‘विलेज रॉकस्टार्स’ची भारताकडून ऑस्करसाठी निवड
- राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘विलेज रॉकस्टार्स’ या आसामी चित्रपटाची प्रतिष्ठेचा पुरस्कार ‘ऑस्कर २०१९’साठी भारताकडून निवड करण्यात आली आहे.
- ऑस्कर पुरस्कारांच्या सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपटांच्या विभागासाठी भारताकडून या चित्रपटाची निवड झाली.
- रिमा दास दिग्दर्शित या आसामी चित्रपटान ६५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार (सुवर्ण कमळ) पटकावला होता.
- या चित्रपटाचे दिग्दर्शन, लेखन, निर्मिती, एडिटिंग हे सर्व काही रिमा दास यांनीच केले आहे. या चित्रपटाचे बहुतांश शूटींग आसामच्या कलारदिया गावात १३० दिवसांत पूर्ण झाले.
- भनिता दास आणि बसंती दास यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. अनेक चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचे कौतुक झाले आहे.
- हा चित्रपट एका १० वर्षांच्या धुनु नामक मुलीची कथा आहे. जी अत्यंत गरिबीत जीवन जगताना स्वत:चा म्युझिक बँड बनवू इच्छिते.
- ऑस्करमध्ये जाणारा ‘विलेज रॉकस्टार्स’ हा आसामचा पहिलाच चित्रपट आहे. तर राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारी भनिता आसामची पहिली बालकलाकार आहे.
ल्युका मॉड्रीचला फिफा सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार
- क्रोएशियाला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत ऐतिहासिक भरारी मारून देणाऱ्या मिडफिल्डर ल्युका मॉड्रीचला २०१८चा फिफा सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार जाहीर झाला.
- २००८ ते २०१७ या कालावधीत ख्रिस्तीयानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांनी प्रत्येकी पाचवेळा हा पुरस्कार जिंकला होता. मात्र त्यांची ती मक्तेदारी अखेरीस संपुष्टात आली.
- या पुरस्कारासाठी निवडलेल्या अंतिम ३ खेळाडूंमध्ये मॉड्रीचव्यतिरिक्त पोर्तुगालचा रोनाल्डो आणि इजिप्तचा मोहम्मद सलाह यांचा समावेश होता.
- मॉड्रीचने फिफाच्या या पुरस्कारापूर्वी विश्वचषक स्पर्धेतील गोल्डन बॉल आणि सर्वोत्तम युरोपियन खेळाडूचा पुरस्कार जिंकला आहे. एकाच वर्षात हे तिन्ही पुरस्कार जिंकणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे.
दिदिएर देशॉ: सर्वोकृष्ट प्रशिक्षक
- फ्रान्स फुटबॉल संघाचे प्रशिक्षक दिदिएर देशॉ यांना फिफाचा २०१८चा सर्वोकृष्ट प्रशिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
- फिफा विश्वकप २०१८मध्ये अंतिम फेरीत फ्रान्सने क्रोएशियाचा ४-२ असा पराभव करून जगज्जेतेपदावर आपले नाव कोरले होते. फ्रान्सला विश्वविजेतेपद मिळवून देण्यात दिदिएर देशॉ यांचा मोलाचा वाटा होता.
- संघातील खेळाडू आणि प्रशिक्षक अशा दोन्ही भूमिकांमध्ये संघाला विश्वचषक जिंकवून देणारे देशॉ हे फुटबॉल जगतातील तिसरी व्यक्ती ठरले होते. १९९८साली झालेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत देशॉ हे फ्रान्स विश्वजेत्याच्या संघात होते.
- यापूर्वी ब्राझिलचे मारियो झगालो आणि जर्मनीचे फ्रांज बेकनबॉयर यांनीही अशी कामगिरी केली आहे.
कोमल लाहिरी: भारतासाठी व्हॉट्सअॅपच्या तक्रार निवारण अधिकारी
- व्हॉट्सअॅपवरील अफवा पसरवणारे आणि खोटे संदेश रोखण्यासाठी व्हॉट्सअॅपने भारतासाठी कोमल लाहिरी यांच्या रूपाने तक्रार निवारण अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे.
- त्यामुळे आता व्हॉट्सअॅपवर फिरणाऱ्या फेक मेसेजसंदर्भात युजर्सना कोमल लाहिरी यांच्याकडे तक्रार नोंदवता येणार आहे.
- तसेच युजर्सना व्हॉट्सअॅप वापरताना काही मदत लागली तर त्यांनी मोबाईल अॅपवरून, मेलद्वारे किंवा पत्र लिहून मदत मागता येणार आहे. कोमल अमेरिकतूनच भारतातील व्हॉट्सअॅप मेसेजवर नजर ठेवणार आहेत.
- मार्च २०१८पासून त्या व्हॉट्सअॅपमध्ये ग्लोबल ऑपरेशन अॅण्ड लोकलायजेशनच्या सीनिअर डायरेक्टर म्हणून काम करत आहेत. त्यांना अर्थ आणि सुरक्षेचा चांगला अनुभव आहे.
- व्हॉट्सअॅपच्या आधी त्यांनी फेसबुकसोबत काम केले आहे. ऑगस्ट २०१४मध्ये त्यांनी फेसबुकसोबत काम सुरु केले होते.
- कोमल यांनी ग्लोबल ऑनलाइन पेमेंट कंपनी ‘पेपाल’मध्येही सीनिअर डायरेक्टर म्हणून काम केले आहे.
- कोमल यांनी पुणे विद्यापीठातून बीकॉम केले आहे. तर सेंट क्लारा युनिव्हर्सिटीतून एमबीए केले आहे.
- इन्स्टाग्राममध्ये त्या कम्युनिटी ऑपरेशनमध्ये सीनिअर डायरेक्टर राहिल्या आहेत. तिथे त्यांनी ४ वर्ष काम केले होते.
- पुढील वर्षी भारतात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटे मेसेज व्हायरल होऊ नयेत यासाठी सरकारने कडक पावले उचलली आहेत.
- भारतात गेल्या काही काळात अनेक अफवा पसरवणाऱ्या खोट्या मेसेजेसमुळे जमावाकडून मारहाणीच्या घटना घडल्या होत्या.
तीन भारतीय महिलांना ग्लोबल कम्युनिटी लिडर्स पुरस्कार
- उत्तम समाजकार्य करणाऱ्या ५ महिला कार्यकर्त्यांना (३ भारतीय) फेसबुकने ग्लोबल कम्युनिटी लिडर्स या पुरस्काराने सन्मानित करण्याचे ठरविले आहे.
- या पाचही सामाजिक कार्यकर्त्यांना प्रत्येकी १० लाख डॉलरचा पुरस्कार फेसबुकतर्फे देण्यात येईल.
- या पुरस्कार विजेत्यांची जगभरातील ६००० नावांतून निवड करण्यात आली आहे. पुरस्कारविजेत्या तीनही भारतीय महिलांना प्रत्येकी ५० हजार डॉलरची फेलोशिपही देण्यात येईल.
पुरस्कारविजेत्या भारतीय महिला:
- मातांना स्तनपानासाठी मदत करण्याकरिता ‘ब्रेस्टफिडिंग सपोर्ट फॉर इंडियन वूमन्स’ ही स्वयंसेवी संस्था स्थापन करणाऱ्या पुण्याच्या आधुनिका प्रकाश.
- महिलांना उद्योजिका बनण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या 'मॉमप्रिनर्स इंडिया' या मुंबईच्या संस्थेच्या संस्थापक चेतना मिस्रा.
- तसेच मातांना परस्परांच्या मदतीसाठी स्थापन केलेल्या 'बेबी डेस्टिनेशन'या दिल्लीतील संस्थेच्या संस्थापक तमन्ना धमिजा.
फेसबुक इंडियाचे नवे एमडी अजित मोहन
- सोशल मीडियामध्ये आघाडीवर असणाऱ्या फेसबुकने फेसबुक इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी व उपाध्यक्षपदी अजित मोहन यांची नियुक्ती केली आहे
- दैनंदिन कामकाजाव्यतिरिक्त फेसबुकच्या भारतविषयक धोरणाचे नियमन करणे ही अजित यांच्यावरील प्रमुख जबाबदारी असेल. अजित यांनी यापूर्वी हॉटस्टारचे सीईओपद सांभाळले आहे.
- ऑक्टोबर २०१७मध्ये उमंग बेदी फेसबुक इंडियाच्या एमडी पदावरून पायउतार झाले होते. त्यानंतर संदीप भूषण यांची हंगामी व्यवस्थापकीय संचालक म्हणून नेमणूक झाली होती.
- जगभरात सर्वाधिक (२.२३ अब्ज) यूजर असणाऱ्या फेसबुकपुढे डेटा लीक प्रकरणामुळे सध्या विश्वासार्हतेचे आव्हान निर्माण झाले आहे.
नीलकुरिंजीच्या संरक्षणासाठी तामिळनाडु सरकारची योजना
- तामिळनाडु सरकारने १२ वर्षातून एकदा बहरणाऱ्या नीलकुरिंजी नावाच्या वनस्पतीच्या संरक्षणाची योजना जाहीर केली आहे.
- सरकारला या वनस्पतीच्या फुलांची व्यापारिक विक्री होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर, सरकारने ही योजना जाहीर केली आहे.
- नीलकुरिंजी ही एक उष्णकटिबंधीय वनस्पती आहे. पश्चिम घाटाच्या शोला वनांमध्ये ही वनस्पती आढळते. पूर्व घाटात ही वनस्पती शेवरोई टेकड्यांवरथोड्या प्रमाणात आढळते.
- केरळमधील अन्नामलाई टेकड्या व अगाली टेकड्या आणि कर्नाटकच्या संदुरू टेकड्यांवर ही वनस्पती आढळते.
- या वनस्पतीची लांबी ३० ते ६० सेंमी असते. १३०० ते २४०० मीटर उंच ठिकाणी ही वनस्पती वाढते.
- नीलकुरिंजीची फुले जांभळ्या रंगाची असतात. १२ वर्षांनी एकदा या वनस्पतीला फुले येतात. या फुलांमुळे पश्चिम घाटातील नीलगिरी पर्वतांना निळा पर्वत असे म्हंटले जाते.
- ही एक दुर्मिळ वनस्पती आहे. पश्चिम घाटाशिवाय जगात इतर कोणत्याही भागात ती वाढत नाही. या वनस्पतीचा समावेश लुप्त होत असलेल्या प्रजातींमध्ये करण्यात आला आहे.
२३ सप्टेंबर: आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिवस
- सांकेतिक भाषेच्या संदर्भात जागरुकता पसरविण्यासाठी जगभरात २३ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.
- यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिवसाचा मुख्य विषय ‘With Sign Language, Everyone is Included!’ हा होता.
- याशिवाय २३ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर हा सप्ताह आंतरराष्ट्रीय कर्णबधीर सप्ताह म्हणून साजरा केला जाणार आहे.
- पार्श्वभूमी
- आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव जागतिक कर्णबधीर संघटनेने (वर्ल्ड फेडरेशन ऑफ दी डेफ) ठेवला होता.
- संयुक्त राष्ट्रांच्या जनरल असेंब्लीने डिसेंबर २०१७मध्ये आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिवसाची सुरुवात केली.
- २३ सप्टेंबर १९५१ रोजी जागतिक कर्णबधीर संघटनेची स्थापना केली गेली. सप्टेंबर १९५८मध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय कर्णबधीर सप्ताह साजरा केला गेला.
- जागतिक कर्णबधीर संघटनेच्या मते, जगभरात सुमारे ७२ दशलक्ष कर्णबधीर लोक आहेत, जे ऐकू शकत नाहीत.
- यापैकी ८० टक्के लोक विकसनशील देशांमध्ये राहतात. ते ३००पेक्षा अधिक सांकेतिक भाषा वापरतात.
दक्षिण भारत हिंदी प्रचार सभेच्या शताब्दी सोहळ्याचे उद्धाटन
- दक्षिण भारत हिंदी प्रचार सभेच्या शताब्दी सोहळ्याचे राष्ट्रपती श्री. राम नाथ कोविंद यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे २२ सप्टेंबर रोजी उद्धाटन करण्यात आले.
- दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा ही एक स्वायत्त संस्था आहे, जे केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या मदतीने कार्य करते.
- बिगर-हिंदी भाषिक दक्षिण भारतात हिंदी साक्षरतेच्या प्रमाणात सुधारणा करणे, हे दक्षिण भारत हिंदी प्रचार सभेचे उद्दीष्ट आहे.
- १९१८साली महात्मा गांधी यांनी दक्षिण भारत हिंदी प्रचार सभेची स्थापना केली होती. ते आजीवन या सभेचे अध्यक्ष होते. या सभेचे मुख्यालय चेन्नई, तमिळनाडु येथे स्थित आहे.
- केंद्र सरकारने १९६४मध्ये या सभेला महत्वाच्या राष्ट्रीय संस्थेचा दर्जा दिला.
- या सभेला आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडु या चार राज्यांसाठी चार विभागांमध्ये विभागण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा