भारत आणि झेक रिपब्लिक या देशांनी संरक्षण, वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन, लेझर तंत्रज्ञान, शेती आणि राजनयिक व्हिसा या क्षेत्रात पाच करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.
झेक रिपब्लिकची राजधानी प्रागमध्ये भारताचेराष्ट्रपती रामनाथ कोविंद व चेक रिपब्लिकचे राष्ट्राध्यक्ष मालोस जॅमन यांच्यातील चर्चेनंतर करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या.
सध्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद सायप्रस, बल्गेरिया आणि झेक रिपब्लिक या ३ युरोपीय देशांच्या दौऱ्यावर आहेत.
गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेससाठी राष्ट्रीय मोहीम सुरु
केंद्रीय वाणिज्य आणि व्यापार मंत्रालयाने गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेससाठी (जीईएम) राष्ट्रीय मोहीम सुरु केली आहे.
जीईएमबद्दल जागरुकता निमार्ण करणे आणि मंत्रालये, राज्य सरकार आणि त्यांच्या एजन्सीद्वारे जीईएमच्या वापरला चालना देणे हा या मिशनचा मुख्य उद्देश आहे.
जीईएमद्वारे केंद्र सरकारचे विविध विभाग, राज्य सरकार आणि सरकारी कंपन्या यांना देनंदिन वापरातल्या वस्तू आणि सेवांचा खरेदी करू शकतात.
या मोहिमेचा हेतू वस्तू खरेदीला पारदर्शक, रोखरहित (कॅशलेस) आणि कागदीविरहित (पेपरलेस) करणे आहे. यामुळे माल खरेदीवर होणाऱ्या अतिरिक्त खर्चाची बचत होईल.
या मोहिमेत सर्व केंद्र सरकारचे विभाग, राज्य सरकार आणि सरकारी कंपन्याही सहभागी होतील. याअंतर्गत खरेदीदार आणि विक्रेते यांना जीईएमचा वापर करण्यास प्रोत्साहित केले जाईल.
जीईएमद्वारे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, स्थानिक उत्पादक, महिला उद्योजक आणि बचतगट आपली उत्पादने आणि सेवा सरकारी विभागांना पुरवू शकतात. यामुळे त्यांच्या व्यवसायातही वृद्धी होईल.
महाराष्ट्राला मनरेगासाठीचे चार पुरस्कार
केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्यावतीने देण्यात येणाऱ्या ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार पुरस्कार २०१८’ (मनरेगा) अंतर्गत महाराष्ट्राला ४ पुरस्कार जाहीर झाले आहेत.
रोजगार हमी योजनेच्या उत्कृष्ट अंमलबाजवणीसाठी महाराष्ट्राला राज्य, जिल्हा, ग्रामपंचायत आणि पोस्ट ऑफीस अशा ४ श्रेणींमध्ये पुरस्कार जाहीर झाले.
याशिवाय मुख्यमंत्र्यांची महत्वाकांक्षी योजना ‘जलयुक्त शिवार’ व ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेअंतर्ग झालेल्या रोजगार निर्मितीची खास दखल घेण्यात आली आहे.
११ सप्टेंबर २०१८ रोजी दिल्लीत केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल.
गडचिरोली जिल्हा हा मनरेगा अंतर्गत सर्वोत्कृष्ट कार्य करणारा जिल्हा ठरला आहे. येथे आर्थिक वर्ष २०१६-१७मध्ये ३९.१२ लाख मानवी दिनाची निर्मिती झाली.
तसेच मनरेगाच्या प्रभावी अंमलबजाणीसाठी गडचिरोली जिल्हयातीलच गडचिरोली ब्लॉकमधील नागरी ग्रामपंचायतीची सर्वोत्तम ग्रामपंचायत म्हणून निवड झाली आहे.
ठाणे जिल्हयातील खुटाघर येथील ग्राम डाकसेवक श्रीमती नुतक प्रकाश यांची मनरेगाच्या प्रभावी अंमलबजाणीसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी राज्यातील सर्वोत्तम ग्राम डाकसेवक म्हणून निवड झाली आहे.
त्यांनी या भागातील कामगारांना मनरेगा अंतर्गत विविध कामे व योजनांची माहिती दिली व या भागात मनरेगाच्या अंमलबजावणीसाठी कामगारही उपलब्ध करून दिले.
अरपींदर सिंगला कॉण्टीनेंटल कप स्पर्धेत कांस्यपदक
अरपींदर सिंगने झेक प्रजासत्ताकमध्ये सुरू असलेल्या आयएएएफ कॉण्टीनेंटल कप स्पर्धेत तिहेरी उडीत कांस्यपदक जिंकले. या प्रतिष्ठित स्पर्धेत पदक जिंकणारा तो भारताचा पहिलाच खेळाडू ठरला.
त्याने नुकत्याच झालेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. तत्पूर्वी त्याने २०१४च्या राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते.
नाओमी ओसाकाला अमेरिकन ओपन स्पर्धेचे विजेतेपद
जपानची युवा खेळाडू नाओमी ओसाकाने अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सवर मात करुन अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत नाओमीने सेरेनाचा ६-२, ६-४ असा पराभव केला.
नाओमीचे हे पहिलेच ग्रँडस्लॅम विजेतेपद ठरले. कोणत्याही ग्रँडस्लॅम एकेरी स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारी नाओमी पहिली जपानी खेळाडू ठरली आहे.
आशिया खंडातून ग्रँडस्लॅम स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारी ती दुसरी खेळाडू ठरली आहे. याआधी फक्त चीनच्या ली ना या खेळाडूने अशी कामगिरी केली आहे.
यापूर्वी मार्च २०१८मध्ये नाओमीने अमेरिकेमध्ये झालेल्या इंडियन वेल्स ओपन स्पर्धेचे जेतेपद मिळविले होते.
स्वित्झर्लंडमध्ये श्रीदेवी यांचा पुतळा उभारणार
भारतीयांसाठी स्वित्झर्लंड हे पर्यटनाचे लोकप्रिय ठिकाण बनविण्यात मोलाची कामगिरी बजावल्याबद्दल दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचा पुतळा स्वित्झर्लंडमध्ये उभारण्यात येणार आहे.
यापूर्वी स्वित्झर्लंडच्या पर्यटन विभागाने निर्माते यश चोप्रा यांचाही इटरलाकेन शहरात त्यांचा पुतळा उभारला आहे. तसेच २०११मध्ये त्यांना त्या शहराचे मानद राजदूत म्हणूनही बहुमान देण्यात आला.
आल्प्स पर्वतराजीमध्ये विविधतेने नटलेल्या निसर्गरम्य स्वित्झर्लंडमध्ये अनेक हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात आले आहे.
श्रीदेवीच्या ‘चांदनी’ या गाजलेल्या चित्रपटातील बहुतेक सर्व गाण्यांचे चित्रीकरण स्वित्झर्लंडमध्ये करण्यात आले होते.
१९६४मध्ये प्रदर्शित झालेला राजकपूर यांना ‘संगम’ हा स्वित्झर्लंडमध्ये चित्रीकरण झालेला बॉलीवूडचा पहिला चित्रपट ठरला होता.
असेच चित्रीकरण असलेल्या आदित्य चोप्रा यांच्या १९९५मधील ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ (डीडीएलजे) या चित्रपटाने लोकप्रियतेचा कळस गाठला होता.
त्यामुळे रूपेरी पडद्यावरील स्वित्झर्लंड प्रत्यक्ष पाहण्याची प्रबळ इच्छा भारतातील श्रीमंत व मध्यमवर्गीयांमध्ये जागृत झाली.
यामुळे स्वित्झर्लंडमधील पर्यटनास मोठी चालना मिळाली. गेल्या वर्षी सुमारे ३.२६ लाख भारतीय स्वित्झर्लंडला पर्यटक म्हणून गेले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा