चालू घडामोडी : २९ सप्टेंबर

आशिया चषक स्पर्धेचे भारताला विजेतेपद

  • अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात भारताने बांगलादेशवर मात करत सातव्यांदा आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
  • नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारताने बांगलादेशला २२२ धावांमध्ये गुंडाळले.
  • मात्र धावसंख्येचा पाठलाग करताना भारताचा डाव मधल्या षटकांमध्ये काहीसा गडबडला.
  • मधल्या फळीतील फलंदाजांनी केलेल्या संयमी खेळीच्या जोरावर भारताने बांगलादेशचा ३ गडी राखून पराभव केला. अखेरच्या चेंडूवर केदार जाधवने एकेरी धाव काढून भारताला विजय मिळवून दिला.
  • या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या बांगलादेशच्या लिटन दासला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
  • तर मालिकेत ५ सामन्यात २ शतकांसह सुमारे ७०च्या सरासरीने ३४२ धावा करणाऱ्या शिखर धवनला मालिकावीराचा किताब देऊन गौरवण्यात आले.
  • गतविजेत्या भारताने सलग दुसऱ्यांदा स्पर्धेत बाजी मारताना सर्वाधिक सातव्यांदा आशिया पटकावला.
  • यापूर्वी भारताने १९८४, १९८८, १९९०-९१, १९९५, २०१० आणि २०१६मध्ये या स्पर्धेचे जेतेपद मिळविले होते.
  • बांग्लादेश सलग दुसऱ्यांदा तर एकूण तिसऱ्यांदा आशिया चषक स्पर्धेत अंतिम सामन्यात पोहचला. परंतु एकदाही त्यांना ही स्पर्धा जिंकता आलेली नाही.
यष्टीमागे ८०० फलंदाजांना बाद करणारा धोनी पहिला भारतीय
  • अंतिम सामन्यातील बांगलादेशचा लिटन दासला बाद करत धोनीने यष्टीमागे ८०० फलंदाजांना बाद करण्याचा विक्रम केला.
  • हा विक्रम रचणारा तो पहिला भारतीय ठरला. आतापर्यंत एकाही भारतीय यष्टीरक्षकाला हा आकडा गाठता आलेला नाही.
  • सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या यष्टीरक्षकांच्या यादीत धोनी आता मार्क बाऊचर (९९८ बळी) आणि अॅडम गिलख्रिस्ट (९०५ बळी) यांच्यानंतर तिसऱ्या स्थानावर आहे.
आशिया चषक जिंकणारा रोहित तिसरा मुंबईकर
  • आशिया चषक पटकावणारा रोहित शर्मा हा तिसरा मुंबईकर कर्णधार ठरला आहे.
  • भारताने पहिल्यांदा १९८४साली पहिल्या आशिया चषक स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. तेव्हा भारताचे कर्णधार मुंबईकर सुनील गावस्कर होते.
  • त्यांनतर दिलीप वेंगसरकर यांनी भारताला १९८८मध्ये दुसऱ्यांदा आशिया चषकाचे जेतेपद जिंकवून दिले होते. वेंगसरकर हेदेखील मुंबईचेच होते.

अॅगमार्कसाठी ऑनलाइन सॉफ्टवेअरची सुरुवात

  • केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने कृषी उत्पादनांच्या अॅगमार्क गुणवत्तेच्या प्रमाणीकरणासाठीच्या अर्जांच्या प्रक्रियेसाठी ऑनलाइन सॉफ्टवेअर सुरू केले आहे.
  • गुणवत्ता नियंत्रण कार्यांच्या अंमलबजावणीसाठी अॅगमार्क ऑनलाइन प्रणाली देशभरात लागू केली जात आहे. ही प्रणाली २४ तास आठवड्याचे सर्व दिवस उपलब्ध असेल.
  • यामुळे अॅगमार्क अर्जांची प्रक्रिया सुलभ, वेगवान आणि पारदर्शक बनेल. ही ऑनलाइन व्यवस्था सुलभ, विश्वासार्ह आणि किफायतशीर आहे.
  • केंद्रीय कृषीमंत्री: राधा मोहन सिंग
अॅगमार्क
  • अॅगमार्क म्हणजे शेती उत्पादनाच्या शुद्धता आणि दर्जासाठी सरकारच्या निरीक्षण आणि विपणन संचालनालयाच्या मानकांनुसार दिलेले प्रमाणपत्र होय.
  • कृषी उत्पादन (ग्रेडिंग व मार्किंग) कायदा, १९३७ (१९८६मध्ये सुधारणा) याद्वारे अॅगमार्क लागू करण्यात आले.
  • सध्या अॅगमार्क मानकामध्ये अन्नधान्य, डाळी, भाजीपाला, फळे आणि भाज्या आणि अर्धप्रक्रिया झालेले खाद्यपदार्थ अशा २०५ वस्तू समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
निरीक्षण व विपणन संचालनालय
  • हे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत कृषी, सहकार आणि शेतकरी विभागांतर्गत काम करते.
  • याची स्थापना १९३५मध्येकृषी विपणन धोरण आणि विकासासाठी करण्यातआली होती.
  • हे संचालनालय केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील दुवा म्हणून कार्य करते.

निधन: ज्येष्ठ हार्मोनियम वादक पं. तुळशीदास बोरकर

  • पद्मश्री पुरस्कार विजेते ज्येष्ठ हार्मोनियम वादक पं. तुळशीदास बोरकर यांचे वयाच्या ८४व्या वर्षी आजारामुळे निधन झाले.
  • गोव्यातील बोरी या गावामध्ये १८ नोव्हेंबर १९३४ साली तुळशीदास बोरकर यांचा जन्म झाला होता.
  • गोवा सोडून पुण्यात स्थायिक झाले होते. त्यांनी मधुकर पेडणेकर यांच्याकडून हार्मोनियम वादनाचे धडे गिरविले.
  • त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी उस्ताद आमीर खान, पं. भीमसेन जोशी, मल्लिकार्जुन मन्सूर, किशोरी आमोणकर, जितेंद्र अभिषेकी, छोटा गंधर्व आदी कलावंतांना साथ केली.
  • शास्त्रीय संगीतातील त्यांच्या योगदानाबद्दल २०१६साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
  • त्यांच्या निधनामुळे सोलो हार्मोनियम वादनातील एक आदर्श व्यक्तिमत्व हरपले आहे.

भूकंपानंतर इंडोनेशियाला त्सुनामीचा फटका

  • इंडोनेशियाच्या सुलावेसी बेटावर २८ सप्टेंबर रोजी ७.५ रिश्टर स्केलचा भुकंपाचा धक्का बसल्यानंतर काही वेळाने त्सुनामीचाही जोरदार फटका बसला.
  • नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत सुमारे ४०० जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
  • भूकंप प्रवण क्षेत्र असल्याने इंडोनेशियात अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवतात. यापूर्वी डिसेंबर २०१४मध्ये सुमात्रा बेटावर ९.३ रिश्टर स्केलाचा भूकंप झाला होता.
  • त्यानंतर हिंदी महासागरात आलेल्या त्सुनामीमुळे विविध देशांत २,२०,००० जणांचा मृत्यू झाला होता. त्यात इंडोनेशियाच्या १,६८,००० नागरिकांचा समावेश होता.

आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची पहिली महासभा भारतात

  • आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्यापहिल्या महासभेचे २ ऑक्टोबर रोजी भारतात आयोजन करण्यात येणार आहे.
  • यासोबतच इंडियन ओशन रिम असोसिएशनची दुसरी अक्षय ऊर्जा मंत्रिस्तरीय बैठक तसेच जागतिक अक्षय ऊर्जा गुंतवणूक बैठक २०१८ या कार्यक्रमांचेही आयोजन २ ते ५ ऑक्टोबर दरम्यान नवी दिल्लीत होणार आहेत.
  • त्याशिवाय सौर सहकार्याशी संबंधित व्यापार आणि तांत्रिक वस्तुंचे प्रदर्शनही या दरम्यान नोएडा येथे आयोजित केले जाईल.
  • केंद्रीय नवीकरण आणि अक्षय ऊर्जा विभागाने हे कार्यक्रम आयोजित केले आहेत.
आंतरराष्ट्रीय सौर आघाडी
  • इंग्रजी: International Solar Alliance (ISA)
  • भारताचा उपक्रम असलेल्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची सुरुवात पॅरिस येथे आयोजित युनायटेड नेशन्स क्लाइमेट चेंज कॉन्फरन्स (COP 21) दरम्यान नोव्हेंबर २०१५मध्ये करणायत आली.
  • भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले होते.
  • ११ मार्च २०१८ हा दिवस आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला गेला.
  • याचे मुख्यालय गुरूग्राम, हरियाणा येथे राष्ट्रीय सौर उर्जा संस्थेमध्ये (NISE) स्थित आहे. भारतात मुख्यालय असलेली ही पहिली आंतरराष्ट्रीय अंतर-सरकारी संस्था आहे.
आयएसएची उद्दिष्टे
  • कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या दरम्यानच्या सौर ऊर्जेच्या दृष्टीने समृद्ध असलेल्या १२१ देशांना या पर्यायी ऊर्जेचा शाश्वत विकासासाठी उपयोग करण्यासाठी प्रोत्साहन देणे.
  • एकत्रित प्रयत्नांद्वारे सौर उर्जेच्या उत्पादनासाठी लागणारी उपकरणे आणि तंत्रज्ञानाचा खर्च कमी करणे.
  • मोठ्या प्रमाणावर सौर ऊर्जा निर्मितीसाठी २०३०पर्यंत या क्षेत्रात १,००० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणे.

शाश्वत विकास आराखड्यावर स्वाक्षऱ्या

  • नीती आयोग आणि संयुक्त राष्ट्र (भारत) यांनी २०१८ ते २०२२ या काळासाठीच्या शाश्वत विकास आराखड्यावर नवी दिल्ली येथे स्वाक्षऱ्या केल्या.
  • शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भारताची कटिबद्धता आणि प्रयत्न या करारातून प्रतिबिंबित होत आहेत.
  • या आराखड्यानुसार शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र कार्य करतील.
  • नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत आणि संयुक्त राष्ट्रांचे भारतातील समन्वयक युरी आफान्सीव यांनी यावर स्वाक्षऱ्या केल्या.
  • सरकारी संस्था, सामाजिक प्रतिनिधी, शिक्षण तसेच खाजगी क्षेत्राशी चर्चा करुन हा आराखडा तयार करण्यात आला आहे.
  • दारिद्रय निर्मुलन, नागरीकरण, आरोग्य, पाणी आणि स्वच्छता, शिक्षण, अन्न सुरक्षा आणि पोषण आहार, हवामान बदल, स्वच्छ उर्जा, कौशल्य विकास, उद्योजकता, रोजगार निर्मिती, स्त्री-पुरुष समानता आणि युवा विकास या क्षेत्रावर यामध्ये भर देण्यात आला आहे.
  • यामध्ये कमी उत्पन्न असणाऱ्या बिहार, छत्तीसगड, झारखंड, मध्यप्रदेश, ओरिसा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या ७ राज्यांसह ईशान्येकडील राज्ये आणि नीती आयोगाने चिन्हांकित केलेल्या अतिमागास जिल्ह्यांवर भर देण्यात येईल.
  • या आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी ११,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असून, यापैकी ४७ टक्के निधी सरकारी व खाजगी क्षेत्रासह इतर स्रोतांकडून निर्माण करण्यात येईल.
  • २०१८-२०२२ हा काळ भारताच्या विकास गाथेसाठी महत्वाचा आहे. कारण २०२२मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्णहोत आहेत.

२७ सप्टेंबर: विश्व समुद्री दिन

  • सप्टेंबर महिन्याचा शेवटचा गुरुवार (यावर्षी २७ सप्टेंबर) जगभरात दरवर्षी विश्व समुद्री दिन (वर्ल्ड मरीन डे) म्हणून साजरा केला जातो.
  • याद्वारे शिपिंग सुरक्षिततेचे महत्व, सागरी सुरक्षा व सागरी पर्यावरणाची सुरक्षा तसेच समुद्री उद्योगांवर प्रकाश टाकण्यात येतो.
  • यावर्षीच्या विश्व समुद्री दिनाची थीम: IMO 70: Our Heritage – Better Shipping for a Better Future.
  • इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशनतर्फे (आयएमओ) हा दिवस १९७८पासून साजरा केला जातो.
इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन
  • इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन (आयएमओ) ही संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था आहे. ती सागरी वाहतुकीचे नियमन करण्यासाठी कार्य करते.
  • या संस्थेची स्थापना १९४८मध्ये जिनिव्हा (स्वित्झर्लंड) येथे आंतरराष्ट्रीय आंतर-सरकारी समुद्री सल्लागार संस्थेच्या स्वरूपात झाली होती.
  • १९८२मध्ये या संस्थचे नामकरण इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन असे करण्यात आले.
  • या संस्थेचे मुख्यालय लंडनयेथे स्थित आहे. या संस्थेचे १७१ सदस्य आणि ३ सहयोगी सदस्य आहेत. १९५९मध्ये भारत आयएमओचा सदस्य बनला.
  • सागरी वाहतुकीसाठी आणि त्याच्या संमतीसाठी एक व्यापक नियामक संरचना विकसित करणे हे आयएमओचे मुख्य कार्य आहे.
  • या संरचनेमध्ये सुरक्षा, कायदेशीर समस्या, पर्यावरणीय समस्या, तांत्रिक सहकार, समुद्री सुरक्षा आणि सागरी वाहतूक दक्षता इत्यादींचा समावेश होतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा