समलैंगिकता गुन्हा नाही: सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
समलैंगिकता गुन्हा नसल्याचा ऐतिहासिक निर्णय ६ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
परस्परसंमतीने ठेवल्या जाणाऱ्या समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणाऱ्या भारतीय दंड विधानाच्या (आयपीसी) कलम ३७७च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना हा निर्णय देण्यात आला.
सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील न्या. आर. एफ. नरीमन, न्या. ए. एम. खानविलकर, न्या. डी. वाय. चंद्रचूड आणि न्या. इंदू मल्होत्रा यांच्या खंडपीठाने हा ऐतिहासिक निकाल दिला.
या निर्णयामुळे मागील १५८ वर्षांपासून अंमलात असलेल्या कलम ३७७ मधील वादग्रस्त समलैंगिक संबंधांना विरोध करणाऱ्या तरतुदी कालबाह्य होणार आहेत.
भारत आणि अमेरिकेदरम्यान टू प्लस टू बैठक
भारत आणि अमेरिकेत ६ सप्टेंबर रोजी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत दोन्ही देशांनी संरक्षणाशी संबंधित सीओएमसीएएसएस करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
या करारामुळे भारताचा अमेरिकेकडून अत्याधुनिक शस्त्रास्त्रे विकत घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दोन्ही देशांचे लष्करी संबंध दृढ करणे आणि आशियातील चीनच्या वाढत्या प्रभावाला आळा घालण्याचा या करारांमागे उद्देश आहे.
अमेरिका आणि भारतामध्ये ‘टू प्लस टू’ची बैठक पार पडली. यापूर्वी दोनवेळा ही बैठक रद्द झाली होती.
अमेरिकेकडून संरक्षण मंत्री जिम मॅटिस, परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पियो तर भारताकडून परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण या बैठकीत सहभागी झाले होते.
दक्षिण आशियात स्थिरता आणि शांतता कशी नांदेल त्या दृष्टीने बैठकीत चर्चा झाली.
भारताचा अण्वस्त्र पुरवठादार गटात (एनएसजी) समावेश करण्याच्या प्रक्रियेला वेग देण्याचाही या बैठकीत निर्णय झाला.
भारतात येण्यापूर्वी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पियो यांनी पाकिस्तानचा दौरा केला. त्यांनी तेथील नवनियुक्त सरकारच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा केली.
ऋतभ्रता मुन्शी यांना रामानुजन पुरस्कार
ऋतभ्रता मुन्शी यांना त्यांच्या नंबर थिअरीवरील संशोधनासाठी यंदाचा रामानुजन पुरस्कार जाहीर झाला आहे.
दी इंटरनॅशनल सेंटर फॉर थिऑरॉटिकल फिजिक्स या संस्थेकडून रामानुजन पुरस्कार दिला जातो. विकसनशील देशातील ४५ वयाखालील संशोधक गणितज्ञांची निवड त्यासाठी केली जाते.
पूर्णाकाचे गुणधर्म हा नंबर थिअरीचा मूळ गाभा आहे. मुन्शी यांनी आधुनिक नंबर थिअरीचा अभ्यास केला आहे.
अमेरिकेच्या प्रिन्स्टन विद्यापीठातून त्यांनी विद्यावाचस्पतीही पदवी घेतली. नंतर डॉक्टरेटनंतरचे प्रशिक्षण घेऊन ते भारतात परतले.
सध्या ते कोलकात्याच्या इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट या संस्थेत कार्यरत आहेत. त्यांनी नंबर थिअरी व गणितीय भूमितीची सांगड घातली आहे.
२०१७मध्ये त्यांना इन्फोसिस सायन्स फाऊंडेशनचा गणित विज्ञानाचा पुरस्कार मिळाला होता.
याशिवाय इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटचे सुवर्णपदक, बिर्ला सायन्स प्राइझ, शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांनी पटकावले आहेत.
तेलंगणामध्ये विधानसभा बरखास्त
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतला असून मुख्यमंत्रिपदाचाही राजीनामा दिला आहे.
मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर राव यांनी राज्यपाल ईएसएल नरसिंहन यांच्याकडे राज्याची विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस केली.
राज्यपालांनीही मुख्यमंत्र्यांचा राजीनामा स्वीकारला असून, राज्याची विधानसभा बरखास्त केली आहे. त्यामुळे तेलंगणामध्ये लवकरच मुदतपूर्व निवडणुका होणार आहेत.
नव्याने अस्तित्वात आलेल्या तेलंगाणा राज्यामध्ये २०१४मध्ये पहिल्यांदाच विधानसभेसाठी निवडणूक झाली होती.
तेलंगणा विधानसभेची मुदत २०१९मध्ये संपणार असून, विधानसभा आणि लोकसभेसाठी एकत्रच निवडणूक होणे नियोजित होते.
मात्र राज्यातील राजकीय समिकरणांचा विचार करून विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय चंद्रशेखर राव आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने घेतला.
११९ सदस्यांच्या तेलंगणा विधानसभेमध्ये सध्या तेलंगणाराष्ट्र समितीचे (टीआरएस) ९० सदस्य असून, विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे १३ तर भाजपाचे पाच सदस्य आहेत.
काझिंद २०१८: भारत-कझाकस्तान संयुक्त युद्धसराव
कझाकस्तानच्या ओतार भागात १० ते २३ सप्टेंबर दरम्यान ‘काझिंद २०१८’ (KAZIND) या भारत आणि कझाकस्तान देशांच्या संयुक्त लष्करी युद्धसरावाचे आयोजन करण्यात येणार आहे.
या दोन्ही देशांमधील ही तिसरा संयुक्त युद्धसराव आहे. या लष्करी सरावाची दुसरी आवृत्ती २०१७मध्ये भारतात आयोजित करण्यात आली होती.
या युद्धप्रणालीचा मुख्य उद्देश दोन्ही देशांमधील कौशल्य आणि अनुभवांची देवाणघेवाण करणे आहे. तसेच या युद्ध सरावामुळे दोन्ही देशांमधील लष्करी संबंध मजबूत होतील.
सिंगापूरमध्ये ६वी पूर्व आशिया शिखर परिषद
६व्या पूर्व आशिया शिखर परिषदेचे आणि आसियान संघटनेच्या आर्थिक मंत्र्यांच्या बैठकीचे सिंगापूरमध्ये १ सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले. सिंगापूर देश आसियानचा विद्यमान अध्यक्ष आहे.
पूर्व आशिया शिखर परिषदेमध्ये १० आसियान देश तसेच ऑस्ट्रेलिया, चीन, भारत, जपान, कोरिया, न्यूझीलंड, रशिया आणि अमेरिका या ८ देशांनी भाग घेतला.
या बैठकीत, डिजिटल अर्थव्यवस्था आणि ग्लोबल व्हॅल्यु चेन यांचे आर्थिक विकासातील योगदान यावर चर्चा झाली.
तसेच नोव्हेंबर २०१८मध्ये मलेशियातील क्वालालंपूर येथे आसियान-भारत व्यापार परिषदेचे आयोजन करण्याचा निर्णयही घेण्यात आला.
पूर्व आशिया शिखर परिषदेनंतर भारत-आसियान आर्थिक मंत्र्यांची १५वी बैठक आयोजित करण्यात आली होती.
सिंगापूरचे व्यापार व उद्योग मंत्री चान चुन सिंग आणि भारताचे वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
या बैठकीत १० आसियान देश सहभागी झाले. यात भारत-आसियानच्या सध्याच्या आर्थिक आणि व्यवसायिक बाबींची चर्चा झाली.
२०१७-१८मध्ये आसियान आसियान भारताचा दुसरा सर्वात मोठा द्विपक्षीय व्यापारी भागीदार होता. भारत व आसियान दरम्यान २०१७-१८मध्ये ८१.३३ अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला.
आंतरराष्ट्रीय महिला उद्योजक परिषद २०१८
आंतरराष्ट्रीय महिला उद्योजक परिषद २०१८ नेपाळची राजधानी काठमांडू येथे ३ ते ५ सप्टेंबर २०१८ रोजी आयोजित करण्यात आली होती.
या परिषदेचे उद्घाटन नेपाळचे उपराष्ट्रपती नंद बहादूर पुन यांनी केले. 'Equality begins with Economic Empowerment' हा या परिषदेचा मुख्य विषय होता.
दक्षिण आशियाई महिला विकास मंचकडून (SAWDF) या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
यशस्वी व आघाडीच्या महिला व्यावसायिक, आंतरराष्ट्रीय सेवा प्रदाते, संसाधन संस्था, विशेषज्ञ, सरकारी प्रतिनिधी यांना एकत्र आणून, चर्चा आणि सहकार्याद्वारे आर्थिक परिवर्तन घडविण्यावर लक्ष केंद्रित करणे हे या परिषदेचे मुख्य उद्दिष्ट होते.
या परिषदेमध्ये सार्क, आसियान, युरोपियन युनियन, आफ्रिका, अरब देश आणि चीनमधील प्रतिनिधी सहभागी झाले होते.
सौरभ चौधरीला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक
भारताचा १६ वर्षीय नेमबाज सौरभ चौधरीने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या १० मीटर एअर पिस्तुल कनिष्ठ गटात विश्वविक्रमाची नोंद करताना सुवर्णपदक जिंकले.
त्याने २४५.५ गुणांची कमाई करताना विश्वविक्रम नोंदवला. याच गटात भारताच्या अर्जुन सिंग चिमाने कांस्यपदक जिंकले
जकार्ता येथे पार पडलेल्या आशियाई स्पर्धेत सौरभने १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात भारताला सुवर्णपदक जिंकून दिले होते.
त्याने जर्मनी येथे झालेल्या कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेत बाजी मारताना विश्वविक्रम केला होता आणि तो विक्रम त्याने मोडला.
याशिवाय दिव्यांश सिंग पनवार आणि श्रेया अगरवाल यांनी आयएसएसएफ जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेच्या १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक कनिष्ठ गटात कांस्यपदकाची कमाई केली.
२०२०मध्ये होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धा ही पहिली थेट पात्रता स्पर्धा आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा