चालू घडामोडी : ४ सप्टेंबर

अपूर्वी चंदेला आणि अंजुम मुदगिल टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र

  • भारताच्या नेमबाज अपूर्वी चंदेला आणि अंजुम मुदगिल यांनी टोकियोमध्ये (जपान) २०२०साली होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता मिळवण्यात यश मिळवले आहे.
  • जागतिक नेमबाजी स्पर्धेत अंजुमने द्वितीय स्थानासह रौप्यपदक, तर अपूर्वीने चौथे स्थान पटकावत ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता मिळवली.
  • या दोघींनी आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाच्या (आयएसएसएफ) जागतिक चॅम्पियनशिपच्या १० मीटर रायफलच्या प्रकारात हे यश पटकावले आहे.
  • या स्पर्धेत अंजुमने २४८.४ गुणांची कमाई करीत रौप्यपदक पटकावले. तर अपूर्वी चंदेलाला २०७ गुण मिळवत चौथ्या स्थान पटकावले.
  • कोरियाच्या हॅना इम हिने २५१.१ गुणांसह सुवर्णपदक, तर कोरियाच्याच इनुहेआ जुंग हिने २२८ गुणांसह कांस्यपदक पटकावले.
  • टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता ठरलेल्या अंजूम आणि अपूर्वी या भारताच्या पहिल्या दोन नेमबाज ठरल्या आहेत.
  • नियमानुसार निवड चाचणी आणि विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील सर्व नेमबाजांची कामगिरी लक्षात घेऊन ऑलिम्पिकमध्ये कोणाला पाठवायचे याचा अंतिम निर्णय भारतीय राष्ट्रीय रायफल संघटना घेणार आहे.
  • टोकियोतील स्पर्धेसाठी पात्रता मिळवण्यासाठीची आयएसएसएफची ही पहिलीच नेमबाजी स्पर्धा होती.

रॅपिड ट्रायडंट : युक्रेन, अमेरिका व इतर नाटो देशांचा युद्धसराव

  • युक्रेन देशाने २ ते १५ सप्टेंबर दरम्यान अमेरिका व ‘नाटो’ संघटनेच्या अन्य देशांसह रॅपिड ट्रायडंट (Rapid Trident) या संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन केले आहे.
  • हायब्रीड युद्धातील सशस्त्र हल्ल्यांचा प्रतिकार करण्याचा सराव करणे, हा या युद्धाभ्यासाचा प्रमुख उद्देश आहे.
  • ब्रिटन, कॅनडा, जॉर्जिया, तुर्की, पोलंड आणि जर्मनी यासह १४ देशांमधील सुमारे २२०० अनुभवी सैनिक या सरावात सहभाग घेणार आहेत.
  • या सरावादरम्यान सशस्त्र वाहने, विमानांची पथके तसेच ३५०हुन अधिक लष्करी साहित्याचा वापर करण्यात येणार आहे.
 नाटो (NATO) 
  • NATO: नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन
  • ही जगातील २९ देशांचा सहभाग असलेली एक लष्करी संघटना आहे. तिची स्थापना ४ एप्रिल १९४९ रोजी १२ राष्ट्रांनी केली.
  • नाटोचे १२ संस्थापक देश: ग्रेट ब्रिटन, फ्रांस, नेदरलँड्‌स, बेल्जियम, लक्सेंबर्ग, नॉर्वे, डेन्मार्क, आइसलँड, इटली, पोर्तुगाल, अमेरिका व कॅनडा.
  • नाटोचे मुख्यालय बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स येथे आहे. २०१७मध्ये माँटेनेग्रो हा देश नाटो मध्ये सहभागी होऊन नाटोची सदस्य संख्या २९ झाली आहे.
  • उत्तर अटलांटिक प्रदेशातील राष्ट्रांमध्ये राजकीय स्वातंत्र्य, समान संस्कृती व आर्थिक स्थैर्य निर्माण करून सहकार्याच्या तत्वाचा प्रसार करणे व त्यासाठी आक्रमकांचा सामुदायिक प्रतिकार करणे व सभासद राष्ट्रांना संरक्षण देणे, या गोष्टी नाटोच्या सर्व सभासद राष्ट्रांवर बंधकारक आहेत.

गंगा नदी जगातील सर्वात संकटग्रस्त नद्यांपैकी एक

  • वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचरच्या (डब्ल्यूडब्ल्यूएफ) अहवालानुसार, गंगा ही नदी जगातील सर्वात संकटग्रस्त नद्यांपैकी एक आहे.
  • प्रदुषणामुळे गंगा नदीची अवस्था अतिशय वाईट आहे. गंगा नदी ऋषिकेशपासूनच प्रदुषणाच्या विळख्यात सापडली आहे.
  • गंगा नदी ज्या भागातून वाहते, त्या भागातील बहुतांश ठिकाणी शौचालयांची स्थिती दयनीय आहे. अनेक ठिकाणी लोक उघड्यावर शौचास जातात. यामुळे नदी प्रदूषित होते.
  • कानपूरपासून ४०० किमी अंतरावर गंगा सर्वाधिक प्रदूषित आहे. गंगा नदीच्या किनाऱ्यांवर अनेक वीजनिर्मिती प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमधील रसायनयुक्त पाणी थेट नदीत सोडले जाते.
  • याशिवाय अनेक कारखान्यांमधील प्रदूषित पाणी कोणत्याही प्रक्रियेशिवाय थेट नदीत सोडले जाते. त्यामुळे गंगा नदी प्रचंड प्रदूषित झाली आहे.
  • गंगा नदी उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगालमधून वाहते. या सर्वच राज्यांमध्ये नदीची स्थिती अतिशय वाईट आहे.
  • केंद्र सरकारकडून नमामि गंगे या उपक्रमातून गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. मात्र तरीही गंगा नदीची परिस्थिती बदलेली नाही.
  • देशात २०७१ किमी लांबीची गंगा नदी उत्तराखंडमध्ये उगम पावते आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते.
  • ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या गंगा नदीमुळे १० लाख चौरस किमी क्षेत्रात शेती केली जाते.
 वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर 
  • वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर (डब्ल्यूडब्ल्यूएफ) ही स्थानिक पातळीपासून ते जागतिक पातळीवर निसर्ग संवर्धनासाठी गेल्या ६० वर्षांपासून काम करणारी एक आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था आहे.
  • या संस्थेची स्थापना २९ एप्रिल १९६१ रोजी करण्यात आली. या संस्थेचे मुख्यालय स्वित्झर्लंडमध्ये असून, ही संस्था पूर्वी वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड या नावाने ओळखली जात होती.
  • डब्ल्यूडब्ल्यूएफ जवळपास १०० देशांमध्ये वन संवर्धन, सागरीय जीवांचं संवर्धन, जल संवर्धन, वन्यजीव संवर्धन, अन्नसुरक्षा, हवामान बदल यावर काम करते.

राम सुतार उभारणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक

  • दादरच्या चैत्यभूमीजवळील इंदू मिलच्या जागेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने प्रसिद्ध मूर्तिकार पद्मश्री राम सुतार यांच्यावर सोपवली आहे.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा जगातील सर्वांत उंच पुतळा असेल. त्याची उंची सुमारे ३५० फूट असणार आहे.
  • इंदु मिलच्या १२.४ एकर जमिनीवर ४२५ कोटी रुपये खर्च करून आंबेडकरांचे स्मारक उभारण्यात येत आहे. २०१५मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्मारकाचे भूमिपूजन केले होते.
  • ही जमीन पूर्वी केंद्र सरकारच्या ताब्यात होती. गेल्यावर्षी केंद्र सरकारने ही जमीन महाराष्ट्र सरकारला हस्तांतरित केली.
  • अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक आणि गुजरातमधली सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारण्याचेही काम राम सुतारच पाहत आहेत.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या चेअरमनपदी एहसान मणी

  • आंतराष्ट्रीय क्रिकेट समितीचे (आयसीसी) माजी अध्यक्ष एहसान मणी यांची ३ वर्षांसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या चेअरमनपदी निवड झाली आहे.
  • आतापर्यंत या पदावर नजाम सेठी विराजमान होते. २१ ऑगस्टला त्यांनी आपला पदभार सोडला.
  • पेशाने लेखापरीक्षक (सीए) असलेल्या मणी यांना प्रशासकीय कामकाजाचा अनुभव असल्याने त्यांना या पदी नियुक्त करण्यात आले आहे.
  • १९८९ ते १९९६ या काळात त्यांनी पाकिस्तानचे आयसीसीमध्ये प्रतिनिधित्व केले. त्यानंतर २००३साली त्यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा