अटल पेंशन योजनेच्या तरतुदींमध्ये बदल
- केंद्रीय मंत्रिमंडळाने अटल पेंशन योजनेची मुदत अनिश्चित काळासाठी वाढविण्याचा निर्णय घेतला.
- ऑगस्ट २०१८मध्ये या योजनेची मुदत संपली होती. परंतु लोकांनी योजनेला दिलेल्या उत्कृष्ट प्रतिसादामुळे ही मुदत वाढविण्यात आली.
- याबरोबरच अधिकाधिक लोकांना अटल पेंशन योजनेमध्ये सामील होण्यास प्रोत्साहन देण्यासाठी वय मर्यादेमध्येही बदल करण्यात आले आहेत.
- यापूर्वी या योजनेत अंशदान करण्यासाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा ६० वर्षे होती. त्यामध्ये वाढ करून आता ती ६५ वर्षे करण्यात आली आहे.
- तसेच ऑगस्ट २०१८नंतर या योजनेत सहभागी होणाऱ्या व्यक्तींना २ लाख रुपयांचा अपघात विमाही देण्यात येईल. यापूर्वी ही रक्कम १ लाख रुपये होती.
- या योजनेतील ओव्हरड्राफ्ट सुविधा ५ हजार रुपयांवरून वाढवून १० हजार रुपये करण्यात आली आहे.
रिकाको इकी: आशियाई स्पर्धेतील सर्वात मौल्यवान खेळाडू
- आशियाई क्रीडा स्पर्धेत जपानची युवा जलतरणपटू रिकाको इकी हिची स्पर्धेतील ‘सर्वात मौल्यवान खेळाडू’ म्हणून निवड करण्यात आली.
- १९९८च्या आशियाई क्रीडा स्पर्धांपासून सर्वात मौल्यवान खेळाडू (Most Valuable Player) हा पुरस्कार दिला जातो.
- हा पुरस्कार प्राप्त करणारी रिकाको पहिली महिला आणि जपानची चौथी खेळाडू आहे. तसेच आशियाई स्पर्धांमध्ये ६ सुवर्णपदक जिंकणारी ती पहिलीच महिला आहे.
- पुरस्कारस्वरूप तिला चषक व ५०,००० डॉलर्सचा (३५ लाख रुपये) धनादेश प्रदान करण्यात आला.
- रिकाकोने या स्पर्धेत ६ सुवर्ण आणि २ रौप्य अशा एकूण ८ पदकांची कमाई करत कोरियन नेमबाज सो जिन मैनच्या विक्रमाशी बरोबरी केली. जिनने १९८२च्या दिल्ली आशियाई क्रीडा स्पर्धेत ८ पदके जिंकली होती.
- तिने ५० मी. बटरफ्लाय, १०० मी. फ्लाय, ५० मी. फ्रीस्टाइल, 100 मी. फ्रीस्टाइल, ४ बाय १०० मी. फ्रीस्टाइल तसेच ४ बाय १०० मी. मेडले प्रकारात सुवर्ण पदक जिंकले.
- याशिवाय तिने ४ बाय २०० फ्रीस्टाइल तसेच मिश्र मेडले रिलेमध्ये रौप्यपदकावर नाव कोरले.
- जपानने या स्पर्धेत एकूण २०५ पदके जिंकून पदक तालिकेत दुसरा क्रमांक मिळविला.
निधन: गुजराती साहित्यिक, पत्रकार भगवतीकुमार शर्मा
- ५०हून अधिक वर्षे गुजराती साहित्य क्षेत्र आपल्या लेखनकर्तृत्वाने गाजविणारे चतुरस्र गुजराती साहित्यिक, पत्रकार भगवतीकुमार शर्मा यांचे ५ सप्टेंबर रोजी निधन झाले.
- भगवतीकुमार शर्मा यांचा जन्म ३१ मे १९३४ रोजी सुरतमध्ये झाला. परिस्थितीमुळे त्यांना शालेय शिक्षण पूर्ण करता आले नाही. नंतरच्या काळात १९६८मध्ये त्यांनी गुजराती व इंग्रजी भाषेत पदवी घेतली.
- महात्मा गांधी यांच्या निधनावेळी (३१ जानेवारी १९४८) त्यांनी त्यांची पहिली कविता लिहिली. त्यानंतर १९५२मध्ये त्यांची २ सुनीत काव्ये ‘गुजरातमित्र’ या सुरतमधील वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाली होती.
- कादंबरी, लघुकथा, कविता, लघुनिबंध, समीक्षा अशा अनेक साहित्यप्रकारांतून त्यांनी लेखन केले. त्यांनी सुमारे ८०हून अधिक पुस्तके लिहिली.
- त्यांना १९८४मध्ये रणजितराम सुवर्ण चंद्रक तर त्यांच्या ‘असूर्यलोक’ पुस्तकाला १९८८मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.
- ‘सुरत मुज घायल भूमी’ हे त्यांचे आत्मचरित्र आहे. त्यांनी ‘अमेरिका आवजे’ हे प्रवासवर्णनही लिहिले. त्यांच्या निवडक कथा ‘भगवतीकुमारनी श्रेष्ठ वार्ता’ नावाने प्रसिद्ध आहेत.
- गुजराती साहित्य परिषदेचे ते २००९ ते २०११ या काळात अध्यक्ष होते. गुजरात मित्रच्या संपादक विभागात ते बराच काळ काम करीत होते.
साहित्यसंपदा | |
---|---|
लघुकथासंग्रह | |
समयद्वीप | रातराणी |
हृदयदान | छिन्नभिन्न |
कई याद नथी | व्यर्थ कक्को |
अकथ्य | मांगल्य कथाओ |
छाल बाराखडी | अडबीद |
महेक माली गई तुमने फूल दिधानु याद नथी | दीप से दीप जले |
गझलसंग्रह | |
संभव | झलहल |
छांदो छे पनदादा जेनान | आधी अक्षरनु चोमासु |
उजागरो | गझलयान |
पुरस्कार | |
---|---|
कुमार चंद्रक | रणजितराम सुवर्ण चंद्रक |
साहित्य अकादमी पुरस्कार | हिरद्र दवे स्मृती पुरस्कार |
कलापी पुरस्कार | नचिकेत पुरस्कार |
अकथ्य | मांगल्य कथाओ |
गुजरात साहित्य अकादमी पुरस्कार | साहित्यरत्न पुरस्कार |
चीनी बंदरांचा वापर करण्याची नेपाळला परवानगी
- भारताच्या शेजारी राष्ट्रांना मदत करुन भारताची कोंडी करण्यासाठी नेपाळला चीनने त्यांच्या देशातील बंदरांचा वापर करु देण्याचा निर्णय घेतला आहे.
- व्यापारासाठी भारताच्या बंदरांवर अवलंबून असलेल्या नेपाळला यामुळे आता व्यापारासाठी भारताची आवश्यकता भासणार नाही.
- चीनने नेपाळला शेनजेन, लियानयुगांग, झाजियांग आणि तियानजिन ही चार बंदरे खुली केली आहेत.
- चीनच्या बंदरांवरुन व्यापार करणे हे नेपाळच्या व्यापाऱ्यांसाठी आव्हानात्मक आहे. नेपाळपासून चीनमधील सर्वात जवळचे बंदर हे २६०० किमीवर आहे.
जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत अंकुरचा सुवर्णवेध
- जागतिक नेमबाजी अजिंक्यपद (ISSF World Championship) स्पर्धेत भारताच्या अंकुर मित्तलने डबल ट्रॅप नेमबाजीत सुवर्णपदक जिंकले.
- याशिवाय अंकुरने डबल ट्रॅप सांघिक प्रकारात शार्दुल विहान आणि मोहम्मद असबसोबत कांस्यपदकाची कमाई केली.
शिकागोमध्ये विश्व हिंदू संमेलनाचे आयोजन
- स्वामी विवेकानंद यांनी शिकागोमध्ये विश्व हिंदू काँग्रेसच्या संमेलनात दिलेल्या भाषणाला १२५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शिकागोमध्येच विश्व हिंदू काँग्रेसच्या संमेलनाचे आयोजन ७ ते ९ सप्टेंबर दरम्यान करण्यात आले.
- या संमेलनामध्ये जगभरातील ८० देशांचे २५००पेक्षा अधिक प्रतिनिधी सहभाग घेणार आहेत.
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर चिन्मय मिशनचे प्रमुख स्वामी स्वरूपानंद, दलाई लामा हे प्रमुख वक्ते म्हणून संमेलनात सहभागी होणार आहेत.
- या कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी भारताचे उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू समारोपाचे भाषण करणार आहेत.
- या संमेलनात आर्थिक, शैक्षणिक, संघटन, राजकीय, महिला तसेच तरुणांशी निगडीत मुद्द्यावर चर्चा होणार आहे. यामध्ये जागतिक हिंदू समाजाची मुल्ये मांडली जाणार आहेत.
- ११ सप्टेंबर १८९३ रोजी शिकागो येथे विश्व हिंदू परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वामी विवेकानंद यांनी ऐतिहासिक भाषण केले होते.
- विश्व हिंदू काँग्रेस जगभरात काम करणाऱ्या हिंदू संघटनांचा हा एक समूह आहे. दर ४ वर्षांनी विश्व हिंदू काँग्रेसद्वारे विश्व हिंदू संमेलनाचे आयोजन केले जाते.
- या समूहाचा मुख्य हेतू हिंदू समाजाला एकजूट करणे, समाजाच्या हिताची काळजी घेणे आणि देशभरातील वंचित समुदायांची मदत करणे हा आहे.
सेऊल येथे तिसरी ASEM परिषद
- ग्लोबल एजिंग आणि वृद्ध व्यक्तींचे मानवाधिकार या विषयांवर आधरित तिसऱ्या ASEM (आशिया यूरोप बैठक) परिषदेचे आयोजन दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल येथे करण्यात आले.
- ही परिषद दक्षिण कोरिया आणि कोरियन मानवाधिकार आयोगाने संयुक्तपणे आयोजित केली होती.
- या ३ दिवसीय परिषदेत संयुक्त राष्ट्र, UNESCAP, UNECE, युरोपियन युनियन, आसियान, GANHRI अशा अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी सहभाग घेतला.
- या परिषदेत भारतीय प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री थवरचंद गेहलोत यांनी केले.
- या बैठकीत वृद्ध व्यक्तींचे अधिकार आणि त्यांच्याशी होणाऱ्या भेदभावांवर चर्चा करण्यात आली.
- या परिषदेतुन मिळालेल्या अनुभवाचा उपयोग ज्येष्ठ नागरिकांसाठीची धोरणे राबविण्यासाठी केला जाणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा