव्हाने
  • शैक्षणिक विकास व दरडोई उत्पन्नात भारताने आघाडी घेतली असली तरी असमानता हे मुख्य आव्हान देशापुढे आहे.
  • राजकीय, आर्थिक व सामाजिक पातळीवर भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर लैंगिक असमानता असल्याचे निरीक्षण अहवालात नोंदविले आहे.
  • शैक्षणिक पातळीवर माध्यमिक शाळेची पायरी चढणाऱ्या महिलांचे प्रमाण केवळ ३९ टक्के आहे. पुरुषांच्या बाबतीत हे प्रमाण ३९ टक्के आहे.
  • श्रम क्षेत्रातही पुरुषांचेच वर्चस्व आहे. काम करणाऱ्या पुरुषांचे प्रमाण ७८.८ असून महिलांचे प्रमाण २७.२ आहे.
  • लैंगिक असमानता विकास निर्देशांकांमध्ये १६० देशांमध्ये भारत १२७व्या स्थानी आहे. याबाबतीत भारताची कामगिरी बांगालादेश व पाकिस्तानपेक्षा सरस आहे. 
  • विषमता निर्देशांकात भारताची २६.८ टक्क्यांनी घसरण झाली. जगात ही घसरण २० टक्के आहे. म्हणजे भारतात विषमतावाढीचे प्रमाण अधिक आहे.
मानव विकास निर्देशांक
  • इंग्रजी: Human Development Index (HDI)
  • मानव विकास निर्देशांक म्हणजे दीर्घ व निरोगी जीवन, ज्ञानार्जनाची संधी व जीवनमानाचा दर्जा या ३ मानव विकासाच्या मुलभूत आयामामधील प्रगतीच्या मूल्यांकनासाठी असलेले सारांश मोजमाप होय.
  • युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामने (UNDP) १९९०मध्ये पहिल्यांदा मानव विकास अहवाल जाहीर केला. यात विविध देशांचे मानव विकास निर्देशांक मोजण्यात आले होते.
  • प्रसिद्ध पाकिस्तानी अर्थशास्त्रज्ञ महबूब-उल-हक यांनी एचडीआयला सुरुवात केली. महबूब-उल-हक यांना मानव विकास निर्देशांकाचे जनक म्हणून संबोधले जाते. १९९०मध्ये भारतीय अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनी एचडीआयला समर्थन दिले.
  • २०१०पासून एचडीआय खालील ३ निकष व त्यांच्याशी संबंधित ४ निर्देशक यांच्यावरून काढला जातो.
  • आरोग्य: देशाचा आरोग्याचा स्तर मोजण्यासाठी जन्माच्या वेळेचे आयुर्मान ही निर्देशक वापरला जातो.
  • शिक्षण: देशाचा शैक्षणिक स्तर मोजण्यासाठी, २५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या प्रौढांची सरासरी शालेय वर्षे आणि १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांची अपेक्षित शालेय वर्षे हे दोन निर्देशक वापरले जातात. शिक्षणाचा निर्देशांक या दोन्ही निर्देशकांचा भूमितीय मध्य असतो.
  • जीवनमानाचा दर्जा: देशाच्या जीवनमानाचा दर्जा मोजण्यासाठी दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्न (Per capita GNI) हा निर्देशक वापरला जातो.
  • या ३ निकषांद्वारे देशाचा मानव विकास निर्देशांक ठरवला जातो. त्याचे मूल्य ० ते १ दरम्यान व्यक्त केले जाते. १च्या जवळ असलेले मूल्य मानव विकासाचा उच्च स्तर दर्शवितो.
असमानता-समायोजित मानव विकास निर्देशांक
  • इंग्रजी: In-equality adjusted Human Development Index (IHDI)
  • २०१०च्या मानव विकास अहवालात हा निर्देशांक लागू करण्यात आला. हा निर्देशांक मानव विकास निर्देशांकाप्रमाणेच काढला जातो.
  • एचडीआय काढतांना प्रत्येक निर्देशकाचे सरासरी मूल्य धरले जात असते. मात्र लोकसंखेमध्ये त्याबाबतीत मोठी असमानता असते. त्यामुळे IHDI काढतांना ही असमानता समयोजित (adjust) केली जाते.
  • देशात चारही निर्देशकांच्या बाबत पूर्ण समानता असेल तर एचडीआय आणि Iएचडीआय समान येतील. मात्र IHDIचे मूल्य एचडीआयपेक्षा जसजसे कमी होते तशी असमानता वाढत जाते.
लैंगिक असमानता निर्देशांक
  • इंग्रजी: Gender Inequality Index (GII)
  • हा निर्देशांक २०१०च्या अहवालात लागू करण्यात आला. त्याने १९९५पासून लागू करण्यात आलेल्या लिंग-आधारित विकास निर्देशांक (GDI) व लिंग सबलीकरण परिमाण (GEM) यांची जागा घेतली.
  • हा निर्देशांक खाली ३ निकष व ५ निर्देशांकांच्या आधारे काढला जातो.
  • जनन आरोग्य: हे मोजण्यासाठी माता मर्त्यता (Maternal mortality) आणि किशोरवयीन जन्यता (Adolescent fertility) हे निर्देशक वापरले जातात.
  • सबलीकरण (Empowerment): हे मोजण्यासाठी संसदीय प्रतिनिधित्व आणि शैक्षणिक स्तर हे निर्देशक वापरले जातात.
  • श्रम बाजार: त्याचे प्रमाण श्रम शक्तीतील सहभागावरून मोजले जाते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा